*आजही संघर्षाच्या वाटेवरच----------------!*
----------------------------------------
*नरेश शं.इंगळे*
*मु.पो.भांबोरा ता.तिवसा*
----------------------------------------
अगदी सकाळची वेळ.कडाक्याच्या थंडीमुळे जिकडे-तिकडे दवबिंदुमुळे सर्वत्र धुकेच धुके.मी अचानक भूपतीच्या घरासमोरून जात असताना भूपती सोबत गाठ पडली.भूपती तसा लगबगीतच होता.काठीच्या आधाराने पुढील मार्गक्रमण करीत असताना मी त्याला सहज विचारले,"भूपती कशाची गडबड आहे"? कुठे चालला?माझ्या प्रश्नांने तो अलगदपणे गालातल्या गालात हसून लेखी परीक्षेला जात असल्याचे सांगितले.त्याच्या हसण्यातही कारुण्याची छटा अन सामर्थ्याच्या बळासोबत संघर्षाची चुणूक त्यांच्यात ओतप्रोत भरलेली दिसत होती.मी तर त्याच्याकडे एकटक पाहत बसलो.भूपती माझ्या नजरेसमोर कधी नाहीसा झाला याची पुसटशीही कल्पनाही आली नाही. काही क्षणातच भानावर येऊन त्याच्या संघर्षमय जीवनाला न्याहाळू लागलो अन मनातच पुटपुटलो की,सदैव परिस्थितीशी सतत संघर्ष करणारा आणि सदा सर्वांच्या सुख-दुःखात तत्परता दाखवून आधार देणारा भूपती स्वतः काठीचा आधार(अपघातामुळे) घेऊन चालतानाही त्यांच्यात किती तळमळता!भूपती तसा वेगळाच तरुण.त्यांच्यात कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याची ताकद,बळ,शक्ती आणि सामर्थ्य होते.संपूर्ण गावात आदराने ओळखला जाणारा भूपती सर्वांचा आवडता होता.विशेषतः हा विद्यार्थ्यांचा सर्वात प्रिय होता. प्रत्येक कार्यक्रमात पुढे असणारा, दरवर्षी परिस्थितीवर विजय मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या भूपतीच्या सोबतच नशिबाने कसा खेळ खेळला?अशा नानाविध प्रश्नांच्या भडिमारात मी हवालदिल झालो होतो.
भूपती तसा माझा अगदी बालपणापासूनचा जिवाभावाचा मित्र होता.त्याच्या जीवनातील असंख्य चढ-उतार मी जवळून पाहिले आहे.भूपतीच्या घरील आर्थिक परिस्थितीहीं तशी हलाखीचीच,पण त्यांच्यातील गुणवत्ता बघून हलाखीच्या परिस्थितीतही पोटाला चिमटा बांधून त्यांच्या आई-वडिलांनी त्याची शिक्षणाची भूक भागविली.आईवडिलांची प्रेरणा व प्रोत्साहनाने प्रती वर्ष भरघोस यश संपादन करीत असे.म्हणूनच तो यशाच्या उच्च शिखराच्या जवळपास पोहचला.आमच्या बालपणीचा एक क्षण तर मला नेहमीच आठवतो कि,भूपती आणि मी दुसऱ्या वर्गात असतांना तो नापास झाल्याने सर्व मुले-मुली त्याला चिडवत असे.मुलाच्या धाकामुळे तो शाळेत तर सोडाच पण कित्येक दिवस घराच्या बाहेर सुद्धा पडला नव्हता.पण जिद्दी,मेहनती असलेल्या भूपतीने निश्चय करून बालवयात जीवनाशी अविरत संघर्ष करण्याची ठाण मांडले होती. अपयशाने खचून न जाता अपयशातही यशाचे रहस्य असल्याचे त्याने आपल्या स्वकर्तुत्वाने दाखवून दिले. आत्मविश्वासाच्या जोरावर निश्चयाने वेडा झालेल्या भूपतीने नंतर कधीच मागे वळून पाहिले नाही तर चक्क प्रत्येक वर्षी कधी प्रथम तर कधी द्वितीय क्रमांकाने पास होऊ लागला.
भूपतीची शैक्षणिक प्रगती व जबरदस्त आत्मविश्वास बघून अनेक मान्यवरांच्या सल्याने त्याच्या आई-वडिलांनी अमरावतीच्या नामांकित शाळेत माध्यमिक शिक्षण याकरिता दाखल केले.परंतु शहरी शाळेचा खर्च न झेपावल्याने इच्छा असतानाही त्याला परत गावालगतच्या शाळेत प्रवेश घ्यावा लागला.काही दिवसातच भूपती दहावीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला.तत्कालीन परिस्थितीत आमच्या गावात गेल्या दोन दशकापासून शाळेच्या इतिहासात प्रथम श्रेणीत पास होणारा भूपती पहिला विद्यार्थी ठरल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होऊ लागले.
दहावीनंतर इंजिनियर किंवा विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन उच्च शिक्षण घ्यावे,अशी सर्वसामान्य गुणवान विद्यार्थ्यांची अपेक्षा असणे सहाजिकच आहे. अनेकांनी पुढील शिक्षणात आर्थिक परिस्थिती हा एक अडसर ठरेल या भीतीने अपेक्षा असतानाही त्या पद्धतीने शिक्षण घेता आले नसल्याचे शल्य त्याला बोचत असले तरी दुर्लक्षित शाखेतही त्याने आपल्या विद्वत्तेचा ठसा उमटविला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भूपती ज्या वर्षी दहावी पास झाला नेमके त्याच वर्षी डी.एड.चे प्रशिक्षण बारावी वर झाले होते.कमी दिवसात कमी खर्चाचे व रोजगार संधी लवकर मिळवून देणाऱ्या प्रशिक्षणापासूनही त्याला वंचित राहावे लागले.तरी निराशावादी न होता;आशावादी दृष्टिकोन समोर ठेवून बारावीत जास्तीत जास्त गुण प्राप्त करून डि.एड. करायचेच हा त्यांनी ठाम निश्चय केला होता.जबरदस्त इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या भरवशावर काही विषयात प्राविण्य श्रेणी प्राप्त करून प्रथम श्रेणीत पास होऊन (तीनशे विद्यार्थ्यांमधून)महाविद्यालयातून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. नशिबाने येथेही त्याला साथ दिली नाही.कारण थोड्याफार फरकानेच त्याचा डी.एड.चा नंबर हुकला.भूपतीचा येथेही भ्रमनिरास झाला.आपण कधीच यशस्वी होणार नाही;असे कदाचित त्याला वाटत असावे,परंतु तो हिम्मत न हारता आपले ध्येय व उद्दिष्ट गाठण्यासोबत ग्रामीण भागात होत असलेल्या ग्रामीण विद्यार्थ्यांची पिळवणूकही त्याच्या नजरेसमोर दिसत होती.आपल्या ज्ञानाचा;समाजाला व आपल्या सारख्याच गरीब विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा या उदात्त हेतूने गावातच विनामूल्य शिकवणी वर्ग सुरू केले होते.शिकवणी वर्गाचा कोणताही मोबदला घेत नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची चांगली सोय होऊ लागली. शिकवणी वर्गाचे विद्यार्थ्यांचे यश बघून बरेच विद्यार्थी शिकवणी वर्गात दाखल होऊ लागले होते. पर्यायाने ग्रामीण भागात शिक्षणाचे जाळे पोहचविण्याचे महत्वपूर्ण कार्य करित आहे असल्याचे असे म्हटल्यास नवल वाटणार नाही.
पदवीचे शिक्षण चालू असताना त्याच्या जीवनात फार मोठे चढ-उतार आले;नव्हे भयंकर वादळच! या कालावधीत त्याला फार मोठ्या रोगाने ग्रस्त केले होते.पोटाच्या विकारामुळे तब्येत त्याला साथ देत नव्हती. शेवटी डॉक्टरांच्या सल्ल्याने अखेर पोटाचे ऑपरेशन करावे लागले.दुसरे म्हणजे याच कालखंडात लग्न झाले होते. तिसरे म्हणजे ऐन तारुण्यात प्रत्येक युवकाच्या जीवनात घडले तेच भूपतीच्या जीवनातही घडले, नव्हे! एका वादळाप्रमाणे प्रवेश झाला अन वादळाप्रमाणे निर्गमन ही झाले.अशा एक ना अनेक समस्या आल्या होत्या.अशा स्थितीत एखादा युवक खचून गेला असता पण भूपतीने याला समर्थपणे तोंड दिले.म्हणूनच परीक्षा एक-दीड महिन्याच्या अंतरावर असताना पोटाचे ऑपरेशन करून सुद्धा पूर्वी प्रमाणेच प्रथम क्रमांकाने पास झाला.हलाखीच्या परिस्थितीतही व लग्नावर झालेला अवाढव्य खर्च व त्याच्या जीवनात आलेले भयंकर वादळ यांने निश्चितच अपयशाच्या खाइत लोटणारे प्रसंग होते;पण भूपती यात यशस्वी झाला हे आताच्या युवकांसाठी खरोखरच प्रेरणादायी आहे.
कालांतराने भूपती पदवीधर झाला.पदव्युत्तर शिक्षण घेण्याच्या दृष्टीने वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला असला तरी शिक्षण आणि राहण्याचा खर्च त्याच्या परिस्थितीच्या पलीकडे होता. म्हणूनच कॉलेज सोबत खाजगी नोकरी करून द्वितीय उच्च श्रेणीत पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झाला.तत्पूर्वी कॉलेज सोबतच खाजगी नोकरी करणे म्हणजे त्याला तारेवरची कसरत करावी लागली.अशा बिकट परिस्थितीत ध्येय प्राप्त करून इतरांना आदर्श व प्रेरक ठरला.म्हणूनच आजही बरेचसे युवक-युवती विद्यार्थी वर्ग भूपतीचा अनमोल सल्ला घेण्यात विसरत नाही.
सध्या बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सर्वांनाच भेडसावत आहे.कोणत्याही शाखेचे शिक्षण घ्या परंतु बेरोजगारी नशिबी येणारच!परंतु शिक्षण कधीही वाया जाणारे नसते.तर वाट चुकलेल्याना वाट दाखविते आणि अंधारकामय जीवनात आशेचा किरण दाखविते.पण शिक्षणाचा योग्य उपयोग करून घेता आला पाहिजे.
परंतु सुशिक्षित पण बेरोजगार शासकीय नोकरीचा हट्टाहास धरून आपला अनमोल वेळ वाया घालविते.इतर कामांना किंवा व्यवसाय,उद्योगाला गौण समजून उच्चशिक्षित मंडळी अहंकारी (अपवादात्मक)असल्याचे निदर्शनास येते.म्हणूनच दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढताना दिसते आहे.परंतु भूपतीच्या स्वभाव वेगळाच!म्हणूनच त्याने अगदी पदव्युत्तर परीक्षेचा शेवटचा पेपर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी एका दुकानात नोकरी स्वीकारली.बेकार राहण्यापेक्षा काही कमविणे योग्य नाही का?काही दिवसातच भूपती पदव्युत्तर परीक्षा पास झाला. दुकान सांभाळीत असताना इतर रोजगाराच्या वाटाही शोधू लागला.व्यवसायात गुंतलेल्या भूपतीच्या अनेकांशी निकटच्या संबंधाने स्थायी रोजगार मिळवून देण्यास उपयोग झाला.म्हणूनच भूपतीचा आत्मविश्वास,चिकाटी,मेहनत आणि स्वभावाची एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी दखल घेऊन नवीन सत्रापासून अंशकालीन प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली.आपल्या मेहनतीचे व संघर्षाचे फलित झाल्याने भूपती तसेच त्यांच्या परिवारातील सदस्य निश्चितच सुखावले होते. परंतु येथेही नियतीने भूपतीच्या जीवनाची क्रूर थट्टाच केली.भूपती प्राध्यापक म्हणून रुजू होण्यापूर्वीच जबरदस्त अपघातात मोठी झुंज द्यावी लागली.सुदैवाने भूपती जीवाने बचावला असला तरी एका पायाने कायमचा अपंग झाला.म्हणतात ना "भगवान देता है तो,छप्पर फाड के देता है"त्याचप्रमाणे भूपतीला संघर्षमय जीवन "छप्पर फाडके दिले आहे" अशाही स्थितीत भूपती न हादरता परिस्थितीशी झुंज देऊन संघर्ष तितक्याच पोटतिडकीने करीत आहे.आजही तो संघर्षाच्या वाटेवरच आहे.ईश्वर त्याच्या संघर्षमय जीवनात न्याय देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व त्याच्या भावी जीवनात हार्दिक शुभेच्छा!!
----------------------------------------
*नरेश शं.इंगळे*
*मु.पो.भांबोरा, ता.तिवसा*
----------------------------------------
*दैनिक देशोन्नती*
*सोमवार-दिनांक ०५/११/२००१*
--–--------------------------- ----------
तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे- शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे. शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...
Comments
Post a Comment