स्त्री मनाचा वेध घेणारी कविता :- " मुक्त श्वासाच्या शोधात " ---------------------------------------- प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे मु.भांबोरा ता.तिवसा जिल्हा अमरावती मोबाईल :- ९९७०९९१४६४ --------------------------------------- साहित्य हा मानवी जीवनाचा आरसा आहे.साहित्यकृतीच्या माध्यमातून मानवी जीवनाचे अनेकविध पैलू प्रतिबिंबित होतात.त्यात मनुष्य आणि मानवी समूहाचे विविधांगी चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला जातो. साहित्यातून स्त्रीवादी जाणिवाही जिवंत केल्या जातात.जुन्या साहित्य प्रकारातील लोकगीतात, लोकसाहित्यात,संतसाहित्यात, आदिवासी साहित्यात आणि तदनंतरच्या काळातील आंबेडकरी साहित्यात स्त्रियांच्या सुखदुःखांचे अनेक पदर उलगडले आहेत.एनकेन प्रकारे बंदिस्त असलेली स्त्री कोणत्या उंबरठ्यावर उभी आहेत यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि केला जात आहे.१९७० चे दशकात आणि त्यानंतरच्या काळात स्त्रीवादी साहित्याचा प्रवाह हा कथा,कादंबऱ्या आणि काव्यात प्रगल्भपणे प्रतिबिंबित झालेला आहे आणि स्त्रीवादी जाणीवाचीही जोरकसपणे सुरुवात झालेली दिसतय.एकंदरीत स्त्रियांचे स्त...