Skip to main content

निळया झेंड्याचा लिलाव अन संभ्रमित जनता

*निळा झेंडयाचा लिलाव अन संभ्रमित जनता*
----------------------------------------
*प्रा.नरेश इंदूशंकर इंगळे*
---------------------------------------
       राज्यात विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जीवाचे रान करीत आहे.काही उमेदवार अपक्ष किंवा बंडखोर म्हणून रिंगणात आहेत.या सत्तास्पर्धेत अस्तित्वासाठी विविध रिपब्लिकन गटांनी व बहुजन समाज पक्षानेही कंबर कसली आहे.बहुजन समाज पक्षाबरोबरच काही अपवाद वगळता सर्वच राजकीय पक्षाच्या प्रचारयंत्रणेत निळ्या झेंडयाचा वापर केला जात आहे.डॉ.आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष व सर्वच राजकीय पक्षांसोबत वेगवेगळ्या रिपब्लिकन गटाची युती लक्षात घेता कोणत्या उमेदवारांना मतदान करावे,अशी संभ्रमावस्था आंबेडकरी विचारधारेच्या मतदाराची झाली आहे.
          वास्तविक पाहता डॉ.आंबेडकरांनी दलित,शोषित,पीडित,उपेक्षित बहुजन समाजाच्या उन्नतीकरिता स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती.सर्व जाती-धर्माच्या तसेच शेतकरी शेतमजुरांच्या हितसंवर्धनाकरिता रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडण्यात आली होती.डॉ.बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर त्यांच्या अनुयायांनी ३ ऑक्टोबर,१९५७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली.पण पक्ष स्थापनेच्या काळापासूनच फुटीरतेची बिजे रोवल्या गेल्याचे सर्वज्ञात आहे.पण बाबासाहेबांच्या अनुयायांनी रिपब्लिकन पक्षाची धुरा यशस्वीपणे सांभाळली.परिणामी रिपब्लिकन ऐक्यमुळे तत्कालीन काळात या पक्षाच्या नावावर लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आमदार-खासदार झाले. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात या पक्षाने आपली शक्ती उभी केली.अर्थात तिसरी शक्ती म्हणून हा पक्ष पुढे आला.परंतु रिपब्लिकन पक्षाच्या अस्तित्वावरच कालांतराने प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
      स्वबळावर लढणार्‍या व  चांगले यश संपादन करणाऱ्या या पक्षाच्या धक्क्याने प्रस्थापिताचे धाबे दणाणले होते.याचा परिणाम म्हणून रिपब्लिकन पक्षासोबत युतीच्या राजकारणास प्रारंभ झाला.युतीबाबत,नेत्याच्या मतभेदांमुळे रिपब्लिकन ऐक्याला तडा गेला,तो आजतागायत कायम आहे.आज रिपब्लिकन पक्षाचे एवढे गट निर्माण झाले आहे की,त्याचे बोटावर मोजमाप करणेही अशक्य आहे.एकसंघ रिपब्लिकन पक्षाची पूर्णपणे शकले पडली आहेत.आज रिपब्लिकन पक्षाकडे अर्थात नेत्याकडे,कार्यकर्त्याकडे दयेच्या भावनेने पाहिले जाते.स्वाभिमानी नेत्याच्या "डॉ.आंबेडकरांच्या" पक्षाकडे या भावनेतून पाहिल्या जात असल्याने आंबेडकरी पित्त पूर्णपणे खवळून येते.पण इलाज नाही.आंबेडकरी नेत्यांच्या स्वाभिमानशून्य नीतीमुळे आंबेडकरी कार्यकर्त्याचेही विभाजन होत असल्याने आंबेडकरी शक्ती क्षीण होत आहे.परिणामी हा बहुसंख्यकाच्या अन्यायाला या जनतेला बळी पडावे लागत आहे.घाटकोपर प्रकरण हे त्याचेच द्योतक आहे. घाटकोपर प्रकरणानंतर आंबेडकरी जनतेच्या रेट्यामुळे नेत्यात ऐक्य तसेच तत्पूर्वी आणि त्यानंतरहीं त्यांच्यात ऐक्य घडवून आणले गेले परंतु व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेमुळे ऐक्याला तडा गेला आहे.याचाच परिणाम आंबेडकरी नेत्यांबरोबरच जनता वेगवेगळ्या गटात विभागली गेली आहे.
      १३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान कोणाला करायचे,अशी संभ्रमावस्था आंबेडकरी जनतेसमोर उभी आहे.आंबेडकरी जनतेची निळ्या झेंड्यावर अर्थात डॉ.बाबासाहेब आंबेडकरावर अगाध श्रद्धा आहे. नव्हे,बाबासाहेब तर या जनतेच शक्तीस्थान,श्रद्धास्थान आहे पण, या शक्तीस्थानाचा अर्थात निळ्या झेंड्याचा पूर्णपणे लिलाव झाल्याचे दिसत आहे.रिपब्लिकन पक्षाचे बाळासाहेब आंबेडकर, प्रा.जोगेंद्र कवाडे,रामदास आठवले,रा.सु.उपाख्य दादासाहेब गवई या प्रमुख नेत्यांसह छोटे-मोठे रिपब्लिकन गट काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस,पुरोगामी विचाराचे काही पक्ष,इतकेच नव्हे तर भाजप सेना युतीसारख्या जातीयवादी पक्षासोबत हातमिळवणी करून निवडणुका लढत आहे.तर,काही जण स्वतंत्र निवडणुका लढवत आहेत.भरीस भर म्हणून सुश्री मायावती यांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षही मोठ्या ताकतीनीशी मैदानात उतरला आहे.या वेगवेगळ्या पक्षांसोबत व स्वतंत्रपणे निवडणुका लढणाऱ्या आंबेडकरी  विचारधारेची दैनावस्था पाहून कुणाला मतदान करावे ही संभ्रमावस्था या मतदारांसमोर आहे.अर्थात,निळा झेंडा निवडणूक प्रचार रणधुमाळीत बहुतांश प्रचार गाड्यावर पहावयास मिळत आहे. संधीसाधू पक्ष त्याचा पुरेपूर फायदा घेत आहे.
      महाराष्ट्राच्या राजकारणात जातीय समीकरणे चांगलीच प्रभावी होत आहे.वास्तविक,अशी स्थिती लोकशाहीला घातक आहे पण "जातीसाठी माती खा"अशी समीकरणे पुढे येत आहेत.डॉ. आंबेडकरांचा "शिका,संघटित व्हा,संघर्ष करा" हा संदेश पूर्णपणे पाळला गेला.मात्र,संघटित पणाला तडा जात आहे. म्हणूनच आंबेडकरी जनतेवर चोहोबाजूंनी आक्रमण होऊन तो अधोगतीच्या मार्गावर आहे.इतर समाज मात्र जागृत होत आहे.
      आजही आंबेडकरी जनता संघटित आहे.आपले हितसंबंध कशात आहेत.याबाबतही पूर्णपणे जागृत आहे.नेत्यांच्या व्यक्तीगत भूमिकेमुळे आशा-आकांक्षा वर पाणी पेरल्या जात आहे.बहुजन समाज पक्षानेही महाराष्ट्रात घट्ट पाय रोवले आहेत.हे रिपब्लिकन नेत्यासाठी एक आव्हान आहे. रिपब्लिकन पक्ष व बहुजन समाज पक्ष समविचारी व एकच ध्येय असतानाही परस्परांशी स्पर्धा करीत एकमेकांना पाण्यात पहात आहेत.दोन्ही पक्षाचे एकच ध्येय व उद्दिष्ट असताना परस्परांशी स्पर्धा का,असा प्रश्न आंबेडकरी जनता करीत आहेत.इतर पक्षासोबत युती करीत असताना हेच समविचारी पक्ष एकत्रित का येत नाहीत?केवळ बोटावर मोजण्याइतक्या जागा पदरी पाडून तेही बहुतांश पणे हरणाऱ्या असल्याचे आजवरच्या राजकीय प्रवासावरून लक्षात येते.मग या संधीसाधू पक्षासोबत युती का?बोटावर मोजण्याइतक्या जागा घेण्यापेक्षा समविचारी पक्ष एकत्रित येण्यास काय हरकत आहे ?असे झाल्यास तिसरी शक्ती म्हणून उदयास येण्यास वेळ लागणार नाही.परंतु हे पुढारी एकमेकांवर कुरघोडी करीत ज्यांनी युती केली ते समाजाचे हितचिंतक तर जे बाहेर पडले किंवा स्वतंत्र लढले ते जातीयवादी पक्षाला पाठबळ देतात असा दिंडोरा पिटत आहेत.यात कितपत सत्यत आहे?पण, आंबेडकरी नेतृत्व पूर्णपणे ओळखले आहे की,व्यक्तिगत स्वार्थासाठी सर्व आंबेडकरी जनता कुणाच्या ना कुणाच्या दावणीला बांधल्या जात निळ्या झेंड्याचा लिलाव करून राजकीय पोळी शेकत आहे. याला सर्वस्वी पुढारी कारणीभूत असून पर्यायी शक्तीच्या पाठिशी जाण्यास आंबेडकरी जनता कधीच मागे पुढे पाहणार नाही, एवढे मात्र निश्चित!!
---------------------------------------
*प्रा. नरेश इंदूशंकर इंगळे*
----------------------------------------
*दैनिक जनमाध्यम-९,ऑक्टोबर,२००४ पृ.क्र ४*
     (प्रकाशित)

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...