Skip to main content

आजही मी दुविधेतच

*पहिले प्रेम*

---- *आजही मी दुविधेतच* ----
----------------------------------------
*नरेश कुमार इंगळे*
----------------------------------------
       प्रेमात सर्व काही क्षम्य असतं.प्रेमाचा साक्षात्कार झाला की,कोणतेही उद्दिष्ट पूर्णत्वास जाण्यास वेळ लागत नाही.इतकेच काय तर कुकर्मी डाकूचे सुद्धा हृदयपरिवर्तन होऊन त्यांच्या भावी जीवनाला निश्चित आकार मिळण्यास मदत होते.त्यातही आधुनिक वर्तमान युगात प्रियकर-प्रेयसी च्या प्रेमाला युवावर्गात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले.इतकेच नव्हे तर युवा अवस्थेतही जीवनाची खरी गरज झाली आहे.पण खऱ्या प्रेमाची माणसाला जेव्हा जाणीव होते तेव्हा मात्र माणसाच्या कोमल मनात अस्थिरता निर्माण होऊन हृदयाच्या स्पंदनाचा वेग झपाट्याने वाढू लागतो.असाच प्रकार माझ्या जीवनात मला सुद्धा अनुभव मिळाला.
       मी महाविद्यालयीन जीवन उपभोगले.पण कुणाच्या समोर प्रेमाचा हात पसरला नाही.मित्राचे अनुभव लक्षात घेऊन प्रेमापासून सदा दूर राहण्याचा प्रयत्न केला. इतरांप्रमाणे माझ्याही मनाला भूलविण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्या युवावस्थेत प्रेमाची ज्योत जागविण्याचा प्रयत्न झाला असला तरी कुणालाही सकारात्मक होकार दिला नाही. पण शेवटी मी एक हाडामासाचा सर्वसामान्य युवक होतो.मला ही भावना होत्या.मन होते.एका मुलीला बघून माझ्या भावना जागृत झाल्या.खऱ्या प्रेमाची जाणीव झाली.युवावस्थेत प्रेमाचा पाझर फुटतो हे मला प्रत्यक्षात अनुभवास येऊ लागले.आपल्या विचाराला विचार मिळणारी मुलगी मिळाली म्हणजे भावना आपोआप जागृत होते.मला ज्या विचारांची सुंदरी आवश्यक होती त्या विचारांची मुलगी माझ्यासमोर होती.माझ्या जीवनात आशेचा किरण पडला.काळोखाला प्रकाश मिळाला.तिच्या नावाप्रमाणेच माझ्या जीवनात किरनोदय झाला.सुंदर,प्रफुल्लित,टवटवीत, नाजूक मनाची,मितभाषी कोकीळ स्वराची,निस्वार्थ,निरागस मन तथा आचार विचारांने प्रभावित झालो.प्रभावित झालो असलो तरी सोबत मात्र कसल्याही प्रकारचा संबंध नव्हता.तिच्या प्रेमाविषयी मी केवळ कल्पनेतील स्वप्नात रंगून गेलो होतो.वस्तुस्थिती पासून कोसो दूर होतो.तिला याबाबत कसल्याही प्रकारची कल्पना नव्हती.माझें केवळ एकतर्फी प्रेम होते.एकतर्फी प्रेमामुळे मन विचलित होते.जोपर्यंत माझ्या भावना तिच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत केवळ कल्पनेतच रममाण व्हावे लागत असे.माझ्या भावना मी स्वतः तिच्यासमोर व्यक्त करण्यास असमर्थ होतो. याकरिता मला ईतराची मदत घेणे आवश्यक होते.तशा प्रकारची मला मदत सुद्धा मिळत गेली. किरण परगावी शिकायला होती. मी सुद्धा त्याच गावाला शिकायला होतो.पण प्रत्यक्ष भेटीत सुद्धा समन्वय नव्हता.तिचे वर्ग दुपारी तर माझे वर्ग सकाळी होत असे. केवळ तिचा चेहरा दिसावा, मनाला समाधान प्राप्ती, मन उल्हासित करून घ्यावे हे सुद्धा शक्य नव्हते.म्हणूनच किरणच्या प्रेमाच्या प्राप्तिसाठी माझ्या मित्राच्या सर्व अडचणीवर मात करावी लागली.पर्यायाने तिच्या अप्रत्यक्ष भेटीचा प्रतिदिन सारांश मला मिळत असे.कारण तो प्रत्यक्ष बोलण्यास एकाएकी शक्य नव्हते.पण त्याचे संबंध तिच्या घरासोबत घरगुती होती.त्यामुळे क्षणिक समाधान लाभत असे. तरीसुद्धा तिच्यावर प्रेमाने झोप कधीचीच निघून गेली होती.क्षणा-क्षणाला तिच्या आठवणीने तिच्या सहवासासाठी मन गहिवरून येत असे.माझे सकाळी वर्ग असल्यामुळे मला दुपारी घरी राहावे लागत असे.पण किरणच्या भेटीसाठी तळमळत राहण्यापेक्षा तिच्या वेळेवर येण्यासाठी आवश्यकता नसताना सुद्धा ४ ते  ५ वाजता च्या दरम्यान शिकवणी वर्गाला जाण्यास सुरुवात केली.त्यामुळे अप्रत्यक्ष का होईना भेट होत असे.पण किरण याबाबत अनभिज्ञ होती.याशिवाय शनिवार व रविवार ला क्रिकेट खेळणे सुरू केले.मैदान तिच्या घरासमोर असल्यामुळे नजरेला-नजर मिळत होत्या.योगायोग म्हणजे मी जेव्हा तिथे खेळायला राहायचो तोपर्यंत ती ती सुद्धा राहायची.जेव्हा मी गैरहजर राहत असे नेमके त्याच वेळेला ती सुद्धा घराबाहेर पडत नसे.त्यामुळे माझं अन माझ्या मित्राचा परिपूर्ण विश्वास झाला की तिच्याही मनात माझ्याविषयी आपुलकी,प्रेम वाटत असावे असा समज होणे सहाजिकच होते.अशा स्थितीत माझ्या निर्मळ मनावर १० एप्रिल १९९३ शनिवारला मित्राने आघात केला.क्षणात रंगीन सुखद स्वप्न क्षणातच धुळीस मिसळून टाकले. हा केवळ त्याचा डावपेच होता हे कालांतराने लक्षात आले.पण प्रेमाची सुरुवात होण्यापूर्वीच अंत करून टाकण्यासाठी त्याने गनिमीकावा तयार केला.खऱ्या प्रेमाचा अंत नसून ते अमर असते हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.म्हणूनच किरण सोबत प्रत्यक्ष प्रेम करण्याची संधी मिळाली नसली तरी अप्रत्यक्ष संधी कुणीही हिरावून घेऊ शकणार नव्हते.कारण तिच्या शरीरावर प्रेम नव्हते तर तिच्या सुस्वभावावर होते.तिला कल्पना नसतानाही तिच्यावर अप्रत्यक्ष प्रेम करायचे निश्चित केले.किरणच्या प्रेमाअभावी मन निराश,उदास आणि नैराश्यपूर्ण वाटत असे.जीवन निरर्थक वाटत असे.अप्रत्यक्ष का होईना सदा जनमानसाच्या पर्यायी तिच्या स्मरणात राहावे यासाठी काही वेगळ्या स्वरुपात राहण्याचा प्रयत्न केला.त्याच वर्षी माझी एस.वाय.जे.सी.ची परीक्षा होती. खूप मेहनत,परिश्रम तथा अभ्यास करून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो.अन महाविद्यालयातुन दुसरा क्रमांक सुद्धा प्राप्त केला. याची परिणीती मी लोकांच्या आदरास पात्र ठरलो.लोकांनी कौतुक सुद्धा केले.किरणने सुद्धा माझे कौतुक केले.पण तिला प्रत्यक्ष प्रेमाची कसलीही कल्पना नव्हती.जर तिला अशी कल्पना असती तर------याशिवाय नैतिक आचरणाचा प्रभाव,सामाजिक बांधिलकी तथा दैनिक वृत्तपत्रलेखन आणि शैक्षणिक प्रगतीने जनमाणसात मानसन्मान मिळत गेला.
     पती-पत्नीचे नाते सात जन्माचे बंधन असते.देवाघरून हे बंधन बांधले असून अतूट अशा बंधनाला कुणीही विलग करू शकत नाही.प्रेमामुळे ते अधिक मजबूत होतात.अशाच प्रकारची समाजात रुढ म्हणी आहे.पण त्यात कितपत सत्यता आहे? ज्याप्रमाणे पती-पत्नीचे अतूट संबंध एका रेशमी धाग्यात बांधले जाते त्याचप्रमाणे प्रियकर-प्रेयसीचे नाते असावे. असाच साक्षात्कार *८ जानेवारी १९९४* ला अनुभवास आला असून माझे प्रेम पुनर्जीवित झाले. अचानक किरण अन तिची मैत्रीण माझ्या घरी येऊन प्रेमाची हिरवी झेंडी दाखविली.आकस्मिक होकार मिळाल्यामुळे यावर माझा विश्वास वाटत नव्हता.एकाएकी किरणचे मत परिवर्तन कसे झाले?माझ्या भावना तिच्याजवळ कोणी व्यक्त केल्या असाव्या? आकाशातील तारेप्रमाणे नानाविध प्रश्न उभे राहू लागले.प्रश्नाच्या भडीमारातच मन आनंदून किरणला स्वप्नात न्याहाळू लागलो.तो क्षण मला अविस्मरणीय वाटू लागला.पुन्हा दुसऱ्या भेटीची आतुरतेने प्रतीक्षा करीत होतो.एक रात्र कित्येक काळाची वाटत होती.घड्याळेचे काटे संथगतीने फिरत होते.बैचन मन उतावीळ होत होते.त्याच स्थितीत १७/ ०२/१९९४ ला लिहिलेले पहिले पत्र मला २२/०२/१९९४ ला प्राप्त होऊन लगेच भेट घडून आली.आमचे मधुरमिलन घडून आले.विचारांची देवाण-घेवाण,उत्तर,-प्रतिउत्तर एकमेकांना करू लागलो.आमचे मधुर मिलन घडुन आले.विचारांची देवाणघेवाण, उत्तर-प्रतिउत्तर एकमेकांना करू लागलो.प्रतीक्षेनंतरची भेट किती सुखद असते याचा अनुभव प्रथम चाखायला मिळाला.त्यात किती गोडवा असतो.कित्येक तास निघून गेले असले तरी वेळेचे भान अजिबात नव्हते.प्रेमाची फूलबाग बहरली.कुणाची दृष्ट लागावी आणि कुणाला प्रेरणादायी ठरावे अशा प्रेमाचा शुभारंभ झाला.एक एक क्षण आम्हाला दूर ठेवण्यास कमकुवत पडत असे.माझ्या प्रेमाचा एक प्रसंग तर मला नेहमीच आठवण करून देतो.एक वेळ मी आजारी असताना तिने सुद्धा आजाराचे रूप धारण करून अन्नसेवन करणे बंद केले होते.
       इतकेही अतूट प्रेम असून सुद्धा कुणाची नजर लागून अल्पावधीतच आमची ताटातूट झाली.एप्रिल ते मे महिन्याचा कालावधी असावा.उन्हाळ्यात खूप उन्ह तापत असताना आमचे प्रेम सुद्धा खूपच तापू लागले.उन्ह अंगाला चटके देत असे.पण शरीरावर त्याचा शून्य परिणाम. एकाएकी भेटीगाठीला पूर्ण विराम बसला.पत्रव्यवहार बंद झाला. इतकेच काय तर एकमेकांच्या नजरेला नजर मिळविण्यास उभयंताकडून बंदी वाटत होती. माझी पडछाया तिला अभद्र वाटत होती.असे एक वर्ष निघून गेले तरी भेट नव्हती.अचानक असा प्रसंग का ओढवला?आपण कोणती चूक केली?आदी प्रश्नाचे उत्तराबाबत द्विधा स्थितीत पडलो.काही दिवसातच तिचा विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.पण माझी बाजू मला मांडण्याची संधी दिली नाही. एकाएकी माझ्या सहवासातून दूर का गेली?माझे प्रेम तिने का झिडकारले? तिने माझी चूक लक्षात का आणून दिली नाही? मला भेटण्याचे तिने का नाकारले? मला बाजू मांडण्याची संधी का दिली नाही?विवाहाला चार वर्ष होऊन आज सुद्धा का टाळत आहे?दुखावलेल्या अन दुरावलेल्या प्रियकराची आठवण सतावत नाही का?आदी प्रश्नांचे कोडे आजही माझ्यासमोर आहे. समर्पक उत्तर अभावी माझे मन अखेर दुविधेतच आहे.
----------------------------------------
*नरेशकुमार इंगळे*
*दैनिक देशोन्नती (विरंगुळा)*   *शुक्रवार दि.०५/०२/१९९९*
----------------------------------------

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...

संत गाडगेबाबा आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील ऋणानुबंध

*संत गाडगे बाबा आणि डॉ.आंबेडकर यांच्यातील ऋणानुबंध* ---------------------------------------- *प्रा.डॉ.नरेश शं. इंगळे* मु.भांबोरा ता.तिवसा,जि.अमरावती. भ्रमणध्वनी-९९७०९९१४६४ ----------------------------------------         विसाव्या शतकातील सामाजिक सुधारणेच्या कार्यात/आंदोलनात ज्या महापुरुषांचा उल्लेखनिय व महत्वपूर्ण सहभाग होता त्यात लोकसंत,कर्मयोगी, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा आणि युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. दीनदलित,पीडित,वंचित आणि दुःखीताच्या कल्याणासाठी या दोन्ही बाबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.त्यासाठी त्यांनी प्रबोधन केले,लढे दिले,आंदोलने केलीत.बळकट असलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था मोडीत काढणे आणि सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करणे हे त्यांच्या कार्याचे प्रमुख ध्येय आणि उद्दिष्ट होते.कीर्तन हे गाडगे बाबाच्या जन प्रबोधनाचे प्रमुख माध्यम तर डॉ.आंबेडकर यांनी सामाजिक,राजकीय आंदोलनाच्या माध्यमातून हे कार्य आरंभले होते.त्यांच्या कार्याची दिशा आणि ध्येय समान होते.संत गाडगेबाबा हे डॉ.आंबे...