Skip to main content

विफल प्रेमातही!

*विफल प्रेमातही*
----------------------------------------
*नरेश शं.इंगळे*
*मु.भांबोरा,जि.अमरावती*
----------------------------------------
       अरे वा!काय भुवन आज खूप मजेत दिसतोय,काय चमत्कार घडला.काही कळेनासे झाले.सतत नशेत गुंग असलेल्या भुवनला विचारीत असतानाच माझ्या मुखातून काही शब्द बाहेर पडण्यापूर्वीच त्याने मला हसतच म्हटले,काय दादा तुम्ही पण,असे बोलता;जणू तुम्हाला काही माहीतच नाही.जगावे तर कसे. चांगले राहिले तरी लोक काही ना काही कुरापत काढतात अन्  वाईट राहिले तरी तेच.असे भावनाविवश होऊन मला म्हणत होता.माणसाने स्वतःला जर ओळखले तर अधोगती त्याच्या जवळपासही फिरकत नाही.भुवन मधील बदल बघून खरोखरच खूपच अत्यानंद झाला होता;पण त्यांच्यातील बदल अंतर्मुख करण्यास निश्चितच भाग पाडले. कारण भुवनला मी अगदी बालपणापासून जवळून पाहिले होते.त्याच्या जीवनात घडलेले भयानक चढ-उतार बघून कधीकधी असं वाटत होते की, भुवन स्वतःचे जीवन तर संपणार नाही ना! पण त्यांच्या बुद्धिचातुर्याने त्यावर मात करून बाहेर पडला तो आदर्श माणूस म्हणूनच!
        भुवन तसा साधाभोळा, भावनाशील,चंचल आणि खूप हुशार होता.साधी राहणी,उच्च विचारसरणी सोबत सभ्यता ओतप्रोत भरलेली होती.कुणाला दुःख न पोहचविता दुसऱ्याच्या दुःखाला आपले दुःख समजून त्यात समरस होण्यास कधीही मागे कचरत नसे.सामाजिक तळमळते सोबतच शैक्षणिक उद्दिष्टाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही.म्हणूनच तो प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत असे.प्रामाणिकपणा,समजूतदार,कर्तव्यतत्पर असलेल्या भुवनने गावातील लोकांबरोबर महाविद्यालयात त्यांने आदराचे स्थान प्राप्त केले.म्हणूनच इतरांकडून होत असलेल्या आदरामुळे आपली इभ्रत कमी होणार नाही याची महाविद्यालयीन जीवनात पुरेपूर काळजी घेतली.ऐन तारुण्यात असताना कुणाच्याही समोर प्रेमासाठी हात पसरला नाही. मित्रमंडळीचे अनुभव लक्षात घेऊन प्रेम प्रकरणापासून सदा दूर राहण्याचा प्रयत्न केला. इतरांप्रमाणे भुवनच्याही मनाला भुलविण्याचा,त्याच्या भावना जागृत करण्याचा प्रयत्न केला असला तरी कुणालाही सकारात्मक होकार दिला नाही.पण शेवटी भुवन पण एक हाडामासाचा सर्वसामान्य युवक होता.त्यालाही मन,भावना होत्या. म्हणतात ना प्रेमात सर्व काही क्षम्य असतं.प्रेमाचा साक्षात्कार झाला की,कोणतेही उद्दिष्ट पूर्णत्वास जाण्यास वेळ लागत नाही.इतकेच काय तर एखाद्या कुकर्मी डाकूचे सुद्धा मतपरिवर्तन होऊन त्याच्या जीवनाला निश्चित आकार प्राप्त होतो.असाच साक्षात्कार विश्वमित्रासारखा असलेल्या भुवनच्या जीवनात घडला.प्रेम केल्या जात नाही तर ते आपोआप होत असते.आपल्या विचाराला विचार मिळणारी मुलगी मिळाली म्हणजे भावना जागृत होऊन प्रेमाचा गुलमोहर बोलू लागला होता.त्याला आवश्यक असलेली उर्वशी समान सुंदर,प्रफुल्लित,टवटवीत,नाजूक,कोमल मनाची,मितभाषी, कोकीळ स्वरांची,निस्वार्थ,निरागस, निष्पाप, सालस आचार-विचाराने परिपूर्ण अशा रश्मीला बघून त्याच्या हृदयाला पाझर फुटला.
दोघेही एकमेकाच्या प्रेमात चांगले रमले होते.अखेरच्या क्षणापर्यंत साथ निभावण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या;पण नियतीने अल्पावधीतच एकमेकापासून ताटातूट केली होती.रश्मी त्याच्या सहवासातून दूर राहण्याचा निश्चयाने भुवनवर जणू आभाळच कोसळल्यासारखे झाले होते. कालांतराने रश्मी त्याच्या सहवासात कायमची निघून गेली. या प्रश्नाचे उत्तर समजले तेव्हा रश्मी त्यांच्याजवळ नसून दुसऱ्याची पत्नी झाल्याने ती सुखी असल्याने तो समाधानी होता.पण तत्पूर्वी गैरसमज दूर होण्याच्या अगोदर रश्मीला गुन्हेगार ठरवून तो स्वतः वेगळ्या वळणावर येऊन ठेपला होता.पण रश्मीला संधीच मिळालेली नाही, ती तरी काय करणार?
        रश्मीच्या बेवफाईने भुवन पूर्णपणे कोसळला होता.आपण स्वतः काय करीत आहे याचीही त्याला कल्पना नव्हती.अशा द्विधा  अवस्थेत त्याला काय करू नये, काहीच सुचत नव्हते.भूतकाळ त्याच्या नजरेआड होत नव्हता तर भविष्यकाळ अंधरकायमय वाटू लागे.परिणामत:त्यांच्या दुःख याचनेत अधिकाधिक भर पडत असे.दुःख त्याचा पाठलाग करीत असताना तिच्या सोबत घालविलेले दिवस अन आणाभाका बेचैन करीत असे.त्याची स्वप्ने पायदळी तुडविल्या गेली होती.रश्मीने आपल्यासोबत दगाबाजी का करावी?मला बाजू मांडण्याची संधी का दिली नाही?आपण तिच्या लायक नव्हतो का?लायक नव्हतो तर तिने हिरवी झेंडी का दाखविली?असे नानाविध प्रश्न, यातना,वेदना सहन होत नव्हत्या. पण नाईलाज होता.आपल्या भावना सांगावा तर कुणाला. लंगोटी मित्र दुसऱ्या शहरात असल्याने इकडे विश्वासातला जेणेकरून त्यांच्याजवळ सांगू शकेल असा मित्र नव्हता.भुवनला मार्ग सुचत नव्हता.जिकडे तिकडे अंधारच अंधार होता.कुण्या कामात तर बरेच बरे पण भूक तहान पण विसरला होता.
      दिवसेंदिवस भुवनच्या दुःखात चांगलीच भर पडून रस्ता पण चुकत गेला.रात्रंदिवस घरी न येता बाहेरच्या बाहेर राहू लागला. अशातच भुवन वाईट सवयीच्या नादी लागला.वाईट व्यसनाच्या पूर्णपणे आहारी गेला,नव्हे! वाईट व्यसनाने त्यांना चांगलेच पछाडले.अगदी निर्व्यसनी असलेला भुवन व्यसनाधीन बघून अनेकांनी तोंडात बोटे टाकली.इतराशी मानमर्यादेने वागणारा भुवन राजरोसपणे सिगारेट,दारू पिऊन वावरू लागला.रश्मी दुसऱ्या गावची असल्याने तिला पुसटशीही कल्पना नव्हती कदाचित तिने बघितली असते तर आपली निवड चुकीची होती हे तिच्या लक्षात आले असते.पण भूवनच्या वागणुकीतील बदलाला कारणीभूत कोण?रश्मी की भुवन?
       कालान्तराने भुवनची परीक्षा संपली.निकाल लागला.प्रथम श्रेणीत उतीर्ण होणारा भुवन यंदा तृतीय श्रेणीत उतीर्ण झाला. आई-वडील कामापुरते शिकलेले असल्याने मुलगा पास झाल्याने आनंदीत होते.व्यसनाधीन असलेल्या भुवनला काही सोयरसुतक नव्हते पण शैक्षणिक अधोगतीने आई-वडिलांच्या विश्‍वासघात करीत आहे ज्यांनी पोटाला चिमटा बांधून शिकविले त्यांच्या आशा-आकांक्षावर पाणी फेरणार याने मात्र निश्चितच हादरला होता.भुवन च्या निकालाची माहिती रश्मीला पण झाली होती .परंतु सामाजिक मर्यादा आणि आई वडिलांची इज्जत यामुळे त्याला इच्छा असताना सुद्धा भेटू शकली नाही. प्रेमावर कितीही बंधने लादले तरी प्रेमी आशेवर जगत असतात. रश्मीच्या जवळच्या नात्यातील व भुवनच्या एका मित्राच्या परिवाराच्या लग्नात दोघांची भेट झाली.पण इतरांच्या नजरा चुकवून त्यांना भेटता आले नाही.संधी पाहून ते एकमेकासमोर आले.भुवन शाब्दिक सूड घेऊन नाकारण्याचे कारण विचारण्याच्या बेतात होता.पण ती समोर येतातच सर्व विसरला.सूड भावना लोप पावून अगदी प्रेमळ स्वरात म्हणाला; का ग रश्मी ! मला वाऱ्यावर सोडून का गेली?ती घाबरली,स्वतःची इच्छा असतानाही वेळेअभावी समर्पक उत्तर देऊ शकली नाही. पण "'स्वतःला ओळख'"हा एकच शब्द उच्चारून निघून गेली.तिच्या पाठमोर्‍या प्रतिकृतीकडे तो बघत राहिला.ती केव्हा नजरेआड झाली याची कल्पना सुद्धा झाली नाही.
      "स्वतःला ओळख"या शब्दाने त्याच्या मनात विचारांचे काहूर निर्माण झाले.पण त्याचे त्याला तात्काळ उत्तर काही मिळेना.पण तो एकच शब्द अंतर्मुख करण्यास बसला पोहचला.तिथे त्याने मनसोक्त दारू ढोसली.दारूकडे बघत गुणगुणत होता की,"स्वतःला ओळख,काय ओळखू, तू स्वतःला ओळख,मला याची काहीही एक गरज नाही,मोठी आली उपदेश करायला हारामखोर!"बडबडत असताना बाजूच्या टेबलवरचा युवक भुवन जवळ येऊन म्हणाला,तू स्वतःला कुठे ओळखले,तू तर बेवडा बहाद्दर, दारूबाज आहे,तू स्वतःला ओळखले असते तर दारूच्या बाटली जवळ असता काय? आता तुझे वय  बाटली,वाट चुकलेला व्यसनाधीन तरुण आहे. तुझ्यासोबत कोण शहाणा मनुष्य मैत्री करणार!असे बोलून तो युवक भुवन ला बेशुद्धावस्थेत त्याच्या घरी घेऊन गेला.तो युवक दुसरा तिसरा कोणी नसून त्याचा अगदी बालपणीचा मित्र तसेच वर्गमित्र वीरेन होता.
     दुसऱ्या दिवशी भुवन शुद्धीवर येताच विरेनला विचारू लागला?अरे!विरेन मी इथे कसा काय? विरेनने घडलेला सर्व प्रकार त्याच्या समोर कथन केला.हे ऐकून भुवन हताश होऊन स्वतःला लाज वाटत असली तरी विरेनलाही त्यांच्या वागण्याचे रहस्य उलगडले नव्हते.भुवनमध्ये असा बदल का?कारण भुवन व विरेन बालपणापासूनचे मित्र असल्याने त्याच्या आवडीनिवडी बाबत परिपूर्ण कल्पना होती. वीरेन दूरच्या शहरात तर भुवनने गावालगतच्या शहरात इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घेतला होता.एक वर्षाच्या कालावधीत ते कधी एकमेकांना भेटले नाही.पण भुवनच्या प्रेमप्रकरणाची त्याच्या पत्रव्यवहारावरून कल्पना होती. पण अशा विचित्र वळणावर गेले याबाबत तो पूर्णपणे अनभिज्ञ होता.भुवनची अवस्था बघून विरेनही हतबल झाला होता. शेवटी विरेनने भुवनला म्हटले की, भुवन,"तू स्वतःला ओळख"असे म्हणतातच भूवनला रश्मीच्या शब्दाची आठवण झाली.भुवन स्वतःला सावरुन रश्मीने पण मला हाच प्रश्न केला.कदाचित तुम्ही दोघांनी संगनमत तर केले नाही! असे विनोदाने पण हताशपणे म्हणाला.अखेर विरेनने त्याची चांगली समजूत काढून स्वतःला ओळखण्याचे मार्ग मोकळे करून दिले.भुवनही काही दूधखुळा किंवा अज्ञानी नव्हता.आपण खरोखर चुकलो काय?याबाबत स्वतःस्वतःच अंतर्मुख झाला.
        रश्मीने आपल्याला का झिडकारले?तिने नाकारण्याचे कारण काय?माझ्यात कोणती कमतरता आहे? रश्मीचा जीवनसाथी म्हणून तिला सांभाळून घेण्यास असमर्थ आहे का?तिच्या आवडीनिवडी मी पूर्ण करू शकणार?रश्मीच्या ज्या श्रीमंतीत वाढली तेवढे वैभव मी देऊ शकणार का?समाज आम्हाला स्वीकारणार का?आदी प्रश्नाबाबत स्वतःच नंतर अंतर्मुख होऊन रश्मीच्या भावी जीवनाचा विचार करू लागला.परंतु ज्या गोष्टीसाठी रश्मीच्या प्रेमाला पारखे झालो त्या गोष्टी स्वतःच्या मेहनतीने हस्तगत करून आपणही तिच्या लायकीचे आहो  हे दाखवून देण्याचा निश्चय केला.
       भुवन स्वतःला ओळखून व्यसनाधीननेतून पूर्णपणे बाहेर पडला.आपले ध्येय पूर्णत्वास नेण्यास पराकाष्टा करू लागला. इतकेच नव्हे तर रश्मीने त्याला नाकारूनही मनोमन तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला.जे कधीच तिला समजू शकले नाही. तिच्या नाकारण्याचे कारण न विचारता आपण तिच्या पसंतीस,कसोटीत उतरणार नाही तोपर्यंत तिच्या आसपासही फिरकन्याचे साहस केले नाही.कदाचित दुसरा एखादा युवक असता तर तिला नक्की जाब विचारला असता.पण भुवनने स्वतःची कमतरता समजून तिला दोषी ठरविण्याचे नाकारले.कालांतराने त्याची परीक्षा झाली.तो यावर्षी चक्क प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला.भुवन मधील बदल बघून कदाचित रश्मी सुखावली असेल!
        कालांतराने भुवनने इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम समर्थपणे परिस्थितीशी संघर्ष करून घवघवीत यश संपादन केले.आज तो एका नामांकित कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे.ते केवळ त्याच्या मेहनतीच्या भरवशावर आणि रश्मीच्या एका शब्दामुळे! पण दुर्दैवाने रश्मी त्याच्या जवळुन कितीतरी दूर गेली तेथे जायला सर्वच मार्ग बंद आहे.भुवन अंतिम वर्षात असताना सामाजिक रितीरिवाजाप्रमाणे ती विवाहबद्द झाली.पण हृदयात त्याने तिच्यावर अतोनात जीवापाड प्रेम केले.ते आजतागायत कायम आहे.कायम राहील!रश्मी इतरांसोबत विवाहबद्ध झाल्याने भुवन निश्चितच दुखावला पण रश्मीच्या संसारात कधी हस्तक्षेप केला नाही.याउलट तिच्या नजरेसमोरून दूर राहून जेणेकरून भुवनचे आकर्षण कमी होऊन तिच्या सुखी संसारात रममाण होईल याच हेतूने तिच्या सुखाला आपले सुख समजून स्वतःचे दुःख,वेदना,यातना आणि भावना मनातल्या-मनात कायम ठेवले.कदाचित यालाच खरे प्रेम समजावे!
     प्रेम हे मानवी जीवनाला मिळालेले अमूल्य असे वरदान आहे.वाट चुकलेल्यांना वाट दाखविते.काळोखाला प्रकाश देते,आशेचा किरण जागविले,जगण्यास व जगू देण्याची शक्ती प्रदान करते.परंतु आधुनिक काळात प्रेमाचे स्वरूपच बदलून व्यक्ती तितक्या प्रवृत्ती प्रमाणे प्रत्येक जण आप-आपल्या सोयीनुसार उपयोग करतात ते खरे प्रेम नव्हेच!ते वासनेने बेधुंद झालेल्या प्रियकर-प्रेयसी चे शारीरिक सुखाचा अविष्कार होय.केवळ शारीरिक सुखाचा अविष्कार होतो.ज्यात शारीरिक समाधान प्राप्त होते.जे क्षणिक असते.म्हणूनच प्रेम बदनाम ठरत आहे.इतकेच नव्हे तर ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीचे जीवन उद्ध्वस्त करण्यास मागेपुढे पाहत नाही. म्हणूनच दररोज आजूबाजूच्या परिसरात तथा वर्तमानपत्रात एकतर्फी प्रेमातून हत्या, आत्महत्या,पेटवून दिल्याचे प्रकार,किंवा पेटवून घेतल्याचे प्रकार,प्रेयसीच्या शारीरिक शोषणामुळे आत्महत्या,प्रेयसी गर्भवती राहिल्याने प्रियकराने "तो मी नव्हेच"ची घेतलेल्या भूमिकेमुळे उघड्यावर पडलेली प्रेयसी अशाप्रकारचे प्रकार पहावयास मिळते.ते तर प्रेमाचे विकृत स्वरूपात म्हणावे.जे शारीरिक आकर्षणातून निर्माण झाले.याला आपण खरे प्रेम म्हणाल का?
        विफल प्रेम आणि एकतर्फी प्रेमाचे पेवच फुटले आहे. एकतर्फी प्रेमात तर ती आपली झाली नाही,म्हणून तिला दुसऱ्याचे होऊ द्यायची नाही.विष कालवून तिचे जीवन उद्ध्वस्त करण्याचे प्रसंगी हिंसक मार्ग पत्करला जाते.पण ते कितपत योग्य आहे?ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीला संपवून किंवा उध्वस्त करून तिचे प्रेम मिळणार का?एकतर्फी प्रेमाप्रमाणेच प्रियकर व्यसनाधीन होऊन आपल्या अनमोल जीवनाचा नाश करतो.स्वतःच्या अधोगतीचा मार्ग स्वीकारतो.यात माञ प्रेयसीला कारणीभूत ठरविल्या जाते.अशा कृत्यास तिची सहानुभूती,प्रेम,आपुलकी जिव्हाळा मिळणार का?ज्या कारणासाठी प्रेयसीने नाकारले ती कारणे शोधण्याचा प्रयत्न तरी केले जाते का?
       कोणत्याही युवकांने ज्या कारणासाठी तिने नाकारले त्याचा शोध घेऊन त्यावर मात केल्यास तिच्या आदरास आणि अभिमानास निश्चितच पात्र ठरेल. तिच्या आदराबरोबर स्वतःचे भावी जीवन सुखमय करण्यास मदत होईल.कदाचित भूवनने स्वतःला ओळखले नसते तर तो इंजिनियर कधीच झाला नसता. प्रेमाने अन रश्मीच्या एका शब्दाने त्याला इंजिनिअर केले.कदाचित रश्मीलाही त्याचा अभिमान वाटत असावा.भुवनने रश्मीच्या विरहात स्वतःला बुडविले असते तर भुवनला ती कधीचीच विसरून गेली असती.माणसाच्या यशाच्या वाटेत एका स्त्रीचा हात असतो ते भुवने सार्थक करून दाखविले. माणूस प्रेमातच यशस्वी होतो, असं नाही तर विफल प्रेमातही यशस्वी होऊ शकतो,हे भुवने दाखवून दिले.जर कुणाचेही विफल प्रेम असेल तर तुम्ही दुसरा भूवन होणार------!
----------------------------------------
*नरेश शं. इंगळे*
*मु.भांबोरा जि.अमरावती*
----------------------------------------
*दैनिक देशोन्नती/अमरावती*
*दिनांक ३१,डिसेंबर २००१.*
----------------------------------------

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...

संत गाडगेबाबा आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील ऋणानुबंध

*संत गाडगे बाबा आणि डॉ.आंबेडकर यांच्यातील ऋणानुबंध* ---------------------------------------- *प्रा.डॉ.नरेश शं. इंगळे* मु.भांबोरा ता.तिवसा,जि.अमरावती. भ्रमणध्वनी-९९७०९९१४६४ ----------------------------------------         विसाव्या शतकातील सामाजिक सुधारणेच्या कार्यात/आंदोलनात ज्या महापुरुषांचा उल्लेखनिय व महत्वपूर्ण सहभाग होता त्यात लोकसंत,कर्मयोगी, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा आणि युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. दीनदलित,पीडित,वंचित आणि दुःखीताच्या कल्याणासाठी या दोन्ही बाबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.त्यासाठी त्यांनी प्रबोधन केले,लढे दिले,आंदोलने केलीत.बळकट असलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था मोडीत काढणे आणि सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करणे हे त्यांच्या कार्याचे प्रमुख ध्येय आणि उद्दिष्ट होते.कीर्तन हे गाडगे बाबाच्या जन प्रबोधनाचे प्रमुख माध्यम तर डॉ.आंबेडकर यांनी सामाजिक,राजकीय आंदोलनाच्या माध्यमातून हे कार्य आरंभले होते.त्यांच्या कार्याची दिशा आणि ध्येय समान होते.संत गाडगेबाबा हे डॉ.आंबे...