हेमंत कडून झालेल्या विश्वासघातानं सूर्या पूर्णतः कोसळला/खचला.चार-चौघात राहण्याऐवजी एकाकी राहणं पसंत करू लागला.त्यावेळी त्याला काही सुचेनासं झालं होतं.हेमंत अनं सूर्या यांच्यातील संवाद कधीचाच थांबला.तो दृष्टीत पडल्यास त्याचा राग अनावर होत असे.त्याच्या कडून झालेला विश्वासघात अनं घडलेला प्रकार कदापिही विसरण्यासारखा नव्हता.इतकं सर्व घडूनही सूर्याचा किरणववरील विश्वास पूर्वीप्रमाणेच कायम होता.तरीपण सत्यता समजून घेण्यासाठी त्याची उत्सुकता अनं तितकीच तळमळ होती.त्यासाठी किरण किंवा सानियाला भेटून शंका निरसन करणं हाच एकमेव पर्याय समोर होता.पण सर्वदूर चर्चेनं सूर्याला किरणच्या संपर्कात किंवा तिच्या घराच्या आसपास परिसरात ये-जा करणं तितकं सोपं नव्हतं.कारण हेमंतनं त्याचं स्वतःचं नाव किरण सोबत जोडून घेतलं होतं शिवाय सूर्यालाही बदनामीच्या कटघऱ्यात उभ केलं होतं.त्याने सूर्याची सर्वच बाजूने कोंडी अन तटबंदी केली होती."सूर्याचं प्रेम तुटलं अनं माझं जुळलं" हे तर त्याच्यासह त्याच्या सहकार्यानी ब्रीदवाक्य बनविलं होतं.हेमंत सह त्याच्या सहकार्यानी सर्व प्रयत्न करूनही प्रामाणिक,सुस्वभावी आणि होतकरू मुलगा म्हणून सूर्याची चांगली असलेली प्रतिमा मलिन शकले नाही.सूर्याची बदनामी आणि त्याच्या विषयी उलट-सुलट चर्चा लोकांच्या पचनी पडली नाही.पण त्याचे प्रयत्न काही थांबले नाहीत.हेमंत कडून सूर्या आणि किरण यांच्या बाबतीत होत असलेला विषारी आणि आक्रमक प्रचार/चर्चा सूर्याला अस्वस्थ करित असे.पण त्यावर तोडगा काढू न शकल्याचे शल्य त्याला चांगलेच बोचत असे.शिवाय त्याच्याकडून झालेला विश्वासघात सूर्याच्या नजरेआड जात नव्हता. भूतकाळातील सर्व प्रसंग आणि किरणच्या भेटीसाठीचा नित्यक्रम अधिक दुःखी करीत असे.किरणच्या विरहात पूर्णतः बुडालेल्या सूर्यानं नाईलाजाने शनिवार दिनांक १७ एप्रिल १९९३ रोजी पुन्हा हेमंतची भेट घेतली.चर्चा अनं बदनामीचं कारण विचारू लागला.तेव्हाही तो उडवा उडवीचे उत्तरे देऊ लागला.विशेष म्हणजे एवढे करूनही त्यांच्या चेहऱ्यावर पच्छातापाचा लवलेशही नव्हता.भेट घेतली पण सूर्याचं काही समाधान झालं नाही.उलट सत्यतेबाबत तो दुविधेतच राहीला.त्यामुळे दिवसेंदिवस त्याची चिंता कमी होण्याऐवजी त्यात भरच पडु लागली.हा सर्व प्रकार समीरच्या कानावर पडला.तशी सूर्यानंही त्याला कल्पना दिली.त्याच्यासाठी सुद्धा हा आश्चर्याचा धक्का होता.समीरनं संपूर्ण माहिती करून घेतली.सूर्याला आधार अनं धीर दिला.विशेष म्हणजे हेमंतही समीरचा नजीकचा मित्र होता.म्हणून घडवून आणलेल्या चर्चेत/अफवेत कितपत सत्यता आहे ही माहिती करून घेण्याचं त्यानं ठरविलं होतं.समीरनं तसा शब्द दिला.कारण सूर्याची अवस्था अनं वाढती चिंता समीरला काही पाहवल्या जात नव्हती.त्याची हेमंतशी असलेल्या मैत्रीमुळे हेमंत कडून माहिती करवून घेणं त्याला अवघड नव्हतं.याच हेतूने समीर हेमंतच्या संपर्कात राहू लागला.दोघांचीही चांगली सलगी वाढली.सूर्या पण प्रत्येक गोष्ट अनं वेदना समीरकडं सांगू लागला.हेमंतच्या मनात नेमकं काय दडलंय याबाबतीत हळूहळू माहिती करून घेऊ लागला.हेमंतकडून तपशीलवार प्राप्त माहितीतून समीरनं ठामपणे सांगितलं की: "हेमंत आणि किरण यांच्यात कसल्याही प्रकारचा संबंध वा जवळीकता नाही.हा सर्व प्रकार हेमंतनं स्वतःच घडवून आणल्याचं समीरने खात्रीपूर्वक सांगितलं" समीर इथवरच थांबला नाही तर सूर्याच्या मनातील गैरसमज दूर.करून हेमंत हा कसा खोटारडा आहे हेही उदाहरणासह सूर्याला पटवून सांगितलं.सूर्यालाही हे सर्व काही पटलं.समीर कडून त्यास दुजोरा मिळाला.पण सर्वदूर चर्चाच अशी घडून आणली की, सूर्याच्या जागी इतर कुणीही असतं तरी सूर्याप्रमाणेच खचला असता.सूर्याचे स्वतः पेक्षा किरणवर अधिक प्रेम आहे. म्हणून तो तिच्यासाठी सदासर्वकाळ कसल्याही प्रकारचा त्याग करण्यास तयार आहे आणि राहील.सगळी धावपळ ही किरणसाठी आहे.ती सदैव सुखी, समाधानी आणि आनंदी राहावी हीच त्याची मनस्वी इच्छा आहे. म्हणून तो तिच्या नजरेपासून दूर राहत असला तरी त्याचं तसूभरही प्रेम कमी झालं नव्हतं आणि कधी कमी होणार सुद्धा नाही.
सन १९९३ च्या जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा (HSC) निकाल जाहीर झाला.खडतर कठीण प्रसंगाला सामोरे जाऊनही सूर्यानं घवघवीत यश संपादन केलं होतं.तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला.शिवाय संपूर्ण महाविद्यालयातून (२४० विद्यार्थ्यांमधून) द्वितीय क्रमांकही मिळविला.अनेक अडचणीवर मात करीत त्याने यशाला गवसणी घातली होती.त्याने मिळविलेल्या यशाची सर्वदूर चर्चा झाली.म्हणून त्याचं सर्व स्तरातून अभिनंदन/कौतुक व्हायला लागलं.गावात तसेच परिसरात त्याची प्रतिमा अधिक उजळू लागली.गरीब, होतकरू आणि हुशार मुलगा म्हणून नावलौकिक मिळू लागला.दैदिप्यमान शैक्षणिक यश,नैतिक आचरण,सामाजिक बांधिलकी आणि लेखन कौशल्य हे त्यासाठी कारणीभूत ठरलं.सर्व स्तरातून सूर्याच्या पाठीवर शाबासकीची थाप पडू लागली.तरीही सूर्या मनातून तितका आनंदी नव्हता.जिचं प्रेम मिळविण्यासाठी हे यश मिळविलं तीच या यशात/आनंदात सहभागी नसल्याने तो अधिक दुःखी होता.सर्व दुःख,वेदना अंतर्मनात ठेवल्या अनं विरहात न रमता तिच्या दृष्टीत कायम चांगलं कसं राहता येईल यादृष्टीने तो सातत्याने प्रयत्नात राहत असे.ती संधी त्याला बारावीच्या परीक्षेने मिळवून दिली.म्हणून तो अहोरात्र कष्ट उपसू लागला.सलग अभ्यास करू लागला.तिच्या नजरेत कायम चांगलं राहावं हाच त्यांचा हेतू होता.तिला जरी माहिती नसलं तरी सूर्याला मिळालेल्या यशात आणि कार्यात किरण हीच त्यांची खरी प्रेरणा होती आणि राहील.कुठल्याही पुरुषाच्या यशात कुठल्यातरी एखाद्या स्त्रीचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असतो तसाच सूर्याच्या यशात अप्रत्यक्षपणे किरणचाच सहभाग आहे.तिचीच प्रेरणा आहे आणि ती कायम राहील हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे.
त्यावेळी प्रथमच डी.एड.प्रशिक्षण हे इयत्ता दहावी ऐवजी बारावीवर झालं.बारावीत मिळविलेल्या घवघवीत यशानंतर त्यानं डी.एड साठी फॉर्म भरला.शतप्रतिशत त्याची निवड होईल याची सर्वांना खात्री होती.परंतु केवळ एक दोन टक्क्याच्या फरकानं त्याचा नंबर हुकला.इतक्या कठीण प्रसंगी प्रचंड मेहनत घेऊनही त्याला डी.एड.ला जाता आलं नाही.म्हणून तो काहीसा निराश झाला.तरीही जिद्द काही सोडली नाही.कदाचित त्यावेळी किरणची साथ मिळाली असती तर चित्र काही वेगळं राहिलं असतं.
किरणसाठी सूर्या काहीही करायला तयार असे.हे यशही त्यानं तिच्यासाठीच मिळविलं होतं.पण किरण त्यात प्रत्यक्ष सहभागी नाही याचं शल्य त्याला होतं.कारण अशा आनंददायी प्रसंगी त्याला तिचा प्रत्यक्ष सहभाग आणि तिचे कडून कौतुक व्हावं असं त्याला वाटणं साहजिक होतं.कपटी हेमंतच्या कटकारस्थानानं त्याचा दुग्धशर्करा योग हिरावला होता.पण चांगल्या कर्माचे फळ कधीना कधी मिळतय यावर त्याचा विश्वास होता;आहे.म्हणूनच सूर्याच्या ध्यानीमनी नसताना एकाएकी त्याला किरणच्या घरी जाण्याचा योग आला.सूर्या त्याच्या गावाच्या बसस्टॉपवर एसटीची वाट पाहत बसला होता.अचानक लगबगीत कोमटे यांचे जावई सायकलने गावाच्या बसस्टैंडवर आलेत.कदाचित त्याना लवकर गावी जायचं होतं.म्हणून त्यानी सूर्याला गावात सायकल पोहोचून देण्याची विनंती केली.सूर्याला बाहेरगावी जायचं असल्यानं त्यानं प्रारंभी सायकल पोहोचून देण्यास नकार दिला.नाईलाजाने त्यांनी गावातील जर कुणी एखादा व्यक्ती भेटला तर त्यांच्या करवी त्यांच्याकडे (किरणच्या वडिलांकडे) ही सायकल पोहचवून देण्याचे सांगून ठेवले आणि घाईतच एसटीने निघून गेले.किरणच्या वडीलाचं नाव ऐकताच सूर्याच्या भुवया उंचावल्या.बाहेरगावी जाण्याचं थांबवून तो स्वतः किरणच्या घरी सायकल पोहचवून देण्यासाठी निघाला.कोणतेही प्रयत्न न करता तिच्याकडे अर्थात किरणच्या घरी जाण्यासाठी सहज संधी त्याला उपलब्ध झाली आणि त्या संधीचा त्यानं पुरेपूर फायदा उठविला.सूर्या स्टॅन्ड वरून सुसाट वेगानं गावाकडे निघाला.तिच्या घरी कधी पोहोचतो असे त्याचे झाले.किरणची नक्कीच नजरेवर नजर पडेल कदाचित ती बोलू पण शकेल या जाणिवेनं तो आनंदी झाला.आशावादी झाला.शक्य तितक्या लवकर पोहोचण्याचा तो प्रयत्न करू लागला.तिच्या घराजवळ येताच तो जरा थबकला.अंगावर आलेल्या चराचरा घामाच्या धारा पुसू लागला.तसा तो चांगलाच गोंधळला होता.स्वतःवरचे नियंत्रण गमावून बसला होता.त्यातच त्याची छाती धडधड करायला लागली.मोठ्या धाडसानं तो मान खाली टाकून किरणच्या घरात सायकलसह शिरला.प्रवेश करताच किरण आणि तिच्या आईची सूर्यावर नजर पडली.किरण आणि तिची आई आवाराच्या मुख्य दरवाज्या ऐवजी आतील घराच्या दरवाज्यात बसल्या होत्या.किरणची आई तिचे डोक्याचे केस नीट करून देत होती अर्थात विंचरून देत होती.सूर्यानं घरात प्रवेश करताच त्याची शांतता भंग झाली.सूर्याची तीव्र इच्छा असतानाही त्याला त्यांच्याकडे फारसं बघता आलं नाही.तो थबकत थबकत जड पावलानं बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतानाच किरणच्या आईनं सूर्याला आवाज दिला अनं थांबविलं.सायकल बद्दल विचारणा केली.लगेच सूर्यानं मिळविलेल्या यशाचा विषय हाताळत म्हणाल्या की, "अरे ! बाबू,पेढा नाही दिला रे तू" असे म्हटले.सूर्या क्षणभर थबकला अनं म्हणाला "कशाचा पेढा" तिची आई म्हणाली, "अरे ! तू चांगल्या मार्कानी पास झाला,शिवाय कॉलेजमधून नंबर मिळविला.तुझ्या यशाची गावासह सर्वदूर चर्चा आहे शिवाय सर्वां कडून कौतुक होत आहे तरी म्हणतोय "कशाचा पेढा".सूर्यानं हळूच मान हलविली.पुन्हा तिची आई म्हणाली की, मला तर पेढा पाहिजे आहे शिवाय किरण सुद्धा पेढा मागत आहे" असे शब्द ऐकताच सूर्याला मनातल्या मनात आनंदाच्या गुदगुल्या व्हायला लागल्यात.तिच्या आईनं सहज म्हटलं असलं तरी ते शब्द सूर्याला चांगले सुखावून गेले.काहीही असो,आपण मिळवलेलं यश हे किरणच्या कानावर पडलं हे काही त्याच्यासाठी कमी नव्हतं.त्याच वेळी सूर्यानं तिच्या आईला म्हटलं की,जेव्हा तुमची मुलगी चांगल्या गुणांनी पास होईल तेव्हा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करिल".असं म्हणताच किरणही गालातल्या गालात हसली ! पाच दहा मिनिटे मनमोकळा संवाद झाला.त्यावेळी काय बोलावं त्याचं त्यालाच कळत नव्हतं.त्याच्यासाठी हा क्षण अविस्मरणीय होता.आजही तो प्रसंग त्याच्या नजरेआड जात नाही.असे असले तरी आपल्या प्रेमाची किरणला माहिती आहे किंवा नाही याबाबतीत तो त्यावेळी सुद्धा दूविदेतच होता.
१९९३ चा नोव्हेंबर महिना.शेतीवाडीच्या कामासह दिवाळी उत्सवाची एकच धामधुम सुरू होती.हा उत्सव सर्वांसाठीच आनंददायी तितकाच उत्साहवर्धक असतो.सगळीकडं मौजमस्तीसह नवनवीन कपडे आणि इतर साहित्य खरेदीची लगबग सुरु होती.याच दरम्यान दिवाळी सणाच्या पर्वात गायी खेळाच्या दिवशी सूर्या हा त्याच्या धाकट्या बहिणीसाठी दिवाळीनिमित्त नवीन कपडे खरेदीसाठी शहराकडे जाण्यासाठी एसटी स्टँडवर पोहोचला.योगायोगानं सानिया सुद्धा एस.टी. स्टॅन्डवर एसटीची वाट पाहत बसली होती.ती पण खरेदी साठी शहराच्या ठिकाणी चालली होती.एसटी यायचे पूर्वी दोघेही गप्पात रमलेत.शाळेच्या जुन्या आठवणी दृष्टी पटलावर आणू लागलेत.सूर्या गप्पात रमला असला तरी त्याच्या मनातील विचाराची कालवाकालव काही थांबत नव्हती.हेमंतही त्याला आठवू लागला.सानिया-किरण या दोघीही तिचे बहिणीच्या गावी जाण्यापूर्वी हेमंतनं सानिया जवळ नक्की काय सांगितलं असेल याबाबतची उत्सुकता ताणू लागली.आज सानिया कडून सर्व काही कळेल या आशेनं तो तिच्याकडं बघू लागला.परंतु असं काही विचारण्याचं एकाएकी त्याचं धाडस काही होत नव्हतं.अखेर चर्चेच्या ओघात त्यानं किरण बाबतचा विषय हाताळला.सानिया ऐकून अवाक झाली.तिलाही आश्चर्य वाटलं.कारण ती या सर्व प्रकारापासून पूर्णतः अनभिज्ञ होती.तिला याबाबतीत किंचितही कल्पना नव्हती.सूर्याने त्याच्या मनात असलेले किरण विषयी विचार आणि घटनाप्रसंग थोडक्यात तिच्यासमोर व्यक्त केले.त्याच्या मनातील विचार किरण पर्यंत पोहोचविण्यासाठी केलेली धडपड तिच्यासमोर मांडली.सूर्या सानियाला म्हणाला की, "का ग,सानिया, तू आणि किरण दोघीही जेव्हा तुझ्या मोठ्या बहिणीच्या गावी गेल्यात तेव्हा हेमंतनं तुला काही सांगितलं का? ती हो म्हणाली.हेमंतनं सांगितलं की, "मी (हेमंत) किरणवर प्रेम करतो.माझे विचार अर्थात माझे प्रेम असल्याचा निरोप किरण पर्यंत पोहचव" असा तो म्हणाल्याचे सांगितले.त्यावर सूर्या म्हणाला की, "मग त्यावर किरणचं काय उत्तर होतं.तिनं त्याच्या प्रेमाला स्पष्ट नकार दिला असल्याचं सांगितलं अनं तिच्या मनात असले कधी विचार आले नाहीत.कधी येणार सुद्धा नाही असं किरणने ठामपणे सांगितलं.अर्थात सूर्यानं सानिया करवी त्याच्या मनातील विचार पोहोचविण्याचं जे सांगितलं होतं ते हेमंतने तिच्याकडे काही एक सांगितलं नाही तर उलट त्यानं तो स्वतःच तिच्यावर प्रेम करीत असल्याचे सांगतानाच त्यांने स्वतःसाठीच सानियाची मदत मागितली असल्याचे सानियाने सांगितले.सूर्यानं विचारलं की, माझ्या बाबतीत तो काही बोलला का? तर ती म्हणाली की, नाही! त्याच्या बोलण्यात तुझ्याविषयी कुठेही उल्लेख आला नाही.तुझं नाव सुद्धा घेतलं नाही.अशी ती म्हणताच सूर्यानं अलगदपणे कपाळावर हात ठेवला अनं म्हणाला " अरे,बापरे ! लोक किती कृतघ्न असतात" सूर्यानं त्याच्या मनात सुरू असलेली घालमेल आणि किरणवर करित असलेलं अफाट प्रेम तो सानिया पासून लपवू शकला नाही.त्यानं सर्व काही तिच्या जवळ सांगून मोकळा झाला.किरणवर त्याचं किती वर्षापासून प्रेम जडलं आहे हे सानियाजवळ व्यक्त केलं.तो तिचेवर किती प्रेम करतो आहे आणि तिचं प्रेम मिळविण्यासाठी काय काय प्रयत्न केले याचा त्यांने तिच्यासमोर पाढाच वाचला.फक्त मला माझे विचार तिच्यापर्यंत पोहचविता आले नाही.त्यासाठी मी हेमंतचं सहकार्य घेतलं पण त्यानं माझा विश्वासघात केला.असं तिला सांगताना सूर्या म्हणाला की, "किरणवर माझं जीवापाड प्रेम आहे आणि हे प्रेम आजन्म राहणार आहे,ते कधीही कमी होणार नाही.तिच्या प्रत्यक्ष संपर्कात असो अगर नसो प्रेम मात्र तितकेच कायम राहील.मात्र याबाबतीत किरणला कधी जाणीव सुद्धा होऊ देणार नाही.तिच्यावर अप्रत्यक्ष (एकतर्फी) प्रेम करीत राहील पण तिच्या संपर्कात जाणार नाही किंवा तसा आता प्रयत्नही करणार नाही आणि म्हणून, तू सुद्धा, तूझी आणि माझी भेट झाली आहे असं किरणला सांगू नको असं सूर्यानं सानियाजवळ मत मांडलं.सूर्यानं या अगोदर एसटीत सुद्धा पूर्वकल्पना दिली असली तरी पुरेशा वेळे अभावी सविस्तर सांगू शकला नाही.एवढे मात्र खरे की,या भेटी दरम्यान हेमंतनं सूर्याच्या प्रेमाचा निरोप न पाठविता स्वतः साठीच सानियामार्फत निरोप कळविल्याचा सूर्याला कळून चुकलं होतं. त्यामुळे तो कमालीचा निराश अनं हताश झाला असलातरी दुसऱ्या बाजूनं किरणने हेमंतला नाकारल्याचा आनंदही तितकाच झाला होता.हेमंतकडून गावात जी चर्चा आणि अफवा पसरविली ती सुद्धा पूर्णतः खोटी असल्याने आनंदी तर तिची नाहक बदनामी झाली आहे वा बदनामी होत आहे हे काही त्याच्या पचनी पडतं नव्हतं.सानियाच्या भेटीनं अखेर हेमंतचं कटकारस्थान त्याच्यासमोर उघड झालं होतं.म्हणून ही भेट सूर्यासाठी मैलाचा दगड ठरली.
सानिया आणि सूर्याच्या भेटीनंतर एक दीड महिना उलटला.नववर्षाला (१९९४) सुरुवात झाली.सूर्या "त्या" प्रकरणातून अद्यापही सावरला नव्हता.त्याच्या चेहऱ्यावरील नैराश्य लपून लपत नव्हतं.प्रत्येक नववर्षे त्याच्यासाठी सारखचं होतं.नववर्षाचं त्याला काही नावीन्य वाटत नव्हतं.तरीपण इतरांच्या शुभेच्छा घेऊ लागला आणि शुभेच्छा देऊ लागला.
सूर्या पूर्वीप्रमाणे किरणच्या नजर भेटीसाठी तितकी धावपळ करीत नव्हता.मात्र किरण विषयी प्रेम किंचितही कमी झालं नव्हतं आणि कमी होणार नाही.त्यानं तिच्यावर कायम अप्रत्यक्ष (एकतर्फी) प्रेम करण्याचा "पण" घेतला होता.नववर्षाचा आठवडा उलटला.अशातच शनिवार दिनांक ८ जानेवारी १९९४ रोजी सायंकाळी पाच साडेपाच वाजताच्या सुमारास सूर्या हा लाल शर्ट पिवळसर पॅन्ट परिधान करून फिरायला निघाला.फिरता फिरता तो गावातील रामेश्वरराव यांचे घरासमोर एकटाच उभा राहिला.अशातच किरण आणि सानिया त्याच्या नजरेत पडल्यात.त्या दोघीही सूर्या उभा असलेल्या दिशेने येत होत्या.त्या दोघींना येतांनी बघताच सूर्याची धाकधुक वाढली.काय घडलंय अनं काय घडणार ह्या विचारानं तो सुन्न पडला.कदाचित आपल्यावर नवं संकट तर कोसळणार नाही ना ! असे एक ना अनेक विचार त्याच्या मनात यायला लागले.याशिवाय असाही विचार यायला लागला की,कदाचित त्यांना इकडे कुणाकडे काही तरी काम असावं असे सकारात्मक तसेच नकारात्मक विचार मनात सुरू असताना त्यानं त्यांच्याकडं फारसं गांभीर्यानं लक्ष केंद्रित केलं नाही.जणू काही त्याचं त्यांच्याकडे काही लक्ष नाही असं तो भासवू लागला.कारण आता त्याला तिच्या संपर्कात न जाता आयुष्यभर अप्रत्यक्ष (एकतर्फी) प्रेम तिला जाणीव होऊ न देता करण्याचं ठरविलं होतं.त्यावेळी (८ जानेवारी १९९४) किरणनं कथिया रंगाचा स्कर्ट आणि मध्यम हिरव्या रंगाचं ब्लाऊज (टॉप) असा ड्रेस परिधान केला होता.सूर्याची तिला बघण्याची तीव्र इच्छा असतानाही तो तिच्याकडे न पाहल्यासारखे दाखवू लागला.त्या दोघी सरळ सूर्या उभा असलेल्या दिशेने आल्यात.मनोमन तीव्र इच्छा असतानाही त्याने किरणकडे फारशी नजर न फिरविता सानियाकडे बघून हलकसं स्मितहास्य करीत खाली मान वळविली.त्या दोघीही थेट रामेश्वरराव यांच्या घरात शिरल्या.रामेश्वरराव यांची धाकटी बहीण ही सानियाची वर्गमैत्रीण.त्या घरात शिरल्या पण सूर्याच्या मनात गरागरा विचारचक्र फिरायला लागले.तो तिथेच खांबा सारखा उभा राहिला.पाच-सहा मिनिटांनी सानिया एकटीच घराबाहेर अर्थात दरवाजा जवळ आली आणि सूर्याला थोडक्यात म्हणाली की, "ती हो म्हणते" एवढा शब्द उच्चारून लगेच घरात शिरली.सानिया काय म्हणाली हे त्याला कळून न कळण्यासारखं झालं.त्याचं मन हे काही मानायला तयार नव्हत.काही वेळाने त्या त्यांच्या घराकडे परत जाण्यास निघाल्या.कदाचित त्या केवळ हाच निरोप घेऊन आल्या असाव्यात.परतीच्या वेळी तो त्यांच्या पाठमोऱ्या प्रतिकृतीकडं एकटक बघत राहिला आणि कधी नव्हे इतका विचार मग्न झाला.सूर्या त्याच दिवशी रात्रीच्या वेळी समीरला भेटला आणि घडलेला सर्व प्रसंग विशद केला.त्यालाही आश्चर्य वाटलं.एकाएकी किरणचं मतपरिवर्तन कसं झालं? खरच तिनं आपल्याला स्वीकारलं आहे का? असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या समोर उभे राहिलेत.विशेष म्हणजे अशा भेटीसाठी किंवा होकार ऐकण्यासाठी त्याला तब्बल पाच-सहा वर्ष प्रतीक्षा करावी लागली.त्यातच मध्यंतरीच्या काळात विश्वास न बसणाऱ्या घटना घडल्यात.संकटाचा पहाड कोसळला.भूतकाळातील सर्व प्रसंग भराभर दृष्टीपटलावर यायला लागलेत.तिचा होकार कायम राहणार की,क्षणिक ठरणार हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा वाटू लागला.पूर्वीसारखी परिस्थिती ओढवून घेण्यापेक्षा अप्रत्यक्ष (एकतर्फी) प्रेम करण्यास काय हरकत आहे असा विचारही त्याच्या मनात यायला लागला.या सर्व विचाराच्या देवाण-घेवाणीतून समीरनं सूर्याची समजूत काढली.तो म्हणाला की,आजपर्यंत किरणचं प्रेम मिळवण्यासाठी जीवाचे रान केले.शर्थीचे प्रयत्न केले.आज ती स्वतःहून तिचं प्रेम व्यक्त करण्यासाठी तुझ्यापर्यंत आली.अशावेळी तू तिला नकार देणार का? कदाचित असं घडलं तर ती कधी सुखी होणार का? ती तुला आयुष्यभर तरी माफ करणार का? नाही ! तुझा नकार तिच्या पचनी पडणार नाही असे अनेक प्रश्न समिरनं सूर्यासमोर उभे केलेत.समीरच्या बोलण्यात तथ्य आहे हे सूर्याला कळलं नाही असं काही नव्हतं.आपण जिच्यावर जीवापाड प्रेम करतोय अशा व्यक्तीला दुखविणं खरंच योग्य आहे का? समीरचं म्हणणं सूर्यालाही पटत असे आणि ते कुणालाही पटणारे आहे.म्हणूनच सूर्यानं तिच्या शब्दाला शिरोधार्य मानलेत.कित्येक वर्षांनी अखेर त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.किरण कडून मिळालेल्या हिरव्या झेंडीने प्रथमच तो दुविधेतून बाहेर पडला.
किरणच्या होकारानं सूर्याचा चेहरा हास्यानं खुलला अनं फुलाप्रमाणे फुलला.कधी नव्हे इतका आनंदी तो दिसायला लागला.आता त्याला सर्व काही मिळाल्याच्या आविर्भावात वावरू लागला.अशातच त्यांनं किरणला पहिलं प्रेमपत्र लिहिण्यासाठी हाती घेतलं.ते पहिलं प्रेमपत्र सानिया करवी किरण पर्यंत पोहचविलं.सूर्यानं प्रेमपत्र पाठविलं असलं तरी मनात भीती बाळगून होता.किरणचा मिळालेला होकार हा सानिया करवी मिळाला होता.कदाचित उलट प्रसंग तर ओढविणार नाही ना! अशी भीतीही त्याच्या मनात घर करून होती.अशातच पुन्हा सूर्याची सानियाशी भेट झाली आणि तिला पुन्हा विचारलं की, "किरणचा खरंच होकार आहे ना !" तेव्हाही सानियानं किरणचा होकार असल्याचा पुनरुच्चार केला.
सूर्याचं पहिलं प्रेमपत्र सानिया करवी किरण पर्यंत पोहचलं.पण लवकर उत्तर काही मिळेना.त्यामुळे सूर्या अस्वस्थ व्हायला लागला.अजून दोन प्रेमपत्र पाठविलेत.त्याचेही काही लवकर उत्तर मिळेना.हे दोन्ही प्रेमपत्र पाठविण्यापूर्वी किरण ही सूर्याच्या घरी आली.रात्रीची वेळ होती.सूर्याच्या घरातील सर्व मंडळी ही घराच्या ओसरीत बसली होती.सूर्या आणि किरण हे दोघेही सूर्याच्या अभ्यास खोलीत बिनधास्तपणे बसली होती.ही त्यांची पहिलीच भेट होती.दोघेही गप्पा गोष्टीत रमलेत.एकमेकांना एकमेकांचे विचार सांगू लागलेत.विचाराची देवाण-घेवाण करू लागलेत. प्रतीक्षेनंतरची भेट ही किती सुखद असते हे प्रत्यक्ष अनुभवू लागलेत.गप्पागोष्टीच्या ओघात ते वेळेचे भानही विसरलेत.अखेर दोघांनीही एकमेकांपासून निरोप घेण्यापूर्वी किरण सूर्याला म्हणाली की,चिठ्ठीचं उत्तर लवकर दिलं नाही म्हणून रागवायचं नाही.याबाबतीत तिनं तिच्या अडचणी त्याच्यासमोर मांडल्यात अनं घरी जायला निघाली.दोघांनाही एकमेका जवळून जाण्याची अजिबात इच्छा नव्हती.तिची पहिली भेट त्याला सुखद धक्का देऊन गेली.सुखद भेटीनं दोघेही भारालेत.
किरण आणि सूर्याच्या प्रेमाची फुलबाग बहरायला लागली.तत्पूर्वी हेमंतने त्याचा विश्वासघात केल्यानंतरही त्यानं घडवून आणलेल्या चर्चेवर त्याचा कवडीचाही विश्वास नव्हता.अप्रत्यक्ष प्रेम करण्याचा "पण" घेऊनही तिला बघितल्याशिवाय त्याला राहवल्या जात नव्हतं. त्यावेळी सूर्या हा पदवीच्या प्रथम वर्षाला तर किरण ही एस.एस.सी.ला होती.सूर्या तालुक्याच्या ठिकाणी तर किरण ही नजीकच्या गावी शाळेच्या ठिकाणी अकरा वाजता तर सूर्यांला बारा वाजता पोहोचायचे असे.किरण आणि सूर्या दोघेही बरोबर सकाळी साडेदहा वाजता घरून निघायचे.योगायोग म्हणजे दररोज सकाळी १०.३५ वाजता दोघांची भेट ही गावातील नदीच्या आसपास किंवा वळण रस्त्यावर व्हायची.तेव्हा त्यावेळी एक-दोन मिनिटाचा जरी फरक पडला तरी एकमेकांची भेट होत नसे.त्यावेळी किरण सूर्याच्या प्रेमाप्रती अनभिज्ञ होती.तरीही दोघांच्याही वेळेत कधी कसूर होत नव्हता.विशेष म्हणजे ती वेळ दोघांनीही ठरवून घेतली नव्हती.तरीही ती न चुकता नेमकी त्याच वेळेत घरून का निघत असावी हा प्रश्न त्याला नेहमीच सकारात्मक विचार करायला भाग पाडत असे.
सूर्यानं पाठविलेल्या प्रेमपत्राचं महिना उलटूनही उत्तर काही आलं नव्हतं.म्हणून तो काहीसा निराश व्हायला लागला.त्यामुळे त्याचे कशातच मन रमत नसे.म्हणून रागाच्या भरात दूरवरून भेट नाही.प्रत्यक्ष भेट नाही.त्यासाठी काही प्रयत्न नाही.अशातच सूर्याने किरणच्या नावे पुन्हा प्रेमपत्र लिहिले.पण हे प्रेमपत्र देण्याची किंवा तिच्या पर्यंत पोहचविण्याची मोठी अडचण होती.कुणा समोर प्रेमपत्र किंवा चिठ्ठी द्यायची नाही,एकटीला बघून किंवा सानिया कडे द्यावी असा तिने प्रत्यक्ष भेटीदरम्यान दंडक घालून दिला होता.त्याला तिचा शब्द कधीच मोडायचा नव्हता.त्या दरम्यान ती कधी एकटी भेटली नाही.सानियाची सुद्धा भेट झाली नाही.चार-पाच दिवस उलटले तरी दोघीपैकी एकीचीही भेट झाली नाही.अशातच एक दिवस सूर्या नेहमी प्रमाणे कॉलेजला जायला निघाला.सोबत त्याची आभा वहिनी (लहान बाळ-मुलगी घेऊन) होती.सूर्याने आभा वहीनीला पहिलेच पूर्वकल्पना दिली होती.सूर्या आणि किरण दोघेही आप आपल्या घरून नेहमीच्या वेळेत शाळा-कॉलेजला जायला निघालेत.दोघात काहीसे अंतर पडले.म्हणून सूर्यानं वहिनीला हळूवार चालण्यास सांगितले जेणेकरून दोघांची भेट होईल.दोघातील अंतर कमी झाले.ती हाकेच्या अंतरावर असल्याने आभा वहिनींना त्यांचे बाळ हे किरण जवळ देण्यास सूचविले.आभा वहिनींनी मागे वळून किरणला आवाज देत बाळांला घे असं म्हटलं.किरणनेही तितक्याच काहीशा तळमळीनं बाळाला (मुलगी)जवळ घेतलं.काही वेळाच्या फरकाने तिनं बाळाला वहिनी कडं न देता सूर्याकडं दिलं.ही संधी साधून बाळाला जवळ घेता घेता तिच्या मैत्रीणची (प्रणिता) नजर चुकवत प्रेमपत्र (चिठ्ठी) किरणच्या हाती दिलं.पण तिची मैत्रीण त्याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवून होती.चिठ्ठी दिल्याचे तिच्या लक्षात आलं.म्हणून तिनं शाळेच्या रस्त्याने जाता जाता "सूर्यानं तुला काय दिलं आहे, ते मला दाखव", अशा प्रकारचा तगादा प्रणितानं तिच्या मागे लावला.प्रणितानं चिठ्ठी दाखविण्यावरून किरणला भंडावून सोडलं होतं.म्हणून तिच्या हट्टाला कंटाळून किरणने त्या दिवशीची शाळा पूर्ण वेळ न करता दोन वाजताच्या मधल्या सुट्टीत एकटीच घरी (गायी) परतली असल्याचे किरण कडून समजलं.त्यादिवशी ती कासावीस झाली.त्यातच सूर्याला पत्राचं उत्तरं मिळालं नसल्याने तो ही तसा कासावीस झाला होता.हे तिच्याही लक्षात आलं होतं.कारण दररोज तिच्या शाळेला जाण्याच्या वेळी आणि कॉलेज जाण्यासाठी स्वतः ठरवून दोघेही घरून सकाळी साडेदहा वाजता निघत असे जेणेकरून दोघांची भेट होईल.पण तिच्याकडून चिट्ठीचं उत्तर न मिळाल्यानं सूर्या त्यावेळेत जाणे टाळू लागला.तिच्या संपर्कातही जाण्यास टाळू लागला.पूर्वीप्रमाणे बोलणंही थांबविलं.इच्छा नसतानाही त्यानं तिचे सोबत तब्बल पंधरा दिवस बोलणं टाळलं.सूर्याचं असं वागणं तिला रुचलं नाही.ते तिला चांगलच खटकलं.चिट्टीचं उत्तर दिलं नाही हेच त्यामागे एकमेव कारण आहे.हे तिच्या लक्षात आलं होतं.तो चिठ्ठीच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आस लावून बसला होता.अशातच किरणने १७ फेब्रुवारी १९९४ रोजी लिहिलेलं पहिलं प्रेमपत्र (चिठ्ठी) २२ फेब्रुवारी १९९४ रोजी प्राप्त झालं.लगेच दोघांची भेट घडून आली.सूर्या हा किरणच्या घराच्या दिशेने निघाला होता.सानिया सह किरण सुद्धा त्याच रस्त्याने सूर्याच्या घराकडे येत होती.दोघांचीही रस्त्याच्या मधोमध म्हणजे गजाननच्या घराजवळ भेट झाली आणि तिथेच तिनं पहिलं प्रेमपत्र (चिठ्ठी) सूर्याच्या हाती दिलं.त्यावेळी किरण ही काळ्या रंगाचं स्कर्ट आणि आकाशी रंगाचं ब्लाऊज (टॉप) त्यावर लहान लहान चांदण्या असा ड्रेस परिधान केला होता.किरण कडून प्राप्त झालेलं पहिलं प्रेमपत्र (जसेच्या तसे) हे पुढीलप्रमाणे आहे.👍
----------------------------------------
*Date 17-2-94*
*अखंड प्रिती ज्योत*
----------------------------------------
प्रिय मित्र कुमार यांना माझा नमस्कार वि वि चिठ्ठी लिहिण्याचे कारण की मी बरेच दिवसापासून तुम्हाला चिठ्ठीचे उत्तर दिले नाही परंतु आता देणार आहे तुमची चिट्ठी मला मिळाली वाचून फार आनंद झाला तुम्ही म्हटलं होते की त्याच्यासोबत आहे ती सर्व गोष्ट सर्व खोटी आहे मी त्याच्यासोबत बोलत सुद्धा नाही तुमच्या सोबत खरं प्रेम करत आहे आपली ही गोष्ट चौघाशिवाय कोणाला माहित नसावी मास्तरला ही गोष्ट कोणी सांगितली हे तुम्ही मला स्पष्ट का सांगत नाही.तुम्ही मला अगोदर सांगितलं होतं काय की मी तुझ्यासोबत प्रेम करणार म्हणून तुम्ही चिठ्ठी मध्ये लिहिले होते की मी गोंधळात पडलो म्हणून तुम्ही कशाच्या गोंधळामध्ये पडले हे मला स्पष्टपणे सांगणे बरं का मी तुम्हाला चिठ्ठीचे उत्तर दिले नाहीत तुम्हाला माझा किती राग आला तुम्ही माझ्यासोबत पंधरा दिवस बोलले नव्हते आणि तुम्ही चिठ्ठीनुसार तर वागले पण नाही की तू मला दिसली नाही तर करमत नाही खरोखरच तुम्ही पोटामधून म्हणत होते की होटामधूनच म्हणत होते बरं तुम्ही मला सोमवारी काय होईल ते बघजो तर तुम्ही मला कशावरून असं म्हटलं म्हणजे तुम्ही मला त्या दिवशी किती उद्धटपणाने बोलले हे मला तर इतक वाईट वाटलं होतं की बस.बरं तुम्ही मला म्हणत होते की बस बरं तुम्ही मला म्हणत होते कि माझं तुझ्यावर प्रेम करण्याची पहिलीच वेळ आहे असं तुम्ही मला सांगितलं परंतु मला वाटतं की ही तुमची पहिलीच वेळ आहे म्हणून परंतु माझी आहे पहिलीच वेळ प्रेम करण्याची म्हणून तर मी तुम्हाला लवकर चिट्टीचे उत्तर दिले नाही कारण मला समजतच नव्हतं कि कशी चिठ्ठी लिहायची म्हणून. परंतु हे मला सगळं तुमच्यावरून समजलं की अशी चिठ्ठी लिहायची म्हणून कारण याचा मला अनुभवच नव्हता मला असं वाटत नव्हत कि माझ्यावर अशी चिठ्ठी लिहायची वेळ येईल म्हणून परंतु काय जाणे ती वेळ माझ्यावर येऊनच ठेपली.बरे असो चिठ्ठी लिहायची कशी काय कशी हे मला मुळीच समजत नव्हतं तुम्ही किनई मला कोणासोबत बोलताना दिसले कि मला वाटते तुम्ही असे सगळ्याच जवळ सांगता काय कि हि माझ्या सोबत आहे म्हणून मला चिठ्ठी लिहिण्याची भितीच वाटायची परंतू मला माझ्या मैत्रिणीने साथ दिली कि काहीच होत नाही असे तीने मला म्हटले म्हणून मी तुम्हाला चिठ्ठी देण्याकरिता लिहायला बसली नाहीतर तुम्ही मला कितीही म्हटलं असतं परंतु मि तुम्हाला लिहू शकली नसती मला वाटलं कि आता जर लिहिली नाही तर नक्कीच आपल्या सोबत बोलणार नाही बरं मि तुम्हाला चिठ्ठीचे उत्तर दिले नाही तर तुम्ही कोणताही शाक पकडला असेल परंतु मला समजतच नव्हतं बर आता जर चिठ्ठीचे उत्तर द्यायला वेळ झालाना तर असं रागावयाच नाही बरं का उत्तर द्यायला वेळ होतच असते इतकं रागावल्याने नसते होत कारण मुलीच्या जातीला पुष्कळ काम असतात परंतु तुम्हाला असते आमच्याइतकेच काम तुम्हाला असते काय बरं ही चिठ्ठी लिहितो खरी परंतु कोणाला दाखववायची नाही तर तुम्ही ही चिठ्ठी सगळ्याना दाखवली तर माझी गावामध्ये बदनामी होईल हे तर तुम्हाला समजते म्हणा परंतु नाही कोणत्या वेळेस लक्ष राहत म्हणून मि तुम्हाला सांगतो आहे बरे असो चूक भूल झाली असेल तर क्षमा करणे कारण माझी पहिलीच वेळ आहे चुका तर पुष्कळ आहे तरी पण राग मानू नये.
तुझीच फक्त
किरण
याच चिठ्ठी सोबतच पुढील चिठ्ठी होती म्हणून तिचा समावेश पहिल्याच प्रेमपत्रात केला आहे.
सुनील बा माझ्या घरासमोरून इतक्या चकरा मारते की बस आणि त्यांच्यासोबत दोन मुलं सुद्धा राहतात पण ते सुद्धा माझ्याच क्लासमधले मला असं वाटते की सुनीलने त्याच्यापाशी असं नाही सांगितले पाहिजे की हि ------सोबत आहे म्हणून मला याची खूपच भीती वाटते मूल म्हणजे इतके कुचिन राहतात की बस बरं तुम्ही सुनीलला सांगजा कि अशी तिच्या विषयी आणि माझ्या विषयी अशी गोष्ट कोणासमोर करायची नाही म्हणून असं त्याला स्पष्टपणे बजावून सांगायचं असं लिहिलं म्हणून रागवायचं नाही कारण मला तर खूपच भीती वाटते कारण कोणाला जर असं माहित झालं कि कोणीही म्हणायचं की पहायला तर खूपच गरीब वाटतंय आणि अशी आहे म्हणून मी याच्यामध्ये लिहीत आहे तुम्ही मला तिच्यासमोर चिठ्ठी दिली ना तर ती काय मला म्हणाली कि चिट्ठी कशाची आहे तर दाखव मी तिला म्हटले की हि चिठ्ठी दाखवायची नाही तर ती मला म्हणाली की मला माहिती हायना कि कशाची आहे म्हणून मग मी तिला म्हटले कशाची आहे म्हणून तुला माझं काय माहिती आहे
तर ती माझ्यासोबत मग बोललीच नाहीं म्हणून तर मी दोन वाजता आली मला किनई तुम्ही चिठ्ठी द्यायची असेल ना तर कोणासमोर द्यायची नाही कारण तिच्यावरूनच समजून घ्याना तुम्हाला काही माहीत नाही ती कशी आहे म्हणून तर ती मला माहिती आहे कशी आहे म्हणून तर इतकी ती बदमाश आहे कि बस बातच इथली तिथं आणि तिथली इथं चुगल्या सांगते पण तुम्हाला वाटत असेल की हिची पेटन मैत्रीण आहे म्हणून पण काही नाही कसेतरी दिवस काढा लागते तर अशी चूक तुम्ही कधीच करू नका मला असं समजलं की तुमची तब्येत एकदमच खराब झाली म्हणून तर तुम्ही माझी इतकी काहीच काळजी घेतली नाही करायची नाही तर तुम्हाला असं वाटत असेल कि मि हिला तिन चिठ्ठ्या दिल्या पण उत्तर दिले नाही याचा तर तुम्ही शाक पकडला असेल तर असा शाक नाही पकडायचा काहीच काळजी करायची नाही मी तुम्हाला कधीच विसरणार नाही तुम्हाला वाटत असेल कि मला विसरेल म्हणून परंतु मी तुम्हाला कधीच विसरणार नाही बरे असो माझं मन होतं की तुमच्या भेटीला याव बा म्हणून परंतु मला असं वाटलं की यांच्या पुऱ्यातल्या मुली मुल म्हणेल की ही कशाला नेहमी नेहमी येते म्हणून मी तुमच्या भेटीला आलीच नाही तर यात शंका वाटून घेऊ नये बरे असो मला तुमची इतकी आठवण येते कि बस तुम्ही जर मला एक दिवस दिसले नाही की मला करमतच नाही मला तुम्ही दोन दिवस दिसले नाही तर मला करमलच नाही मग मला असं समजलं की तब्येत बरोबर नाही म्हणून मला तर इतकं वाईट वाटलं की बस मला असं समजलं तर मी त्या दिवशी जेवण सुद्धा केले नाही बर दवाखान्यामध्ये जाणे चांगली तब्येतीची सोय करा कारण आता परीक्षा जवळ आली आहे चांगल्या डॉक्टराकडे जायचे आणि चांगली तपासणी करून चांगलं औषध घ्यायचं तब्येतीकडे दुर्लक्ष करायचं नाही बरं माझ्या म्हणण्यानुसार वागायचं बरं का बरे असो तुम्ही मला जशी पहिली चिठ्ठी दिली होती तशीच द्यायची अशी कधीच करू नये मी तुमच्या चिठ्ठीचे उत्तर लिहितो परंतु मला तुम्ही एकटे दिसता परंतु माझ्यासोबत त्या राहतात ना म्हणून मी तुम्हाला म्हटले की तुम्हाला लाळू खायला बोलावते म्हणून तर ते मी चिट्ठी घेण्याकरिता असे म्हटले बरे असो चिट्ठी जवळ ठेवायची नाही आणि कोणाला दाखवायची नाही तर जाळून टाकायची
# तुमचीच फक्त
किरण
----------------------------------------
या चिठ्ठीच्या उभ्या-आडव्या बाजूला पुढील मजकूर होता......
१)तुम्ही मला चिठ्ठीमध्ये पाठविले की कशाचं बर्डन असेल म्हणून उत्तर देत नाही परंतु मला कशाचच बर्डन नाही तुम्ही गावाला गेले होते म्हणून मि तुम्हाला चिठ्ठी देऊ शकली नाही
कारण ही चिठ्ठी माझ्याजवळ नसते तर ही चिठ्ठी राहते म्हणजे समजून जा कि कोणापाशी राहते म्हणून
२) तुम्ही मला तिच्यासमोर म्हणत होते की उत्तर नाही दिल म्हणून तुम्हाला तर माहित आहे कि आजकालच्या मुली लवकरच करंट पकडतात म्हणून तुम्ही एवढे शिकून राहले परंतु तुम्हाला अक्कल कमी आहे.कशी कमी तर तुम्ही तिच्या समोर चिठ्ठी दिली म्हणून राग नको यायला हं तुम्ही मला इतकी कारागिरीची चिठ्ठी लिहिली तशी मला लिहिता येत नाही मि एकातच खिचडी केली
३)तुम्ही मला परवाच्या दिवशी चिठ्ठी दिली परंतु ती अशी दिली मैत्रीण समोर तर मला म्हणत होती की तुला काय दिले मला दाखव मी तिला म्हटले कि काहीच नाही तर सगळ्यापाशी सांगितले तर मला खुबच वाईट वाटलं बर आता तुम्हाला द्यायची असेल ना तर एकटीला पाहून द्यायची आता अशी चूक करायची नाही हं.
४)शून्यातून शून्य गेले राहिले शून्य असे मला मित्र मिळाले हेच माझे पुण्य.चिठ्ठीचे उत्तर लवकरात लवकर देणे बरे असो मी तुम्हाला म्हटले होते की तुम्हाला लाळू खायला बोलावते म्हणून त्याच दिवशी चिठ्ठी घ्यायला बोलावले तर तुम्हाला काही समजलंच नाही
५) शिरोमणी शिरोमणी आठवण येते क्षणोक्षणी जसे गंगेचे निर्मळ पाणी तशी तुमची गोडवाणी पंख नाही दिले देवांनी तरी समाचार कळवितो चिठ्ठिनी.
---------------------------------------------
Comments
Post a Comment