Skip to main content

मानवी कल्याणाचे उर्जास्रोत बुद्ध विहारे !!!

*"मानवी कल्याणाचे ऊर्जा स्त्रोत* *:--बुद्ध विहारे"*

----------------------------------------
प्रा. डॉ.नरेश शं.इंगळे
अर्थशास्त्र विभाग प्रमुख
श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा ता.धामणगाव रेल्वे
जिल्हा अमरावती
मोबाईल- ९९७०९९१४६४
----------------------------------------

        समग्र क्रांतीचे अग्रदूत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली पवित्र अशा नागपूरच्या पवित्र भूमीवर पिढ्यानं-पिढ्या निपचित पडलेल्या लाखो अनुयायासह  बौद्ध धम्माचा अंगीकार केला. जगाच्या इतिहासातील "न भूतो न भविष्यती " अशी ही घटना म्हणावी लागेल.अठराविश्व दारिद्र्यात खितपत पडलेला अन शिक्षणापासून कोसो दुर असलेला हा परिवर्तित; शोषित, पिडीत,वंचित,अस्पृश्य समाज बौद्ध तत्त्वज्ञानाबाबत तितकाच अनभिज्ञ होता.या सकल समाज घटकाचा सर्वंकष उद्धाराचा ध्यास घेतलेल्या डॉ.बाबासाहेबावरच्या अगाध आस्थेपोटी तत्कालीन अस्पृश्य समाज बुद्धाच्या चरणी नतमस्तक झाला.धर्मांतरानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अल्पावधीतच महापरिनिर्वाण झाले. परिणामतः डॉ.आंबेडकराना बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार तसेच अपेक्षित असे तत्त्वज्ञान नवबौद्ध समाजात पेरणी करण्यास तितका अवधी मिळाला नाही.मात्र पुढील मार्गक्रम सुकर करून ठेवण्यास ते विसरले नाहीत हेही तितकेच खरे आहे.बुध्दांचे तत्वज्ञान अखेरच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांची प्रचंड तळमळ होती आणि ती शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी जपली.त्याच अपेक्षेने डॉ.आंबेडकरांनी  " दि बुद्धा अँड हिज धम्मा " या ग्रंथाचा समारोप करतेवेळी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार हा खेड्यापाड्यातून करण्याची सर्व बांधवांनी शपथ घ्यावी असे पोटतिडकीने आव्हान केले होते.काही अपवाद वगळता संपूर्ण समाज याच ध्येयाने प्रेरित झाला आणि त्यांची महत्त्वकांक्षा पूर्ततेसाठी संपूर्ण समाज कटीबद्ध   झाला.धर्मांतरित नवबौद्ध समूह मिळेल त्या स्रोताद्वारे धम्म म्हणजे काय? त्यांचा इतिहास काय? हा धम्म मानवी जीवनात कसे परिवर्तन घडवून आणू शकतो.धम्माचे अनुसरण-आचरण कसे करायचे यांसह अन्य इत्यंभूत माहिती बौद्ध अनुयायी अवगत करू लागलात.त्या दिशेने मार्गक्रमण करू लागलात.प्रारंभीच्या काळी अस्पृश्य समाजाच्या वस्तीत, झोपडपट्टीत पंचशील ध्वज (गाव तेथे झेंडा) आणि कालांतराने भगवान बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पुतळे मोठ्या दिमाखाने/डौलाने उभे राहू लागलीत. १९८०-१९९० च्या दशकाचा काळ तर हा पुतळा उभारणीचा सुवर्णकाळच म्हणावे लागेल.गाव-खेड्यात,वस्तीत, झोपडपट्टी परिसरात लोकवर्गणीतून छोटे-मोठे प्रबोधनात्मक,सामाजिक,धार्मिक कार्यक्रम दमदारपणे होऊ लागलेत.डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमाला उत्सवाचेच स्वरूप प्राप्त झाले आहे.कधी नव्हे इतका उत्साह या वस्त्यातून ओसंडू लागलात.पारंपारिक रिती- रिवाजाच्या जागी बौद्ध संस्काराने आपसूकच जागा घेतली.विवाह पद्धतीत तर आमुलाग्र असे परिवर्तन घडून आलेत.परंपरागत रुढी,प्रथा परंपरांना फाटा देत भगवान बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होऊ लागलेत. गाव-खेड्यात झोपडपट्टीत-वस्तीत बुद्धम् शरणम् गच्छामिचा स्वर गुंजू लागलात.ही सर्व किमया डॉ. आंबेडकरांच्या क्रांतीने घडून आणलीत.
     भारतात प्रचंड अशी सामाजिक विषमता असल्याचे सर्वश्रुत आहे.याची झळ नवंबौद्धांना पोहचलीच नाही असे कुणीही छातीठोकपणे म्हणणार नाही.सार्वजनिक ठिकाणी तसेच सार्वजनिक कार्यक्रमासाठी/लग्न प्रसंगासाठी अन्य कार्य प्रसंगासाठी तर या समाजाची चांगलीच गोची होत असे.आजही काही भागात अशी स्थिती कायम असल्याचे नाकारता येत नाही. अशातच शासकीय स्तरावरून (निधीतून) गाव पातळीवर समाज मंदिरे अस्तित्वात आलीत.अधिकांश समाज मंदिरे ही बौद्धवस्ती लगतच असल्याने इतर उच्चवर्णीय/धर्मीय लोक समाज मंदिराकडे हेतुपुरस्सर पाठ फिरवित असल्याचे कुणीच नाकारत नाही.जणू काही ही समाजमंदिरे केवळ बौद्धासाठीच उभारलीत असा त्यांचा कदाचित समज झाला असावा.इतकेच काय तर त्यातून अनेकदा जातीय तेढ सुद्धा निर्माण झाल्याचे उदाहरणे कमी नाहीत.अशी समाज मंदिरे ही आंबेडकरी वस्ती वगळून अन्य ठिकाणी व्हावीत ही भावनाही त्यावेळी बळावली होती.जातीय विद्वेषातून अनेक ठिकाणची समाज मंदिरे येनकेन प्रकारे ओस पडू लागलीत तर काही ठिकाणच्या समाज मंदिरात बौद्ध विहारे अस्तित्वात आलीत.तथागत गौतम बुद्धाचा शांतीचा संदेश व बाबासाहेबांच्या वैचारिक क्रांतीची मशाल तेवत ठेवण्यासाठी हे बुद्ध विहारे उदयास आलीत.कालांतराने याच हेतूने स्वतंत्र बौद्ध विहारांची संकल्पना पुढे आली.समाजही शिक्षित/ जागृत व्हायला लागला. शिक्षणात प्रचंड अशी क्रांती झाली.शिकून सवरुन अनेकजण छोट्या मोठ्या शासकीय नोकऱ्याच्या सेवेत रुजू झालेत.मोक्याच्या जागी विराजमान झालेत.पर्यायाने आर्थिक परिस्थितीतही बऱ्यापैकी सुधार व्हायला लागला.ही सर्व बाबासाहेबांची देणगी आहे.या कृतज्ञ भावनेतून जाणीव असलेल्या लोकांच्या पुढाकाराने लोक वर्गणीतून पंचशील ध्वज,पुतळ्याप्रमाणेच बौद्ध विहारे तितक्यात दिमतीने उभे झालीत."गाव तेथे बुद्ध विहार" ही संकल्पना अधिक रूढ/दृढ झाली.बौद्धांची वस्ती आहे तेथे बौद्ध विहार नाही अशी गावे विशेषता महाराष्ट्रात तरी दुर्मिळ आहे.महापुरुषाच्या विचारांची पेरणी, बौद्ध धम्माचा/ज्ञानाचा प्रसार,संस्कारक्षम पिढी घडविणे बंधुभाव जपणे आणि बौद्धांचा सर्वांगीण विकास साधने हा या बुद्ध विहार स्थापनेमागचा प्रमुख हेतू आहे.
      बुद्ध विहारे धर्माणतरीत नवबौद्धासाठी समाज उद्धार आंदोलनाचे प्रमुख केंद्र ठरत आहे.विहारात नियमितपणे सामूहिक बुद्ध वंदना त्रिशरण पंचशील,पूजाअर्चा आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे सामूहिक वाचन केले जाते. त्याचीच फलस्फूर्ती म्हणजे बालमनावर/समाजमनावर बौद्ध संस्कार अधिक दृढ होण्यास मदत होत आहे. धम्मकार्याच्या प्रचार प्रसारासाठी बौद्ध भिख्खू सह उपासक, लेखक,विचारवंतांना आमंत्रित केले जाते.त्यांच्या कडून मिळणाऱ्या विचाराचा आणि उपदेशाचा लाभ समाजातील विविध स्तरातील घटकांना मिळवून दिला जातो. सोबतच बालकांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, धम्मज्ञान ग्रहण करता यावे तसेच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला पूरक असे बाल संस्कार शिबिरे सोबतच प्रश्नमंजुषा,सांस्कृतिक कार्यक्रम, वाचन लेखन स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, बुद्ध भीम गीते, पथनाट्य,नाट्यछटा, आरोग्य शिबिरे यासह अनेक जनपयोगी उपक्रम/कार्यक्रम राबविले जातात.नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविले जातात.प्रबोधन,धम्मचर्चा घडवून आणली जाते.सामाजिक धार्मिक चळवळीचे प्रमुख केंद्र असलेले बुद्ध विहाराचे सामाजिक धार्मिक उपक्रम समाजाला योग्य दिशा देण्याचे महत्वपूर्ण असे कार्य करीत आहे."वर्षावास" हा तर अत्यंत महत्त्वाचा असा कार्यक्रम आहे.यात अध्ययन-अध्यापन, चिंतन,मनन आणि लोक कल्याणकारी कार्याला प्राधान्य दिले जाते. या कालावधीत बौद्ध भिख्खू बरोबर बौद्ध अनुयायी सुद्धा अध्ययन अध्यापन करतात.अधिकांश बौद्ध विहारात आणि कुटुंबात बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे सामूहिक पठण,वाचन आणि आचरणावर भर दिला जातो. त्यातून बुद्ध संस्कारीत पिढी घडविण्यास हातभार लागतो. ही सर्व बुद्ध विहाराची उपलब्धी आहे.म्हणूनच सन २००० दशकाच्या पूर्वी साधी सामूहिक वंदना त्रिशरण पंचशील घ्यायचे असेल तर त्यासाठी गावगाड्यात शोधूनही व्यक्ती मिळत नव्हता.आज घराघरात त्रिशरण पंचशील मुखपाठ असल्याचे चित्र आहे.हा बौद्ध विहारातील संस्काराचाच परिणाम आहे.बौद्ध अनुयायी नियमितपणे बुद्ध विहारात व्यक्तिगत मतभेद बाजूला सारून एकाच ध्येयाने एकत्रित येतात.आचार विचारांची देवाणघेवाण करतात. वैचारिक संस्काराचे धडे गिरवितात. त्यातूनच सुसंस्कारित अशी पिढी घडत आहे हे सर्व बुद्ध विहाराचे फलित आहे.
      डॉ.आंबेडकरांनी "शिका, संघटित व्हा,संघर्ष करा" असा मूलमंत्र दिला.या समाजाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.शिक्षण हे खऱ्या अर्थाने समाजासाठी सर्वांगीण विकास साधण्याचे माध्यम आहे. परिवर्तनाचे साधन आहे यावर डॉ.आंबेडकरांची प्रचंड अशी श्रद्धा होती.समाजाने हाच मूलमंत्र  शिरोधार्य मानत नवबौद्धातील गोरगरिबांनी पोटाला चिमटा बांधून,एक वेळ उपाशी राहून आपल्या पाल्यांना शिकविले शिक्षित-उच्चशिक्षित केले.त्याचीच फलश्रुती म्हणजे  शिक्षणातून समाजाचा कायापालट झाला.परिणामतः अनेक गोरगरीब कुटुंबातील मुल-मुली शिकून सावरून चांगल्या नोकरीच लागले.स्वतंत्र उद्योग व्यवसायात गुंतले.वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. प्रस्थापिताच्या नजरेत भरेल इतकी भरारी या समाजाने घेतली. सन १९७०-१९७५ च्या पूर्वी जन्म झाला आणि शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळविणाऱ्यास आजच्या प्रमाणे निश्चितच अडचणी आल्या नसतील.मात्र आजच्या घडीला या समाजात शिक्षणात प्रचंड अशी क्रांती झाली.घराघरात वेगवेगळ्या शाखेतील पदवी-पदवीत्तरांची संख्या वर्षगणिक फुगत आहे. शिक्षित-उच्चशिक्षिताचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत कितीतरी प्रमाणात वाढलेले आहेत.तुलनेत नोकरीचे प्रमाण मंदावले. बेरोजगारीचे प्रमाण बेसुमार वाढले आहे.स्पर्धेच्या युगात नोकऱ्या मिळविणे अवघड होऊन बसले आहेत.समाजातील नव शिक्षितांना स्पर्धेत टिकण्यासाठी तयार करणे,स्पर्धा परीक्षेसाठी सक्षम करण्याची आवश्यकता भासू लागली.त्यातून २०१० च्या दशकापासून अभ्यासिका ही संकल्पना पुढे आली.विहारातील नियोजित कार्यक्रम/ उपक्रमाप्रमाणेच अभ्यासिका सुरू करण्यास कुणाचेही दुमत नाही.काळाची गरज ओळखून बुद्ध विहारातून अभ्यासिका या संस्कृतीचा जन्म झाला.गाव तिथे बुद्धविहार याप्रमाणेच "बुद्ध विहार तिथे अभ्यासिका" हा उपक्रम रूढ व्हायला लागला.समाजाकडून लोकवर्गणीसाठी दानदात्याचे भरभरून हात पुढे आलेत.लोकवर्गणीतून अभ्यासिका उभ्या राहू लागल्यात.उभ्या राहत आहे. बाबासाहेबांच्या उपकाराचे काही देणे लागते या उदात्त भावनेतून काही संधीसाधूचा अपवाद वगळता उच्चपदस्थ नोकरदार वर्ग आणि सामाजिक जाणिवेचे आर्थिक संपन्न व्यक्ती तसेच सर्वसामान्य व्यक्ती समूहाकडून तन मन धनाने दानासाठी ओघही वाढता आहे.परिणामतः अनेक गावात-शहरात अद्यावत अशा अभ्यासिका अस्तित्वात यायला लागल्यात.भांबोरा (ता तिवसा जिल्हा अमरावती) सारख्या लहानशा खेड्यात अद्यावत अशी अभ्यासिका पोहचली.अशी कित्येक उदाहरणे आहेत.बुद्ध विहारे हे परिवर्तनाचे केंद्र बनत असल्याचे कुणीच नाकारणार नाही.
       शहरापासून तर गाव- खेड्यापर्यंत अद्यावत आणि सुसज्ज अशा अभ्यासिका अस्तित्वात आल्या आहेत.युवक-युवतीचा वाढता कल आणि तळमळ लक्षात घेता परीक्षेसाठी आवश्यक अशी पुस्तके आणि इतर साहित्याची उपलब्धतेसाठी समाजातून उत्साहाने मदतीचे अनेक हात पुढे यायला लागलीत.कुणी पुस्तके दान स्वरुपात,कुणी रोख रक्कमेच्या स्वरुपात,कुणी आवश्यक साहित्याच्या स्वरूपात साहाय्य करण्यास पुढे येत आहे.कुणी वेगवेगळ्या खर्चाचा भार उचलत आहे.म्हणूनच स्पर्धा परीक्षा पुस्तकाने समृद्ध अशा अभ्यासिका उभ्या राहू लागल्यात.पुस्तके, वृत्तपत्रे, मासिके तसेच आधुनिक पद्धतीने अध्ययन करण्यासाठी संगणक लॅपटॉप सोबतच इंटरनेट सेवेची सुद्धा सोय उपलब्ध करून दिली जाते.त्याच बरोबर अध्ययन-अध्यापनाचे नियमित वर्ग चालविले जाते.विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम उपक्रम राबविले जाते.दिवसभर अभ्यास,अवांतर वाचन सोबतच सुसंस्कारासाठी बुद्ध धम्म,धार्मिक पुस्तके यासह इतर पूरक साहित्य उपलब्ध करून दिले जातात.सोबतच युवकांना स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी पोटतिडकीने प्रोत्साहित/प्रेरित/प्रवृत्त केले जाते.आज अनेक ठिकाणच्या अभ्यासिकेची व्याप्ती वाढली आहे.विद्यार्थ्यांचा कलही वाढला.या अभ्यासिकेची फलश्रुती म्हणजे या अभ्यासिकेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून अनेक युवक/युवती शासकीय उच्च पदावर विराजमान झालेत.छोट्या मोठ्या नोकऱ्या मिळविल्यात. म्हणूनच दिवसेंदिवस स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासिकेकडे युवक-युवतीचा ओघ वाढता आहे.ही बाब समाजासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे.रुजत चाललेली ही संस्कृती गतिमान करण्यासाठी, सक्षम नवी पिढी घडविण्यासाठी,शोषित ,पीडित वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, सामाजिक जाणिवेतून बाबासाहेबांचे ऋण दृष्टी पटलावर ठेऊन अनेकांनी निस्वार्थपणे समाजसेवेचे व्रत स्वीकारले आहे.अभ्यासिकेला धम्मदान दिले आहे.आता या सच्या कार्यकर्त्यांना/ समाजसुधारकांना/अभ्यासिकाना बळ देण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे.स्पर्धा परीक्षा अभ्यासिका संस्कृती गतिमान करायची आहे.बुद्ध विहार हे प्रबुद्ध भारत व सामाजिक सशक्तीकरणाचे केंद्र बनण्यासाठी  प्रत्येकांनी व्यक्तिगत महत्वकांक्षा राग,द्वेष,प्रतिष्ठा,राजकीय मतभेद बाजूला सारून अभ्यासिका संस्कृतीला बळ देण्याची नितांत गरज आहे.असे झाले तर महापुरुषाची विचारधारा घराघरात पोहोचेल आणि बुद्ध विहारे ही खऱ्या अर्थाने मानवी कल्याणासाठी/समाजासाठी ऊर्जास्त्रोत ठरेल यात अजिबात शंका नाही.
----------------------------------------
प्रा. डॉ. नरेश शं. इंगळे
अर्थशास्त्र विभाग प्रमुख
श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा ता. धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती
मोबाईल --९९७०९९१४६४
-----------------------------------------

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...