-----------लघुकथा----------- ---------------------------------------- !! *पश्चाताप* !! *प्रा.डॉ.नरेश इंगळे* मु.भांबोरा ता.तिवसा जि. अमरावती.. उन्हाळ्याचे दिवस.धगधगत्या अन कडक उन्हामुळे लोक दुपारच्या वेळेत थंड गारव्यात विसावा घेत होते.अशातच मी जयंत च्या घरी गेलो. जयंत घरी एकटाच विचारमग्न होता.मी तिथे आलो आहे याबाबतीत त्याला पुसटशीही कल्पना आली नाही.तो अगदी विचार प्रवाहात वाहून गेला होता. कडक उन्हाची वेळ असल्याने नुकताच तो शेतातून घरी आला होता.हातपाय न धुता तो ओसरीमध्ये एकटाच बसला होता.त्यांच्या अंगावरून भराभर घाम वाहत होता. तरीही तो विचारमग्नच.अचानक मी त्याची शांतता भंग केली आणि सहज प्रश्न केला की, काय साहेब कशाचा विचार करता?अगदी बेहोश माणूस जसा अचानक शुद्धीवर येतो तसाच जयंत शुद्धीवर आला व स्वतः ला सावरत केविलवाण्या स्वरात म्हणाला,कशाचा विचार करतो,काही नाही केलेल्या कर्माची फळे भोगतोय. त्याच्या अशा बोलण्याने मी अवाक झालो.कर्माची फळे, तुमच्या सारखा खुशाल चेंडू माणूस आणि त्यातही आर्थिक संपन्न तसेच खूप सुखी,समाधानी-आनंदी असलेल्या ज...