*डॉ.आंबेडकर आणि धर्मांतर*
----------------------------------------
*नरेशकुमार शं. इंगळे*
मु.भांबोरा ता.तिवसा जि. अमरावती.
----------------------------------------
अखिल विश्वाला प्रज्ञा,शील, करुणा आणि मैत्री चा संदेश देणारा,मानवजातीला अज्ञान, अंधश्रद्धा,धर्मांधता आणि दैववादाच्या जाचातून मुक्त करणाऱ्या,मानवाला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाची शिकवण देणारा तथा माणसाला माणसाशी माणुसकीने वागण्याची शिकवण देणारा तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचा १४ ऑक्टोबर १९५६ ला आपल्या लाखो अनुयायांसह समवेत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा घेतली. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतराची गरज का निर्माण झाली?बौद्ध धम्माचा स्वीकार का केला.याशिवाय स्वातंत्र्य सुवर्णमहोत्सवी वर्षात आणि एकविसाव्या शतकात पदार्पण करीत असताना बौद्ध धर्माची का आवश्यकता आहे? यावर विचारमंथन होणे काळाची गरज आहे.
डॉ.आंबेडकर यांनी धर्मांतर केले असले तरी धर्मांतर करण्याची खरोखर गरज होती का?त्यांच्या मनात हिंदू संस्कृती बद्दल खरोखरच राग,द्वेष, मत्सर हेवा तथा तिरस्कार होता का?याचे आपणास नकारार्थीच उत्तर मिळेल.डॉ.आंबेडकराना हिंदू धर्माबद्दल तिरस्कार नव्हता पण तत्कालीन अस्पृश्यांची सामाजिक,आर्थिक,धार्मिक आणि राजकीय व आर्थिक विषमता, जातीयवाद,धर्मांध शक्ती कडून अस्पृश्यांची होणारी पिळवणूक,अमानवी पद्धतीने होणारा छळ,पशुपेक्षाही दिलेला हीन दर्जा इत्यादी बाबी कारणीभूत होत्या.अस्पृश्य समाज हा हिंदू धर्मातच राहावा अन हिंदू धर्म हा एकसंघ रहावा असे आंबेडकरांना मनस्वी वाटत होते.पण येथील धर्मांध प्रवृत्तीने प्रेरित झालेल्या मनुवाद्यांनी डॉ.आंबेडकर यांना कधी समजूनच घेतले नाही.याउलट त्यांनी या वर्गाचे मूलभूत अधिकार हिरावून घेतले होते.हक्कही नाकारले होते.त्यांनी अस्पृश्य समाजाला माणूस म्हणून कधीही वागणूक दिली नाही.तसेच अस्पृश्य समाजाकडे पाहण्याचा दूरदृष्टीचा अभाव प्रकर्षाने जाणवत होता.प्रस्थापित समाज या समाजाला कधीही जवळ करणार नसून त्याकडे सदैव पशुप्रमाणे पाहण्याचा तथा वागणुकीचा दृष्टिकोन सहज लक्षात येते. हीच खरी हिंदू धर्माची तथा संस्कृतीच्या विचारधारेची शोकांतिका होती असे म्हटल्यास हरकत नाही.
डॉ.आंबेडकरांना माणसाला माणसाशी माणुसकीची वागणूक देणारा,जातीय विषमतेला मूठमाती देणारा धर्म अभिप्रेत होता.पण नेमके याच तत्वाचा अभाव हिंदू संस्कृतीत प्रकर्षाने दिसून आला म्हणूनच डॉ. आंबेडकरांचा समजच नव्हे तर आत्मविश्वास होता की या मूलभूत गरजा हिंदू समाजापासून कदापीही मिळणे शक्य नाही अशी खात्री वाटत होती.दलितांना कशा प्रकारच्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे हे त्यांनी स्वतःअनुभवले होते.म्हणूनच त्यांना दलित उद्धाराविषयी तळमळ, आत्मीयता होती.हिंदू धर्मापासून मानवी वृत्तीला लज्जित करणारी अमानवी वागणूक या समाजाला मिळत होती.अस्पृश्याच्या सावलीचा विटाळ ईतकेच काय तर रस्त्यावर पडलेल्या पावलाच्या ठशाचा सुद्धा विटाळ वाटत असे.त्यांना कुत्र्या-मांजराची विष्टा चालत असे पण अस्पृश्यांचा स्पर्श त्यांना तृच्छ असे.सामाजिक हेटाळणी शिवाय नानाविध प्रश्न अस्पृश्यांचा पाठलाग करीत होते.त्यांची कशाप्रकारे पिळवणूक होत होती याची कल्पना डॉ.आंबेडकरांना नक्कीच होती. तरीही हिंदू धर्मीयांमध्ये मतपरिवर्तन होईल या आशेने सर्व काही सहन करीत असे.पण सहन तरी किती दिवस, काळ करायचे हा ही प्रश्न होता. कोणत्याही गोष्टीला सीमा/मर्यादा असते.ही मर्यादा हिंदूधर्म केव्हाच पार करून पुढे गेला होता.मग अशा विषमतावादी धर्मात राहून काय उपयोग?सवरणांनी अस्पृश्य समोर आ वासून उभ्या नानानाविध समस्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा तथा निवारण्याचा प्रयत्न तरी केला गेला का?याबाबत तडजोड अथवा निराकरण करण्यासाठी आशेचा किरण मात्र दिसत नव्हता.अंधारकामय जीवन जगणाऱ्याला आशेचा किरण दिसावा सर्वांगीण विकासाची द्वारें खुली व्हावी यासाठी डॉ.आंबेडकर यांची खरी लढाई होती.त्यातूनच समाज जागृतीचे वारे वाहू लागले.समतेच्या मशाली पेटू लागल्या होत्या.अग्नीच्या शब्द ज्वाला पेटल्या.नव्हे तर त्याची आस तळागाळातील सर्वसामान्य स्तरावर जाऊन पोहोचली होती.ज्या धर्मांत आपणास पशूप्रमाणे वागणूक दिली जाते.सावलीचा विटाळ वाटतो, रस्त्याने जाताना झाडू अन कमरेला गाडगे बांधून तथा सवर्णाच्या समोरुन जाताना जोडे-चपला हाती घ्यावे लागते,पिण्याच्या पाण्यासाठी आणि देव दर्शनासाठी संघर्ष करावा लागतो अशा विचारधारेच्या धर्मात समाजाचा विकास होणे शक्य नाही?मग अशा धर्मात राहून काय उपयोग?या धर्माने दलितांना सुखसोयी व मूलभूत गरजा पासून कोसो दूर ठेवले होते.समाजाच्या विकासासाठी स्वातंत्र्य,समता, बंधुत्व आणि न्यायाची अत्यंत निकड असते.त्याशिवाय विकास होणे अशक्य आहे.दलित समाजाच्या विकासासाठी आणि आणि त्यांच्या सामाजिक, आर्थिक,धार्मिक,शैक्षणिक तथा वैचारिक विकासासाठी आणि स्वातंत्र्य,समता,बंधुत्व व न्यायाची वागणूक प्रदान करण्यासाठी धर्मांतर करण्याशिवाय डॉ.आंबेडकरासमोर दुसरा पर्याय नव्हता.याच पार्श्वभूमीवर १९३६ ला "येवले" या स्थळी सिंहगर्जनेने प्रमाणे धर्मांतर करण्याविषयीची अद्वितीय घोषणा केली." मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही"अशी घोषणा करून विषमतेला प्रेरणा देणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केले.धर्मांतराच्या घोषणेची मुस्लिम,बौद्ध,ख्रिश्चन,शीख इत्यादी धर्मीयांनी दखल घेतली.पण हिंदू धर्माने त्याची दखल घेतल्याची दिसत नाही.डॉ.आंबेडकरांची मनधरणी करण्याऐवजी त्यांना उलट नाना प्रकारच्या धमक्या येत होत्या.तरी ही डॉ.आंबेडकरांना हिंदू धर्माबद्दल नितांत आत्मीयता होती.म्हणूनच घोषणेनंतर तब्बल वीस वर्षापर्यंत धर्मांतराची घोषणा प्रत्यक्षात अस्तित्वात आणली नाही.हिंदू धर्मात मतपरिवर्तन होईल अशी त्यांची अपेक्षा होती.पण डॉ.आंबेडकरांचा अपेक्षा भंग झाला.
डॉ.आंबेडकरांनी मुस्लिम, शीख,ख्रिश्चन धर्माच्या स्वीकृतीबाबत निमंत्रणे आलीत.त्यावर त्यांनी सखोल अभ्यास सुद्धा केला.डॉ. आंबेडकर फार दूरदृष्टीचे तत्वज्ञ होते म्हणूनच त्यांनी इतर धर्माचे निमंत्रणे नाकारून याच मातीतील बौद्ध धर्माचा विचार केला.बौद्ध धर्माबाबत बाबासाहेबांना एक पत्र आले होते ते "बनारस महाबोधी सोसायटीच्या वतीने आपली भेट घेऊ इच्छितो आपण भगवान बुद्धाच्या धर्माचा विचार करावा असे मला वाटते.तो धर्म आपल्या उदात्त विचारसरणीन सर्वानाच आदरणीय वाटतो.डॉ आंबेडकरांनी भारतातून हद्दपार झालेल्या ह्या सदधर्माचा अंगिकार करावा आणखी भेटी अंती बरेच बोलण्यासारखे आहे"
आपला
चिटणीस महाबोधी सोसायटी ऑफ इंडिया
पत्र हातात असतानाच समोर असलेल्या शोपीसवरील भगवान गौतम बुद्धाच्या ब्रांझ मूर्तीकडे पाहून मानवतावादी धर्माला न्याहाळू लागले.त्यांच्या मुखातून सहज शब्द निघाले "Thou great light of Asia" हे आशियाच्या महान प्रकाशदात्या" (बा.स.हाटे लिखित युगंधर कादंबरीवरून)यापूर्वीही डॉ.आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास केला होता.भगवान गौतम बुद्धाच्या विचाराने ते प्रभावित झाले म्हणूनच अखिल विश्वाला प्रज्ञा,शील,करुणा,मैत्रीचा संदेश देणारा,मानवजातीला अज्ञान,अंधश्रद्धा,धर्मांधता आणि दैववादाच्या जाचातून मुक्त करणाऱ्या,मानवाला स्वातंत्र्य,समता बंधुत्व आणि न्यायाची शिकवण देणारा तसेच माणसाला माणसाशी माणुसकीने वागण्याची शिकवण देणाऱ्या तथागत गौतम बुद्धाच्या धम्माचा १४ ऑक्टोबर १९५६ ला आपल्या लाखो अनुयायांसमवेत गुरु चंद्रमनी यांचे प्रमुख उपस्थितीत बौद्ध धर्माची शिकवण घेऊन याच भूमीतून हद्दपार झालेल्या मानवतावादी धर्माला पुनर्जीवित केले.यातून डॉ.आंबेडकरांची प्रगल्भता अन देशभक्तीचा परिचय येतो.बौद्धधर्म हा येथील संस्कृतीत निर्माण झालेला होता.धर्मांतरासोबत त्यांना मानसिक स्वातंत्र्य हवे होते.मानसिक स्वातंत्र्य शिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही.याचा अर्थ डॉ.आंबेडकर यांना भारताला स्वातंत्र्य हवे नव्हते असे नाही पण भारताला स्वातंत्र्यपूर्वी सामाजिक स्वातंत्र्य मिळणेही तितकेच आवश्यक वाटत होते.कारण सामाजिक स्वातंत्र्य शिवाय म्हणजेच स्वकियाच्या गुलामगिरीतून स्वकियाना मुक्त करणे तितकेच आवश्यक वाटतं होते.यासाठी अस्तित्वात असलेली चातुर्वण्याची चौकट मोडित काढणे आवश्यक होते.ब्राह्मण,क्षत्रिय आणि वैश्य हें परस्पर पूरक होते पण शूद्रांना त्यांचा कसलाही उपयोग नव्हता.ज्या धर्मात पाणी आणि देवदर्शनासाठी आंदोलने करावी लागते. क्रांती करावी लागते त्या धर्माला कोणत्या नावाने संबोधावे?अशा प्रकारची प्रवृत्ती कुठल्याही धर्मात आढळणार नाही.डॉ आंबेडकर यांनी १९२७ ला पाण्यासाठी महाड सत्याग्रह आणि १९३० ते १९३५ मध्ये मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला.कालांतराने डॉ.आंबेडकरांनी म्हणूनच धर्मांतर केले.धर्माणतराचा अन्वयार्थ स्पष्ट करताना म्हणतात की "माणुसकी करिता मला धर्मांतर करणे अगदी आवश्यक झाले आहे.आपल्या मातीमोल आयुष्याला सोन्याचे दिवस प्राप्त होण्यासाठीच मला धर्मांतराची आवश्यकता भासत आहे.तुम्हाला कर्तबगार बनविण्यासाठी मला धर्मांतर करावयाचे आहे.माझ्या हिताच्या प्रश्नाबद्दल मी अगदी बेफिकीर आहे.मी जे कार्य करीत आहे ते तुमच्याच हितासाठी करीत आहे.मला तुम्ही ईश्वर मानता परंतु मी ईश्वर नाही,मी तुमच्या सारखाच एक माणूस आहे.माझ्यापासून तुम्हाला जी काही मदत पाहिजे ती मी द्यायला तयार आहे,तुम्हाला तुमच्या आजच्या वाईट स्थिती पासून मुक्त करण्याचे मी ठरविले आहे. माझ्यासाठी मी काही करीत नाही.तुम्हाला कर्तबगार बनविता येईल तितके कसोसीचे प्रयत्न मात्र मी करीत राहणार.तुम्ही आपल्या जबाबदारीची जाणीव करुन घ्या व मी जो मार्ग दाखविला तो अनुसरा म्हणजे तुमचे हित,तुमची कर्तबगारी उदयास आल्याशिवाय राहणार नाही.डॉ.आंबेडकर यांनी तत्कालीन परिस्थितीत हे विचार व्यक्त केले असले तरी विद्यमान स्थितीत सुद्धा हे विचार किती आणि कसे उपयुक्त आहे हे आपल्या सहज लक्षात येते.कारण बदलत्या विद्यमान स्थितीतही त्यांच्या विचारांची खरी गरज आहे.इतकेच नव्हे तर आपल्या जबाबदारीची जाणीव करुन घेणे तितकेच आवश्यक आहे.कारण स्वातंत्र्य प्राप्ती ला पन्नास वर्षे पूर्ण झालेली आहेत.पण बाबासाहेबांना अपेक्षित असलेला भारत देश आणि येथील दलित समाज,बहुजन समाजाचा विकास तथा प्रगत समाजाची निर्मिती झाली नाही.एकीकडे विज्ञान झपाट्याने विकसित होत असून दैनंदिन जीवनात प्रवेश करण्याच्या स्थितीत आहे.पण याचा लाभ केवळ बुद्धीजीवी वर्गांना होतो पण बहुसंख्य विशेषतः ग्रामीण भागातील लोक मात्र यापासून वंचितच आहे.आजही ग्रामीण भागातील समाजाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.त्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. उच्चविद्याविभूषित मंडळी त्यांच्यापासून दूर अंतर ठेवत आहे.
२१ व्या शतकात पदार्पण करीत असताना विज्ञाननिष्ठ विचाराची बैठक घेऊन तशी मानसिक स्थिती निर्माण करणे समाजाच्या दृष्टीनेच नव्हे तर देशाच्या सर्वांगीण विकासासाठी तितकेच आवश्यक आहे.त्यासाठी बौद्ध धम्माची तत्व प्रणाली आणि विचारधारेशिवाय पर्याय नाही असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
----------------------------------------
*नरेशकुमार शं. इंगळे*
मु.भांबोरा ता.तिवसा जि. अमरावती.
---------–-----------------------------
*संग्रहित लेख*
सदर लेख हा "धम्मघोष" धम्मचक्रप्रवर्तन दिन विशेषांक १९९८ पृष्ठ क्रमांक १७.
संपादक-विनोदचंद्र शापामोहन,तिवसा
प्रकाशित/प्रसारित झाला आहे.
---–-------------------------------------
तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे- शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे. शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...
Comments
Post a Comment