Skip to main content

पौराणिक व ऐतिहासिक कौडन्यपूर

*पौराणिक व ऐतिहासिक कौंडण्यपुर*
---------------------------------------
*प्रा.नरेश इंगळे*
----------------------------------------
       अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात असलेल्या श्रीक्षेत्र कौडन्यपुरला पौराणिक व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.रुक्मिणीचे माहेर कौंडण्यपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान,आद्यशक्तीपीठ, विदर्भपंढरी,विदर्भाच्या मध्यभागी वर्धा (वशिष्ठ)नदीच्या तीरावर वसलेले पौराणिक नगर कौंडण्यपूर,आई अंबेच्या रूपाने शक्तीचे प्रथम अवतरण या पवित्र भूमीवर झाले.पौराणिक उल्लेखाप्रमाणे शेवटच्या शक्ती अवतरण जगन्ममाता रुक्मिणीदेवीच्या रूपाने झाले आहे.
      महाभारत काळी विदर्भात एक सुसंस्कृत शासनव्यवस्था असल्याचा उल्लेख येथे आढळतो. अगस्ती ऋषीच्या नेतृत्वात उत्तरेकडून आर्यांनी विंध्यपर्वत ओलांडून विदर्भात प्रवेश केल्याचा उल्लेख आहे. चंद्रभागा,पूर्णा व वर्धा नदीच्या अंत:प्रदेशातील जंगले तोडून त्या जमिनी लागवडीखाली आणल्या; तसेच ठिकठिकाणी वसाहती सुद्धा स्थापन झाल्या.त्यातूनच वर्धा नदीकाठी विदर्भ नगरी अर्थात कौडण्यपूर हे राजधानीचे शहर निर्माण झाले.कुंडीनपूर या पुरातन राजधानीचा परीस २६ कोस होता.उत्तरेतील आर्याच्या यदुवंशातील भोज शाखेतील विदर्भ नावाच्या क्षत्रियाने  येथे राज्य केले.इतकेच नव्हे तर त्यांच्या घराण्यातील अनेक पिढ्यांनी राज्य केल्यानंतर याच राजघराण्यातील इंदूमती नावाच्या कन्येचा विवाह प्रभू रामचंद्राचे पितामह अब नृपतीशी झाला. अगस्ती ऋषींची पत्नी लोपमुद्रा आणि नल राजाची पत्नी दमयंती ही देखील विदर्भाचीच राजकन्या. नंतर याच राजघराण्यातील राजा भिमकाची कन्या रुक्मिणीचे भगवान श्रीकृष्णाने हरण केल्याची आख्यायिका आहे. कुलचाराप्रमाणे देवी दर्शनास रुक्मिणी आली असता,ज्या मंदिरातुन तिचे हरण झाले ते मंदिर म्हणजे जगदंबेचे मंदिर असल्याची आख्यायिका आहे. हरिवंशात रुक्मिणीचे हरण कुंडीनपूरच्या तटाबाहेरील देवी मंदिरातून केली असल्याचाही उल्लेख आहे.
      स्वर्गातून पृथ्वीवर गंगेला आणणार्‍या भगीरथाची माता केशीनी व नाथ संप्रदायातील चौरंगी नाथ यांची ही जन्मनगरी. चौरंगीनाथाची समाधी येथेच आहे.या समाधीवर पूर्व व उत्तरभिमुख,अशा दोन पादुका आजही येथे पहावयास मिळतात.कंस मातेचे अर्थात राजा उग्रसेंनाच्या पत्नीचे माहेर हेच आहे.कौंडण्यपूरातील या ऐतिहासिक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर विस्तिर्ण घाट आहे. या घाटावर शासनाच्यावतीने १०० बाय ६५ फुटाचा सभामंडप बांधण्यात आला.हा घाट पवित्र वर्धा नदीच्या तीरापर्यंत आहे.येथे येणाऱ्या भावीका करिता मंदिराच्या मागील बाजूस धर्मशाळेची व्यवस्था करण्यात आली.१० बाय १९ आकाराच्या २० खोल्या असून,मध्यभागी पटांगण आहे.मंदिराच्या उत्तरेला सभागृह तर दक्षिणेकडे स्वयंपाक व भांडारगृह आहे.तसेच दोन ते तीन हजार लोकांची व्यवस्था होईल इतकी भांडी येथे उपलब्ध आहेत.दररोज सायंकाळी हरिपाठ तर पहाटे काकडा होतो.अखंड वीणा व अखंड नंदादीप तेवत असतो.देवीच्या दैनिक व्यवस्थेंकरिता स्वतंत्र पुजाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविक भक्तांना पुजाऱ्यामार्फत अभिषेक करण्याची सोय आहे. कार्तिक पौर्णिमेला या ठिकाणी भव्य यात्रा महोत्सव होत असतो. कार्तिक वद्य प्रतिपदेला भीमक टेकडीवर गोपाळकाला, तर दर एकादशी पौर्णिमेला भाविकांच्या अलोट गर्दीने नगरी दुमदुमून जाते.
----------------------------------------
*प्रा.नरेश इंगळे*
----------------------------------------
*दै.सकाळ झेप तालुका विकास पुरवणी---दि.११/०२/२००९ पृ. क्र.३
----------------------------------------

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...