*भाग-चार*
कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर किरण कडून पहिलं प्रेमपत्र (चिठ्ठी) प्राप्त झालं अनं सूर्या कधी नव्हे इतका आनंदी झाला.जणू सर्व काही सुख त्याच्या पदरी पडलं,नव्हे सर्व जग आपल्या मुठीत आलं असंच काहीसं त्याला वाटू लागलं.अखेर त्याचे प्रयत्न फळाला आले.काही दिवसातच सूर्या आणि किरण या दोघांची प्रत्यक्ष भेट घडून आली.तदनंतरही भेटीगाठी होत राहिल्या.विचारांची देवाण-घेवाण सुरू झाली.काही गोष्टी प्रत्यक्ष भेटीतही सविस्तरपणे व्यक्त करता येत नव्हत्या.म्हणून त्याने त्याच्या मनातील किरण विषयी असलेली प्रचंड आस्था,प्रेम,जिव्हाळा अनं उदात्त भावना प्रेमपत्राद्वारे (चिठ्ठी)व्यक्त केले.म्हणून किरण त्यांचे पत्र वाचून नेहमी म्हणायची की, "तुमचे प्रेमपत्र (चिठ्ठी) वाचून इतका आनंद वाटतो की,ते पत्र एक वेळा वाचून माझं काही समाधान होत नाही.म्हणून मला ते प्रेमपत्र ( चिठ्ठी) दोन-तीन वेळा वाचून काढावं लागतं." "मला नेहमीच असं वाटतय की,तुमचं पत्र हे कायमस्वरुपी संग्रही ठेवावं.अनेकदा किरण सूर्याला म्हणायची की,तुम्ही खरोखर पत्राप्रमाणे वागणार का? मला तर तुमची भीती वाटते हो की,तुम्ही मला विसरणार तर नाही ना !!!
प्रेमाला हिरवी झेंडी मिळाली आणि तदनंतर पत्र व्यवहार केल्यानंतर दोघांच्या भेटीगाठी होत राहिल्या. विचाराची देवाण-घेवाण होत राहिली.परंतु किरणने चिट्ठीचं उत्तर न पाठविल्याने सूर्या काहीसा हिरमुसला.स्वतःच्या समाधानासाठी तिच्या पत्राची (चिठ्ठी) वाट पाहू लागला.पण पत्र (चिठ्ठी) काही केल्या येईना.म्हणून सूर्यानं तिचेशी तब्बल पंधरा दिवस अबोला धरला.तिला टाळू लागला.स्वतःच्या अशा वागण्यानं त्यालाही त्रास व्हायला लागला.कारण किरणचा चेहरा बघितल्याशिवाय त्याचं काही समाधान होत नव्हतं.कसल्याही कामात मन रमत नव्हतं.कदाचित त्यावेळी तिलाही अशी जाणीव झाली असावी की,जर आपण चिठ्ठीचं उत्तर दिलं नाही तर कदाचित सूर्या आपल्याशी नेहमीसाठी तर अबोला धरणार नाही ना ! त्याचं असं वागणं किरणला अजिबात पटलं नाही.त्याच्या अशा वागण्यानं किरणलाही त्रास व्हायला लागला.सूर्या आपल्या सोबत असा का वागतोय? आपल्या सोबत बोलणं का टाळतोय? तिला याबाबतचं कोडं काही उलगडत नव्हतं.त्यामुळे ती व्याकूळ व्हायला लागली. दुसरीकडे जोपर्यंत किरण कडून चिठ्ठीचं उत्तर मिळणार नाही तोपर्यंत बोलायचं नाही असं त्यानंही ठरवून घेतलं होतं.कालांतराने ही बाब किरणच्या लक्षात यायला लागली असावी. दोघांच्याही मनात असलेली घालमेल सुरू असताना किरणने अखेर सूर्याला चिठ्ठीचे उत्तर पाठविले.नव्हे ! तिने उत्तर लिहून संधी मिळाली तेव्हा ती चिठ्ठी त्याच्या हातात दिली.तिनं दिलेल्या चिट्ठीच्या उत्तरानं तो सुखावला.दोघात असलेला अबोला दूर झाला.पुन्हा दोघांमध्ये संवाद व्हायला लागला.भेटीगाठी व्हायला लागल्यात.चिठ्ठी देण्यापूर्वी दोघांचीही नेहमीप्रमाणे सकाळी साडेदहा वाजता शाळेला जाण्याच्या वेळी चंद्रभागा नदी जवळ भेट झाली.तेव्हाच किरणनं चिठ्ठीच्या उत्तराची कल्पना दिली होती.त्याचवेळी तालुक्याच्या ठिकाणावरून तिनं स्वतःचे काढलेले पासपोर्ट व अन्य फोटो आणण्याचे सूर्याला सांगितले.अनेक दिवस दोघात अबोला असल्यानं त्याला तिचे फोटो तिच्याकडे काही देता आले
नाही.तिचे पासपोर्ट व अन्य फोटो २२ फेब्रुवारी १९९४ रोजी तिच्याकडे सुपूर्द केले.त्यापैकी एक दोन फोटो त्यानं आठवणीसाठी स्वतःकडे ठेवलेत.तशी कल्पना किरणला सुद्धा दिली.त्याच्या कडे तिचे फोटो ठेवण्यास तिचीही काही हरकत नव्हती.सूर्याने स्वतःकडे ठेवलेला तिचा पासपोर्ट फोटो कायम जपत आहे.
त्याच दरम्यान सूर्या एकाएकी आजारी पडला. आजारपणामध्ये तो आरामासाठी घरी राहू लागला.ही बाब किरणला काही दिवसांनी समजली.म्हणून सूर्याच्या भेटीविना तिच्याकडून काही राहावयाला जात नव्हतं. भेटीसाठी तिची तगमग व्हायला लागली.सूर्याला बघितल्याशिवाय तिचंही काही समाधान होत नव्हतं.मनोमन इच्छा असतानाही अनेकविध बंधनामुळे तिला भेटीला येता येत नव्हतं.सूर्याच्या भेटीला येणं म्हणजे तिच्यासाठी एक प्रकारे अवजड जागेवरचं दुखणं होतं.कारण दोघांचीही घरे दोन टोकावरची.त्यातच मुलगी म्हणून किरणलाही काही सामाजिक मर्यादा/ बंधने होती.म्हणून तिला सूर्याच्या भेटीला येणं अवघड होऊन बसलं होतं.शेवटी २५ फेब्रुवारी १९९४ रोजी फार मोठं धाडस करून तिच्या प्रवीण मामाच्या मुलीला (छोटी मुलगी) सोबत घेऊन ती सूर्याच्या भेटीला आली.भेटी दरम्यान ती सूर्याच्या आजारपणाची चौकशी करू लागली.चांगल्या डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देऊ लागली.धीरही द्यायला लागली.खरं प्रेम अनं तितकाच जिव्हाळा काय असतोय हे आता कळायला लागलं.तिच्या वागण्यानं/व्यवहारानं सुर्या अधिक भावूक झाला.शिवाय तिच्या मनात आपल्या विषयी किती प्रचंड प्रेम आहे याची त्याला जाणीव झाली.तत्पूर्वी किरण कडून प्रेमपत्राचं (चिठ्ठी) उत्तर मिळालं नाही म्हणून आपण कसं उद्धटपणानं वागलो याची त्याला स्वतःचीच स्वतःला लाज वाटायला लागली.किरण आपल्याला किती जीवापाड जपतेय याची अनुभूती यानिमित्ताने आली.त्यावेळी तिच्या बोलण्यात/वागण्यात असलेला प्रचंड आत्मविश्वास त्याच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही.आता यापुढे तिला कधी दुखवायचं नाही तर कायम स्वतःही पेक्षा अधिक जपायचं हा "पण" सूर्यानं घेतला.आजारपणाच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने तिच्या अंतरंगात शिरता आलं.म्हणून आजारपणातच नव्हेतर ती कायम आपल्या आयुष्यात असावी असं सूर्याला मनोमन वाटायला लागलं.वेळेचे भान राखून तिनं जड अंतकरणानं निरोप घेतला.एवढं मात्र खरं की,किरण आपल्यावर "जिवापाड प्रेम करतेय" ही जाणीव त्याच्या मनात कायमसाठी घर करून गेली !!
लवकरच सूर्या आजारातून बरा झाला.नित्यक्रमानं दोघांच्या भेटीगाठी व्हायला लागल्यात.आता दोघांनाही एकमेकांशिवाय राहवल्या जात नव्हतं.म्हणून सूर्या तिच्या भेटीसाठी बरेचदा तिच्या घराच्या आसपास जायला लागला.कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष दूरवरून नजरभेटी व्हायला लागल्यात.कधी किरण तिच्या मर्यादा सांभाळून जमेल त्यावेळी सूर्याच्या घराकडे येऊ लागली. दोघांनाही; नाही भेट तर निदान नजरभेटीविना राहवल्या जात नव्हतं.एकमेकाचा चेहरा दिसल्याशिवाय समाधान मिळतं नव्हतं.म्हणून दोघेही संधी मिळेल तेव्हा तेव्हा एकमेकांना भेटू लागलेत.त्यासाठी प्रयत्न करू लागलेत.त्याच दरम्यान दोघांच्याही परीक्षा अर्थात किरणची इयत्ता दहावीची परीक्षा तर सूर्याची पदवीच्या प्रथम वर्षांची परीक्षा अगदी तोंडावर येऊन ठेपल्या होत्या.परीक्षेचा कालखंड लक्षात घेता दोघेही अभ्यासात रमलेत.पण मन मात्र एकमेकांतच गुंतले होते.म्हणून ते संधी साधून एकमेकांना भेटण्याचा प्रयत्न करू लागलेत.संधी मिळेल तेव्हा कधी कधी किरण तिच्या मामेबहिण किंवा अन्य सहकारी सोबत घेऊन सूर्याच्या घराकडे येत असे.सूर्याही तिच्या घराच्या आसपास जात असे.पण सूर्याला प्रत्यक्षात तिचे घरी जाण्याचा कधी योग आला नाही.तशी संधी मिळण्याचं काही एक कारण नव्हतं.सूर्याची धाकटी बहीण आरती आणि किरण वर्गमैत्रीण असल्याने आरतीच्या भेटीच्या निमित्ताने किरणचं सूर्याकडे येणं-जाणं असे.सूर्या सुद्धा किरणच्या घराकडे बरेचदा जात असे.परंतु दोघात भेटगाठ होणं तसं अवघडच होतं.किरणची दूरवरून नजरभेट होत असे.कारण तिचं घर फारच अडचणीच्या ठिकाणी असल्याने तिच्या घराशेजारी जाणं तसं अवघडच असे.म्हणून सूर्या दूरवरून तिची नजरभेट घेण्याचा प्रयत्न करीत असे.काही एक कारण नसताना वारंवार तिच्या घराकडून ये-जा करणं म्हणजे लोकांना शंकेला आमंत्रण देण्यासारख होतं.हे टाळण्यासाठी सूर्या वारंवार तिच्या घराकडे ये-जा करणं टाळत असे.किरणकडे कुणी शंकेने बघू नये किंवा तिच्या चारित्र्यावर कुणी गालबोट लावू नये हाच त्यामागचा हेतू असे.तसे दोघेही बदनामीसाठी फारच घाबरत असे.हे सर्व टाळण्यासाठी सूर्याची इच्छा असतानाही त्याला वारंवार किरणच्या घराकडे ये-जा करणे शक्य होत नसे.म्हणून दोघेही प्रत्यक्ष भेटी दरम्यान एकमेकांना सांगत असे की,जिथे जिथे शंका येईल अशा गर्दीच्या ठिकाणी एकमेका सोबत बोलायचं नाही किंवा एकमेकाकडे फारसं बघायचं सुद्धा नाही असं ठरवून घेतलं होतं.हा नियम दोघांनीही अखेरपर्यंत पाळला.पण प्रेम हे आंधळं असतं.त्यात प्रेमी युगुल कधी जगाची पर्वा करित नसते.ते आपल्याच धुंदीत वावरत असते.मग सुर्या-कीरण त्यास कसे काय अपवाद ठरणार !!! दोघांनाही एकमेकाशिवाय राहणं शक्य नव्हतं.दोघेही प्रेममग्न झाले होते.एकमेकांच्या भेटीसाठी तारेवरची कसरत करून भेटल्याशिवाय राहत नव्हते.
स्वभाव गुणाबाबत दोघांचीही प्रतिमा ही सर्व गावभर सारखीच होती.दोघांचाही स्वभाव तसा साधा- सिंपल,लाजरा-बूजरा अनं कधीही कोणत्या फालतू भानगडीत न पडणारे म्हणून सर्व गावभर सर्वश्रुत आहे.ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आहे असं कुणीच म्हणणार नाही वा कुणी शंका घेणार नाही वा अशा चर्चेवर कधी कुणाचा विश्वास बसणार नाही.म्हणून ते दोघेही एकमेकाची प्रतिमा जपत असे.कुणालाही शंका/संशय येणार नाही अशीच त्यांची वागणूक राहत असे.त्यात किरण ही मुलीची जात शिवाय आई वडिलांची एकुलती एक लाडाची लेक असल्याने सूर्या स्वतःपेक्षा तिला अधिक जपत असे.काळजी घेत असे.कारण तिच्या आई-वडिलांची इभ्रत अनं सर्वकाही आशा आकांक्षा ह्या तिच्यावरच अवलंबून होत्या.ती तिच्या आई-वडिलांसाठी सर्वस्व आहे याची जाणीव सूर्याला होती.तिला कधी गालबोट लागणार नाही.तिच्या चारित्र्यावर कुणी बोट ठेवणार नाही याची पुरेपूर काळजी घेत असे.तिच्या मनाविरुद्ध किंवा तिच्या मनाला ठेच पोहोचेल अशाप्रकारे तो कधीही वागत नसे.त्यातच त्यांचे जीवापाड प्रेम असले तरी ते कधी विवाह बंधनात अडकणार असे अद्याप पर्यंत तरी त्यांनी विचार केला नव्हता /ठरविलं नव्हतं.पण सूर्यानं तिला केव्हाचेच कायम आपलं सर्वस्व मानलं होतं.म्हणून ते कधी विवाह बंधनात अडकणार नाही असंही काही नव्हतं !!! यदाकदाचित किरण ही सूर्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी सामाजिक रितीरिवाजानुसार विवाहबद्ध झाली तर सूर्याचं जिवापाड असलेलं प्रेम हे तिच्यासाठी कायम आदर्शवत राहील.यासाठी तो सदैव प्रयत्नाची पराकाष्टा करीत असे.भविष्यात सूर्याचं प्रेम तिच्या कायम स्मरणात राहील यासाठी तो कसलीच कसर सोडत नसे.
कुणी शंका घेणार नाही किंवा कुणाला बदनामी साठी संधी मिळणार नाही यासाठी दोघांनी पुरेपूर काळजी घेतली.काळजी घेत असे.पण प्रेम हे कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी लपून लपत नसते हे ही तितकचं सत्य आहे.कधी ना कधी अशा प्रेमप्रकरणाची लोकांना चुणूक लागतेच.दोघाही कडून आटोकाट प्रयत्न करूनही त्यांच्याही प्रेमप्रकरणाची चर्चा व्हायला लागली.किरणच्या वर्गातील मुला- मुलीत कुजबूज सुरू झाली.तिच्याकडे तिच्या वर्गातील तसेच अन्य मुलं-मुली शंकेनं बघू लागलीत.तसे व्यवहार करू लागलेत.इतकेच नव्हे तर कालांतराने सूर्याची धाकटी बहीण आरतीलाही हे प्रेमप्रकरण लक्षात आलं.आता या प्रेमप्रकरणाची झळ किरणला अधिक पोहचू लागली.वारंवार किरण आपल्या घरी का येतय ह्याचं रहस्य आरतीला उमगायला लागलं.किरण माझ्या भेटीसाठी नव्हे तर दादाच्या भेटीसाठी येतय अशी ती समजून चुकली.त्यावेळी तिलाही आश्चर्याचा धक्का बसला.सूर्या आणि किरण असे एकमेकांच्या प्रेमात पडू शकते यावर तिचाही विश्वास बसत नव्हता.या प्रेमप्रकरणाचे आरतीला वाईट तर वाटलेच शिवाय वेदनाही व्हायला लागल्यात.खरं म्हणजे आपल्या भावाचं असं वागणं आरतीला अजिबात पटलं नाही/रुचलं नाही.म्हणून ती भावापासून चार हात दूर राहायला लागली.शिवाय त्याच्यासोबत अबोलाही धरला.या संपूर्ण प्रेम प्रकरणाचा राग ती किरणवर काढायला लागली.किरणला नको ती बोलू लागली.तिरस्कार करू लागली.बरेचदा किरणला अपमानीत करू लागली.किरणला हे सर्व काही सहन होत नव्हतं पण नाईलाजाने ती सहन करू लागली.इतकं सर्व घडत असतानाही किरणने सूर्याकडे आरतीची अशी तक्रार कधीच लावून धरली नाही.राग,द्वेष अपमान स्वतःच पचवू लागली.त्यातच तिच्या वर्गातील मुला-मुलींकडून सूर्याच्या नावाने तिला चिडविने त्यात अधिक भर घालू लागली.मूलं-मुली तिला चिडविण्याची कुठलीही संधी सोडत नव्हते.सोबतच त्यांच्या प्रेमाची तिच्या शिक्षकाना आलेली कल्पना अधिक त्रासदायी ठरू लागली.परिणामतः किरणला शाळेला जाणं आणि मुला मुलीत मिसळण अधिक अवघड ठरू लागलं.अशावेळी किरणची काय मनस्थिती असेल याची कल्पना न केलेली बरी !!!
या सर्व प्रेमप्रकरणाच्या जाणिवेने आरतीच्या रागाला सीमा उरली नव्हती.मोठा भाऊ असूनही ती सूर्याकडे ढुंकूनही बघत नव्हती.कारण आरतीसाठी तिचा मोठा भाऊ हा खरा आदर्श आहे.आपला मोठा भाऊ असा काही करू शकतो किंवा वागू शकतो यावर तिचा अजिबात विश्वास बसत नव्हता.या सर्व प्रेम प्रकरणासाठी ती भाऊ सूर्यापेक्षा किरणला अधिक कारणीभूत ठरवू लागली.त्यातच ती अंतर्मनातून पूर्णपणे घाबरली.खचली.आपल्या भावाचे कमी- जास्त तर होणार नाही ना याची भीती/ चिंता तिला अधिक अस्वस्थ करीत असे.कारण किरण ही आई-वडिलांची एकुलती एक लाडाची लेक.त्यातच किरणच्या वडिलांचा तामसी स्वभाव तसेच ती आपल्यापेक्षा वेगळ्या जातीची.अशा स्थितीत किरण कडील नातेवाईक/स्वजातीचे लोक हे सर्व सहन करतील का? ही चिंता तिला अधिक अस्वस्थ करीत असे.कदाचित किरण कडील लोकांना या प्रेमप्रकरणाची भनक लागली तर ते लोक दादांना सोडणार नाही/मारझोड केल्याशिवाय राहणार नाही.शिवाय दादांनी गावात जो विश्वास कमविला आहे तो सुद्धा क्षणात धुळीत मिसळून जाईल. हेच आरतीच्या काळजीचं आणि वागण्यचं खरं कारण होतं.म्हणून सूर्याकिरणचं प्रेमप्रकरण तिच्या पचनी पडत नव्हतं.या प्रेमप्रकरणातून दोघांनीही कायमचं बाहेर पडावं असचं तिला मनोमन वाटत असे.यासाठी आरतीची सगळी धावपळ होती.आरती ही सूर्या सोबत प्रत्यक्षात बोलली नसली तरी तिच्या नजरेतील भाव आणि तिचं वागणं सूर्याच्या नजरेतून सुटलं नाही.आरती आणि किरण या दोघी वर्गमैत्रीण असल्याने आरतीने आपल्या रागाची सर्व भडास ही किरणवर काढली.किरण ही सूर्याच्या आयुष्यातून कायमची जावी हाच त्यामागे भावाच्या प्रेमापोटी हेतू होता.याबाबतीत आरती ही सूर्यासमोर कधी व्यक्त झाली नाही तर हे सर्व तिनं किरण समोर व्यक्त केलं.आरतीनं हे सर्व भावाप्रती असलेला प्रचंड आदर आणि प्रेम आणि किरण कडील लोकांच्या/नातेवाईकांच्या भीतीपोटी केलं होतं.आरतीचा यामागील उद्देश जरी प्रामाणिक असला तरी किरण मात्र पूर्णपणे दुखावली.खचली.एकाकी पडली.कारण तिच्यावर तर पूर्णपणे आभाळ कोसळलं होतं.कालांतराने ही बाब सूर्याच्या कानावर आली.या सर्व प्रकरणांने सूर्या दुःखी झाला अनं विचारात पडला.तो दोघीनाही दुखवू शकत नव्हता.बहिणी बरोबर किरणही त्याच्या साठी तितकीच आवश्यक आहे.म्हणून तो पुन्हा दुविधेत अडकला. कुणाची समजूत काढावी हे सूर्याला काही सुचत नव्हतं.दोघींच्याही भावना दुखावणार नाही/दोघीही दूर जाणार नाही यासाठी तो प्रयत्न करू लागला.किरण सोबत याबाबतीत काहीही बोलणं झालं नव्हतं.आरती मात्र काहीही एक समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. "किरण नकोच" ही तिची भूमिका होती.अखेर सूर्यानं धाकट्याबहिणी समोर हार पत्करली,बहिणीची समजूत काढली आणि यापुढे किरण सोबत कुठलेही संबंध ठेवणार नाही वा बोलणार नाही असा शब्द दिला.शिवाय मोठाभाऊ असूनही धाकट्या बहिणीची माफी मागितली.अखेर मोठा असूनही लहान बहिणीच्या प्रेमापोटी त्याने तिचे समोर गुडघे टेकविले.असे असले तरी सूर्या हा किरण शिवाय जगूच शकत नाही,राहूच शकत नाही हेही तितकेच सूर्यप्रकाशाइतके सत्य.पण आरतीची समजूत कोण काढणार? सूर्याच्या अशा वागण्याच्या बाबतीत किरण पूर्णतः अनभिज्ञ होती.आरतीला शब्द दिला तरी किरणविना राहणं सूर्याला असहय्य होऊन बसलं होतं.किरण शिवाय त्याचं कशातच मन रमत नव्हतं.आता किरण प्रमाणे सूर्याही पूर्णतः खचला असला तरी तो त्याच्या वेदना कुणाला सांगू शकत नव्हता.आरतीची नजर चुकवून तो किरणला भेटण्याचा प्रयत्न करू लागला.सूर्या असा का वागतोय याबाबतीत किरणला सुद्धा काही कळत नव्हतं.सूर्या सुद्धा त्याच्या अशा वागण्याचं कारण एकाएकी किरणला सांगू शकत नव्हता.कदाचित त्यावेळी सूर्या असा का वागतोय,मला का टाळतोय याबाबतीत तिचा पण गैरसमज झाला असावा आणि वाईट पण वाटत असावं पण सूर्या याविषयी किरण सोबत कधी बोलला नाही वा बोलण्याची तशी संधी मिळाली नाही.कालांतराने सूर्याच्या अशा वागण्याने किरण सुद्धा दूर दूर राहण्याचा प्रयत्न करू लागली.कारण आरतीनं सुनावलं.शाळेत शिक्षकांना कळलं.वर्गातील मुला-मुलींनाही कळलं.इतकेच नव्हे तर मूल-मुली सुद्धा किरणला सूर्याच्या नावाने चिडवू लागले.वर्गातील मुलं-मुली तिच्यापासून दुर अंतर ठेवू लागले.ती एकाकी पडू लागली.अगदी बालवयातच तिच्यावर असं संकट उभं राहिलं.कालांतराने या सर्व बाबीची सूर्याला जाणीव करून देण्यास ती विसरली नाही.सुर्याही हतबल होता.अशाही परिस्थितीत ते एकमेकांना भेटण्यास कधी विसरत नव्हते.दोघाही साठी हा काळ तसा जिकिरीचा ठरला !.
काही दिवसातच किरणच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला प्रारंभ होणार होता.त्या दृष्टीने सूर्या किरणला परीक्षेविषयी अवगत करू लागला.परीक्षा होईस्तोवर किरणच्या सहवासात राहायला मिळेल या कल्पनेनं तो अतिशय आनंदी/उत्साही होता.त्यावेळी परीक्षेच्या
दरम्यान मानसिक आधार/पाठबळ म्हणून कुणीतरी हक्काच सोबत असाव असं प्रत्येक परीक्षार्थींना अपेक्षित असे.तसे किरणलाही वाटणं स्वाभाविक होतं.सूर्याही तितक्याच तळमळतेनं किरणसाठी परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी पहिलेच उत्सुक/उत्साही होता.त्याला तर त्यानिमित्ताने काही दिवस तिच्या संपर्कात/सहवासात राहण्यासाठी सुवर्ण संधी चालून आलेली होती.म्हणून तो ही संधी न दवडता परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी तत्पर होता आणि तो अपेक्षेप्रमाणे नियमितपणे परीक्षा केंद्रावर जाऊ लागला.परंतु परीक्षा केंद्रावर सूर्याची चांगली पंचाईत व्हायला लागली.कारण त्याचवेळी त्याची धाकटी बहीण आरती ही सुद्धा त्याच परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी होती.सूर्यानं आरतीला यापूर्वीच शब्द दिला होता की, किरणशी यापुढे कधी बोलणार नाही,कसलेही संबंध ठेवणार नाही.हे वचन पाळणं त्याच्यासाठी तितकचं आवश्यक असलंतरी किरणपासूनही तो दुर राहू शकत नव्हता आणि ते त्याला शक्य नव्हतं.आता त्याला नाईलाजाने दोन्हीही भूमिका पार पाडल्याशिवाय गत्यंतर नव्हतं.म्हणून तो कोंडीत सापडला.आपण तोंडघशी तर पडणार नाही ना अशी भितीही त्याला वाटायला लागली.त्यातच आपला मोठा भाऊ परीक्षा केंद्रावर येत असल्यानं आरती सुद्धा बिनधास्त होती.दोघीचीही परीक्षा एकाच केंद्रावर असल्यानं दोघींनाही सूर्या आपल्या सोबत असणं अपेक्षित होतं.तसं वाटणं स्वाभाविक होतं.आरती बिनधास्त असली तरी किरण याबाबतीत सूर्यासोबत या विषयावर कधी बोलली नाही किंवा सूर्यानं परीक्षा केंद्रावर यावं (किरणसाठी) यासाठी ती आग्रही राहिली नाही.कदाचित तो येणार आहेच अशी तिला पूर्णपणे खात्री वाटत असावी.बहिण आणि सखी (प्रेयसी) या दोघींचीही मर्जी सांभाळून सूर्या परीक्षा केंद्रावर यायला लागला.हे सर्व त्याला आरतीची नजर चुकवून करावं लागत असे.तो किरण सोबत बोलतो हे त्यानं कधी आरतीच्या लक्षात येऊ दिलं नाही.प्रत्येक पेपरच्या वेळी सूर्या-किरणची भेट घडून येत असे.कधी कधी ते दोघेही एकाच एसटी बसने ये-जा करित असे.आरतीची नजर चुकवून ते एकमेकांशी मनसोक्त बोलत असे.गप्पा-गोष्टी करित असे.म्हणून परीक्षेचा काळ हा सुर्यासाठी सुवर्णकाळ ठरू लागला.त्याच दरम्यान एके दिवशी किरणचा इंग्रजी या विषयाचा पेपर होता.त्या दिवशी त्याच परीक्षा केंद्रावर हेमंतचा पण पेपर (सप्लिमेंट) होता.म्हणून तो सुद्धा परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आला होता.त्यादिवशी परीक्षा केंद्रावर किरणचा परीक्षेचा रोल नंबर हा खोली क्रमांक सहा मध्ये होता.पेपर लागण्यापूर्वी किरण आणि सूर्या हे दोघेही खोली क्रमांक सहाच्या समोर गप्पा-गोष्टी करित उभे होते.किरण परीक्षा खोलीमध्ये आत जाईपर्यंत त्यांच्यात बोलणं सुरू होतं.हेमंत बाजूला उभा आहे याचं दोघांनाही भान नव्हतं.त्या दोघांना एकमेकांसोबत चर्चा करताना बघून हेमंतला तसा आश्चर्याचा धक्का बसला.शिवाय नवलही वाटायला लागलं.त्या दोघांचं असं एकमेकांशी बोलणं हेमंतला चांगलच खटकलं.जिव्हारी लागलं.म्हणून तो त्यांच्याकडे उपहासानं/तिरस्कारानं/द्वेषानं/सूड भावनेनं एकटक बघू लागला.बारकाईनं अवलोकन/निरीक्षण करू लागला.सूर्यकिरणचे त्यांच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं.तसे त्याच्या कारनाम्या बाबतीत किरण हीं अनभिज्ञ असल्याने किरणला त्याच्याकडे लक्ष ठेवणं काही आवश्यक वाटत नव्हतं.सूर्याचा तर त्याने विश्वासघात केला होता.म्हणून तो हेमंत पासून नेहमीसाठी सावध राहत असे.सुर्याकीरण एकमेकांसोबत बोलण्यात अधिक गुंग होते.आजूबाजूला कोण आहे याचंही त्यांना भान नव्हतं.मात्र ते दोघेही हेमंतच्या नजरेतून सुटले नाही.तो प्रसंग बघून हेमंतची तळपायाची आग मस्तकात गेली.त्या दोघांचं एकत्रित येणं हेमंतला अजिबात रुचलं नाही.सूर्याकिरणचं एकत्रित येणं हेमंतला नकोच होतं.त्यासाठी त्यांनं जिवाचं रान केलं होतं.मात्र त्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरलेत.म्हणून त्या दोघांचाही त्याला मनापासून तिरस्कार वाटू लागला.आता हे दोघे कसे वेगळे होतील आणि या दोघांचं प्रेम कसं संपुष्टात येईल यासाठी तो तिथूनच कामी लागला.पुढील दिशा ठरवू लागला.त्यासाठी त्यानं गावातील काही सवंगड्याना हाताशी घेतलं आणि त्यांच्या सहकार्याने पुढील योजना आखू लागला असावा असचं परीक्षा केंद्रावरील त्याच्या हालचाली वरून सूर्याच्या निदर्शनास यायला लागलं होतं.
परीक्षा कालावधी दरम्यानचा एक प्रसंग तर सूर्याला नेहमी आठवण करून देतो.किरणचा कोणता तरी पेपर होता.नेमका कोणत्या विषयाचा पेपर होता हे नक्की आठवत नसले तरी तो प्रसंग मात्र नेहमीच त्याच्या दृष्टिपटालावर येतो.परीक्षेदरम्यान त्याच्या गावाचा जग्गूदादा नावाचा एक मुलगा त्या परीक्षा केंद्रावर किरणची टिंगल टवाळकी (चिडीमारी) करू लागला होता.त्याचं असं वागणं किरणला काही सहन झालं नाही.म्हणून ती कावरी-बावरी झाली.आकांत करू लागली.या प्रसंगाने ती अंतर्मनातून पूर्णतः घाबरली/हादरली.आक्रोश करू लागली.रडायला लागली.जग्गु दादाचं बोलणं तिनं चांगलच मनाला लावून घेतलं होतं.हा सर्व प्रकार बघून तिच्या सभोवताली मुल- मुली गोळा व्हायला लागली.शिक्षकही तिथे आलेत.घडलेला सर्व प्रसंग ती उपस्थितीताना रडत रडत सांगू लागली.हा प्रसंग सर्वांनी हाताळण्याचा प्रयत्न केला.पण प्रकरण काही निस्तारत नव्हतं.ते अधिक विकोपाला जायला लागलं होतं.गर्दी बघून सूर्याही तेथे आला.सूर्या तेथे येताच किरणला डोळ्यातील अश्रू आणि मनातील भाव काही आवरता आला नाही.तेथील चित्र बघून सुर्याही भावूक अनं संतप्त झाला.प्रकरण समजून घेऊ लागला.घडलेला सर्व प्रसंग तिने रडत रडत सूर्याला सांगितला.तिचे म्हणणे ऐकून सूर्यालाही हा सर्व प्रकार काही सहन झाला नाही.म्हणून तो जग्गू दादाची कानउघडणी करू लागला.जग्गु दादाही त्याची बाजू मांडू लागला.पण किरणची तेथील परिस्थिती बघून जग्गुदादाचं म्हणणं कुणाला काही पटत नव्हतं.ते अगदी बरोबरही होतं.पूर्णतः घाबरलेल्या किरणची सर्वचजण समजूत काढू लागलीत.पण ती कुणाचेही काही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.प्रसंग इतका हाताबाहेर जायला लागला की,काही मुलं मुली पोलीस स्टेशनला रिपोर्ट दाखल करण्याची भाषा करू लागले होते.म्हणून उपस्थित शिक्षकांसह सूर्यानेही पुढाकार घेत हे प्रकरण तेथेच थांबविण्याचा प्रयत्न केला.सूर्या हा किरणची समजूत काढू लागला.मनधरणी करू लागला.अखेर ती सूर्याच्या शब्दापलीकडे काही गेली नाही.सूर्याच्या शब्दाला नकार न देता पोलीस स्टेशनला जाण्याचं टाळलं.तिनं स्वतःला सावरलं.एवढं मात्र खरं की,याप्रसंगाने ती पुर्णतः घाबरली होती.म्हणूनच ती पेपर सोडवायला जाण्यासाठी पण तयार नव्हती.प्रसंगच असा घडला की, तिच्या जागी कुणीही असत तरी पेपरला जाण्याचं धाडस केलं नसतं.किरण ही मानसिक दृष्ट्या पूर्णतः खचली होती.तिचा आक्रोश अनं पेपरला न जाण्याचा निर्णय सुर्याला काही आवडला नाही.सूर्या तिला पेपरला जाण्यासाठी मनधरणी/आग्रह करू लागला.शिक्षकासह इतरांनीही मनधरणी केली पण ती काही केल्या कुणाचेही ऐकण्यास तयार नव्हती.अखेर सर्वाचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर सूर्यानं हक्काने/अधिकार वाणीने विनंती वजा कडक शब्दात सुनावून किरणला पेपरला जाण्यासाठी सांगितलं.सूर्याच्या शब्दाला कसलंही प्रतिउत्तर न देता ती पेपर देण्यासाठी अखेर तयार झाली.इतरांचं काही एक न ऐकता केवळ सूर्याच्या एका शब्दाने ती पेपरला जाण्यास तयार झाली याचे उपस्थितीतापेक्षा हेमंतला अधिक आश्चर्य वाटायला लागलं.
ओढवलेल्या बिकट प्रसंगातून ती स्वतःला सावरत सूर्याच्या एका शब्दाखातर परीक्षेला बसण्यासाठी राजी झाली.हा सर्व प्रकार हेमंत निरखून बघत होता.किरण ही सूर्याचे असे काही ऐकून घेईल असं त्याला कधीच वाटलं नाही.कारण सूर्या किरणचं असं हे प्रेमप्रकरण कधी जुळू नये वा भविष्यात ते कधी एकत्रित येऊ नये यासाठी त्यांनं प्रयत्नाची पराकाष्टा केली.परंतु त्याचे सर्व प्रयत्न निष्पळ ठरले.म्हणून तो कावरा-बावरा झाला.तेथूनच तो "त्या" दोघांना पुन्हा अलग करण्यासाठी कामी लागला.बदनाम करण्याचं षड्यंत्र रचू लागला.कारण त्या दोघांना कोणत्याही परिस्थितीत एकत्रित असणं हेमंतला बघवत नव्हतं.त्यासाठी तर त्याचा सर्व काही आटापिटा होता.म्हणून ही मोहीम फत्ते करण्यासाठी त्याने गावातील काही सवंगड्याची फौज तयार केली.(श्याम, विलास,शेखर,रवी गजू प्रदीप इत्यादी) त्याने त्यांच्या मनात सूर्याच्या बाबतीत जबरदस्त अशी विष पेरणी केली.जातीचंही विष कालविलं.म्हणून ही सर्व मंडळी सूर्याच्या विरोधात हेमंतच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीत. त्यादृष्टीने या सर्व मंडळीनी सूर्याकिरणच्या विरोधात पाऊल उचलावयास सुरुवात केली.आता त्याचा त्रास दोघांनाही व्हायला लागला.त्याच दरम्यान सूर्या व त्याचा मित्र समीर किरणच्या भेटीसाठी तिच्या घराच्या आसपास जाऊ लागलेत.कधी प्रेमपत्र देण्यासाठी तर कधी नजर भेटीसाठी जाऊ लागलेत.यासर्व प्रकाराबाबतीत किरण ही पूर्णपणे अनभिज्ञ होती.म्हणून तिला सर्व बाबी अवगत करून देण्यासाठी सूर्या व समीर तिच्या घराकडे नियमित जाऊ लागलेत.कारण त्याच्या फौजेकडून (शेखर,शाम विलास,रवी,गजू प्रदीप इत्यादी) हा सर्व प्रकार तिच्या पश्चात होत होता.म्हणून तिला या प्रकाराची जाणीव करून देणे तितकेच गरजेचे होते.विशेष म्हणजे हेमंतच्या अनुपस्थित सूर्या व समीर हे दोघेही तिच्या घराच्या आसपास जाण्याचा प्रयत्न करीत असे.कारण हेमंत हा दिवसभर कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी असला तरी त्याच्या पश्चात गावात सूर्यकिरण यांच्यामध्ये नेमकं काय घडतेय यावर त्याची फौज नजर ठेवून होती.तो रात्रीच्या वेळी कामावरून घरी परतल्यानंतर त्यांच्या सवंगड्या कडून दिवस भरातील सर्व काही इत्यंभूत अशी माहिती कळत असे किंवा तशी तो माहिती करून घेत असे.आणि याच आधारावर तो सूर्याकिरणच्या विरोधात नेमके काय करायचे जेणेकरून ते दोघेही बदनाम होईल आणि एकमेकापासून कायमसाठी दूर जाईल या अनुषंगाने दिशा ठरवत असे.विशेष म्हणजे सूर्या जेव्हा केव्हाही किरणच्या घराकडे/आसपास जात असे तेव्हा तेव्हा हेमंतच्या मित्रपरिवारातील कुणी ना कुणी त्यांच्यावर एक प्रकारची पाळत ठेवत असे.या बाबतीत केवळ सूर्याला कल्पना होती.किरण तर पूर्णतः अनभिज्ञ होती.तिला त्याच्या कारवायाविषयी काही एक कल्पना नव्हती.म्हणून हेमंतच्या सवंगड्याचे सर्व प्रयत्न हे बरेचदा यशस्वी होत असे.कारण सूर्याला जे अपेक्षित होतं ते हेमंतला तो दिवसभर गावात नसूनही तपशीलवार माहिती मिळत असे.हे सर्व त्याला अप्रत्यक्षपणे निवड केलेल्या सवंगड्याकडून कळत असे.म्हणून सूर्यासाठी किरणला भेटणे तर दूरच दूर नजर भेटही होणे अवघड होऊन बसले होते.आता याचा त्रास दोघांनाही व्हायला लागला.कारण हेमंतचे सवंगडी त्यांच्यावर केवळ पाळतच ठेवत होते असे नाही तर दबक्या आवाजात गावात सूर्या किरणच्या प्रेमप्रकरणाची चर्चाही घडवून आणायला लागली होती.त्यांची बदनामी करण्याची कसलीही संधी ते सोडत नव्हते.परिणामतः त्यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा ही गावभर पसरायला लागली होती.चर्चा आणि बदनामीच्या आधारावर गावातील काही मुलं-मुली तिला चिडवायला लागलेत.अशा चिडविण्याचा तिलाही त्रास व्हायला लागला होता.म्हणून ती मानसिक दबावात येऊ लागली.या सर्व प्रकाराचा किरणला खूप त्रास होतोय याची कल्पना सूर्याला आली.परंतु सूर्या समोर तिला भेटण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नव्हता.भेटी अभावी तो तिला याबाबतीत अवगत करू शकला नाही.अशी कल्पना देण्यासाठी सूर्या हा किरणच्या भेटीसाठी संधी मिळेल तेव्हा तेव्हा तो तिच्या घराच्या आसपास जाऊ लागला.ती कधी बाहेर असेल तर कितीतरी अंतरावर राहत असे किंवा त्या परिसरात हेमंतचा कुणी ना कुणी मित्र तिथे हमखास हजर राहत असे.त्यांच्या नजरेसमोर तिला भेटले तर ते बदनामी वा उलट-सुलट (खरे खोटे सांगून) चर्चा घडवून आणण्यास कधीही मागे पुढे पाहत नव्हते.म्हणून सूर्या त्यांच्यासमोर किरणला भेटण्याचं धाडस करीत नव्हता.कारण त्याचं असं धाडस हे त्याच्या बदनामीसाठी कारणीभूत ठरणारं होतं याची त्याला पुरेपूर शाश्वती होती.त्याच्या प्रेमप्रकरणा विरोधात हेमंतच्या सांगण्यावरून त्यांची काही मित्रमंडळी कसे कटकारस्थान रचित आहे या बाबतीत आटोकाट प्रयत्न करूनही किरणला काही एक सांगता आलं नाही.तशी संधी त्याला मिळाली नाही.आता हे सर्व सांगण्यासाठी तिला भेटणं अवघड आहे हे त्याला कळून चुकलं होतं. किरणला ही सर्व माहिती व्हावी यासाठी त्यांने किरणसाठी एक चिठ्ठी लिहिली.आणि ती चिठ्ठी किरण पर्यंत पोहोचविण्यासाठी सूर्या आणि समिर तिच्या घराकडे येरझारा मारू लागलेत.सुटीच्या दिवशी तर सूर्या अनं त्याचा मित्र तिच्या घरा शेजारील शाळेत तासनतास तिची वाट पाहत बसत असे.पण इतके करूनही भेट तर बरेच बरे साधी चिट्ठीही तिच्यापर्यंत पोहचविता येत नव्हती.
दरम्यानच्या कालावधीत किरण शाळेला जाण्याच्या वेळेवर सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे दोघांची चंद्रभागा नदीवर चालता बोलता क्षणभर भेट झाली.या भेटीदरम्यान तिने सूर्याकडे असलेल्या तिच्या फोटोची मागणी केली.जवळ फोटो नसल्याने नंतर देणार असल्याचे सांगितले.त्यासाठी त्याच दिवशी सायंकाळी सूर्या व समीर हे दोघेही गावातील दळण केंद्रावर (चक्कीवर) दळण घेऊन आलेत.दळण आतमध्ये ठेवलं आणि लगेच दोघेही चक्की बाहेर आलेत आणि बाहेर उभे राहिलेत.चक्की समोर उभे राहिले की,किरणच्या घराकडील सर्व परिसर पूर्णपणे नजरेत पडतो.(बऱ्याचदा सूर्या हा तिच्या नजर भेटीसाठी दळणाचे निमित्त करून नेहमी चक्कीवर जात असे.कधी कधी तर तो इतरांचेही दळण दळून आणून देण्यासाठी नेहमी तत्पर राहत असे) सूर्या व समीर हे दोघेही चक्की समोर उभे आहेत हे किरणच्या लक्षात आले असावेत.म्हणून ति सुद्धा पाच दहा मिनिटाचे फरकाने चक्कीच्या दिशेने येऊ लागली असल्याचे सूर्याच्या दृष्टीत पडले.दूरवरून तो किरणकडे एकटक बघून पूर्णतः सुन्न झाला.कारण कधी नव्हे इतकं सुंदर रूप त्याच्या नजरेत भरलं.गुलाबी रंगाची साडी मध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुललं होतं.एखादा राजकुमारही तिच्या प्रेमात पडेल आणि आपलंसं करेल असं तिचं त्यावेळचं सुंदर असं रूप होतं.तिच्यावरून सूर्याची नजर काही केल्या हटता हटेना.किरण जसजसी एक एक पाऊल पुढं टाकू लागली तसं तसं तिचं सौंदर्य सूर्याला घायाळ करू लागलं होतं.ती जवळ आली तरी तिच्यावरून त्याची नजर काही केल्या हटली नाही.अखेर किरणने सूर्याला आवाज दिला.तेव्हा कुठं तो भानावर आला.किरण सुद्धा दळण घेऊन आली होती.तिनं दळण चक्कीवर ठेवलं आणि लगेच बाहेर आली.ती सूर्याला भेटली.त्यांच्यासोबत बोलू लागली.हेमंतची टवाळखोर मित्रमंडळी आजूबाजूला आहेत का याची तो खातरजमा करू लागला.तेथे एकमेकांसोबत जास्त वेळ बोलणं उचित नव्हतं.अल्पशा वेळेत तिनं शाळेतील मुलं-मुली तिला कसे चिडवितात.कसा त्रास देतात.कशी टिंगलटवाळी करतात याबाबतीत सूर्याला अवगत केलं.थोडक्यात किरणने तिची व्यथा सूर्यासमोर मांडली. सूर्याला तिला जे काही सांगायचं होतं अर्थात त्याच्या प्रेमप्रकरणाबाबत हेमंतसह त्याच्या मित्रपरिवाराकडून कसं कटकारस्थान रचल्या जात आहे तसेच ते गावभर कशी बदनामी घडवून आणत आहे हे सांगण्यासाठी त्याला काही संधी मिळाली नाही.म्हणून त्याला हेमंत व त्याच्या सवंगड्याच्या कारवायाबाबत काही एक सांगता आलं नाही.सर्व काही किरणचेच ऐकून घेण्यास वेळ गेला.तिच्यावर काय परिस्थिती ओढवली आहे आणि तिचं मानसिक खच्चीकरण कसं होत आहे हे सर्व काही तिनं सांगण्याचा प्रयत्न केला.वेळेअभावी सूर्याने त्याच्या मनातील विचार अर्थात हेमंतसह त्याचे मित्रमंडळी घडवून आणत असलेला प्रकार तिला थोडक्यात सांगितला पण सविस्तर सांगता आला नाही.बोलता बोलता सूर्याने त्याच्याकडे असलेला तिचा पासपोर्ट फोटो तिच्या हाती दिला.कुणाला संशय नको म्हणून थोड्याच वेळात सूर्यानं किरणला घरी जाण्यासाठी सूचित केलं.ती घरी जायला लागली तेव्हा तो तिच्या पाठमोऱ्या प्रतिकृतीकडे एकटक बघतच राहीला.त्याच वेळी सूर्या सुद्धा घरी परतला.
दोघेही घरी परतले असले तरी त्याचवेळी हेमंतच्या टोळीतील त्याचा शेखर नावाचा एक मित्र हा त्यांच्यावर लक्ष ठेवून होता.हे तेव्हा सूर्याच्या लक्षात आलं नाही.तो त्यांच्या घराच्या छोट्याशा आवारात (अंधारात) उभा राहून सर्व काही दूरवरून बघत होता.तो तेथे अंधारात उभा आहे हे सूर्याला कालांतराने समजले.किरणला तर त्याच्यावर काही एक शंका नव्हती.शेखरने तेथील सर्व घटना-प्रसंगाचे अवलोकन केले.सूर्याने जेव्हा किरणच्या हाती तिचा स्वतःचा फोटो तिचेकडे सुपूर्द केला तेव्हा शेखर हा त्यांच्याकडे दुर अंतरावरून बघत होता.त्यांनी सर्व प्रसंग नजरेत साठवून ठेवला.या निमित्ताने त्याला ही नामी संधी चालून आली होती.त्यानं संधीचं सोनं केलं.त्यानं तेथे जे घडलं ते जसेच्या तसे न सांगता त्या उलट गावभर सांगत फिरू लागला.त्यांच्या भेटीची चर्चा सर्वीकडे घडवून आणू लागला.त्यांच्या प्रेमप्रकरणाचा धिंढोरा पिटु लागला.उलट सुलट प्रचार-प्रसार करू लागला.शेखरने जणूकाही त्याच्या बदनामीची सुपारीच घेतली की काय असाच तो काहीसा प्रचार/प्रसार करू लागला.जेव्हा सूर्या किरण हे दोघेही चक्कीवर एकमेकांना भेटलेत.त्यावेळी त्यांच्यात काय चर्चा झाली आहे हे त्याला दूरवरून काही कळलं नाही.तरी तो लोकांना सांगू लागला की,सूर्या आणि किरण हे दोघेही एकमेकांना चक्की समोर भेटले.बरेच वेळ पर्यंत एकमेकांसोबत बोललेत.चर्चेत रंगलेत आणि किरण घरी जातेवेळी सूर्याने तिच्या हाती चिठ्ठी दिली.किरण चिठ्ठी घेऊन सरळ घरी न जाता सोमा सुर्वेच्या घरात शिरली.तिथे काही वेळ थांबली अनं सूर्यानं दिलेली चिठ्ठी पूर्णपणे वाचून काढली आणि तिथेच ती फाडून टाकली असा तो एकदोघाजवळ सांगून थांबला नाही तर सर्वीकडे असा सांगत फिरू लागला.ही चर्चा त्याने हेमंतच्या कानावरही घातली.वास्तविकता वस्तुस्थिती जशी आहे तशी सांगण्यात काही हरकत नव्हती.पण शेखरने वस्तूस्थितीच्या अगदी उलट तिखट मीठ लावून सांगत सुटला.वास्तविकता त्यावेळी सूर्याने किरणला चिठ्ठी वगैरे काही दिली नव्हती.केवळ तिचा फोटो तिच्या हाती दिला आणि हेमंत तसेच त्याच्या मित्र परिवाराकडून सावध राहण्याचं सांगितलं होतं.पण शेखरने या भेटीला वेगळी कलाटणी देत सर्वत्र बदनामी घडवून आणली.बदनामी करण्यास त्यांने कसल्याही प्रकारची कसर सोडली नाही.हेमंतचे तर चांगलेच फावले होते.त्यानिमित्ताने त्याला सूर्या किरणची अधिक बदनामी करता आली.शेखरने पसरविलेल्या चर्चेत त्याने अधिक भर घातली.म्हणून सूर्याकिरणच्या प्रेम प्रकरणाची चर्चा आता सर्व गावभर व्हायला लागली.बदनामीने अगदी कळस गाठला होता.या बदनामीने मुलं मुली सुद्धा सूर्या किरणला त्यांच्या प्रेम प्रकरणाबाबतीत विचारणा करू लागलेत.असं काही प्रेमप्रकरण आहेत हे दोघेही पूर्णपणे नाकारू लागलेत."आमचं प्रेमप्रकरण नाहीच" असं दोघेही ठणकावून सांगू लागलेत.दोघांचेही स्वभाव गुण लक्षात घेता त्या दोघात असं काही प्रेमप्रकरण सुरू असेल यावर अधिकांश जणांचा अजिबात विश्वास बसत नव्हता.
आता एकाच वेळी सर्वच जण कामी लागलेत.किरण सूर्याच्या स्वभाव गुणाची गावात असलेली ओळख लक्षात घेता हेमंत व त्याच्या सहकार्याकडून घडवून आणत असलेल्या चर्चेवर शक्यतोवर कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं.त्यांनी सर्व प्रयत्न पणाला लावूनही किरणसूर्याची अपेक्षेप्रमाणे बदनामी होत नव्हती.म्हणून त्यांनी आपला पवित्रा बदलविला.लोकांना पटेल अशा भाषेत/शैलीत सांगू लागलेत.खऱ्या-खोट्याची कसलीही तमा न बाळगता त्याच्या पुढील कारवाया सुरू झाल्यात.ती सर्व मंडळी अशा भाषेत सांगू लागलेत की,लोकांना खरे वाटेल.किरणच्या आई वडिलांचे संस्कार तसेच तिच्या वडिलांचा तामसी स्वभाव अर्थात वाघाच्या कळपात शेळीचा प्रवास करीत असलेल्या किरणचा स्वभाव तसा लाजरा-बूजराच.कधीही कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडणारी,घराबाहेर पडली तरी खालची मान वर न करणारी किरण तसेच सूर्याही तिच्यापेक्षा फारसा काही वेगळा नाही.कधीही फालतू भानगडीत न पडणारा अनं सदा अभ्यासात रमणारा आणि तिच्या परिसरात कधीही न फिरकणारा.त्यांच्यात प्रेमसूत जुळेल अशी कुठलीच परिस्थिती नव्हती.आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते दोघेही भिन्नजातीचे.दोघांच्या घराचे अंतरही तसे दोन टोकावरचे.ते प्रेमात अडकेल असे कुठलेच ठोस कारण नव्हते.यासह अनेक कारणास्तव गावातील लोकांचा किरणसूर्याचे प्रेमप्रकरण सुरू आहे यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते.तरीही हेमंत व त्याच्या साथीधाराकडून प्रयत्न काही थांबत नव्हते.उलट ते अधिक गतिमान व्हायला लागले होते.वस्तुस्थितीला सोडून ते उलट-सुलट चर्चा घडवून आणू लागलेत.कालांतराने त्यांना काहीसे अपेक्षित यशही मिळू लागले.आता काही लोकही त्यावर विश्वास ठेवू लागलेत.हे प्रेम प्रकरण इतकं विकोपाला गेलं होतं की,गावात सूर्याला तोंड वर काढायला जागा शिल्लक राहिली नव्हती.गावातील मुलं-मुली,लोक सूर्याकडे त्याच दृष्टीने बघू लागलेत.सूर्या आलेल्या परिस्थितीला शक्य होईल तसा प्रतिकार करू लागला.पण त्याचे विरोधक काही केल्या थांबता थांबेना.ती मंडळी बदनामीची कुठलीच संधी सोडण्यास तयार नव्हते.प्रेम प्रकरण विकोपाला गेलेल्या परिस्थितीत आणि तत्पुर्वी सुद्धा सूर्या हा किरणला भेटण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करू लागला.विशेष म्हणजे तिच्या घराच्या दिशेने जाण्यासाठीचे सर्व रस्तेही आपसुकच बंद झाले होते.उन्हाळी सुट्या असल्यामुळे शाळा कॉलेजही बंद होते.शाळेला बाहेर जाण्याच्या निमित्ताने निदान किरण घराबाहेर तरी पडत असे.शाळेला सुट्या असल्याने किरणचं बाहेर पडणं ही पूर्णपणे थांबलं होतं.त्या दरम्यान सानियाची सुद्धा भेट घेण्याचा प्रयत्न केला.पण तिचीही भेट घडून आली नाही किंवा भेटता आले नाही.किरणला भेटण्यासाठीचे सूर्याचे प्रयत्न काही थांबले नव्हते.विशेष म्हणजे सूर्या जेव्हा घराबाहेर पडत असे किंवा किरणच्या घराच्या आसपास वा दूर अंतरावर जात असे तेव्हा तेव्हा कुणी ना कुणी त्याला त्याच्या प्रेमप्रकरणाबाबत विचारणा करीत असे.
इतकेच नव्हे तर काही लोक त्याच्या गुणापेक्षा दोष अधिक बाहेर काढू लागले होते.लोक नको त्या भाषेत बोलू लागले होते.बोलत असे.मुलं-मुली आणि लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देता देता आणि स्वतःबद्दल लोकांकडून कधी न ऐकलेले वाईट वाईट शब्द ऐकता ऐकता सूर्याच्या नाकी नऊ आले होते.या प्रेमप्रकरणाने तोही कोसळला होता.चर्चा अनं काळजीने पुर्णतः थकला आणि मनातून पूर्णपणे खचला होता.या प्रकरणाने त्याला स्वतःलाच इतका त्रास होत आहे तर किरणला किती त्रास होत असेल या कयासाने तर तो अधिकच खचू लागला.आता त्याला स्वतःपेक्षा किरणची अधिक काळजी वाटू लागली.कारण त्या दरम्यान किरणही पूर्वीप्रमाणे सूर्याच्या कधी नजरेत पडली नाही.कदाचित लोक आणि मुलं-मुली तिलाही सूर्याप्रमाणेच प्रश्न करीत असावीत.नको त्या भाषेत/शब्दात बोलत असावीत.तिच्या चारित्र्यावरही बोट ठेवत असावीत.म्हणून ती घराबाहेर पडत नसावी असंच त्याला वाटू लागलं होतं.
या सर्व प्रकरणावर चर्चा करण्यासाठी व तोडगा काढण्यासाठी तसेच बदनामी टाळण्यासाठी किरणची भेट घेणे त्याला आवश्यक वाटू लागले.जेणेकरून तिला वास्तव परिस्थितीविषयी अवगत करू शकेल.भेटीसाठी प्रयत्न करूनही किरणची भेट झाली नाही.सोबतच सानियाची पण भेट घडून आली नाही.किरणची भेट घडून येणे अवघड होते.म्हणून घडलेल्या सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी तिला सविस्तर अशी चिठ्ठी लिहिली.त्यात घडलेल्या आणि घडत असलेल्या सर्व प्रकारची तसेच हेमंतसह त्याच्या सहकार्याकडून बदनामी साठी चालविलेल्या मोहिमेची आणि सूर्याकडून किरण सानियाला भेटण्यासाठीचे आटोकाट प्रयत्न या सर्व बाबींचा आढावा त्या चिठ्ठीत घेतला होता.परंतु किरणची भेट काही घडून येत नव्हती.सानियाची पण भेट होत नव्हती.साधारण चिठ्ठीच तिच्यापर्यंत पोहोचू शकला नाही तर भेट घेणे किती अवघड होऊन बसले असेल!!.अशी परिस्थिती त्यावेळी गावात निर्माण झाली होती.पुढे पुढे ते दोघेही भेटणे अवघड झाले.म्हणून पुन्हा दुसरी चिठ्ठी लिहिली.त्यातही या प्रकरणाचा पूर्ण उलगडा केला होता.सूर्या या दोन्ही चिठ्ठ्या खिशात घेऊन फिरू लागला.कधी ना कधी, कुठे ना कुठे दोघीपैकी एकीची तरी भेट होईल या आशेने प्रयत्न करू लागला.शाळेला सुट्टी असल्याने गावातील शाळाही बंद होती.म्हणून तो तिच्या घराशेजारील शाळा परिसरात भूक तहान विसरून सकाळी अकरा-बारा वाजता पासून तर सूर्यास्त होईस्तोवर तिला चिठ्ठी देण्यासाठी शाळेच्या आवारात थांबू लागले.किरण कधी ना कधी तिच्या घराच्या दरवाज्या बाहेर येईल आणि भेट नाही;निदान चिठ्ठी तरी देता येईल या आशेने कित्येक दिवस त्यांनी भूक तहान आणि सर्व काही विसरून प्रयत्न चालविले.परंतु त्याचे सर्व प्रयत्न निष्पळ ठरलेत.शाळा परिसरात दिवस दिवसभर थांबूनही ती घराबाहेर पडताना दिसत नव्हती.कदाचित ती घराबाहेर (दरवाज्यापर्यंत) पडली तर तिचे सूर्याकडे लक्ष केंद्रित होत नसे.असेच प्रयत्न कितीतरी दिवस पर्यंत चालविले.पण सर्व व्यर्थ ठरले.कदाचित तिची भेट झाली असती तर या सर्व प्रकाराची तिला कल्पना देता आली असती आणि त्यातून काही तरी मार्ग निघाला असता.सूर्याचे सर्व प्रयत्न अखेर अयशस्वी ठरत गेले.अशी चर्चा घडून आली पण कालांतरानेही ही चर्चा काही थांबली नाही.शेवटी तिच्या आई-वडिलांच्या कानावर तरी ही चर्चा जाऊ नये असं सूर्याला वारंवार वाटत असे.तीच भीती आता त्याला अधिक त्रासदायक/क्लेशदायक ठरू लागली.कारण किरण ही आई-वडिलांची एकुलती एक लाडाची लेक.त्याच्यासाठी ती सर्वस्व आहे.तिचे आई-वडील आपल्या लेकीचं असलं प्रेमप्रकरण कधी सहन करू शकणार नाही हे सूर्याला चांगलं ठाऊक होतं.म्हणून असं काही होऊ नये यासाठी सूर्याकडून प्रयत्न चालविले.म्हणूनच तो किरण आणि सानियाच्या भेटीसाठी धडपडू लागला.बदनामीला कुठेतरी आळा बसावा हाच त्यामागे हेतू होता.
सूर्या बदनामी टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करू लागला तर दुसरीकडे हेमंत व त्याचे सहकारी अधिकाधिक बदनामी करण्यासाठी उतावीळ झाले होते. किरणसूर्याचं अतूट असलेलं प्रेम संपुष्टात यावं हाच हेमंत व त्याच्या सहकाऱ्यांचा मुख्य हेतू होता.बदनामीचे सत्र कायम ठेवत त्या दोघांनाही अलग करण्यासाठी ते वाटेल ते प्रयत्न करू लागलेत.त्यांचे प्रयत्न यशाच्या दिशेने वाटचाल करीत होते.कारण सूर्या व किरण यांच्यात एवढी मोठी दरी निर्माण झाली होती की,ते भविष्यात कधी एकमेकांना भेटणार की नाही अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती.कारण या दरम्यान सूर्याकिरणला एकमेकांना भेटण्यासाठी कुठलीच संधी दृष्टीत पडत नव्हती.कारण हेमंत व त्याच्या सहकार्याने गावात तशी वातावरण निर्मिती केली होती.सूर्यासाठी प्रत्येक दिवस हा परीक्षेचा दिवस ठरत असे.किरणला भेटणे तर अवघड ठरू लागलेच शिवाय त्यांच्यातील दुरावाही अधिकाधिक विस्तारत होता.त्यांच्यातील अशा वाढत्या दुराव्यामुळे सूर्या पूर्णपणे हतबल आणि मनाने पूर्णपणे खचला होता.निराश/हतबल झाला होता.अशा दूविधास्थितीत तो स्वतः काय करतोय आणि कसा वागतोय हे त्याचं त्यालाही कळत नव्हतं.वेड्यापिशा माणसापेक्षा त्याची वेगळी काही स्थिती नव्हती.तरीही किरणच्या भेटीची आस काही सोडली नव्हती.
उन्हाळ्याचे दिवस आणि त्यातही लग्नसराईची एकच लगबग.उन्हाळा जोरात तापू लागला त्याचप्रमाणे हेमंत व त्याच्या सहकाऱ्याची डोकीही तशीच तापू लागली.सूर्याकिरणला एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधू लागले होते.त्या दरम्यान नजीकच्या गावात अर्थात सूर्याच्या मामे बहिणीचं लग्न ठरलं होतं.त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह सूर्याही इच्छा नसतानाही लग्नासाठी गेला होता.तो लग्न प्रसंगाच्या ठिकाणी असला तरी त्याचं सर्व लक्ष हे गावाकडेच होतं.पाच सहा दिवस तो मामाकडे असला तरी त्याला सर्व चिंता ही गावाकडची अधिक होती.आपल्या पश्चात गावाकडे काय प्रकार सुरू असेल,किरणची काय अवस्था असेल ही चिंता त्याला अस्वस्थ करून सोडत असे.सूर्या गावात नाही ही कल्पना हेमंत व त्याच्या विकृत सहकाऱ्यांना नक्कीच आली होती म्हणून ते त्यादृष्टीने कामी लागलेत.या संधीचा त्यांनी पूर्णपणे फायदा उठविला.त्यांच्याकडून सर्व प्रयत्न करूनही ते दोघे अलग झाले आहेत याची त्यांना खात्री पटत नव्हती.म्हणून त्यांनी थेट किरणच्या वडीलापर्यंत जाण्याचा मार्ग पत्करला.यासाठी त्यांना शेखरची चांगली साथ मिळाली.तिच्या वडीलापर्यंत जाण्यासाठी शेखर सारखा मासा गळाला लागला होता.किरणचे वडील आणि शेखर यांच्यात अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आणि नातेसंबंध सुद्धा होते.साळे-जावई असं त्यांचं थट्टा मस्करीचं नातं.या नात्याचा उपयोग त्यांनी सूर्याकिरणला अलग करण्यासाठी केला.किरणचे वडील आणि शेखर एकमेकाची थट्टा-मस्करीच नव्हे तर ते कुठल्याही विषयावर एकमेकांसोबत बिनधास्तपणे बोलत असे.चर्चा करीत असे.तिच्या वडिलांचा अतिशय विश्वासू व्यक्ती असलेल्या शेखरची हेमंतला चांगली मदत झाली.२० मे १९९४ ते २५ मे १९९४ या पाच दिवसाच्या कालावधीत त्यांनी हे सर्व कर्तव्य पार पाडलं.सूर्या गावी नाही हे बघून शेखरने संधी साधून सूर्याकिरणची अख्खी प्रेमकहानी किरणच्या वडिलांसमोर मांडली.किरणच्या वडिलांचा तामसी स्वभाव लक्षात घेता अशी माहिती त्यांच्याजवळ सांगण्यास कुणी धाडस केलं नसतं.मात्र असं धाडस शेखरनं करून दाखविलं.सूर्याकिरणचे प्रेमप्रकरण ऐकून प्रारंभी त्यांचाही विश्वास बसत नव्हता.परंतु शेखरनं त्यांना व्यवस्थितरित्या घटनाक्रम सांगितला अनं त्यांना खरं मानण्यास बाध्य केलं.किरणच्या वडिलांसाठी हे सहन न करण्यापलीकडचं होतं.कोणत्याही मुलींच्या आईवडिलांसाठी आपल्या मुलीचं असलं प्रेम प्रकरण सहन होणारं नव्हतं.त्यास किरणचे वडील कसे अपवाद ठरणार !!! ते रागाने लालबुंद झाले.त्याचा राग अनावर झाला.जणूकाही त्यांच्या पायाखालची सगळी वाळूच सरकली.काय करावे अनं काय करू नये अशीच त्यांची काहीशी स्थिती झाली होती.सूर्याची प्रतिमा तर त्याच्या नजरेसमोरून काही केल्या हटता हटत नव्हती.या सर्व प्रकरणाचा त्यांच्यावर चांगलाच परिणाम झाला आणि याचा वचपा काढण्यासाठी ते पुढे सरसावले.ते यापुढे काय करतील याबाबतीत कल्पना न केलेली बरी !!!!.
Comments
Post a Comment