Skip to main content

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*
       मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली 
आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.
      सूर्या हा एक सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील होतकरू मुलगा.त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी जेमतेमच.त्याचे आई-वडील हे शेती आणि शेतमजूरी करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे.अशा बेताच्या परिस्थितीत त्याच्या आई-वडिलांनी कुटुंबाला विशेषतः सूर्याला आर्थिक परिस्थितीची कधी झळ पोहचू दिली नाही.इतरांच्या आई-वडिलाप्रमाणेच त्याच्या आई-वडिलांना सुद्धा आपली मुलं-मुली शिकून सवरुन पुढे जावीत,उत्तरोत्तर प्रगती करावी अशी मनोमन आशा-आकांक्षा बाळगून होते.आपल्या स्वप्नपूर्तीसाठी कुटुंबात/घरात अठराविश्व दारिद्र्य असताना सुध्दा मुलाच्या शिक्षणात आर्थिक परिस्थिती आड येऊ दिली नाही.त्यांच्या आई-वडिलांमध्ये शिक्षणाप्रती प्रचंड आस्था ओतप्रोत भरलेली होती.ती त्यांनी कायम जपली.आई-वडिलांची प्रेरणा अनं पाठबळाने पुढील मार्ग पादाक्रांत करित होता.
     सूर्याला गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात दाखल केलं.पहिला वर्ग बऱ्यापैकी उत्तीर्ण झाला पण  दुसऱ्या वर्गात असताना त्याने अंतिम परीक्षेचे काही पेपर दिले नाही.त्यामुळे तो चक्क नापास (१९८२-८३) झाला ! आई वडीलासाठी हा नक्कीच धक्का होता.कदाचित सूर्याही खचला असेल.अपयश नसूनही त्याला हे सर्व पचवावं लागलं !.विशेष म्हणजे त्यावेळी तो नापास झाल्यामुळे तत्कालीन छोटे-मोठे सवंगडी मुलं-मुली त्याला चिडविण्यास कसलीच कसर सोडत नव्हते.हा प्रसंग सूर्याच्या चांगला जिव्हारी लागला.काही न बोलता हे सर्व काही सहन करीत तो पुढे चालत राहिला.भविष्यात असलं अपयश आपल्या वाट्याला कधी येऊ नये अशी मनाशी खूणगाठ बांधली आणि परिणामतःतो पुढील वर्गात चक्क प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण होऊन चिडविणार्याना कृतीतून उत्तर दिलं.त्यातून सूर्याचा आत्मविश्वास अधिक बळावला.तिसऱ्या-चौथ्या वर्गातही प्रथम क्रमांक मिळविला.पुढे हीच प्रगती त्याने कायम ठेवली.सूर्याच्या प्रगतीने त्याचे आई-वडीलही सुखावलेत.बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे सूर्याच्या आई-वडीलाना सुद्धा कदाचित त्याची जाणीव झाली असावी. म्हणूनच ते सूर्यासाठी कधी मागे हटले नाहीत तर उलट त्याला सतत प्रेरणा देत राहिले.ऊर्जा देत राहिले.हे विशेष.
     सूर्याच्या यशाने त्याच्या आई वडीलाच्या आशा-आकांक्षा पल्लवित झाल्यात.सूर्याला चांगलं शिकवायचय हा "पण" घेतला.तदनंतर सूर्याला सन १९८५-८६ ते १९८७-८८ या कालावधीत इयत्ता पाचवी ते सातवी या वर्गातील अध्ययनासाठी नजीकच्या गावी जिल्हा परिषद शाळेत दाखल केलं.तद्नंतरच्या वर्गात सुद्धा सूर्याने यशाची परंपरा कायम ठेवली.त्याची शैक्षणिक गुणवत्ता
 बघून त्यांच्या आई-वडिलांनी १९८८-८९ च्या शैक्षणिक सत्रात ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या ठिकाणी आठव्या वर्गात एका खासगी शाळेत दाखल केले.परीक्षा संपली अनं सूर्या गावी परत आला.तो शहरात फारसा रमला नाही आणि पुढील दहावी पर्यंतच्या माध्यमिक शिक्षणासाठी त्याला नजीकच्या गावातील एका खासगी शाळेत दाखल केले.दहावीची वार्षिक परीक्षा संपली.
     उन्हाळ्याचे दिवसात सगळीकडे लग्नसराईची एकच धामधूम सुरू झाली.आप्तस्वकीयाच्या लग्नप्रसंगी नातेवाईकाची गर्दी दाटू लागली.लग्नसराईत उन्हाळा कधी व कसा संपला हे काही कळलंच नाही.मात्र जुन्या  नातेवाईक-आप्तस्वकीयासोबतच इतर नवनवीन नातेवाईक मित्र मंडळीची भर पडली हे मात्र तितकेच खरे आहे.अशाच लग्न प्रसंगी मारडा या गावी १५ मे  १९९१ बुधवार रोजी सूर्याचा एका नातेवाईकाच्या लग्न प्रसंगी जाण्याचा योग आला.त्याच लग्न प्रसंगी त्याच्याच गावातील "किरण" नावाची मुलगी आली होती.अचानक किरण त्यांच्या दृष्टीत पडली.त्यावेळी तिच्या अनं सूर्याच्या मनात अशा काही भावना असतील असे वाटण्यास काही कारण नाही.दोघेही एकाच गावातील अशीच काहीशी त्यांची ओळख होती !!!.
          त्याकाळी लग्न सोहळे हे गावातच उरकत असे.हाही लग्न सोहळा मारडा या गावी वधूच्या घरालगत होता.लग्न मंडप सजला.वऱ्हाडी मंडळी लग्न मंडपात नटून थटून आलीत.लग्न मंडपी पाहुण्यांची एकच गर्दी वाढू लागली.पाहुणे मंडळींनी लग्न मंडप गचागच भरला.नवरदेव-नवरीच्या आजू-बाजूला मोजक्या काही सुवासिनीचा घोळका उभा होता.त्यात किरण नावाची मुलगी सुद्धा उभी होती.सडपातळ बांधा,सुडौल सुरेख शरीरयष्टी, काळेशार लांब डौलदार केस,गौर वर्ण,आकर्षक/मनमोहक चेहरा,त्यात स्मित हास्याची भर,चमकदार चेहऱ्यावर पांढरा चष्मा,अगदी साधा-भोळा चेहरा सोबतच अंगावर शाळेचा ड्रेस (कथिया स्कर्ट आणि शुभ्र रंगाचा शर्ट) परिधान केलेली किरण कुणाची दृष्ट लागावी अशी तिची साधी पण मनमोहक प्रतिमा उपस्थिताच्या मनात भरणारी होती !.सूर्या त्यास कसा अपवाद ठरणार ! सूर्याची अलगदपणे किरणवर नजर पडली.त्यावेळी तो तिला दूरवरून बघतच राहिला.कदाचित तिच्या मनात असले काही विचारही आले नसावेत.पण पहिल्याच भेटीत किरण सूर्याच्या मनात घर करून बसली !.लग्न समारंभ उत्साहात आणि थाटामाटात पार पडला.लोकांची गर्दी विरळ झाली.नवरी पाठवणी (बिदाई) नंतर काही निवडक पाहुणे मंडळी ही नवरी घरी बसलीत.अधिकांश पाहुणे मंडळी ही सूर्या अन किरणच्या गावातील होती.उपस्थित मंडळी पैकी एका व्यक्तीने पिण्यासाठी पाणी मागविले.इतरांकडूनही अशीच मागणी झाली.किरण पाणी घेऊन आली.ती येताच सूर्या इतरांच्या नजरा चुकवून तिच्याकडे एकटक बघू लागला.कधी ती पाठमोरी झाली ते त्याला कळलेच नाही !. त्यावेळी ती कदाचित आठवी-नववीत शिकत असावी.
      सूर्यासाठी ही किरणची  पहिलीच भेट.दोघेही एकाच गावातील असले तरी ते कधी एकमेकांसमोर येत नसत. दोघांच्याही मनात भेटण्याचा काही उद्देशही नव्हता.कधी काळी त्यांच्यात आमना-सामना झाला असलातरी त्यावेळी तसे काही विचार मनात आले नाहीत.काळ पुढें सरकत गेला.सूर्या शाळेत जाऊ लागला.सूर्या आईवडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी मेहनत करू लागला.एक होतकरू आणि हुशार विद्यार्थी म्हणून सुर्याला ख्याती मिळू लागली.आपल्या नावलौकिकाला तडा बसणार नाही याची तो पुरेपूर काळजी घेऊ लागला.अशातच सूर्या सन १९९०-९१ या शैक्षणिक सत्रात इयत्ता दहावीची परीक्षा ही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला.त्यावेळी तो निकाल शाळेसाठी ऐतिहासिक ठरला.कारण शाळेच्या स्थापनेपासून कधीच कुणी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले नव्हते. यावेळी मात्र शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन विद्यार्थी प्रथम श्रेणीत उतीर्ण झाले.त्यात दोघांपैकी एक सूर्या होता.सूर्याच्या गावाच्या शैक्षणिक इतिहासातही दहावीत प्रथम श्रेणीत उतीर्ण होणारा सूर्या हा पहिला विद्यार्थी ठरला!.त्यामुळे सूर्याला गावात वेगळे पण तितकेच आदराचे स्थान प्राप्त झाले.आई-वडीलाचाही आनंद द्विगुणित झाला.
     सूर्यानं आपल्या जिद्द व मेहनतीच्या भरवशावर घवघवीत असं यश संपादन केलं.त्यामुळे सूर्याचं सगळीकडे कौतुक व्हायला लागलं.
शहरी भागातील चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन मनासारखं शिक्षण घ्यावं अशी
त्याची आणि त्याच्या आईवडिलांची मनोमन इच्छा होती.परंतु योग्य मार्गदर्शनाचा अभाव,बेताची आर्थिक परिस्थिती आणि इतर अन्य कारणामुळे
त्याला अपेक्षित ठिकाणी उच्च माध्यमिक शिक्षणासाठी प्रवेश घेता आला नाही.सूर्या निराश झाला नाही.आहे त्या परिस्थितीत समाधान मानू लागला.अपेक्षित यश मिळावं यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करु लागला.त्याची शिक्षणातील प्रगती बघून सूर्याला एक हुशार विद्यार्थी अनं प्रामाणिक मुलगा म्हणून नावलौकिक प्राप्त व्हायला लागला.परिणामतः सूर्या हा इतरांसाठी आदर्शवत ठरला आणि आज सुध्दा तितकाच आदर्शवत आहे.सूर्याचा स्वभाव आणि प्रामाणिकपणा बघून शालेय जीवनात इतराप्रमाणेच सूर्याकडेही मुली आकर्षित होत असे.कधी कुणी प्रेम व्यक्त करत असे तर कुणी मनांतल्या मनात प्रेम करण्याची भावना ठेवत असे. ऐन उमेदीच्या वयात अशा भावना त्यालाही आनंददायी वाटत असे.मात्र त्याने कुण्या मुलीसमोर कधी प्रेम व्यक्त केलं नाही.सूर्या हा तसा मनमोकळ्या स्वभावाचा असल्याने वर्गातील अधिकांश मुली त्याच्या संपर्कात येत असे.मनात कुठलीही भावना न ठेवता सूर्याहीं सहज त्यांच्या वर्गातील मुली सोबत बोलत असे.त्यामुळे अनेकांना सूर्या बाबत संशय वाटत असे.पण सूर्यानं अशी भावना कधीच मनात ठेवली नाही.त्यादृष्टीने कोणत्याही मुलीकडं बघितलं नाही.परंतु कधी कधी इच्छा नसतानाही सहजपणे टिंगलटवाळीच्या ओघात असं काही घडून जात असे.पण त्यावेळी अशी कुठल्याही प्रकारची भावना त्यांच्या मनात नव्हती.हुशार सूर्याच्या प्रामाणिकपणामुळे संपर्कातील मुली आकर्षित होण्यास कारणीभूत ठरत असे.यातूनच सूर्याला अनेक मुलींच्या मैत्रीचा सहवास (प्रेम नव्हे) मिळू लागला.अशा प्रकारच्या सहवासामुळे अनेकांचा गैरसमज होत असे.कुण्या मुलींच्या भावना जरी त्याच उद्देशाने असल्या तरी सूर्याने एखादा अपवाद वगळता असे विचार कधीच मनात आणले नाहीत हेही तेवढेच खरे आहे.त्या वयात प्रेम म्हणजे काय? हे कळण्याचे नक्कीच ते वय नव्हतं.ते केवळ भिन्न लिंगी आकर्षण असे.सूर्या कोणाच्या प्रेमात पडला नाही (त्यावेळी इतरांच्या समजूती नुसार)असे म्हणता येणार नाही.शालेय कालखंडात सूर्याच्या जीवनात असे प्रसंग आले असले तरी तो कुणाच्या प्रेमात पडला नाही.मात्र काही घटनाप्रसंग सूर्या प्रेमात पडला आहे असेच काहीशा किस्यावरून वाटत असे.
पण त्यात काही तथ्य नव्हते.
     सूर्यानं तालुक्याच्या ठिकाणी अकरावी साठी प्रवेश घेतला.नियमितपणे कॉलेजला जाऊ लागला.जुने सवंगडी मागे पडलीत.सोबतच्या मित्रपरिवारानी आप-आपल्या सोयीनुसार महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतले.त्यामुळे काही मित्र-मैत्रिणी वेगवेगळ्या ठिकाणी तर काही सूर्या ज्या गांवी शिकत होता त्याच गावी शिकत असे.अशी संख्या अत्यल्प होती.पण जुन्या आठवणी मात्र कायम होत्या.त्याच कालखंडात एक मुलगी सूर्यावर जीवापाड प्रेम करीत असे.पण तिनं तिचं प्रेम कधी व्यक्त केलं नाही.तसा तिनं प्रयत्न केला असल्याचे सूर्याच्या कधी लक्षात आले नाही.कदाचित यालाच खरे प्रेम म्हणावे !
     सूर्यानं शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात प्रवेश केला.सुर्यासाठी हे सर्व नवख होतं.आता त्याला नवे सवंगडी, मित्रपरिवार मिळाला.विद्यमान मित्रपरीवार बदलला.वातावरण बदलले.वयोमानानुसार विचारही बदलायला लागलेत.युवा अवस्थेसाठी हा खऱ्या अर्थानं संवेदनशील असा काळ असतो.याच वयात अनेक घडामोडी घडत असतात.सूर्यातही तसा बदल व्हायला लागला.हा काळ म्हणजे कुणाही साठी टर्निंग पॉईंट असतो.याच वयात मुला-मुली मध्ये अनेक बदल घडून येत असतात.सोबतच मुला-मुली प्रति अर्थात एकमेकां प्रति (भिन्न लिंगी) आकर्षणही तितक्याच झपाट्याने वाढत असते.या वयातूनच प्रत्येकाच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळत असते.भावनेला टाळून योग्य निर्णय घेणारा आपलं उज्वल भविष्य घडवू शकतो.सूर्याला त्याच्या कुटुंबाची आणि व्यक्तिगत भविष्याची नक्कीच जाणिव होती.म्हणून तो असेल त्या प्रसंगांशी समरस झाला.सहभागी झाला पण तो आपल्या ध्येयापासून कधी भरकटला नाही.भावनेच्या भरात वाहून गेला नाही.असे त्याकाळीच्या प्रवासावरून सहज लक्षात येतय.विशेष म्हणजे याच वयात कळत-नकळत मूलं-मुली एकमेकांच्या प्रेमात पडत असतात.कदाचित हे प्रेम आकर्षणातून होत असे.याच वयातील मित्रपरिवाराचे सुखद  अनुभव लक्षात घेता प्रत्येकाला प्रेमात पडावसे वाटते.सूर्याच्याही मनात असे विचार कधी आले नाही असे नाही.अनेकांचे अनुभव बघून त्याने कधी असे धाडस केल्याचे  वाटत नाही.त्याच्याही आयुष्यात कुणीतरी आलं असेल किंवा येण्याचा प्रयत्न केला असेल पण सूर्या अशा गोष्टीपासून नेहमीच चार हात दूर राहिला.कदाचित त्याला त्याच्या मनासखी अपेक्षित अशी मुलगी मिळाली नसेल किंवा अप्रत्यक्षपणे कुणावर प्रेम तरी करीत असावा !!!.
      सूर्या नित्यनेमाने कॉलेजला जाऊ लागला.योगायोग म्हणजे ज्या गावी सूर्या शिकायला होता नेमके त्याच गावी "किरण " सुद्धा शिकायला होती.त्यामुळे ते दोघेही  बरेचदा एकमेकांसमोर येत असे.पण किरण याबाबतीत पूर्णतः अनभिज्ञ होती.किरणच्या प्रति सूर्याच्या मनात सुप्त इच्छा असली तरी तिच्या मनात त्याच्या प्रति असे विचार नसतीलच. कालांतराने सूर्याला भूतकाळ अर्थात तो लग्नप्रसंग एकदम आठवणीत यायला लागला.त्या लग्न प्रसंगातील प्रत्येक क्षणनं-क्षण भराभर
त्याच्या दृष्टीपटलावर यायला लागला.कारण मध्यंतरीच्या काळात सूर्या आणि किरण हे दोघेही वेगवेगळ्या गावी शिकायला होते.तसे गावातही एकमेकांचे घरे ही कितीतरी अंतरावर अर्थात दोन टोकावरचे दोन घरे होती.त्यामुळे एकमेकांचा आमना-सामना होणे तसे दुर्मिळच होते.त्यामुळे एकमेकांप्रति कसे आकर्षण असणार किंवा एकमेकांकडे आकर्षित होणार किंवा एकमेकांच्या दृष्टीत पडणार!.
       सूर्या आणि किरण येनकेनप्रकारे एकमेकांसमोर आले तरी त्याच्यात केवळ एकमेकांच्या गावचे एवढीच काय ती ओळख.ते दोघेही एकाच गावी शिकायला असल्याने अनेकदा एकमेकांसमोर येत असे.पण ते  एकमेकांशी कधी बोलण्याचे काही कारण नव्हते.त्याकाळी मुलामुलींना एकमेकांशी  बोलणे तसे सहज शक्य होत नसे.तसे मुक्त स्वातंत्र्यही नव्हते.मुलीच्या बाबतीत तर अनेक सामाजिक बंधने होती.मग कसा संवाद होणार.विशेष म्हणजे त्यावेळी किरणच्या मनात असे काही विचारही नव्हते.त्याच्या बाबतीत जाणीवही नव्हती.पण सुर्याच्या मनात किरण कधीचीच घर करून बसली होती.पण त्याचवेळी शालेय काळातील "त्या" मुलीचे  अव्यक्त प्रेमही दृष्टीआड करता येत नव्हतं.तिही सूर्यावर मनोमन जिवापाड प्रेम करीत असे.ती मुलगी  सूर्यावर जिवापाड प्रेम करते अशी कधी जाणीवच झाली नव्हती किंवा तिने अशी जाणीवच होऊ दिली नाही.ती सुद्धा चांगल्या सुस्वभावाची अनं संस्कारी मुलगी होती.कुणालाही प्रभावित करेल असच त्या मुलीचं व्यक्तिमत्त्व होतं.सूर्या दुविधा स्थितीत अडकला असलातरी मन मात्र किरणकडेच अधिक वळत होतं.पण किरणला याबाबत काहीच माहीत नव्हतं.किरण सूर्याला स्वीकारेल की नाही हा ही यक्ष प्रश्न होता.जिला माहीत आहे तिच्यावर प्रेम करावं की,जी पुर्णतः अनभिज्ञ आहे तिच्यावर प्रेम करावं असा प्रश्न त्याचेसमोर होता.जेव्हा जेव्हा असा प्रश्न त्याचेसमोर येत असे तेव्हा तेव्हा तो दुविधा अवस्थेत अडकत असे."त्या" मुलीच्या घराशी सूर्याची असलेली जवळीकता अनं जिव्हाळ्याचे सामाजिक आणि व्यक्तिगत कौटुंबिक संबंध लक्षात घेता सूर्याचा कल किरण कडेच अधिक राहिला.
     सूर्या आणि किरण एकाच गावी शिकायला (१९९१-९२) होते.सूर्या अकरावीत तर किरण कदाचित नवंवीत असावी.त्यामुळे कधी कधी दूरवरून एकमेकांच्या अप्रत्यक्ष भेटी होत असे.कारण सूर्याचे वर्ग सकाळच्या सत्रात तर किरणचे वर्ग दुपारच्या सत्रात असे.त्यामुळे दोघांचीही एकवेळ येणे अवघड होते.त्यामुळे कधी ती शाळेत जात असतानाच्या वेळी,तर कधी गावच्या एस.टी. स्टँडवर उभी असेल तेंव्हा दृष्टीत पडत असे.दुर अंतरावरून भेट होत असल्याने कधी नजरेला नजर मिळत नसे.त्यावर्षीचा उन्हाळा संपला.नवीन शैक्षणिक सत्राला सुरवात झाली.नव्या शैक्षणिक सत्रांतही सूर्या आणि किरण एकाच गावी शिकायला होते.किरण सूर्याच्या मनात पक्की ठाण मांडून होती.किरणला कसलीही कल्पना नसताना सूर्याला किरणच का आवडली असावी हाही कळीचा मुद्दा आहे.किरणचं मनमोहक, सुंदर दिसणं,प्रेमळ असा सुस्वभाव तर सूर्याला आवडलाच पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिची मधुर गोड वाणी अधिक पसंत पडली.तिचं हळुवार अनं नाजूक अस बोलण्याची लकब सूर्याला घायाळ करून गेली.म्हणून किरण जेव्हा जेव्हा सूर्याच्या नजरेत पडत असे तेव्हा तेव्हा सूर्या घायाळ होत असे.आता सूर्या पुर्णतः किरणकडे पूर्णतः आकर्षित झाला.सूर्या एकतर्फी प्रेमात आकांत बुडाला.तिचा मधुर अन गोड आवाज ऐकण्यासाठी आतुर होऊ लागला.अप्रत्यक्ष भेटही त्याला सुखद धक्का देत असे.पण हे सर्व त्याच्या मनातल्या मनात होतं.सूर्या किरणवर जीवापाड प्रेम करू लागला पण हे प्रेम तिच्यासमोर कसं व्यक्त करायचं हा प्रश्न त्याचे समोर आ वासून उभा होता.
      शैक्षणिक वर्ष १९९२-९३ मध्ये सुर्या बारावीत तर किरण वर्ग दहावीसाठी एकाच गावी शिकायला होते.दोघेही बसने प्रवास करीत असे.परंतु सूर्याचे वर्ग सकाळी तर किरणचे वर्ग दुपारच्या सत्रात असे.त्यातच सूर्याचे एकतर्फी प्रेम.किरणला याबाबतीत पुसटशीही कल्पना नव्हती.त्यामुळे तिचा नित्यक्रम पूर्ववत असे.सूर्याची माञ चांगलीच घालमेल होत असे.त्यांच्या अप्रत्यक्ष भेटीतही ताळमेळ नव्हता.तिच्याकडे जाणारे सर्व मार्ग बंद होते.त्यामुळे सूर्या त्याच्या भावना व्यक्त करण्यास पुर्णतः असमर्थ होता.हतबल होता.शेवटी त्याचा अप्रत्यक्ष भेटीसाठीच प्रयत्न राहत असे.दूरवरून का होईना अप्रत्यक्ष भेटीनेही तो समाधानी होत असे.दिवसागणिक सूर्याच्या मनातील भावना अधिक तीव्र होत होत्या.तिचे प्रेम मिळविण्यासाठी तो अधिक आतूर व्हायला लागला.नव्हे तिला भेटण्याच्या संधीतच तो संधी शोधत असे.पण त्याला कधी अशी संधीच मिळत नव्हती.कदाचित अशी संधी मिळाली तर एकाएकी आपल्या भावना तिच्यासमोर कशा व्यक्त करायच्या हाही प्रश्न कायम होता.अशा भेटी अनेकदा होत राहिल्यात.असे असले तरी सूर्याच्या मनात असलेले प्रेम तिच्यासमोर व्यक्त करण्यासाठी सूर्याचं कधी धाडस झालं नाही.तिच्या मनात काहीच नसेल तर आपल्या प्रेमाचे काय होईल, ही भीतीही त्याला सतावीत असे.कारण दोघेही वेगवेगळ्या प्रवाहातील.दोघांच्याही आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत कमालीची भिन्नता.किरणचे वडील शासकीय नोकरीत तर सूर्याचे वडील हे शेतकरी,शेतमजूर.त्यातही किरण ही आई वडिलांची एकुलती एक मुलगी.त्यामुळे ती बालपणापासूनच लाडात वाढलेली.तिचे आईवडील सुद्धा तिला फुलासारखे जपत असे.त्यातच तिच्या वडिलांचा तामसी/तापट स्वभाव हा सर्वश्रुत होता.नाकावर माशीही सहन न करणारा माणूस म्हणून तिच्या वडिलांची गावभर ख्याती.म्हणून किरण जितकी लाडात वाढली तितकीच वडिलांच्या धाकात वाढली हेही तितकेच खरे आहे.अशा स्थितीत किरण ही सूर्याचे प्रेम स्वीकारण्याचे धाडस करेल का ? हा अनुत्तरीत प्रश्न सूर्यासमोर नेहमीसाठी होता.तिच्याशी संपर्क करणे किंवा तिचे समोर प्रेम व्यक्त करणे म्हणजे वाघाच्या गुहेत शिरण्यापेक्षा कमी नव्हतं.इतकेच नव्हे तर किरण म्हणजे अतिशय कमी बोलणारी आणि लाजरी-बुजरी तसेच विनाकारण घराबाहेर न पडणारी मुलगी अशी तिची गावभर ओळख.जितक्या लाडात पण तितक्याच धाकात वाढलेली किरण प्रेम करण्याचे धाडस तरी करणार का? हा अत्यंत कळीचा मुद्दा होता.अशाही परिस्थितीत  एकतर्फी का होईना सूर्या तिच्यावर जीवापाड प्रेम करू लागला.तिनं प्रेमाचा स्वीकार करो वा न करो किरणवर आयुष्यभर तितकेच प्रेम करण्याचा "पण" मात्र त्याने कधीचाच घेतला होता.म्हणूनच दिवसागणिक तो किरणकडे अधिकाधिक आकर्षित होऊ लागला.तिच्या प्रेमाशिवाय हे जीवन त्याला निष्पळ वाटायला लागले.सूर्याचं एकतर्फी प्रेम तर होतच शिवाय त्याच्या मनातील वेदना तो ना कुणाला सांगू शकत होता,ना किरण जवळ व्यक्त करू शकत होता.अशी दुविधास्थिती सूर्याची होऊन बसली होती.
      सूर्याच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ही किरणच्या आठवणीने होत असे.आता सर्व काही किरणसाठीच अशी त्याची अवस्था झाली.एक दिवस जरी किरण त्याच्या दृष्टीत पडली नाही तो दिवस त्याच्यासाठी बेचैनीचा अनं नैराश्याचा ठरत असे.इतकं प्रेम तो किरणवर करू लागला.म्हणून तर तो प्रत्येक दिवशी निदान तिची दूरवरून भेट घेतल्याशिवाय राहत नव्हता.हा त्याचा दैनंदिन जीवनातील नित्यक्रम झाला होता.दिवसांमागून दिवस जात होते.दररोज नित्यक्रमानुसार तो तिची अप्रत्यक्ष भेट घेऊ लागला. तिच्या दररोज शाळेला जाण्याच्या वेळी किंवा परतीच्या वेळी तर कधी कधी दोन्ही वेळी सूर्या अप्रत्यक्ष भेटी घेऊ लागला.पण असे किती दिवस चालणार !.कदाचित आयुष्यभर असेच चालणार का ? अशी संभ्रमवस्था सूर्याची झाली होती.ना तो स्वतः बोलू शकत होता,ना त्याला कुणी मदत करेल असा किरणच्या अति निकटची व्यक्ती सुर्याकडे नव्हती.त्यात किरणचा शांत स्वभाव आणि तिच्या वडिलांचा तामसी/तापट स्वभाव यामुळे सूर्याला त्याच्या मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी धाकानेच कुणी पुढे येत नव्हतं.त्यामुळे सुर्याच्या मनातील विचार मनातल्या मनात राहत असे.म्हणून अप्रत्यक्ष प्रेम करण्याशिवाय आणि मनात कुढत बसण्याशिवाय त्याचे समोर दुसरा पर्याय नव्हता.
      सूर्या एकतर्फी प्रेमात आकांत बुडाला.इकडे आड तिकडे विहीर अशी दुविधास्थिती त्याची झाली.सूर्याने मनातील प्रेम किरण समोर व्यक्त केले तरी ती प्रेम स्वीकारणार का? असे एक ना अनेक प्रश्न सुर्यासमोर आ वासून उभे राहिलेत.त्यामुळे सूर्याला जीवन जगनेच असहय होऊ लागले.प्रत्येक दिवस  त्याच्यासाठी अग्निपरीक्षा पेक्षा कमी नव्हता.त्यातच त्याचे बारावीचे वर्ष होते.प्रेम आणि परीक्षा (अभ्यास) या दोन्ही बाबी त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या होत्या.किरणचे प्रेम मिळविणे सध्या तरी त्याच्या आवाक्यात नव्हते परंतु अभ्यास करणे हे मात्र त्याच्या हाती होते.एकाच वेळी दोन्ही बाबतीत कसरत करणे वाटते तितके सोपे नव्हते.तरी सुद्धा त्याची धडपड सुरू होती.अशा दुविधेत असतानाही त्याने कधी अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं नाही.मात्र पूर्वीपेक्षा परिणाम झालाच नाही असेही म्हणता येणार नाही.दुसरीकडे तो त्याचे प्रेम किरण पर्यंत पोहचविण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागला तरी त्याला यश मात्र आले नाही. इतकेच काय तर तो किरणवर जिवापाड प्रेम करतो असे कुणाला सांगूही शकत नव्हता. कदाचित असा प्रयत्न केला असता तर तिच्या मनात काहीही  नसताना किरणची विनाकारण बदनामी झाली असती.कदाचित तिचं प्रेम मिळण्याऐवजी उलट ती कायमची त्याच्या पासून दुरावली जाईल अशी भीतीही त्याच्या मनात घर करून बसली होती.म्हणून तो त्याचे प्रेम ना तो किरणजवळ व्यक्त करू शकत होता, ना तो इतर कुणाला सांगू शकत होता.एकंदरीत काय तर दुविधास्थिती त्याचा पाठलाग सोडायला तयार नव्हती.म्हणून निदान समाधानासाठी अप्रत्यक्ष भेटीची कुठलीच संधी तो सोडत नसे.पण तो किरणवर प्रेम करतो ही जाणीव तिला कधीच होऊ दिली नाही हे विशेष!.पण दिवसेंदिवस तिच्यावरील प्रेम मात्र अधिक घट्ट होत राहिले.कधी ना कधी ती मिळेल आणि सर्वकाही बाबी तिच्या समोर व्यक्त करण्याची संधी मिळेल या आशेवर तो प्रत्येक दिवस काढत असे.सूर्याच्या एकतर्फी प्रेमाने सूर्यात अनपेक्षित असे बदलही व्हायला लागले.त्याच्या वागण्या-बोलण्यात ते स्पष्ट जाणवत असे.पुर्वी सारखा उत्साह अन आत्मविश्वास जणू काही हरवून बसला होता.अभ्यासातही पूर्वी सारखं सातत्य दिसत नव्हतं.
     सूर्या हा किरणच्या सहवासाशिवाय राहूच शकत नाही,जगूच शकत नाही अशी काहीशी त्याची स्थिती झाली होती.म्हणूनच तो निदान ती नजरेत पडावी,अप्रत्यक्ष भेट व्हावी यासाठी तहान भूक विसरून जीवाचे रान करीत असे.यावरून किरण प्रति किती आस्था आहे हे लक्षात येते ! विशेष म्हणजे त्यांच्या अप्रत्यक्ष भेटीसाठी सुद्धा कुठलाही ताळमेळ नव्हता.कारण तिचे वर्ग हे सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता तर सूर्याचे वर्ग सकाळी साडेसात ते बारा वाजता या दरम्यान होते. त्यातच सूर्याचे आणि किरणचे घर हे दोन टोकाचे होते.मग अशा स्थितीत अप्रत्यक्ष भेट तरी कशी होणार! प्रत्यक्ष भेट तर नाहीच शिवाय अप्रत्यक्ष भेट पण त्याच्या वाट्याला येत नव्हती.सूर्या तर कधी कधी अप्रत्यक्ष भेटीसाठी बरेचदा कॉलेजला दांडी मारून किरणच्या वेळेपर्यन्त गावी यायला लागला आणि त्याच बसने तोही प्रवास करू लागला.त्यामुळे गावाच्या बस स्टँडवर तिची भेट होत असे.केवळ तिचा हसमुख चेहरा दिसावा हाच त्यामागे हेतू होता.वारंवार असे करणे योग्य नाही याची जाणीव सूर्याला होती. कारण त्याचे वर्गाचे तास बुडत असे.असे करणे भविष्यासाठी नक्कीच घातक ठरेल हेही त्याला चांगलं ठाऊक होतं.म्हणून तो वर्ग सोडून न येता किरण ज्यावेळी बसने पोहचते आणि ज्या रस्त्याने ती शाळेला जाते त्या मार्गावरील मोक्याच्या ठिकाणी (कधी दुकानात तर कधी स्टॅंडवर) अर्थात तिची नजर नजरेला मिळेल अशा ठिकाणी बसत असे किंवा उभा राहत असे अनं क्षणभर का होईना तिला डोळ्यात साठवून ठेवत असे.हा त्याचा नित्यक्रम होता.
     सूर्या हा जमेल तसा किरण च्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करू लागला.अकरावीत असताना सुर्याचे कॉलेज सकाळच्या सत्रात असे.सुट्टी नंतर त्याला दिवसभर घरी फारसे काम राहत नसे.घरी एकटेच राहावे लागत असे.अकरावीत असल्याने अभ्यास पण तेवढा नव्हता.एकट्यात त्याला किरणचे विचार अन आठवण चैन पडू देत नव्हते.रिकाम्या डोक्यात नानाविध विचार थैमान घालत असे.घरी बसून किरण तर नजरेत पडणार नाही उलट तिच्या विचाराने तो कासावीस होत असे. म्हणून घरी कुढत बसण्यापेक्षा तो तालुक्याच्या ठिकाणी जाऊ लागला.दिवसभर तिथेच वेळ घालवीत असे.तिचे वर्ग सुटण्याची प्रतीक्षा करीत असे.दिवसभर टाईमपास करण्यापेक्षा वेळेचा सदुपयोग म्हणून त्याने टायपिंगचे वर्ग सुरु केले.तिचे वर्ग सुटले की तो तिच्या मार्गावर ऊभा राहत असे.ती एसटी डेपोत बसली असली की तो तिला दूरवरून न्याहाळत असे.एसटी बस येईपर्यंत तो एकदम आनंदी राहत असे.म्हणून तर त्याला नेहमीच असे वाटे की,एसटी बस कधी यायलाच नको जेणेकरून तिला मन भरून बघता येईल.एकमेकांसमोर राहण्यास अधिक वेळ मिळेल.गावी दोघेही एकाच बसमध्ये परतत असे.नव्हे! तसा तो योग जुळून आणत असे.मात्र एकमेकांसोबत ते कधी फारसे बोलत नसे.पण किरणची नजर चुकवून सूर्या हा तिच्याकडे एकटक पाहत असे.कधी कधी ते एकमेकांसोबत बोलत असले तरी कदाचित सूर्याच्या प्रेमाची तिला कसलीही कल्पना नव्हती.कालांतराने दोघांच्याही परीक्षा संपल्या.उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यात.सुट्टीच्या काळात दोघांची नजरभेट होणे तसे अवघडच.दोघांचेही घरे दोन टोकावरचे म्हणून पुर्वीप्रमाणे भेटी होणे तसे दुर्मिळच.किरणला फारसा फरक पडला नाही मात्र सुर्याला सुट्या म्हणजे एक प्रकारची शिक्षाच वाटू लागली. दररोज होणारी भेट थांबली. दूरवरून का होईना तिची भेट घ्यावी असे जरी वाटले तरी तिचे घरच एवढ्या अडचणीत होते की, वारंवार त्या रस्त्याने जाणे सुद्धा अवघड होते.वारंवार जाणे म्हणजे संशयाला जागा करून देणे असे होते.तरी सुद्धा कधी कधी त्या रस्त्याने जाण्याचा मोह त्याला आवरत नसे.त्या दरम्यान ती कधी नजरेत पडत असे तर कधी नजरेत पडत नसे.नजरेत पडलीच तर केवळ क्षणभरासाठी.त्यामुळे सूर्याची चांगलीच पंचाईत होत असे.आता त्याच्या प्रतीक्षेचा बांध फुटायला लागला.आजपर्यंत तो किरणंवर प्रेम करतो हे कुणालाच सांगितले नाही.कधीना कधी कोणत्या तरी हक्काच्या माणसाजवळ भावना व्यक्त करून डोक्यावरचा भार हलका करावा असे त्याला आवर्जून वाटायला लागले.अशातच त्याचा निकटचा मित्र समीरशी गाठ पडली.दोघेही इकडील तिकडील गप्पात रंगले.अचानक सूर्यानं त्याच्या समोर सहज किरणचे बाबतीत विषय हाताळला.सूर्याने तिच्या गुणगौरवाची गाथाच त्याचे समोर मांडली.समीर सर्व काही समजून चुकला.बोलण्याच्या ओघात सूर्या अचानक समीरला म्हणाला की, कारे समीर ! किरणचा स्वभाव कसा वाटतंय.अचानक प्रश्नांने समीर अचंबित झाला.शिवाय त्याला आश्चर्यही वाटलं.ते पण साहजिकच होतं.जशी त्याची घरे दोन दिशेची,दोन टोकावरची तशीच ते दोघेही कौटुंबिक, सामाजिक आणि रीतिरिवाजाने पण भिन्न होते.कदाचित यांचे कसे प्रेम जुळणार? असा प्रश्न त्यालाहीं पडला असावा.त्याने तसं मत व्यक्त केलं नाही.पण त्याला मदत करण्याचा शब्द दिला.त्या दोघांचा योग जुळून आणणे तसे अवघड काम होतं.कारण किरण आणि सूर्या कधी संपर्कात आले नाही. त्यातच किरणंचा साधा तितकाच लाजरा बुजरा स्वभाव तसेच कामाव्यतिरिक्त कधीच घराबाहेर न पडणारी,फारशी कुणाच्या संपर्कात न राहणारी मुलगी म्हणून त्याने सूर्याच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला.असे असूनही तुझे प्रेम जर सत्य असेल तर कधीना कधी तिला कळेलच असा धीर देण्यासही तो विसरला नाही.क्षणिक का होईना सूर्या सुखावला अन तिचे स्वप्नात तल्लीन झाला.दोघेही पुढे काय करायचे ते ठरविण्यास गर्क झाले.आता सूर्याला मदतगार अन धीर देणारा मित्र मिळाला.आपले प्रयत्न व्यर्थ जाणार नाही असा आत्मविश्वास  निर्माण झाला.अशा दुविधा स्थितीत समीरने त्याला धीरच दिला नाही तर वेळोवेळी मदतीला धावून येऊ लागला.वेळोवेळी साथसंगत करू लागला.काळवेळ बघून समीर अन सूर्या किरणंच्या घराकडे जाऊ लागले.ती दूरवरून त्याच्या नजरेत पडू लागली.कधी कधी तिचं दिवसभर दर्शन होत नसे.तो दिवस म्हणजे सुर्यासाठी काळा दिवस ठरत असे.तिच्याकडे जाणारे मार्ग शोधू लागले.तिला भेटण्याच्या तळमळीतून समीर अन सूर्या अशा ठिकाणी उभे राहत असे किंवा बसत असे की, जेणेकरून ती नजरेत पडेल किंवा तिच्या नजरेत पडेल हा त्याचा नित्यक्रम ठरला असला तरी कुणाला संशय येणार नाही याची पण ते दोघेही पुरेपूर काळजी घेत असे.लोक तर बरेच बरे किरणला सुध्दा असा संशय येण्यास वाव नव्हता.विशेष म्हणजे जोपर्यंत ती नजरेत पडत नसे तो पर्यंत हे दोघेही त्या जागेवरून हटत नसे.एखादे वेळी सूर्यास्त जरी झाला तरी नजरभेट होत नसे.सोबतच सायंकाळी पाच-साडेपाच वाजताच्या सुमारास त्यांनी गावथनाचे (गोठाण) ठिकाणी ( लोखंडी पाईप वर बसने) दररोज बसण्याचा ठिय्या धरला.कारण त्यावेळेस गावातील सार्वजनिक पाण्याचे नळ येत असे आणि त्यावेळी ती सार्वजनिक नळावरून पाणी भरण्यासाठी बाहेर पडत असे.पाणी भरणे जवळपास कमीतकमी एकदिड तास चालत असे.त्यामुळे तितका वेळ त्याला किरणला डोळ्यात साठवून ठेवण्याची संधी मिळत असे.कधी कधी ती सुद्धा त्यांच्याकडे नजर टाकत असे. तेव्हा सूर्या मनातून सुखावून जात असे आणि आनंददायी सहवासाठी स्वप्ने रंगवीत असे.दिवसागणिक दोघेही तिकडे जात असल्याने कालांतराने किरण सुद्धा त्यांचेकडे पूर्वी पेक्षा अधिक वेळा नजर टाकत असे.पण तिच्या मनात नेमका काय भाव असेल याचा अंदाज येत नव्हता.पण सकारात्मक दिशेने पाऊल पडत असल्याचे दोघांनाही वाटत असे.एकतर्फी प्रेमाच्या दिवसाचा समारोप होणार की नाही ही चिंता सूर्याला अधिक बेचैन करीत असे.पण त्याचे प्रयत्न थांबले नाही.उलट पूर्वी पेक्षा अधिक प्रयत्नाची पराकाष्ठा करू लागला.एकतरी दिवस आपलाच असेल अशी आशा कायम मनाशी बाळगून होता.
       किरणच्या घरासमोर काही अंतरावर खेळाचे मैदान होते.गावातील मुले त्या ठिकाणी दररोज विटीदांडू तसेच क्रिकेट किंवा अन्य खेळ खेळत असे.हाही प्रयत्न त्यांनी चालविला.दररोज एकाच ठिकाणी बसण्यापेक्षा पर्यायी मार्ग म्हणून त्याने क्रिकेट खेळण्याचा छंद नसतानाही क्रिकेट खेळायला सुरवात केली.त्या निमित्ताने तिला बघता येईल.क्रिकेट खेळणे हा उद्देश नव्हता तर सतत किरणच्या नजरेसमोर राहणे हाच केवळ हेतू होता.त्यामुळे सूर्याचे खेळण्यापेक्षा अधिकतर लक्ष हे तिच्या घराकडे राहत असे.ती पण बरेचदा घराच्या दरवाज्यात बसत असल्याने सूर्याचा उद्देश साध्य होत असे.शनिवार रविवारचा दिवस तर त्याच्यासाठी पर्वणीचा दिवस ठरत असे.त्या दिवशी दोघांनाही सुटी राहत असे. त्यामुळे सूर्या आणि किरण दिवसभर घरी राहत असे.संधीचा उपयोग करून सूर्या हा भूक तहान विसरून दिवसभर क्रिकेटच्या मैदानावर राहत असे.किरण सदैव त्याच्या समोर राहावी हाच त्यामागे हेतू होता.कारण तो किरणच्या प्रेमासाठी तर पूर्णतः वेडापिसा झाला होता.अधीर झाला होता.भूक तहान तर कधीचाच विसरला होता.असे असले तरी त्याने अभ्यासाकडे कधी दुर्लक्ष केलं नाही हेही तितकच खरं आहे.
      समीर अन सुर्या खेळाच्या मैदानावर असताना किरण सुध्दा तिच्या घराचे आजूबाजूला राहत असे.इकडे तिकडे घिरट्या मारत असे.जेव्हा जेव्हा सूर्या अन त्याचा मित्र मैदानावर राहत असे तेव्हा तेव्हा किरण सुद्धा बाहेर राहत असे.कदाचित तिला पण सूर्याचा तिच्याकडे असलेला कल लक्षात येत असावा.कधी कधी तर तासनतास ती सुद्धा तिच्या घराच्या दरवाज्या समोर उभी राहत असे.पण ती कशासाठी उभी राहते.त्याचा कयास सूर्या मनातल्या मनात बांधत असे. तिचा कोणताही उद्देश असला तरी ती आपल्यासाठीच उभी राहते असा समज सूर्याचा झाला होता.कारण कधी कधी सूर्या जर खेळाच्या मैदानावर हजर नसेल तेव्हा किरण सुद्धा तिच्या घरासमोर तितक्या वेळ उभी राहत नसे.सुर्या नसेल तर ती केवळ कामानिमित्तच घराबाहेर पडत असे किंवा क्षणभर थांबून अंदाज घेत लगेच घरात परतत असे.हे त्याला त्यांच्या मित्राकडून (समीर) कळत असे.तीही सुर्याकडे आकर्षित होत असल्याचे,किंवा तिच्या मनात प्रेम प्रज्वलित होत आहे हे नाकारता येत नव्हतं.तसाच त्यांच्या मित्राचा पण अंदाज होता.त्यामुळे आपल्या प्रेमाला बळकटी मिळत असल्याचा त्याचा समज होऊ लागला.कदाचित तिच्याही मनात सूर्या प्रति प्रेमाची पालवी फुटत असावी.तिलाही प्रेम झाले असावे पण सामाजिक बंधने पायदळी तुडवून प्रेम व्यक्त करण्याचं तिचं धाडस होत नसावं.तिचीही घुसमट होत असावी त्यातच तिचा साधाभोळा,लाजारा बुजरा स्वाभव,अतिशय कमी बोलणारी किरण तिचं प्रेम व्यक्त करण्याचं साहस करित नसावी.असाच काहीसा समज सूर्याचा झाला होता.परंतु नेमक तिच्या मनात काय चाललंय हे कळायला मार्ग नव्हता.कयास बांधण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.एवढे मात्र खरे की,जसजसे दिवस जात होते तसतसे सूर्या हा किरणच्या भेटीसाठी अधिकाअधिक तळमळ होता.परिणाम काहीही व्होव्हो पण आपल्या भावना तिच्यापर्यंत पोहचल्याच पाहिजे या इर्षेने तो पेटला होता.त्यासाठी तो मिळेल त्या मार्गाच्या शोधात राहत असे.इतकेच नव्हे तर तो तसा समीरकडे आग्रहही करीत असे पण तो सुद्धा हतबल होता.म्हणून तिच्याकडे जाणाऱ्या आशा मावळल्या होत्या.किरणकडे जाणारा मार्ग गवसत नव्हता.सूर्याची अभिमन्यू सारखी स्थिती झाली होती.
     सूर्याचे रिकाम्या वेळेत तालुक्याचे ठिकाणी एका दुकानात नेहमीच बसणे-उठणे राहत असे.अधिकांश रिकामा वेळ तो तेथेच काढत असे.गप्पां-गोष्टीच्या ओघात त्या दुकानदार मित्राने दुकानात काम करण्यासाठी त्याच्या दुकानाचे काम अवगत असलेला एखादा होतकरू अन खात्रीचा मुलगा लक्षात ठेवण्याचं सूर्याला सांगितलं.सूर्याने ठीक आहे असे म्हणत मान हलवून होकार दिला.तेथेच सूर्याचा गजानन नावाचा मित्र पण होता.त्याने आपल्या गावात हेमंत नावाचा मुलगा असल्याचे सुचविलं.हेमंत हा शेतीवाडीत काबाडकष्ट करणारा मुलगा.हेमंतचे मत घेतले नाही पण तो चांगला मुलगा आहे हे सूर्यालाही चांगलं माहित होतं.अशातच सूर्या रस्त्याने स्टॅण्डवर पायदळ जात असताना एका शेतावर काम करित असलेल्या हेमंतवर सूर्याची नजर पडली.त्यांना दुकानावर काम करणे बाबत विचारणा केली. त्यावेळी त्याला त्या दुकानावरील काम अवगत नव्हतं.म्हणून त्यानं नकार दिला.सुर्या कॉलेजला जाण्यासाठी स्टॅन्डवर पोहचला.किरण पण स्टँडवर एसटीची वाट पाहत होती. त्याचवेळी हेमंतची आठवण झाली.कारण हेमंत आणि किरण यांच्या घराचे तसे कौटुंबिक संबंध बऱ्यापैकी होते.आपले विचार किरणपर्यंत विचार पोहचविण्यासाठी कदाचित हेमंतची मदत होऊ शकते असे त्याला वाटले.म्हणून सूर्या पुन्हा हेमंतकडे गेला.त्याला दुकानवर काम करण्यास कसलीही अडचण नसली तरी आर्थिक अडचण होतीच शिवाय त्याला त्या दुकानातील काम सुद्धा अवगत नव्हतं.त्यामुळे दुकानदार पगार देण्यास राजी नव्हता.कारण त्यांना शिकाऊ नव्हे तर काम शिकलेला मुलगा हवा होता.सूर्या सोबत असलेल्या व्यक्तीगत संबंधामुळे दुकानदारानं त्याला दुकानवर ठेवण्यास होकार दिला.हेमंतला हे परडवणारे नव्हते.सूर्याने त्याची समजूत काढली.हेमंतला तेथे काम पण शिकता येणार होतं.भविष्य अनं स्वयंरोजगाराचे दृष्टीने त्या दुकानवर काम करणे कसे फायदेशीर आहे हे त्याच्या लक्षात आणून दिलं.सोबतच अडचणी आणि आवश्यक त्यावेळी साहाय्य करण्याचा शब्द दिला.शेवटी हेमंत काम करण्यास (शिकण्यास) राजी झाला.ह्यात सूर्याचा पण स्वार्थ दडला होता.त्याला किरणच्या कुटुंबा नजीकचं कुणीतरी हवं होतं ते हेमंतच्या रूपात मिळालं.त्यामुळे सूर्याच्या आशा पल्लवित झाल्या.सूर्याला किरणकडे जाणारा एक नवा मार्ग गवसला.त्यामुळे सूर्याच्या आनंदाला पारावार नव्हता.पुढे सूर्याला हेमंतची मदत व्हायला लागली.त्यामुळे त्याला कांम शिकेपर्यंत दुकानदाराकडून एक दमडीही मिळत नसली तरी सूर्यानं त्याला मदत करण्यास कधीच आखळता हात घेतला नाही.हेमंतच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी तो जमेल तशी मदत करू लागला.हे सर्व किरणचे प्रेम मिळविण्यासाठी सगळा आटापिटा होता.
      ठरल्याप्रमाणे हेमंत कामावर रुजू झाला.नियमितपणे कामावर येऊ लागला.रिकामेवेळी सूर्या सुद्धा त्याच्या दुकानवर बसू लागला.सूर्या अनं हेमंत या दोघांत पूर्वीपेक्षा अधिक घट्ट मैत्री व्हायला लागली.संवाद वाढू लागला.त्याचवेळी जेव्हा जेव्हा किरण त्याच्या दुकानासमोरून जात असे तेव्हा तेव्हा सूर्या हा तेथेच राहत असे.कारण शाळेला ये-जा करण्यासाठी तोच एकमेव रस्ता होता.किरण ज्यावेळी त्या रस्त्याने जात असे त्यावेळी सूर्याची तिच्यावरील नजर कधीच हटत नसे.त्यावेळी हेमंत किंवा अन्य कुणी सुर्यासोबत बोलत असले तरी त्यांच्या बोलण्याकडे त्याचं अजिबात लक्ष राहत नसे. हा त्याचा नित्यक्रम होता.त्यामुळे सूर्याच्या मनात काय सुरू आहे यांचा अंदाज घेण्यास हेमंतला फारसा वेळ लागला नाही.हेमंतला कळून चुकले की; सूर्या हा किरणंच्या प्रेमात पडला आहे म्हणून.काही दिवसानंतर हेमंतने सूर्याकडून खात्री करून घेतली. त्यालाही आश्चर्य वाटलं.तो तिच्या कुटुंबाच्या संपर्कातील असल्यानं तो बरेचदा तिच्या कुटुंबातील गोष्टी सुर्याजवळ सांगू लागला.त्या गोष्टी ऐकून सूर्या आनंदी तर होऊ लागलाच शिवाय तो जणू काही किरणच्याच गोष्टी सांगू लागला आहे असे वाटत असे.त्यामुळे दिवसेंदिवस हेमंतवर सूर्याचा अधिक विश्वास वाढू लागला.त्याला गावातून शहरात आणल्याने हेमंतही त्याच्या ऋणात राहू लागला.सूर्याही त्याला लहान भावाप्रमाणे वागणूक देण्यास कसलीच कसर सोडत नसे.इतका घट्ट संबंध त्यांच्या मैत्रीत झाला.वेळोवेळी त्याला आर्थिकतेसह इतरही मदत करू लागला.सूर्या ज्यावेळी कॉलेज मध्ये जात नव्हता त्यावेळी त्याची एसटी पास पण तो हेमंतला देत असे.एखादेवेळी त्याच्याकडे तिकीटसाठी पैसे नसल्यास त्यावेळी सूर्या हा स्वतः घरी थांबून त्याची एसटी पास तो हेमंतला देत असे किंवा तिकीट खर्चाचा भार उचलत असे.
       एकेदिवशी सूर्या अन हेमंत शहराकडे जाण्यास निघाले.बोलण्याच्या ओघात सूर्याच्या मुखातून किरणबाबत विषय निघाला.सूर्या त्याला सांगण्याच्या मानसिकतेत नव्हता.पण हेमंतने आग्रह धरल्याने सर्व काही सांगून टाकलं अनं त्याचे विचार तिच्या पर्यंत पोहचविण्यासाठी मदत मागितली.तिने प्रेम स्वीकारो अथवा न स्वीकारो तिच्या कोणत्याही निर्णयासाठी सूर्यानं मन घट्ट केलं होतं.कदाचित तिनं प्रेम स्वीकारलं नाही अर्थात नकार दिला तरी आयुष्यभर तिच्यावरच कायम प्रेम करण्याचा निर्धार व्यक्त केला.हेमंतने सहकार्याचा हात पुढे केला.त्याच्या होकाराने सूर्याला दिलासा मिळाला.परिणामतः सूर्या हा हेमंतच्या कोणत्याही कामासाठी सदासर्वकाळ तयारच राहत असे.त्यांने सहकार्याचा हात पुढे केला असलातरी किरण आणि हेमंतच्या शहराच्या ठिकाणी जाण्याच्या वेळा एकदम भिन्न होत्या.हेमंत हा अगदी सकाळी जात असे आणि रात्री घरी परतत असे.त्यामुळे किरण आणि हेमंत यांच्यात कधी गाठभेट होत नसे.दुकानदार सुध्दा त्याला तिच्या वेळेवर सुटी देण्यास तयार नव्हता.पुन्हा अडचण झाली.दुकानदार सूर्याचा निकटचा मित्र असल्याने किरणचे वर्ग सुटते त्यावेळेवर हेमंतला अखेर सुटी देण्यास राजी झाला.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...