Skip to main content

आंबेडकरी चळवळीकडे एक:दृष्टीक्षेप


*आंबेडकरी चळवळीकडे दृष्टिक्षेप*
-------------------------------------------
*प्रा.नरेश शं.इंगळे*
भांबोरा, जिल्हा अमरावती.
-------------------------------------------
         दारिद्र्याच्या गर्तेत अन गुलामगिरीच्या जोखडात अडकलेल्या दलित-आदिवासी व संपूर्ण बहुजन समाजाच्या उद्धाराकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत लढा दिला.त्यातुनच डॉ.आंबेडकरांच्या चळवळीची ज्योत तेवत ठेवण्याच्या दृष्टीने आंबेडकरी चळवळ उदयास आली.परंतु ज्या जोमाने, आत्मविश्वासाने हा लढा उभारला त्या गतीने त्यांचा लढा त्यांच्याच अनुयायांनी अवरुद्ध करीत आंबेडकरी चळवळीची वाताहात करण्यास कुणीच मागे पुढे पाहिले नाही.डॉ.आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर आंबेडकरी चळवळ का भरकटली यावर विचार मंथन करणे काळाची गरज आहे.
       ज्या समाज सुधारकांनी समाजाच्या उद्धाराकरीता लढा उभारला त्यात महात्मा फुले व छत्रपती शाहू महाराज यांचा अग्रक्रमाने विचार करावा लागेल. त्याचाच वारसा अर्थात आदर्श दृष्टिपटलावर ठेवून डॉ. आंबेडकरांनी दलित,शोषित, आदिवासी आणि बहुजन समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात बंड पुकारले होते.कारण मनुवादी समाज रचनेत  उच्चवर्णीय समाज मानाचे जीवन जगतो तर दुसरीकडे दलित,आदिवासी, शोषित,श्रमिक वर्ग हीनतेचे,निम्म दर्जाचे जीवन जगत असून पूर्वीपासून या वर्गाचे स्वातंत्र्य व त्यांचे हक्क हिरावल्या गेले होते.
वेठबिगारी आणि गुलामगिरीचे जीवन जगण्याचे एक प्रकारचे ओझे त्यांच्या खांद्यावर पडले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.दलित समाज स्वातंत्र्यापासून कोसो दूर ठेवला गेला.एवढेच काय तर त्यांना उच्चवर्णीयांच्या सड्यावर उभे राहण्यास सुद्धा मनाई होती.दलित वर्गाला मानवी अन्याय-अत्याचार मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत असे.अशा जुलमी व्यवस्थेपासून दलित,आदीवासी,अल्पसंख्यांक समाजाला स्वाभिमानाने जीवन जगता यावे या उदात्त हेतूने डॉ.आंबेडकरांनी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करून  सामाजिक,आर्थिक,धार्मिक तथा राजकीय बदल घडवून आणण्याचा निकराने प्रयत्न केला.समाजाला नवी दृष्टी, नवे वळण तथा दिशा दिली.यातूनच एक मोठा आंबेडकरी समाज विचारप्रवाह निर्माण झाला.पण डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर आंबेडकरी चळवळीकडे एक दृष्टिक्षेप टाकला असता बाबासाहेबांचा अपेक्षाभंग झाल्यासारखा वाटतो. कारण स्वातंत्र्यच्या ५५ वर्षाच्या कालखंडात आंबेडकरी चळवळ ज्या गतीने पुढे जायला पाहिजे होती त्या गतीने गेलेली दिसत नाही.आंबेडकरी समाजाला दिशादर्शक नेतृत्वाअभावी विखुरला जाऊन समाज दुरापास्त होत असल्याची जाणीव होत असून  बहुतांश जनता दारिद्र्याचे जीवन जगत आहे.त्यांच्यात वैचारिक,सामाजिक,राजकीय जागृतीचा अभाव जाणवत असून तो दिशाहिन मार्गाने भटकत आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना हेच अपेक्षित होते का?याचे फुले-आंबेडकरी चळवळीतील विचार तज्ञ आणि राजकीय नेत्यांनी चिंतन आणि आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.याशिवाय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपेक्षाभंग करण्यास कोण कारणीभूत आहे याचाही पाठपुरावा करणे काळाची गरज आहे.
      आजपर्यंत दलित समाज दिशाहीन मार्गाने भटकंती करीत आहे.याला कारणीभूत समाजातील संधीसाधू राजकीय नेते,बुद्धिजीवी वर्ग तथा विचारवंत (काही अपवाद) कारणीभूत समजल्यास नवल वाटण्याचे कारण नाही.समाजाचे नेतृत्व करणारे नेते मंडळी आपसात भांडतात आणि याचा पुरेपूर फायदा धर्मांध शक्ती घेत आहे.असे जर झाले नसते तर डॉ.आंबेडकर यांच्या कल्पनेतील *रिपाई* हा पक्ष भारतात तिसरी प्रमुख शक्ती म्हणून उदयास वेळ लागला नसता.तरीपण धर्मांध शक्तीच्या राजवटीत होत असलेल्या अन्यायी धोरणाला कंटाळून आपल्या हक्काचे रक्षण व्हावे व विरोधकांना आपली शक्ती दाखविण्यासाठी *रिपाई* एकिकरणाचा प्रयत्न केला जातो.परंतु नेत्याच्या फुटीर व व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेमुळे एकीकरण नेहमीच अल्पायुषी ठरते.त्यामुळे नेत्यांच्या फुटीर वृत्तीमुळे,संधीसाधू पणामुळे आंबेडकरी जनता वेळोवेळी राजकीय प्रवाहात विखुरल्या गेली आणि जात आहे.राजकीय नेते आपल्या सोयीसाठी पक्षाच्या मूळ उद्देशाला बगल देत असल्याचे लक्षात येते.कारण रिपाई हा पक्ष असला तरी राजकारण हे एकमेव या पक्षाचे धोरण नाही.म्हणजेच राजकारण एवढेच कार्यक्षेत्र असा संकुचित विचार ठेवू नये.रिपाई ज्या लोकांचे प्रतिनिधित्व करीत आहे त्या लोकांच्या सामाजिक,आर्थिक आणि इतर समस्या वेगळ्या स्वरूपाचे असल्याने केवळ राजकारणाने त्यांचे निरसन होणार नाही तर समाजकारण व अर्थकारण याची जोड देणे आवश्यक आहे.
      वेगवेगळ्या राजकीय प्रवाहात काही लोक,मंडळी कार्यकर्ते, बुद्धिजीवी वर्ग मोठ्या अभिमानाने वावरत आहे.याबाबत आंबेडकरी समाजातील लोकांचे काही वावडे नाही.पण आंबेडकरी चळवळीला दाबण्याचा तथा समाजाला दूर ठेवून अस्पृश्यतेची वागणूक देणाऱ्या राजकीय पक्षात राहून समाजाचे हित साध्य होणार का? कधी असा प्रयत्न तरी केल्या जाते का? नव्हे! आंबेडकरी भाषा वापरून अप्रत्यक्षरित्या आंबेडकरी चळवळीवर आघात करणाऱ्या राजकीय प्रवाहात राहून एक प्रकारचा चळवळीला दाबण्याचा प्रयत्न होत आहे असा भास होऊन सुद्धा काही मंडळी मोठ्या ऐटीने वावरत आहे,असे का होत आहे याचा विचार होणे आवश्यक आहे.डॉ.आंबेडकरांनी विषमतावादी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला.तेव्हा केवळ धर्मांतरच अपेक्षित नव्हते तर त्यांना एक आदर्श समाज निर्माण करावयाचा होता.दुर्दैवाने असे म्हणन्यास वेळ येत आहे की;खरोखरच डॉ. आंबेडकरांचे स्वप्न साकार झाले आहे का? जर तसे होत नसेल तर त्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न तरी केल्या जात आहे काय? काही प्रमाणात याचे उत्तर नकारार्थीच मिळेल.
       आज आंबेडकरी समाज दारिद्र्याचे आणि  वेठबिगारीचे जीवन जगत आहे.काहींच्या तर मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण होत नाही.त्यामुळे त्यांच्या सर्वागीण विकासाला खीळ बसलेली आढळते.म्हणूनच आंबेडकरी समाज व्यवस्थेवर बेरोजगारीचे तथा गुन्हेगारीचे प्राबल्य आढळून येत असून यामागे आर्थिक दुर्बलते सोबतच इतरही काही कारणे आढळून येतात.या अत्यंत महत्त्वपूर्ण समस्येकडे विशेष लक्ष दिले गेले जात नसून आजही दुर्लक्ष होत असल्याचे जाणवत आहे.अशाच प्रकारचे दूर्लक्ष होत गेले तर याचे गंभीर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.या प्रश्नाकडे वेळीच गंभीरतेने लक्ष केंद्रित झाले तरच आंबेडकरी समाज स्वयंपूर्णतेकडे शिखर गाठण्यास तथा वाटचाल करण्यास तत्पर होईल. खाजगीकरण जागतिकीकरणांच्या  स्थितीत अशी काळाची गरज आहे.
       दलित समाजातील काही युवावर्ग प्रेरक आणि दिशादर्शक नेतृत्वाअभावी चळवळी पासून दूर जात आहे.युवावर्ग असा का भटकतो.याची कारणमीमांसा करणे काळाची गरज आहे.दलित समाजातील मान्यवर मंडळी सवलतीच्या,तरतुदीचा फायदा घेऊन मोठमोठ्या पदव्या संपादन करून उच्चशिक्षित होत आहे. चतुर्थश्रेणी पासून तर सर्वोच्च श्रेणी पर्यंत नोकऱ्या हस्तगत करीत आहे.याचा परिणाम त्यांची आर्थिक बाजू बळकट होण्यास मदत होत आहे.पण ज्यांच्या भरवशावर सुशिक्षित म्हणून गौरवाचे स्थान प्राप्त करीत आहे. मोठमोठ्या नोकऱ्या मिळवित आहे,आर्थिक बाजू सुदृढ करीत आहे त्यांच्याच समाजाला हेच लोक (काही अपवाद) बेईमानी करीत असल्याचे प्रकर्षाने जाणवते.आंबेडकरी चळवळीला वेळ म्हणजे फालतू कामाला वेळ, अशी त्यांची भावना झालेली दिसत आहे.आंबेडकरी चळवळीस योगदान,सहभाग देण्यास तर वेळ नाही पण समाजाला जवळ करण्यास किंवा मदतीचा हात देण्यास सुद्धा तयार नसल्याचे चित्र पाहावयास मिळते.एक प्रकारे आंबेडकरी समाजात सुद्धा वर्गवाद निर्माण होण्याची भीती नाकारता येणार नाही.असे काही सुशिक्षित मंडळी व ज्यांनी ज्यांनी आपली आर्थिक बाजू बळकट करून घेतली त्यावरून सहज लक्षात येते. त्याचप्रमाणे सवलतीचा,तरतुदीचा फायदा घेतला, आर्थिक बाजू सुदृढ करून घेतली पण त्याच वेळी स्वतः धनाढ्य तथा शिक्षित समजणारी हेकेखोर मंडळी समाजापासून दूर जाण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न करण्यात मागेपुढे पाहत नाही.दलित,शोषित, आदिवासी व अल्पसंख्यांक बांधवांना का विसरत आहे याचे कोडे निर्माण झाल्यासारखे वाटते.यावरून आंबेडकरी चळवळ तथा समाजाविषयी तळमळता आत्मीयतेच्या भावनेचा अभाव का? यावरून आंबेडकरी चळवळ गतिमान होण्याच्या दृष्टीने निर्णायक भूमिका कशी निभावणार? एकंदरीत आंबेडकरी चळवळीत उदासीनतेचे चित्र दिसत आहे असे मोठ्या दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.
       जातीयवादी व धर्मांध शक्ती आंबेडकरी चळवळीवर, विचार प्रवाहावर अप्रत्यक्षरीत्या तर काही प्रमाणात प्रत्यक्षरीत्या चौफेर हल्ला करीत आहे.याचा प्रतिकार करण्याच्या दृष्टीने आपल्यातच एकतेचा अभाव दिसत आहे.म्हणूनच जातीयवादी शक्ती प्रबळ रूप धारण करीत असल्याचे काही उदाहरणावरून सहज लक्षात येते.११ मे म्हणजे बुद्ध जयंतीच्या दिवशी घेतलेली अनुचाचणी,६ डिसेंबर अर्थात डॉ.आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी उद्ध्वस्त केलेली बाबरी मज्जिद, अरुण शौरी सारख्या कमकुवत बुद्धीच्या माणसाने बाबासाहेबांच्या विचारावर केलेली चिखलफेक, घटना समितीच्या पुनरालोकनाच्या माध्यमातून घटना बदलविण्याचे षड्यंत्र, मुंबईच्या रमाबाई आंबेडकर नगरातील प्रकरण असे एक ना अनेक बाबी त्याचे घोतक आहे. अर्थात अशा घटना वरून आंबेडकरी चळवळ चळवळीवर होणाऱ्या आक्रमणाची परिणामकारकता लक्षात येते.
      जातीयवादयाचे हल्ले परतून लावण्याच्या दृष्टीने आंबेडकरी चळवळीत एकता असणे अगदी महत्त्वाचे आहे.पण ऐकतेचाच अभाव प्रकर्षाने जाणवते.म्हणूनच आंबेडकरी समाजाला योग्य दिशा देण्याच्या दृष्टीने एकता असणे काळाची गरज आहे.डॉ.आंबेडकरांनी सामाजिक परिवर्तन अर्थात सामाजिक समता प्रस्तापित करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.यातूनच त्यांनी विषमतावादी धर्माचा त्याग करीत समतावादी बौद्ध धम्माचा स्वीकार केला.परंतु समतेचा मंत्र देण्याचा याच धर्मात तथाकथित पोटजातीचे खुळ उखरून सामाजिक विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. लाळवाण, बावणी, सोमस आंधवन आदी जातीमध्ये आमचीच पोट जात श्रेष्ठ असल्याची टेंबी मिरवीत समतेला सुरुंग लावण्याचे स्वकियाकडूनच प्रयत्न केले जाते ते कितपत योग्य आहे यावर विचार मंथन करण्याची खरी गरज आहे. एकंदरीत समाजातील (चळवळीतील) सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक तथा राजकीय व इतर समस्या कडे एकविसाव्या शतकातही समाजातील नेत्यांनी,बुद्धीजीवी वर्गांनी, विचारवंतांनी तथा सामाजिक कार्यकर्त्यांनी ही आव्हाने स्वीकारून याकडे जर वेळीच लक्ष केंद्रित केले नाही तर आंबेडकरी चळवळ-------- याला दोषी आपणच ठरणार आहे.
----------------------------------------
*प्रा.नरेश शं. इंगळे*
मु.भांबोरा अमरावती
----------------------------------------
*संग्रहित लेख*
       सदर लेख हा संग्रहित लेख असून
१)"सा.जबरमार -भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांक १९९८" अमरावती  १४ एप्रिल १९९८,
२) दैनिक विदर्भ मतदार दिनांक १३ फेब्रुवारी २००१
३) मासिक भीमनायक, मे २००६,पृ. क्र.६ इत्यादी मध्ये
  प्रसिद्ध झालेला आहे



Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...

संत गाडगेबाबा आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील ऋणानुबंध

*संत गाडगे बाबा आणि डॉ.आंबेडकर यांच्यातील ऋणानुबंध* ---------------------------------------- *प्रा.डॉ.नरेश शं. इंगळे* मु.भांबोरा ता.तिवसा,जि.अमरावती. भ्रमणध्वनी-९९७०९९१४६४ ----------------------------------------         विसाव्या शतकातील सामाजिक सुधारणेच्या कार्यात/आंदोलनात ज्या महापुरुषांचा उल्लेखनिय व महत्वपूर्ण सहभाग होता त्यात लोकसंत,कर्मयोगी, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा आणि युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. दीनदलित,पीडित,वंचित आणि दुःखीताच्या कल्याणासाठी या दोन्ही बाबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.त्यासाठी त्यांनी प्रबोधन केले,लढे दिले,आंदोलने केलीत.बळकट असलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था मोडीत काढणे आणि सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करणे हे त्यांच्या कार्याचे प्रमुख ध्येय आणि उद्दिष्ट होते.कीर्तन हे गाडगे बाबाच्या जन प्रबोधनाचे प्रमुख माध्यम तर डॉ.आंबेडकर यांनी सामाजिक,राजकीय आंदोलनाच्या माध्यमातून हे कार्य आरंभले होते.त्यांच्या कार्याची दिशा आणि ध्येय समान होते.संत गाडगेबाबा हे डॉ.आंबे...