Skip to main content

आजही अधांतरीच


*आजही अधांतरीच*
----------------------------------------
   *नरेश शं.इंगळे*
  *भांबोरा,जि.अमरावती*
----------------------------------------
      जिल्ह्याच्या ठिकाणावरून महत्त्वाची कामे आटोपून गावाकडे परत येत असताना वाटेवर दिपाचे गाव असल्याने  क्षणात घराकडे गाडीचा रोख वळवून दीपाच्या घराकडे निघून गेलो.तिच्या घराजवळ गाडी थांबताच ती करीत असलेली कामे बाजूला सारून तिने आमचा आदर सत्कार केला.इकडील-तिकडील विचाराच्या देवाणघेवाणीनंतर तिच्या वैभवशाली घराकडे नजर फिरवून अलगदपणे विचारले की, चांगली प्रगती दिसते.तुम्ही तर चांगलाच जम बसविला.शून्यातून विश्व निर्माण करून दाखविणाऱ्या तुमच्या कर्तुत्वावर विश्वासच बसत नाही.खरोखर तुम्ही ग्रेट आहात.ममतेचा सागर.प्रेमविवाह करणाऱ्यांना खरा आदर्श आहात.असे बोलत असतानाच माझे शब्दसुमने मध्ये खंडित करून अगदी स्मितहास्यातच दीपा म्हणाली,काय भाऊ! देवाची कृपा आहे.आणि तुमच्या सारख्या  अनेक हितचिंतकाचे सहकार्य, समजून घेण्याची वृत्ती तथा मेहनतीचे फळ आहे,असे म्हणत असतानाच दीपा एकदम वर्तमान काळातून भूतकाळात शिरून भूतकालीन आठवणीच्या स्मरणाने तिच्या डोळ्यातून धारा ओथंबून वाहत होत्या.काही क्षणातच भानावर येऊन (डोळे पुसत)काय मी माझेच रडगाणे गात आहे;बरं जाऊ द्या! तुमचे कसे काय चालू आहे?अशा प्रश्नांने अलगदपणे भूतकालीन विचारातून बाहेर पडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.दिपाच्या सांसारिक जीवनातील भरती-ओहोटी च्या प्रसंगाने निश्चितच वेदना झाल्यानंतरही दीपाचे प्रगतीचे शिखर पाहून आनंदही तथा अभिमानही तितक्याच आवेशाने वाटत होता.लवकरच दीपाचा निरोप घेऊन परतीच्या मार्गावर भरधाव वेगाने निघून आलो.
      सायंकालीन वेळ असल्याने सामसूम रस्त्याने आमची गाडी भरधाव वेगाने गाव जवळ करु लागली होती.कडक थंडीची वेळ असली तरी दीपाच्या जीवनातील चढ-उताराने शरीरावर थंडीचा प्रभाव काही जाणवत नव्हता. दीपा तशी अगदी लाडात वाढलेली.मूळची मुंबईसारख्या शहरातील मुलगी होती.सर्व गुण संपन्न असलेल्या दीपाचे आई-वडील उच्चपदस्थ शासकीय नोकरीवर असल्याने तिला कशाचीच कमतरता भासू दिली नाही.तरीही दीपाने वाढत्या वयानुसार जबाबदारीची जाणीव स्वीकारून मुंबईतच एका खाजगी कंपनीत नोकरी स्वीकारली. नोकरी करीत असताना त्याच परिसरातील कंपनीत नोकरी करणाऱ्या राजासोबत मैत्रीचे संबंध निर्माण झाले.मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले याची थोडीशीही कल्पना आली नाही.अखेर त्यांच्या प्रेमाचा गुलमोर चांगलाच फुलू लागला.
      ड्युटीवर जात असताना एकाच मार्गाने जात असल्याने त्यांच्या भेटीगाठीत कधीच खंड पडत नसे.वाढत्या सहवासामुळे भावी जीवनाचे स्वप्नही रंगू लागले होते.जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या आणि त्यां निभावल्या सुद्धा.
       असेच दिवसामागून दिवस तथा वर्षामागून वर्षे जात असतानाच त्याच्या प्रेमाच्या चर्चाही बऱ्याच प्रमाणात होऊ लागल्या होत्या.अशाप्रकारच्या चर्चेला उधाण येण्याऐवजी विवाहाबद्द होण्याचा त्यांनी निश्चय केला होता.आई-वडिलांच्या मर्जीविना विवाहबद्ध होण्याचा त्यांनी निश्चय केला होता.आई वडिलांच्या मर्जीविना विवाह होणे म्हणजे आई-वडिलांच्या विश्वासघात होईल या दृष्टीने तिला चांगलेच पछाडले होते.पण म्हणतात ना प्रेम किती ही लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी आज नाही तर उद्या सर्वांनाच माहीत होते.याच पार्श्वभूमीवर दीपाच्या घरच्यांना याची चाहूल लागली होती.याबाबत दीपाला विचारणा करतांना दीपाला आई-वडिलांना सांगण्याचे धाडस होत नव्हते.कारण दीपा आणि राजच्या लग्नाला तिच्या घरच्या मंडळी कडून प्रखर विरोध होणार हे ही तितकेच सत्य होते.कारण राज त्यांच्या पसंतीत कधीच उतरणार नाही याची दीपाला परिपूर्ण कल्पना होती.कारण राज हा ग्रामीण भागातून आलेला युवक होता.दीपाला राजबाबत सविस्तर कल्पना असली तरी उच्चविद्याविभूषित दीपाचे आई-वडील खेडूत व अस्थायी नोकरी करणाऱ्या राज सोबतच्या विवाहाला कदापिही मान्यता देणार नव्हते.म्हणून त्यांच्या विवाहाला दीपाच्या घरील प्रखर विरोध झाल्याने अखेर काही मित्र मंडळीच्या सहकार्याने दीपाच्या आई वडीलाच्या पश्चात राज व दीपा विवाहबद्ध झाली.दीपाने न विचारता चक्क आंतरजातीय विवाह केल्याने दोघांनाही संपविण्याचा निर्णयाने ते चांगलेच धास्तावले होते.म्हणूनच दोघेही मुंबईतून रातोरात राजच्या गावाला निघून आले ते कायमचेच.
      मुंबईतून गावात मुलगी आल्याने खेड्यागावात कुतूहलाचे वातावरण.त्यामुळे लोकांना त्यांना भेटण्याची व पाहण्याच्या इच्छेने त्यांच्या घराकडे लोक येऊ लागले.त्यात काही विरोधक तर काही समर्थक असे.राजच्या घरी काही दिवसापर्यंत बराच विरोध झाल्याने ते अगदी संकटात सापडले होते.परंतु परिस्थितीवर मात करून काही दिवसातच दीपाने राजच्या परिवारासोबतच गावकऱ्यांची सुद्धा मने जिंकली होती.म्हणूनच तिच्याकडे सर्वजण आदराने पाहून बिनदिक्कतपणे "ताई" म्हणून संबोधत असे.पण तत्पूर्वी अनेक अडचणीला व समस्येला सामोरे जावे लागले होते,हे ही तितकेच सत्य आहे
      दीपा व राजने सर्वांची सहानुभूती मिळविली असली तरी उदरनिर्वाहाचा खरा प्रश्न त्यांच्यासमोर होता.निव्वळ सहानुभूतीने पोट भरत नाही.येताना सोबत आणलेला पैसा सर्व खर्च झाल्याने तसेच समाजाकडून मदतीचा हात मात्र कुणीच दिला नाही.त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्या.पण अगदी सुरुवातीला दीपाने कशाचीही कुरबूर न करता "आलिया भोगासी,असावे सादर"या वृत्तीने दुःखाला सुख माणून जीवन जगत होती.वाढत्या समस्यामुळे तथा राजला घरच्या कडून होणाऱ्या प्रखर विरोधामुळे राज सुद्धा चिडचिड करीत असल्याने त्यांच्यात नेहमीच शाब्दिक चकमक होत असे.कधीकधी तर त्यांचा एवढा बेबनाव होत असे की,एखाद्याचे नुकसान होणार की काय?अशी भीती वाटत असे.कालांतराने राज व दीपाच्या व्यवहारात समन्वय होऊन दीपाला त्रास देण्यापेक्षा तिला समजून घेण्याची गरज असल्याचे राजच्या लक्षात आले.कारण ज्या वैभवशाली व लाडात वाढलेल्या दीपाने आपल्या प्रेमासाठी सर्व सुखांना व आई-वडिलांचा त्याग केला त्या दीपाला त्रास देणे म्हणजे तिच्यावर मानसिक दडपण टाकल्यासारखे होईल म्हणूनच राज तिला समजून घेऊ लागला होता.
     दोघेही सुखात वाढले असल्याने काबाडकष्ट करणे फारच कठीण होते.परंतु त्याशिवाय गत्यंतर नव्हते. म्हणूनच कधीही शेत न पाहिलेल्या,पीक व तनकट यांच्यातील फरक न समजणार्‍या दीपाने गावातील महिला कामगारांसोबत टोंगळा-टोंगळा गाट्यात(फसणीत) नींदन खुरपण करायला जाऊ लागली परंतु पीक व तणकट यांच्यातील फरक न समजणार्‍या दीपाने शेत मालकाचे काम करण्याऐवजी जास्त नुकसानच काढत असे.काही काही शेतमालक तिची परिस्थिती बघून समजून घेत असे.पण सर्वच शेतमालक सारखे असतात का?पण बहुतांश शेत मालकांनी मुंबई ची पोरगी आपल्या शेतात कामाला येत असल्याच्या अभिमानाने दीपाच्या चुकाकडे दुर्लक्ष करीत असे. आपल्या गोड व मधुर वाणीने सर्वांची मने तिने जिंकली होती. म्हणून ती गावची सून नव्हे तर गावची मुलगी म्हणून तिने आपले स्थान निर्माण केले होते
          कालांतराने काही वर्षातच आपल्या जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर परिस्थितीशी प्रखर झुंज देत संसाराचा रथ योग्य मार्गावर आणण्यास दोघेही यशस्वी झाले. याच कालखंडात त्यांना कन्यारत्न प्राप्त होऊन घरात लक्ष्मी आल्याचे समजून तिचे चांगले स्वागत केले.सुदैवाची गोष्ट म्हणजे मुलीच्या जन्मापासून त्यांच्यात भरभराट होत गेली. याच दरम्यान राजने स्वमालकीचा शहरात एक चांगला व्यवसाय सुरू केला.व्यवसायात दीपा पण घरबसल्या काही कामे करून मदत करते आहे.पुढे त्यांना पुत्रप्राप्ती सुद्धा झाली."हम दो हमारे दो"असा त्यांचा छोटासा संसार अगदी आनंदात जीवन व्यतीत करीत आहे.दोन अपत्त्यासह शहराच्या ठिकाणी वैभव संपन्न जीवन जगत आहे ते केवळ आत्मविश्वास,जिद्द,मेहनत तथा एकमेकाच्या सहकार्यामुळेच ना ! राज व दीपाचा प्रेमविवाह झाल्यानंतर आज ज्या स्थितीत आहे त्यासाठी त्यांना किती कष्ट उपसावे लागले याची कल्पना आपण करू शकाल काय?समाज अगदी सहानुभूती दर्शवित असला तरी अनेकांनी मदत करण्याऐवजी प्रतिष्ठित समजणाऱ्या लोकांनी त्यांच्यात कित्येकदा हस्तक्षेप केल्याचे दिसत आहे.समाज अडचणीच्या वेळेस मदत करण्याऐवजी मदत करणाऱ्याचे हात कापत असलेल्यांना आपण काय म्हणावे?याउलट सुखी संसाराचे जीवन उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्रच ना! हे सर्व करण्याचे मूळ कारण म्हणजे त्यांनी प्रेमविवाह केला  म्हणून ना! प्रेमविवाह करणे गुन्हा आहे का?त्यांनी निखळ प्रेम करून एकमेकाचा विश्वासघात न करता जाती धर्माच्या शृंखला तोडून प्रेमविवाह केल्याने ते गुन्हेगार ठरतात का?नव्हे संबंधीताच्या नकली प्रतिष्ठेला धक्का पोहोचला म्हणूनच हा सर्व आटापिटा असतो.नकली प्रतिष्ठेचे जीवन जगण्याऐवजी एकमेकाच्या प्रेमाच्या आधारावर सुखी संपन्न तथा समाधानी जीवन जगणे योग्य नाही का? परंतु तथाकथित लोक यास विरोध करून लग्नासारख्या पवित्र बंधनाला बाजाराचे स्वरूप देण्यातच कुठे हुंड्याच्या छळापायी आत्महत्या तर कुठे प्रेमीयुगुलाच्या घरच्या मंडळीकडून झालेल्या प्रखर विरोधामुळे प्रेमीयुगुलाने केलेली आत्महत्या किंवा पळून जाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. याला कारणीभूत कोण? समाज की नकली प्रतिष्ठेवाले लोक? प्रेमविवाहाबाबत समाजाचा तथा बहुतांश प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांच्या आई-वडिलांचा तथा समाजाचा दृष्टिकोन बदललेला दिसत नाही.अरेंज मॅरेज बाबत जशा त्यांच्या जबाबदाऱ्या असतात तशा लव मॅरेज बाबत काहीच जबाबदारी नाही का? नेमके असेच दीपा बाबत घडलेले आहे.आपल्या स्वकर्तुत्वाने सगळ्यांना जिंकू शकली पण आई-वडिलांना जिंकू शकली नाही. यात दोष कुणाचा?दीपाचा की दीपाच्या आई-वडिलांचा (कुटुंबाचा)? दीपा सारख्या सोज्वळ,प्रेमळ, निगर्वी,ममतेचा सागर असलेल्या दीपाला अशा प्रसंगाला बळी बळी पडावे लागले आहे.दीपाच्या लग्नाला चक्क बारा वर्षे होऊन सुद्धा त्यांचे मतपरिवर्तन झाले नाही हे खेदाने म्हणावे लागते.कोणताही अपराध न करता केवळ प्रेमविवाह केल्याने आई वडिलांच्या प्रेमाला पोरके व्हावे लागल्याचे शल्य कायमचे तिच्यासमोर दिसते आहे.दीपाचे आई वडील तिला कधीच भेटणार नाही का?ह्या एकाच कारणाने दीपा कितीही वैभव संपन्न तथा सुख-समाधानात जीवन जगत असली तरी आई-वडिलांच्या प्रेमाविना तिचे जीवन आजही अधांतरीच आहे---------!
----------------------------------------
*नरेश शं.इंगळे*
*मु.भांबोरा,जि.अमरावती*
----------------------------------------
*दैनिक देशोन्नती*
*सोमवार,दि- २६/११/ २००१*
----------------------------------------

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...

संत गाडगेबाबा आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील ऋणानुबंध

*संत गाडगे बाबा आणि डॉ.आंबेडकर यांच्यातील ऋणानुबंध* ---------------------------------------- *प्रा.डॉ.नरेश शं. इंगळे* मु.भांबोरा ता.तिवसा,जि.अमरावती. भ्रमणध्वनी-९९७०९९१४६४ ----------------------------------------         विसाव्या शतकातील सामाजिक सुधारणेच्या कार्यात/आंदोलनात ज्या महापुरुषांचा उल्लेखनिय व महत्वपूर्ण सहभाग होता त्यात लोकसंत,कर्मयोगी, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा आणि युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. दीनदलित,पीडित,वंचित आणि दुःखीताच्या कल्याणासाठी या दोन्ही बाबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.त्यासाठी त्यांनी प्रबोधन केले,लढे दिले,आंदोलने केलीत.बळकट असलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था मोडीत काढणे आणि सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करणे हे त्यांच्या कार्याचे प्रमुख ध्येय आणि उद्दिष्ट होते.कीर्तन हे गाडगे बाबाच्या जन प्रबोधनाचे प्रमुख माध्यम तर डॉ.आंबेडकर यांनी सामाजिक,राजकीय आंदोलनाच्या माध्यमातून हे कार्य आरंभले होते.त्यांच्या कार्याची दिशा आणि ध्येय समान होते.संत गाडगेबाबा हे डॉ.आंबे...