*जागतिकीकरण आणि भारतीय कृषीक्षेत्र* ------------------------------------ प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे मु.भांबोरा ता.तिवसा जि.अमरावती. मोबा.९९७०९९१४६४ ------------------------------------ दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था मोडकळीस आल्या होत्या.अर्थव्यवस्थेची पुनर्बांधणी आणि उर्जितावस्था प्रदान करण्याचे आवाहन जगातील सर्वच देशासमोर होते.त्याच दरम्यान मुक्त व्यापार धोरणाचे जोरदार वारे ही वाहू लागले होते.संपूर्ण जगाची एकच अर्थव्यवस्था असावी यासाठी अनेक देश पुढे आली होती. त्यादृष्टीने चर्चासत्रे घडून आलीत.आर्थिक विकासासाठी व्यापार विषयक धोरणे कशी असावीत अर्थात आंतरराष्ट्रीय व्यापारातील समस्या निवारण्यासाठी जगातील प्रमुख देश विचार विनिमयासाठी एकत्रित येऊ लागली होती.त्यातूनच आंतरराष्ट्रीय मुद्रानिधी आणि आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक (जागतिक बँक) या दोन जुळ्या संस्था जन्मास आल्यात.परंतु त्यावेळी अपेक्षित मुक्त व्यापार प्रणाली निर्माण होऊ शकली नाही.तद्नंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी १९४८ मध्ये प्रशुल...