*राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्या
***********************
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा अशी मागणी सन २००३ पासून चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराचे अभ्यासक राजेंद्र मोहितकर गुरुजी यांनी केली.त्यांनी सन २००३ पासून सातत्याने १६ वर्षे या मागणीवर बराच पञव्यवहार केला.भारत सरकार,महाराष्ट्र सरकार व अनेक आमदार ,खासदार यांनाही निवेदने पाठवून चर्चा करून अवगत केले.सोबतच या मागणीचा प्रचार— प्रसार फार मोठ्या प्रमाणावर करून जनजागृती निर्माण केली.
गावोगावी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात झालेल्या भाषणातून निवेदने, ग्रामसभेचे ठराव पाठविण्याचे आवाहनही त्यांनी केले.यासोबतच हजारो लोकांनी भारत सरकार,महाराष्ट्र सरकार यांचेकडे हजारो निवेदने, ग्रामसभेचे ठराव पाठविले. अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळ गुरूकुंज अाश्रमने या मागणीचा बराच पाठपुरावा केला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जेष्ठ सहकारी पूज्य तुकारामदादा गीताचार्य ,राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद चंद्रपूरचे अध्यक्ष प्रा.बंडोपंत बोढेकर,जीवन प्रचारक भानुदासजी कराळे,रमेश कचरे,अॅड. राजेंद्र जेनेकर,सत्यपाल महाराज, राष्ट्रसंत युवक विचारमंच महाराष्ट्र राज्य, सेवारत फाऊंडेशन तिवसा, ह.भ.प.साबळे महाराज, ह.भ.प.लक्ष्मणदास काळे महाराज, भाऊसाहेब थुटे,मोहनदास चोरे,संजय बेले,विकास बोरवार,सचिन राऊत,अमर वानखेडे, गजानन सहारे,सागर गोचे,नकुल पालखेड़े, मोहित ढोले, रमेशचंद्र सरोदे हरिभाऊजी वेरूळकर,ह.भ.प.उद्धवराव गाडेकर इ.अनेक कीर्तनकार, वक्ते,प्रचारक,कार्यकर्त्यांनी या मागणीचे समर्थन करून प्रचार,प्रसार, पञव्यवहार व पाठपुरावा केलेला आहे व गावागावातील हजारो लोकांना जागृत करून पञव्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन दिलेले आहे.
ही मागणी तळागाळापर्यंत पोहचलेली आहे.आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाला हे वाटत आहे की भारत देशासाठी अहोरात्र काम करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न सन्मान देण्यासाठी १६ वर्षे होवूनही भारत सरकार निर्णय घेत नाही हे दुर्देव आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारावर प्रेम करणारे तरूण विदर्भ व महाराष्ट्र राज्यात तसेच भारताच्या इतरही राज्यात आहेत .त्यांच्या मनात तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे.तुकडोजी महाराज यांचे प्रचंड व प्रभावी राष्ट्रीय व सामाजिक कार्य असताना व भारताच्या स्वातंञ्यासाठी भरीव योगदान असताना त्यांना भारतरत्न सन्मान प्रदान करण्याचा निर्णय घेण्यासाठी शासनाने प्रदीर्घ कालावधी लावावा ही निश्चितच दुर्दैवी बाब आहे .राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे थोर क्रांतिकारी संत आहे.देशविदेशात त्यांनी भारत देशाची मान उंचावली.जपानच्या विश्वधर्म व विश्वशांती परिषदेत ते १९५५ ला भारत देशाचे प्रतिनिधी म्हणून ते गेले होते.जगातील अठरा राष्ट्राचे ते सल्लागार म्हणून नियुक्त झाले होते,अशा महामानवास भारत देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यास होत असलेला उशीर हे न उलगडणारे एक कोडे आहे.ही मागणी त्वरित पूर्ण व्हावी ही लाखो लोकांची मनातील इच्छा अाहे. भारत सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अशी सर्वत्र मागणी होत आहे.
Comments
Post a Comment