*आंबेडकरी नेत्यांना विचारमंथनाची गरज*
*बसपा विरोधक नव्हे,समविचारी मित्रपक्ष!*
----------------------------------------
*प्रा.नरेश इंदूशंकर इंगळे*
*मु,भांबोरा,ता.तिवसा,जि. अमरावती.*
----------------------------------------
(अपूर्ण लेख-संग्रहित लेख)
----------- बहुजन समाज पक्ष सुद्धा स्वतंत्र निवडणूका लढल्या. या निवडणुकीत विशेषतः विदर्भात बसपाला ५,२०,८१४,भारिप-बमसंला २,७४,४०४, आरिपाला ३१,४६६, तर सर्व रिपब्लिकन गट मिळून ७,०२,२५२ एवढी एकूण मते मिळालीत.बसपाने विदर्भातील अकराही मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते.एवढे मात्र निश्चित की,वेगवेगळ्या रिपब्लिकन पक्षाच्या गटापेक्षा बसपाने बाजी मात्र निश्चितच मारली.
*मतविभाजनाचा फायदा*
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष वेगवेगळ्या गटात विखुरला गेल्याने तसेच बसपाने स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने आंबेडकरी मतांची विभागणी होऊन जातीयवादी पक्षाला बळ मिळाले.आंबेडकरी मतावर डोळा ठेवून काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मताचे नेहमीच भांडवल केले. पण,यावेळी बसपाच्या आक्रमनाने त्यांचे स्वप्न ध्वस्त झाले.
आंबेडकरी मतावर जहागीरदारी सांगणाऱ्या रिपब्लिकन नेत्याच्या मतावर बसपाने कब्जा करून विदर्भातील संपूर्ण राजकीय समिकरणे बदलून टाकले.रिपब्लिकन पक्षाचे सर्व पुढारी आपलाच खरा रिपब्लिकन पक्ष असे सांगून युतीच्या काळातही केवळ एक दोन जागेवर हक्क सांगत संपूर्ण आंबेडकरी समाज त्याच्या दावणीला बांधल्या जात असे.आता मात्र रिपब्लिकन नेत्यांच्या दुकानदारीला बसपाने सुरुंग लावल्याने काँग्रेस-राकाला बसपाला विचारात घेण्यासाठी नंबर लावावे लागेल.
काँग्रेस-राका व इतर पुरोगामी पक्ष आंबेडकरी मताववर डोळा ठेवून आंबेडकरी मतदार केवळ रिपब्लिकन पक्षाचा वेठबिगार आहेत,असे समजतात.त्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.या पक्षाचे नेते सुद्धा आंबेडकरी मतावर केवळ आमचाच कब्जा आहे,असा टेंभा मिरवीत केवळ स्वतःच्या खुर्चीसाठी आंबेडकरी जनतेचा भ्रमनिरास करीत आले. परंतु चौदाव्या लोकसभेच्या निवडणुकीत बसपाने रिपाची मक्तेदारी मोडीत काढत रिपाच्या बालेकिल्ल्यात आपले अस्तित्व दाखवून दिले.बसपाने मारलेली मुसंडी रिपाच्या नेत्यांना विचारमंथन करण्यास भाग पाडणारी आहे.
वास्तविक आंबेडकरी जनता रिपब्लिकन पक्षाच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी उभी होती.परंतु पुढार्यांनी वारंवार केलेला भ्रमनिरास ही ताकद इतरत्र विखुरण्यास कारणीभूत ठरला आहे.पुढारी वेगवेगळ्या गटात विभागल्या गेले नसते आणि फक्त राजकारणासाठी जनतेचा उपयोग केला गेला नसता तर हा समाज पूर्णपणे रिपाईच्या पाठीशी राहिला असता.परंतु रिपाईचे पुढारी मात्र विरोधकांचा सामना करण्यापेक्षा समविचारी वेगवेगळ्या रीपा गटाच्या पुढार्याशीच स्पर्धा करून आपलाच गट खरा शक्तिशाली व विचाराचा पक्ष अशी शेखी मिरवीत असतात.आपल्या गटाचे अस्तित्व दाखविण्यात ते केवळ वेळ घालवतात.मात्र जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.
बसपाने घेतलेली मते लक्षणीय नसली तरी त्यांच्या शक्तीला नजरेआड करता येणार नाही.कारण बसपाचीच मते कारणीभूत ठरली हे नाकारता येत नाही.बसपा जर या युतीत असेल तर महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात वेगळे चित्र राहिले असते! परंतु आंबेडकरी जनतेवर केवळ रिपाचाच एकाधिकार समजून बसपाला विचारात घेतले नाही. त्यांचा जो परिणाम व्हायचा होता;तो झाला.
आगामी विधानसभेच्या निवडणुकीत रिपाईचे अस्तित्व दाखवण्याकरिता रिपाईच्या सर्व पुढाऱ्यांनी विचारमंथनास व एकत्रीकरणात पुढाकार घेतला पाहिजे.अन्यथा,इन्का-राका केवळ रिपाईला सोबत घेऊन निवडणुका जिंकणे सोपे नाही हे लक्षात घेऊन बसपाला सोबत घेईल.मग,रिपाईचे अस्तित्व टिकणार का?
याचा अर्थ असा नव्हे,बसपाने मारलेल्या मुसंडी रिपाईचे अस्तित्वासाठी धोक्याची घंटी ठरेल.आंबेडकरी जनता आजही तन-मनाने रिपाई सोबतच आहे.बाबासाहेबांचा खरा म्हणजे रिपब्लिकन पक्ष अशी समजूत या जनतेची आहे.परंतु नेत्यांच्या संधीसाधूपणा व इतर गटांचा पुढाऱ्यांच्या वर्चस्वाच्या स्पर्धेमुळे हा समाज कंटाळला आहे.म्हणूनच तो बसपाला पर्याय समजून आकृष्ट होत आहे.
बहुजन समाज पक्षाला मिळालेली सर्व मते त्याच पक्षाची आहेत,असे नाही.कारण नेत्याच्या धोरणाला कंटाळलेली जनता नाईलाजाने बसपाकडे वळत आहे.रिपाईचे नकारात्मक मते बसपाच्या पारड्यात पडल्याने मतदान वाढले.भविष्यात रिपाई नेत्याची अशीच नीती व धोरण राहिले तर आंबेडकरी जनता पर्यायी पक्ष म्हणून बसपाला जवळ करील.म्हणून रिपब्लिकनांनी वेळीच धोका ओळखून बसपाला आपला विरोधी पक्ष न समजतात समविचारी पक्ष म्हणून एकत्रित येण्याबरोबरच आंबेडकरी जनता रिपाई पासून का दुरावत आहे, याबाबत रिपाइंच्या नेत्यांनी विचारमंथन करण्याची गरज आहे.
----------------------------------------
*प्रा.नरेश इंदूशंकर इंगळे*
मु.भांबोरा,ता.तिवसा,जि. अमरावती.
----------------------------------------
दैनिक जनमाध्यम-दिनांक-८/६/२००४
(प्रकाशित)
Comments
Post a Comment