Skip to main content

रिपाई एकसंघ राहणे काळाची गरज

*रिपाई एक संघ राहणे काळाची गरज*

--------------------------------------------
*नरेशकुमार शं. इंगळे*
मु.भांबोरा, ता.तिवसा, जि. अमरावती.
------------------------------------------
       क्रांतीसुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हयात असेपर्यंत दलितांच्या उद्धारासाठी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष केला.दलित,शोषित,श्रमिक वर्गाला स्वामीमानाने आणि संयमाने जगण्यात शिकविले. यासाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष केला.दलित, शोषित,अस्पृश्य समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. याकरिता लढे,आंदोलने उभारलीत.शिका!संघटित व्हा!! आणि संघर्ष करा!!! हा मंत्र देऊन हक्काची जाणीव करून दिली.शब्दाच्या ज्वाला पेटविल्या. सामाजिक,आर्थिक,धार्मिक, सांस्कृतिक तथा राजकीय शोषणाविरुद्ध लढण्यासाठी सिंहाचे बळ दिले."अन्याय करने वाले से,अन्याय सहने वाला जादा दोषी होता है"या मंत्राने दलितांना होणाऱ्या शोषणाची जाणीव करून दिली.यातूनच एका नव्या परिवर्तनशील दलित चळवळ उदयास यावी असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यदिव्य स्वप्न असावे.पण बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर दलित चळवळीला खीळ बसून ज्या गतीने आंबेडकरी चळवळ उदयास यायला पाहिजे होती त्या प्रमाणात आलेली दिसत नाही असे म्हटलयास अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही,हेच खरे आपले दुर्दैव आहे.
         दलित,शोषित वर्गांचा सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक, आर्थिक,राजकीय विकास घडवून आणण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर म्हणजे ३ ऑक्टोबर १९५७ ला डॉ.आंबेडकरांच्या सहकाऱ्यांनी/ अनुयायांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली.ज्या हेतूने रिपाई ची स्थापना झाली होती त्या रिपाईची नेत्यांच्या स्वार्थी वृत्तीमुळे रिपाईत फुटीरतेचे बीज रोवल्या गेले.परिणामतःरिपाई हा अनेक गटागटात विभागला गेला. इतकेच नव्हे तर अंतर्गत कलहाला कंटाळून इच्छा नसतानाही काही लोक (युवक) इतर पक्षाच्या आश्रयास गेले,परंतु इतर पक्षात आपले हितसंबंध, अधिकार सुरक्षित ठेवणे कठीण आहे.याची जाणीव सर्वांनाच होती आणि आहे.म्हणूनच दलित-शोषित श्रमीक वर्गाच्या हितरक्षणासाठी रिपाई एकसंघ राहणे आवश्यक आहे.याच पार्श्वभूमीवर रिपाई  एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला.याची परिनिती अनेकदा आपल्याला अनुभवास आली.परंतु स्वार्थी नेत्याच्या "मी"पणाचा वृत्तीमुळे सर्व प्रयत्न असफल ठरत गेले. तरीही आंबेडकरी जनता निराश झाली नाही.पुन्हा रिपाईचे जनतेच्या दबावामुळे ६.६.८९ नंतर पुन्हा ६ डिसें.१९९५ रोजी पुन्हा रिपाईचे  एकत्रीकरण झाले.या प्रयत्नात माजी संरक्षण मंत्री व माजी मुख्यमंत्री शरद पवारांचा सुद्धा सहभाग होता. पार धुव्वा उडवून टाकला,परंतु सरसेनापती खा.प्रा.जोंगेंद्र कवाडे सर,रिपाई बमसचे तथा बहुजनांचे नेते माजी खासदार ऍड प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या काँग्रेस विरोधी भूमिकेमूळे काँग्रेस ला फायदा झाला नाही. पण १९९८ च्या लोकसभेच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसला पुनर्जीवित होण्यास मदत मिळाली कारण रिपाईत अनेकदा एकीकरण झाले असले तरी ते अल्पायुषी ठरले. हे सर्वज्ञात आहे.पण लोकसभा निवडणुकीपूर्वी घडून आलेले एकीकरण हे त्यास अपवाद म्हणता येणार नव्हते.पण निवडणूक कालखंडात मात्र नेत्यात परस्परविरोधी भूमिका असून सुद्धा रिपाई जनतेत खऱ्या अर्थाने ऐक्य घडून आल्याचे दिसले हे सत्य नाकारता येत नाही.याची कल्पना मागील (१९९८) लोकसभेच्या निवडणूक निकालावरून सहज लक्षात येते. रिपाई जनतेचा तसेच नेत्याच्या ऐक्यामुळे महाराष्ट्रात नवा इतिहास घडविला असे विरोधकांनी सुद्धा मान्य केल्याचे सर्वज्ञात आहे.ह्या अभूतपूर्व यशाचे श्रेय प्रत्येक गटाचा नेता आपल्यामुळेच हे घडून आल्याचे बोलत असून रिपाई जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.म्हणूनच दलित,शोषित,श्रमिक वर्गांचे हितसंबंध,अधिकार आणि रिपाईचे ध्येय धोरणाकडे डोळेझाक करून नेतृत्ववाद निर्माण करून जनतेला संभ्रमात टाकून आपली राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करीत असावे. असे जर नसते तर रिपाईचा वाद चव्हाट्यावर आला नसता कारण रिपाई नेतृत्वाचा अंतर्गत वाद करून दुसऱ्यांना आपल्या घराकडे बोट दाखवू नये अशी जनतेची तळमळ, मनस्वी अपेक्षा असताना हा वाद कशासाठी?रिपाईत अशाच प्रकारे  नेतृत्वावादाबाबत सावळागोंधळ सुरू राहिला तर रिपाई जनता संभ्रमात पडून विरोधी पक्षाचे कावळे याचा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही.
पर्यायाने रिपाई जनता भटकंत राहीन.त्यांचे हितसंबंध धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. पर्यायाने राजकीय नेत्यावरील विश्वास उडून रिपाइं नेत्याची "तेल गेले,तुप गेले,हाती धुपाटणे आले" अशी स्थिती झाल्याशिवाय राहणार नाही.कारण रिपाईचे ऐक्य झाल्यामुळे राजकीय नेत्याच्या गटातटाचे राजकारण विसरून व आपले हितसंबंध सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने व बाबासाहेबांच्या भव्यदिव्य स्वप्नाला एक नवी दिशा देण्याच्या दृष्टीने रिपाई जनता निळ्या झेंडया खाली एकत्रित आली. गटातटाच्या राजकारणाला कंटाळून काही रिपाई कार्यकर्ते सोडून गेले होते.ते सुद्धा बाबाच्या घरात परत आले.केवळ परतच आले नाही तर नव्या जोमाने प्राण/प्रतिष्ठा पणाला लावून रिपाईला गतिमान करण्यासाठी प्रयत्न करू लागले होते.आणि त्याचे मनोबल सुद्धा वाढले होते.याची परिणीती १९९८ च्या लोकसभेच्या निवडणुकीत "न भूतो न भविष्यती"असे यश रिपाईच्या पदरात पडले म्हणजेच १०० प्रतिशत यश कदाचित रिपाईलाच मिळाले असावे हे कशाचे धोतक आहे? काही कालखंडानंतर प्रथमच चार खासदार दिल्लीच्या संसदेत जाऊन पोहोचले.एकीकरणाअभावी हे कदापि शक्य नव्हते आणि नाही. याची कल्पना रिपाई नेत्यांना असून सुद्धा त्यांच्या "मी"पणाच्या वृत्तीमुळे पक्षात फुटीर वृत्तीच्या बीजाला खतपाणी घालून त्याचे योग्य पोषण करीत आहे.याचा परिणाम पुन्हा रिपाईचे पुन्हा विभाजन दिसत असून सरळ सरळ आंबेडकर-आठवले-कांबळे गट दिसत असून त्यांचे वेगवेगळ्या तिन्ही नेत्याच्या रिपाईचे तीन वेगवेगळे राष्ट्रीय अधिवेशन झाले.पक्षाच्या मान्यता प्राप्तीसाठी निवडणूक आयोगाकडे त्यांचे लक्ष लागले आहे.निकाल लागेल तो भाग वेगळा पण सध्यातरी सरळ सरळ तीन प्रमुख गट दिसत आहेत. या फुटीवृत्तीमुळे काय साध्य होणार?
फुटीर वृत्ती कोणत्याही संघटनेला घातक असते.हे सांगण्याची गरज नाही.काँग्रेसमधील फुटी वृत्तीमुळे मागील काही निवडणुकात काँग्रेसची वाताहात झालेली दिसत असून काँग्रेसचा चांगलाच धुव्वा उडविला असला तरी पण पक्षाचे अस्तित्व टिकविण्यासाठी ते यशस्वी ठरले.याशिवाय देशाला तीन पंतप्रधान देणाऱ्या जनता दलांच्या स्थितीवरून सहज लक्षात येते.रिपाईत जर असा वाद कायम राहिला तर जातीयवादी शक्ती प्रबळ होऊन जातीवादी शक्‍तींना अनुकूल वातावरण निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.पर्यायाने दलित-शोषित श्रमीक वर्गाचे शोषण होऊन रिपाई जनता पुन्हा भटकत राहील.परिणामता जातीयवादी शक्ती मजबूत होऊन रिपाईला ऱ्हासाचे ग्रहण लागल्याशिवाय राहणार नाही.
       पक्ष नेतृत्ववाद करण्यापेक्षा ज्या व्यापक उद्दिष्टांनी रिपाइंची स्थापना करण्यात आली.त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. कारण स्वातंत्र्याची पन्नास वर्षे होऊन गेले असून एकविसाव्या शतकाकडे सुद्धा काही वर्षातच आपण पदार्पण करीत आहोत.पण जनतेसमोर सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक आदी प्रश्न आ वासून उभे आहेत. दारिद्र्य,बेरोजगारी,राखीव जागेचा प्रश्न,सामाजिक समतेचा प्रश्न,न्यायाचा प्रश्न,सन्मानाने जीवन जगण्याचा प्रश्न,मानाच्या जागा मिळविण्याचा प्रश्न,दारिद्र्य निर्मूलनाचा प्रश्न,(काही प्रमाणात वेठबिगारीचा प्रश्न)एक ना अनेक प्रश्न दलित जनतेसमोर आहेत. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातीलच नव्हेतर या देशातील धर्मनिरपेक्ष विचाराने प्रभावित झालेल्या लोकांना तथा दलित-शोषित समाजाला या पक्षापासून इतर सवर्ण उच्चवर्णीयाच्या पक्षापेक्षा वेगळ्या अपेक्षा,आशा-आकांक्षा आहेत.कारण ईतर पक्षाकडून अशा अपेक्षा करणे दुरापास्त आहे.जर रिपाईत असाच वाद कायम स्वरूपाचा राहात गेला तर आंबेडकरी जनतेच्या अपेक्षा पूर्णत्वास जाईल का?
       प्रबळ नेतृत्वाअभावी आंबेडकरी जनता सदैव भटकत राहिली असून आजही त्यांच्यापुढे तोच प्रश्‍न कायम आहे.हा प्रश्न विशेषता ग्रामीण जनतेशी अतिशय निगडित आहे.कारण ग्रामीण जनता याबाबत अनभिज्ञ असून सुशिक्षित वर्गानी सुद्धा आत्मीयतेने लक्ष केंद्रित केले नाही.रिपाइं नेत्यांनी सुद्धा ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केल्याचे आजवरच्या परिस्थितीवरून सहज लक्षात येते.आजही बहुतांश ग्रामीण भागातील जनता दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असून त्याचे दरडोई वास्तविक उत्पन्न फारच अल्प असून त्यांच्या मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही.यात म्हणजेच दारिद्र रेषेखालील जगणाऱ्या जनतेत बौद्धधर्मीय लोकांची संख्या जास्त आहे.आजही त्यांच्यासमोर दारिद्र्य,बेकारी,उपासमारी, निरक्षरता,अज्ञानवृत्ती दलित जनतेच्या वस्तीत पहावयास मिळते.विविध प्रश्न आणि समस्या आहे.म्हणूनच उच्चवर्णीयांच्या दबावाला बळी पडत आहे.इतकेच नव्हे तर ग्रामीण भागातील तरुण वर्ग अपरिपक्व राजकीय ज्ञानामुळे जातीयवादी पक्षात सामील होण्याच्या स्थितीत दिसत आहे.जातीयवादी शक्ती त्याचा पुरेपूर फायदा घेऊन समाज विघटीत करून त्यांच्यात फुटीरतेची बीज पेरण्यास यशस्वी होत असल्याचे दिसत आहे.याला कारणीभूत कोण?ज्याप्रमाणे उच्च पातळीवर फुटीर वृत्ती अनुभवास येते त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर सुद्धा फुटीर वृत्ती जम धरून बसली आहे. स्थानिक पातळीवरील नेते सुद्धा ग्रामीण भागातील दलितांवर होणाऱ्या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी पोटतिडकीने सामोरे येत नाही.खेड्यातील आंबेडकरी जनता आंबेडकरी चळवळ(रिपाई) गतिमान होण्याच्या दृष्टीने उच्चवर्णीयांचा तथा धनाढ्य लोकांचा विरोध पत्करून आंबेडकरी कोणताही गट नसतो तर आंबेडकरी विचारधारेचे समर्थन करणारा रिपाई असतो.डॉ.बाबासाहेब आंबेडकराचे कार्य त्यांच्या समोर असून हाच उदात्त हेतू समोर ठेवून कार्य करीत असतो.नेमका हाच फायदा रिपाई नेते घेत आहे कारण प्रत्येक नेत्यांना वाटतो की, आंबेडकरी जनतेचा माझ्या नेतृत्वावर विश्वास आहे.पण हा सपशेल त्यांचा गैरसमज आहे.
      वर्तमान स्थिती लक्षात घेता जातीयवादी प्रवृत्ती जबरदस्त बळावली आहे.शहरापासून तर ग्रामीण भागापर्यंत प्रवृत्तीचे जाळे पोहोचले आहे.आणि त्याचा पद्धतशीररीत्या प्रसार सुद्धा करण्यात येत आहे. जणू त्यांनी धर्मनिरपेक्षतेच्या भावनेला सुरुंग लावण्याचे कट-कारस्थान रचण्यात पुढाकार घेत असल्याचे जाणवत असून "धर्मनिरपेक्षता"हा केवळ त्यांचा मुखवटा आहे.जाती-जातीत, धर्माधर्मात तेढ निर्माण करून सामाजिक शांतता नष्ट करू पाहत आहे.असे वातावरण निर्माण करीत असतांना "लक्ष्य" मात्र आंबेडकरी जनतेला ठरविले असावे.आंबेडकरी प्रवाहातील काही लोक सुद्धा राजकीय जागृतीचा अभाव तथा योग्य नेतृत्वाच्या अभावामुळे बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.धर्मांध तथा जातीयवादी प्रवृत्तीचे लोक आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध मार्गाचा तथा विविध प्रकारचे आर्थिक प्रलोभने देऊन त्याचा पुरेपूर फायदा घेण्यास जराही कचरत नाही.रिपाईचे संघटन मजबूत असेल,कार्यकर्त्यात तत्परता,तळमळ असेल व रिपाई एकसंघ असेलतर अशी स्थिती उद्भवणार का?
     भारतातील सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता कोणताही एक एकटा गट/पक्ष स्वबळावर निवडणुकीसाठी असमर्थ आहे. निवडणूकित यशस्वी होण्याकरिता कोणत्याही समविचारी पक्षाशी युती करणे आवश्यक आहे.रिपाईच्या दृष्टीने तर अतिशय आवश्यक आहे.कारण दलित हे अल्पसंख्यांक असून स्वबळावर तो यशस्वी होऊ शकत नाही हे आजवरच्या निवडणूक निकालावरून लक्षात येते.म्हणूनच धर्मनिरपेक्षतावादी तथा समविचारी राजकीय पक्षाशी हातमिळवणी करून निवडणूक लढवली पाहिजे.केवळ वैयक्तिक स्वार्थाला महत्त्व देऊन रिपाईचा बळी देऊ नये.रिपाईचे एडवोकेट बाळासाहेब बाळासाहेब आंबेडकर असो की रामदास आठवले तसेच सरसेनापती जोगेंद्रजी कवाडे सर असो की दादासाहेब गवई तसेच कोणतेही अन्य नेते असो या सर्वांबाबत मनस्वी आदर आहे. सर्वच नेते कुशाग्र बुद्धीची असून पक्ष चालविण्यास समर्थ आहे.यात कोणतेही दुमत नाही.पण नेता जर स्वतःच्या नेतृत्वाला/हितसंबंधाला महत्त्व देत असेल तर ते त्यांचे दुर्दैव समजण्यास हरकत नाही.
      काही दिवसातच लोकसभा निवडणुका पाठोपाठ महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका संपन्न होणार आहेत.स्वबळावर निवडणुका लढणे रिपाईच्या दृष्टीने सध्या तरी अयशस्वी ठरेल. पर्यायाने कोणत्याही समविचारी राजकीय पक्षाशी निवडणूक समझौता करणे आवश्यक आहे. निवडणूक समझोता इंदिरा काँग्रेस सोबत असो की पुरोगामी विचारसरणीच्या तिसऱ्या आघाडीशी असो पण त्यासाठी रिपाई एकसंघ असणे आवश्यक आहे.जर रिपाई नेत्यांनी परस्पर विरोधी भूमिका घेऊन एका गटाने काँग्रेसशी तर दुसऱ्या गटांनी तिसऱ्या आघाडीशी निवडणूक समझोता केला तर त्यांचा जातीयवादी पर्यायाने भाजप-सेना युतीला पाठबळ मिळाल्याशिवाय राहणार नाही.पर्यायाने पुन्हा जातीवादी शक्ती प्रबळ होऊन सत्तारूढ झाल्याशिवाय राहणार नाही.कारण रिपाईत फुटीर वृत्ती बळावली तर दलितांची मतविभागणी होईल यात शंका नाही.जातीयवादी शक्तींना पर्यायाने भाजप-सेना युतीला सत्तेपासून रोखण्यासाठी एक निर्णयाकशक्ती ठरत असल्याने त्यांच्यात ऐक्य असणे आवश्यक आहे.शिवसेनाप्रमुखांनी सुद्धा (७.४.९९. लोकमत पान एक ) अप्रत्यक्षरीत्या कबुली दिली आहे. भाजप-सेना युतीला सत्तेपासून रोखण्यासाठी रिपाईची एक प्रबळ निर्णयाकशक्ती उभी केल्याशिवाय त्यादृष्टीने रिपाई एकसंघ असल्याशिवाय शक्य नाही असे म्हटल्यास अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही. चला आता पाहुया की,रिपाइं नेते कोणता निर्णय घेऊन रिपाई ची कोणत्या प्रकारची शक्ती उभी करते या प्रतीक्षेत.............
----------------------------------------
*नरेशकुमार शं. इंगळे*
मु.भांबोरा, ता.तिवसा,जि. अमरावती.
----------------------------------------
   सदर लेख हा *शालवन पत्रिका* नागपूर सोमवार दि.३१ मे १९९९ (पृ.क्र.६),(संपादक-श्रीकृष्ण उबाळे) रोजी प्रसिद्ध झाला आहे.
-------------------------------------------


Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...

संत गाडगेबाबा आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील ऋणानुबंध

*संत गाडगे बाबा आणि डॉ.आंबेडकर यांच्यातील ऋणानुबंध* ---------------------------------------- *प्रा.डॉ.नरेश शं. इंगळे* मु.भांबोरा ता.तिवसा,जि.अमरावती. भ्रमणध्वनी-९९७०९९१४६४ ----------------------------------------         विसाव्या शतकातील सामाजिक सुधारणेच्या कार्यात/आंदोलनात ज्या महापुरुषांचा उल्लेखनिय व महत्वपूर्ण सहभाग होता त्यात लोकसंत,कर्मयोगी, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा आणि युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. दीनदलित,पीडित,वंचित आणि दुःखीताच्या कल्याणासाठी या दोन्ही बाबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.त्यासाठी त्यांनी प्रबोधन केले,लढे दिले,आंदोलने केलीत.बळकट असलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था मोडीत काढणे आणि सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करणे हे त्यांच्या कार्याचे प्रमुख ध्येय आणि उद्दिष्ट होते.कीर्तन हे गाडगे बाबाच्या जन प्रबोधनाचे प्रमुख माध्यम तर डॉ.आंबेडकर यांनी सामाजिक,राजकीय आंदोलनाच्या माध्यमातून हे कार्य आरंभले होते.त्यांच्या कार्याची दिशा आणि ध्येय समान होते.संत गाडगेबाबा हे डॉ.आंबे...