Skip to main content

आजही दुविधेतच-------!!! भाग पाच

*आजही दुविधेतच*
*भाग- पाच*

         सूर्याकडून बदनामी टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करूनही त्याच्या प्रेमप्रकरणाची माहिती अखेर किरणच्या आई- वडिलांपर्यंत जाऊन पोहचली.हे प्रेमप्रकरण ऐकून किरणच्या वडिलांचा राग अनावर झाला.काय करावं आणि काय करू नये अशीच त्यांची स्थिती झाली होती.कधी नव्हे इतके ते सुड भावनेने पेटून उठले होते.चिडले होते.रागाने बेधुंद होऊन ताबडतोब प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी त्यांनी आपला मोर्चा हा सूर्याच्या घराकडे वळविला.रागाच्या भरात ते काय करतील याची अजिबात शाश्वती नव्हती.येनकेन प्रकारे त्याच्या दृष्टी पटलावर केवळ सूर्याचाच चेहरा गरगर फिरत होता.सूर्याला भेटल्याशिवाय व त्यांना जाब विचारल्याशिवाय त्यांना काही चैन पडणार नव्हतं. म्हणूनच त्यांनी अजय यांना सोबत घेऊन सूर्याच्या घराकडे धाव घेतली.रागानं लालबुंद चेहरा आणि सुड भावना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.अजयनं त्याच्या रागाला अधिक खतपाणी घातलं.सूर्याच्या घराकडे जात असताना वाटेतच शाळेजवळील मंदिराजवळ गजाऊ बसला होता.त्यांची गाठ ही गजाहूशी पडली.तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावरील प्रचंड राग गजाहूच्या नजरेतून सुटला नाही.गजाहूनं मोठं धाडस करून त्यांना विचारणा करण्यास पुढे आला.अशावेळी त्यांच्या समोर येण्याचं कुणीच धाडस केलं नसतं.पण गजाहून संभाव्य संकट लक्षात घेऊन असं धाडस केलं.किरणच्या वडिलांनी सर्व हकीकत गजाहू समोर मांडली.गजाहूला हे सर्व प्रकरण अगोदरच अवगत होतं.कारण गजाहू आणि सूर्या यांच्यात चांगली घट्ट मैत्री होती.विशेष म्हणजे गजाहूने सूर्याचे किरण सोबत असलेले प्रेम आणि तिच्या वडिलांच्या स्वभावाविषयी सूर्याला पहिलेच जाणीव करून दिली होती.पण सूर्याच्या डोक्यात शिरलेलं प्रेमाचं भूत काही केल्या उतरत नव्हतं.तो कुणाचही काही एक ऐकण्यास तयार नव्हता.त्यांचं प्रेम चांगलं फुललं असताना जे घडायला नको होतं,नेमकं तेच घडलं.किरणचे वडील आणि गजाऊ यांच्यातील नातं तसं जिव्हाळ्याचं होतं.ते दोघेही सूर्याच्या घरी पोहोचण्यापूर्वी गजाहूनं त्यांना रस्त्यातच गाठून किरणच्या वडिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.कुणाच्या सांगण्यावरून किंवा खरं-खोटं काय आहे हे माहित नसताना असं पाऊल उचलणं वा सूर्याला विनाकारण जाब विचारणं कितपत योग्य आहे असा प्रति प्रश्न करून भविष्यातील परिणामाची जाणीव करून दिली.इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मुलीवर विश्वास ठेवा.सूर्याचाही स्वभाव गुण लक्षात घ्या.या सर्व प्रकारात सूर्यापेक्षा किरणचीच अधिक बदनामी होईल याची जाणीव करून दिली.गजाहूचं म्हणनं त्यांनाही पटलं.तात्पुरतं का होईना गजाहूच्या प्रयत्नानं सूर्याच्या घराकडे येणारं भयंकर वादळ थांबलं.कदाचित गजाहूच्या जागी इतर दुसरं कुणी असतं तर किरणच्या वडिलांना वाटेतच थांबविनं तसं सोपं काम नव्हतं.किरणचे वडील तात्पुरते शांत झाले असले तरी त्यांचा राग मात्र कायम होता.त्यांचं प्रेम प्रकरण त्यांच्या अगदी जिव्हारी लागलं होतं.म्हणून ते काही वेळाच्या फरकाने अजयसह त्यांनी अखेर सूर्याचं घर गाठलंच.ते पूर्ण तयारीनिशी आले होते.सूर्याला प्रत्यक्ष भेटून पूर्ण रागाची भडास काढणार होते.पण योगायोगाने सूर्याच्या घराला कुलूप बघून त्यांचा भ्रमनिरास झाला.कारण त्यावेळी सूर्यासह त्याचं संपूर्ण कुटुंब हे (दि.२० मे ते २५ मे १९९४) त्यांच्या मामे बहिणीच्या लग्नाला गेले होते.म्हणून होणारा सर्व अनर्थ टळला.
       सुर्याकिरणचं प्रेमप्रकरण ऐकून किरणच्या वडिलांची झोप केव्हाचीच उडाली होती.अनं ते साहजिकच आहे.सूर्याला भेटल्याशिवाय आणि त्यांच्यावर सुड उगवल्याशिवाय ते शांतपणे बसणाऱ्यापैकी नव्हते.त्यांना सूर्या भेटला नाही.म्हणून त्यांनी सूर्याचा मित्र समीरला गाठलं.समीर हा त्यांच्या प्रेमप्रकरणाचा साक्षीदार आहे हे ही त्यांना ठाऊक होतं.वास्तविकता समीर आणि किरणचे वडील यांच्यात गावनात्याचे संबंध तसे जिव्हाळ्याचे आणि थट्टा मस्करीचे.पण ते हे सर्व विसरलेत.समीरला गाठून या सर्व प्रकरणाचा त्यांना उलगडा करायचा होता.म्हणून त्यांनी त्यांच्या स्वभावानुरूप समिरवर प्रश्नाचा एकच भडीमार केला.नको त्या भाषेत बोलायला लागलेत.अपमानितही केलेत.एकंदरीत त्यांनी आपला सर्व राग हा समीरवर काढला.समीरला किरणच्या वडिलांचा स्वभाव अवगत होता.म्हणून त्यानं प्रति उत्तर देण्यापेक्षा शांत राहणंच पसंत केलं.कदाचित समीर बोलता झाला असता तर वाद-विवाद विकोपाला जाण्यास वेळ लागला नसता.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून समीरने मूकपणे ऐकणेच पसंत केले.
       दोन-तीन दिवसाच्या फरकानं सूर्या लग्नावरून गावी परतला.तो या सर्व प्रकाराबाबतीत पूर्णतःअनभिज्ञ होता.आठ-दहा दिवस तो लग्नात राहिला.म्हणून त्याचा ओढा किरणकडे अधिक होता.ते पण स्वाभाविक होतं.किरणला बघितल्याशिवाय त्याला काही चैन पडत नव्हतं.म्हणून तो किरणला भेटण्यासाठी समीरकडे आग्रह करू लागला.पण समीर काही त्याला प्रतिसाद देत नव्हता.किरणला भेटण्यासाठी किंवा तिच्या घराकडे जाण्यासाठी नेहमी तत्पर असलेला समीर यावेळेस मात्र सूर्याचं काही एक ऐकण्यास तयार नव्हता.समीर असा का वागतय याचं सूर्याला आश्चर्य वाटायला लागलं.घडलेल्या प्रसंगा बाबतीत समीरनं सूर्याला अजून पर्यंत तरी काहीही सांगितलं नव्हतं.विशेष म्हणजे समीर,सानिया आणि आभा वहिनी सूर्याचे खरे पाठीराखे.समीर,सानिया आणि आभा वहिनी यांचे पासून तो काहीही लपून ठेवत नव्हता.त्याच्या मनातील सर्व विचार/भावना त्यांच्याकडे व्यक्त करीत असे.तसे ते तिघेही सूर्याला वेळोवेळी आवश्यक ते मार्गदर्शन करीत असत.सल्ला देत असत.धीर देत असत.यावेळी समीर काही एक ऐकत नसल्याने त्याने आभा वहिनी कडे धाव घेतली.समीरच्या वागण्याबद्दल त्यानं आभा वहिनीकड सर्व काही सांगितलं.आभा वहिनीला समीरच्या वागण्याचं काहीही नवल वाटलं नाही.आभा वहीनीला सूर्याच्या पश्चात घडलेला सर्व प्रकार माहित होता.आभा वहिनी हे सर्व ऐकून धीर गंभीर झाल्यात आणि घडलेला सर्व प्रसंग सूर्याजवळ व्यक्त केला.हे सर्व ऐकून सूर्या पूर्णतः कोसळला.सुन्न झाला.अखेर जे व्हायला नको होतं नेमकं तेच घडलं,असं पुटपुटत दोन्ही हात डोक्यावर ठेवून ताडकन खाली बसला अनं विचारमग्न झाला.काही वेळ पर्यंत तो अबोल राहिला.आभा वहिनीनं त्याची निरव शांतता भंग करीत सूर्याला म्हणाली, "काही काळजी करू नका जी,सर्व काही व्यवस्थित होईल,पण तुम्ही चार दिवस गावात राहू नका.त्या भाऊना तुम्ही गावात आल्याचे कळले तर ते तुमचे कमी जास्त करण्यास मागे पुढे पाहणार नाही म्हणून तुम्ही चार दिवस किरणच्या वडिलांच्या नजरेआड राहा" असा सल्ला दिला.विशेष म्हणजे ते (तिचे वडील) समीर कडून आभा वहिनीच्या घरी सुद्धा आले होते.त्याच्यातील कौटुंबिक नातेसंबंध जिव्हाळ्याचे आणि गावकी नात्यानुसार त्यांच्यात बहिण-भावाचे नाते.बहिण म्हणून त्यांनी आभा वहिनी समोर सूर्याच्या बाबतीत त्यांच्या मनात कसा व किती राग आहे  हे दाखवून दिलं होतं.आभा वहिनीला जणूकाही काही एक माहिती नाही असं समजून त्यांनी आपलं मन बहिणी समोर हलकं केलं.म्हणून किरणचे वडील द्वेषाने कसे पेटून उठले आहे याचा पाढाच आभा वहिनीनं सूर्यासमोर वाचला.हे सर्व ऐकून सूर्या पुर्णतः खचला.काय करावं त्याचं त्यालाच कळत नव्हतं.तो निराश अनं हताश झाला.तिच्या वडिलांचा स्वभाव सूर्याला चांगला माहीत होता.आपल्या बाबतीत ते कसे वागताहेत यापेक्षा ते किरण सोबत कसे वागत असतील या चिंतेने तो अधिक हवालदिल झाला.हे सर्व ऐकून ते किरणवर चिडले नाही असे काही होणार नव्हतं.म्हणून ते किरणशी कसे वागत असतील ही चिंता त्याला अधिक सतावत होती.आपल्या मुळे तिला असे दिवस बघावे लागतेय यासाठी तो स्वतःच स्वतःला गुन्हेगार समजू लागला.अशा स्थितीत समीर अनं आभा वहिनी सूर्याला धीर देत असे.पण सूर्या काही स्थिरावत नव्हता.हे सर्व घडण्यासाठी जे लोक कारणीभूत आहेत त्यांचा प्रतिशोध घ्यावा आणि त्यांना कायमची अद्दल घडवावी असाही विचार त्याच्या मनात घोळ घालू लागला होता.म्हणूनच सूर्याने हेमंत,शेखर सह त्याच्या सर्व साथीदाराला धडा शिकविण्याचा "पण" घेतला.परंतु असे काही करण्यास त्यांला अनेकांनी विशेषता समीर व आभा वहिनींनं थांबविलं.असं वागल्यानं हेमंत आणि त्याच्या सहकार्याचं काही एक वाकड होणार नाही पण पुन्हा बदनामी होण्यास कसलीही कसर उरणार नाही याची जाणीव करून दिली.पण सूर्या नेहमीसाठी स्वस्थ बसणार नाही हे तितकच खरं होतं.
       घडलेल्या सर्व प्रसंगांनाने सूर्या पूर्णतः अस्वस्थ व्हायला लागला तर दुसरीकडे किरणच्या वडिलांचा राग पूर्वीपेक्षा अधिकच वाढायला लागला.सूर्याचं किरणवरील प्रेम आणि सूर्या सोबत तिचं जोडलेलं नाव त्यांना काही केल्या सहन होत नव्हतं.कालांतराने त्यांनी सूर्याला थेट भेटून राग व्यक्त करणे टाळलं असलं तरी अप्रत्यक्षपणे सूर्याचा अपमान करण्याचा आणि नको ते बोलण्याचं सत्र सुरू केलं.जेव्हा जेव्हा सूर्या त्याच्या नजरेत पडत असे तेव्हा तेव्हा त्यांना नको त्या भाषेत अर्थात घाणेरड्या,अश्लील भाषेत बोलायचं कधीच टाळलं नाही.त्याच्या वागण्यावरून कधी कधी तर असं वाटायचं की,किरणचे वडील सूर्याचं नुकसान तर करणार नाही ना ! अशीही शंका येत असे.त्यावेळी परिस्थितीच तशी बिकट होती.त्यांची सूर्याप्रती असलेली वागणूक लक्षात घेता सूर्या सुद्धा तिचे वडील जिथे असतील तिथे अजिबात जाण्याचं वा उभं राहण्याचं टाळत असे.इतकेच काय तर तिचे वडील दूर अंतरावरून जरी त्याच्या नजरेत पडले तरी तो दूरवरूनच स्वतःचा रस्ता बदलवित असे.इतकं धैर्य त्याचं खचलं.कोणतेही कारण नसताना ते दात किंचाळत अनं हात मनगट दाबत त्याला घाणेरड्या शिवाय घातल्याशिवाय राहत नसत.दुर्दैवाची बाब म्हणजे खरं-खोटं काय ह्या बाबतीत सूर्याला कसलीही विचारणा न करता ते थेट सूर्यावर तुटून पडत असत.कदाचित तसं त्यांनी मनाशी ठरवूनच घेतलं होतं.सूर्या तसा सुशिक्षित,सोज्वळ,समजदार आणि भावनिक स्वभावाचा.कदाचित त्यांनी सूर्याची समजूत काढली असती तर त्यांनही समजून घेतलं असतं.पण त्यांनी तसं काही केलं नाही.उलट सुरुवातीच्या काळात सूर्याचा जितका अपमान करता येईल तितका अपमान केला.विशेष म्हणजे सूर्या हा तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण घेत होता.त्यामुळे त्यांचं नित्यनेमाने तालुक्याच्या ठिकाणी ये-जा होतं.तालुक्याच्या ठिकाणी बऱ्याचदा त्यांचे संबंध जिथे असतील नेमके तिथे (काही ठिकाणी) सूर्याचे पण संबंध राहत असे.अशा ठिकाणी सूर्याची निंदानालस्ती तर करीत असे शिवाय सूर्याच्या बाबतीत जितकं वाईट-साईट सांगता येईल तितकं वाईट-साईट सांगण्यास कधीही कसलीच कसर सोडली नाही.सूर्याचा स्वभाव आणि तिच्या वडिलांचा स्वभाव लक्षात घेता अनेकांना त्यांचं म्हणणं,बोलणं,वागणं यावर अजिबात विश्वास बसत नव्हता.बरेचदा तर असे लोक सूर्याला म्हणायचे की,"तुझ्या गावातील तो व्यक्ती, तुझ्याबद्दल इतका वाईट कसा काय बोलतोय" असे म्हणायचे.त्यावेळी सूर्या मूक राहणेच पसंत करीत असे.इतकं वाईट बोलूनही सूर्यानं कधी त्यांना प्रति उत्तर दिलं नाही.उलट त्यानं त्यांचा नेहमीच आदर,मान-सन्मान केला. "कधी ना कधी,त्यांचं मत परिवर्तन होईल आणि आपला प्रामाणिकपणा त्यांच्याही लक्षात येईल" असं सूर्यानं स्वतःहाच स्वतःताची समजूत घातली होती.
       प्रेमप्रकरण किरणच्या वडिलांना कळल्याने किरण फारसी काही घराबाहेर पडत नव्हती.सर्वीकडे चर्चेने सूर्याही तिच्या घराकडे फारसा फिरकत नव्हता.पण कधीतरी ती मिळेल/भेटेल या अपेक्षेने तो तिच्या घराच्या दूर अंतरावर घिरट्या मारत असे.पण काही केल्या ति त्याच्या नजरेत काही पडत नव्हती.घराबाहेर पडली तरी गाठभेट काही होत नव्हती.त्यामुळे सूर्या अधिक चिंतातूर व्हायला लागला.तिच्या वडिलांना माहिती पडताच सूर्याप्रती त्यांचा व्यवहार लक्षात घेता ते किरण सोबत याहीपेक्षा अधिक ताठर व्यवहार करीत असतील वा वागत असतील या कल्पनेने सूर्या अधिक अस्वस्थ होत असे.स्वतःबरोबर किरणचीही चिंता त्याला अधिक अस्वस्थ करीत असे.या सर्व प्रकारात तिची आपल्या प्रति कशी भावना असेल याबाबतीत सूर्या पुन्हा दुविधेत अडकला.प्रयत्न करूनही त्यांना कसलाच मार्ग गवसत नव्हता.परिस्थिती समोर तो पूर्णतः हतबल झाला होता.आपल्यासाठी किरणला कसलाही त्रास व्हायला नको असंच सूर्याला अपेक्षित होतं.
        प्रेमप्रकरण किरणचे आई-वडिलाना कळल्याने हेमंत,शेखर सह त्याचे सर्व सहकारी यांचा उत्साह गगनात मावेना.जणूकाही त्यांनी सर्व जग जिंकलं.त्यांना जे अपेक्षित होतं ते सर्व काही घडलं.घडलेला सर्व प्रकार किरण जवळ सांगावा यासाठी सूर्याने प्रयत्नाची पराकाष्टा केली पण तिची गाठभेट न घडल्याने तिला काही सांगता आलं नाही.तशी तीही खचली असेल,घाबरली असेल म्हणून ती सुद्धा फारशी घराबाहेर पडली नाही किंवा पडत नव्हती.मग तिची भेट कशी घडून येणार !! इतकच काय तर सर्व गावभर चर्चा आणि तिच्या आई-वडिलांना पूर्णपणे माहिती होऊनही हेमंत शेखर सह त्याचे सर्व सहकारी शांत बसले नव्हते.ते पूर्वीप्रमाणेच सूर्यावर पाळत ठेवत असे.शेखर तर तिच्या वडिलांना अधिक भडकावून देण्याचा प्रयत्न करायचा.नव्हे ! शेखरने तर वेळोवेळी आगीत तेल ओतण्याची कुठलीच संधी सोडली नाही.म्हणून सूर्याच्या मनातल्या आशा-आकांक्षा मनातच राहिल्यात.दुसरीकडे किरण भेटत नाही म्हणून सूर्यानं सानियाला भेटण्याचा प्रयत्न केला.प्रयत्न करूनही सानियाची सुद्धा भेट काही होत नव्हती.जेव्हा केव्हा सानिया दूर वरून सूर्याच्या नजरेत पडायची तेव्हा तेव्हा त्याने सानियाला भेटण्याचा प्रयत्न चालविला.परंतु ती सुद्धा दूर दूर पळायची.कदाचित ती सुद्धा या प्रकरणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत असावी असं तिच्या वागण्यावरून/ व्यवहारावरून सहज लक्षात येत असे.सानिया आपल्याला का टाळत आहे हे कालांतराने सूर्याच्याही लक्षात आलं.या प्रकरणात सानिया सुद्धा सहभागी असल्याची किरणच्या वडिलांची समजूत झाली आहे असं सूर्याच्या कानावर आलं होतं.म्हणून सानियाला किरणच्या वडीलाकडून अपमानित होण्याची वेळ आली आहे असही सूर्याला समजलं होतं.या सर्व प्रकारांमुळे सानिया सुद्धा आपल्याला टाळत असल्याचं सूर्याला कळून चुकलं होतं.सानियानं पूर्णपणे पाठ फिरविल्याने सूर्याचे किरणकडे जाणारे सर्व मार्ग बंद झाल्यागत होते.आता किरण आपल्याला काही दिवस तरी भेटणे अवघड आहे हे ही सूर्याच्या लक्षात आलं.
       काही महिन्याचा अवधी उलटल्यानंतर कदाचित किरणच्या वडिलांचा राग शांत झाला असेल असं सूर्याला वाटू लागलं पण त्याच्या वागण्यात/ व्यवहारात फारसा काही फरक पडला नव्हता.उलट त्यांचा राग पूर्वीपेक्षा अधिक बळावला होता.सूर्या दिवसातून जितक्या वेळा त्याच्या नजरेत पडत असे तितक्या वेळा त्यांना अपमानित करण्याची व खालच्या स्तराच्या भाषेत बोलण्याची कुठलीही संधी दवडत नसे.ते सूर्याला कोणत्या वेळेत काय बोलतील याची अजिबात शाश्वती नव्हती.म्हणून सूर्या सुद्धा चांगलाच धास्तवाला होता.पण किरणचे वडील म्हणून तो सर्व काही मुकाट्याने सहन करित असे.कदाचित सूर्याच्या जागी इतर कुठलाही मुलगा असता तर त्यांने मागचा पुढचा विचार न करता प्रत्युत्तर देण्यास मागं पुढं पाहिलं नसतं.सूर्याचा मूळ स्वभाव आणि किरणच्या भविष्याचा विचार करून सूर्या सर्व काही निमूटपणे सहन करीत होता.किरण प्रति असलेलं प्रचंड प्रेम हेच त्याला उद्धटपणे वागू देत नव्हतं.आपण किरणला सुखाचे- आनंदाचे दिवस देऊ शकलो नाही निदान आपल्या वागण्याने निदान तिला त्रास वा दुःख तर व्हायला नको हाच त्या मागील हेतू होता.
       सूर्या ज्या गावी शिकायला होता नेमके त्याच गावी किरणचे वडील सुद्धा त्याच गावी शासकीय नोकरीत कार्यरत होते.दोघांचीही त्या शहराकडे जाण्याची एकच वेळ होती.म्हणून त्या दोघांचाही आमना सामना हा नित्यक्रमाने व्हायचा.सूर्या तिच्या वडिलांच्या वेळेवर जाण्याचं टाळत असला तरी येनकेन प्रकारे त्यांची कधी ना कधी दूरवरून भेट व्हायचीच.सूर्या जेव्हा जेव्हा त्यांच्या नजरेत पडायचा तेव्हा तेव्हा कधी अप्रत्यक्ष तर कधी प्रत्यक्षपणे बोलून अपमानित करायचे.नको त्या भाषेत बोलायचे.त्यामुळे सूर्याला दररोज अपमानित व्हावं लागत असे.त्यांच्यापासून दूर राहण्याचा कितीही प्रयत्न करीत असला तरी येनकेन प्रकारे त्यांच्या नजरेत पडत असे किंवा दूर अंतरावरून भेट होत असे.अनेकदा सूर्या ज्या ठिकाणी जायचा नेमकं त्या ठिकाणी तिच्या वडिलांची ओळख/संबंध असेल तर सूर्या तेथून गेल्यानंतर किरणचे वडील सुद्धा लगेच तेथे जायचे.सूर्या बद्दल मानहानी कारक बोलायचे.नव्हे ! त्यांची अब्रूच चव्हाट्यावर आणायचे.जे दुर्गुण सूर्यात नाही तेही सांगायचे.नेहमी दुर्गुण सांगायचा त्यांचा प्रयत्न राहायचा. सूर्या लोकांच्या नजरेतून कसा पडेल असाच त्यांचा व्यवहार राहायचा.कालांतराने सूर्या त्या ठिकाणी गेल्यावर संबंधितांकडून सूर्याला तसे कळत असे.तो त्या विषयावर  बोलण्याचं नेहमीच टाळत असे.सूर्या हे सगळं का सहन करीत आहे तर ते केवळ किरणसाठीच ! आयुष्यभर असाच अपमान सहन करायचा का?कदाचित असंच होणार होतं.घडणार होतं.महिन्या मागून महिने जात असतानाही किरणच्या वडिलांचा राग काही शांत होत नव्हता.लोकही सूर्याला म्हणायचे की, "सूर्या तुझ्या गावातील अमुक व्यक्ती तुझ्याबद्दल असा इतका वाईट-साईट का बोलतोय ? त्यावेळेस सूर्या हा निरुत्तर व्हायचा.तसा त्यांच्यासमोर पर्याय नव्हता.यात सूर्याचा काय उद्देश असेल?
        सूर्या किरणचं प्रेम प्रकरण किरणच्या वडिलांनी चांगलंच मनाला लावून घेतलं.म्हणून त्यांचे कडून किरणलाही त्रास व्हायला लागला असेलच शिवाय समीर आणि कदाचित सानियाला पण त्रास व्हायला लागला असल्याचे सूर्याला कळले.इतकेच नव्हे तर या सर्व प्रकरणाला किरणपेक्षा तिच्या आईला अधिक जबाबदार धरलं असल्याचं सूर्याच्या कानावर येऊ लागलं.किरणच्या आईला अधिक बोलू लागलेत.त्रास देऊ लागलेत.त्यात किरणच्या आईचा काय दोष? या सर्व प्रकरणात किरण बरोबर इतरांनाही त्रास व्हायला लागल्याने सूर्या अधिक दुःखी होत असे.बरेचदा त्याला किरणच्या वडिलांचा रागही येत असे पण राग व्यक्त करता येत नव्हता.राग व्यक्त करणं म्हणजे तिच्या वडिलांचा अनादर करणं शिवाय उभं भांडणं अंगावर घेण्यासारखं होतं.सूर्याला असा व्यवहार कधीच करायचा नव्हता.किरणच्या वडिलांचं मन द्वेषानं नव्हे तर प्रेमानं जिंकायचं होतं.तो ते जिंकणारच असा सूर्याचा आत्मविश्वास होता.त्याच दिशेने त्याची पाऊले पडत असे.
       काही महिन्याच्या फरकाने सूर्या पुन्हा किरणच्या भेटीसाठी प्रयत्न करू लागला.भेटी दरम्यान घडलेला सर्व प्रकार तिच्यासमोर मांडायचा होता.त्यासाठी त्याने शर्तीचे प्रयत्न चालविले.पण किरणची भेट काही केल्या होत नव्हती.पूर्वी प्रमाणे किरणच्या घराकडे ये-जा पण करता येत नव्हतं.बदनामी आणि किरणच्या वडिलांना हे सगळं प्रकरण अवगत झालं तेव्हापासून किरणच्या घराकडे घिरट्या मारणं नक्कीच उचित नव्हतं.म्हणून मध्यंतरीच्या काळात किरणला भेटण्यासाठी त्याच्या कडून पूर्वीप्रमाणे प्रयत्न केला जात नव्हते.म्हणूनच किरणच्या वडिलांना प्रकरणाची माहिती होण्यापूर्वी जे सविस्तर प्रेमपत्र लिहिलं होतं ते प्रेमपत्र तिच्यापर्यंत पोहोचविता आलं नाही.इतरांच्या मार्फत ते प्रेमपत्र तिच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.परंतु त्याचे सर्व प्रयत्न विफल ठरले.म्हणून त्यानं नाईलाजाने आभा वहिणीकडे धाव घेतली.आभा वहिनीला हे सर्व प्रकरण अवगत होतं.माहीत होतं.त्यांनीच वेळोवेळी सूर्याला धीर दिला.आभा वहिनीनं प्रारंभी असं प्रेमपत्र किरण पर्यंत पोहोचविण्याच्या संदर्भात स्पष्ट नकार दिला होता.तस ते योग्यही होत.कारण किरणचे वडील आणि आभा वहिनी यांच्यात बहिण-भावाचं नातं.किरण सुद्धा आभा वहिनीला तोंड भरून मामी म्हणायची.या सर्व नात्याला आभा वहिनीला जपायचं होतं.म्हणून त्या असं प्रेमपत्र पोहचून देण्यास तयार नव्हत्या.शेवटी सूर्याची हवालदिल परिस्थिती बघून अखेर त्या कठोरमनानं तयार झाल्यात.आभा वहिनीसाठी तसं हे धाडसाचं तितकच जिकीरीचं काम होतं.सूर्याचे सर्व प्रयत्न निकामी ठरल्याने आभा वहिनी सूर्याच्या मदतीसाठी पुढे आल्यात.समीरनंही ते प्रेमपत्र पोहोचविण्यासाठी प्रयत्न केलेत.त्याचेही प्रयत्न अयशस्वी ठरलेत.अखेरचा प्रयत्न म्हणून आभा वहिनीची मदत घेतली.आभा वहिनीचे किरणच्या कुटुंबाशी असलेले जिव्हाळ्याचं नातं लक्षात घेता ते प्रेमपत्र किरणला देण्यास आभा वहिनीकडून प्रयत्न करूनही ते पत्र किरणला देण्यास त्यांचं काही धाडस झालं नाही.चार-पाच महिन्यानंतर सानिया ही तिच्या मोठ्या बहिणीच्या गावी गेली असल्याचे सूर्याला समजलं.म्हणून त्यानं दुसऱ्या दिवशी सानियाच्या बहिणीचं गाव गाठलं.त्या गावी सानियाशी फारशी चर्चा करता आली नाही.तशी संधीही मिळाली नाही.परंतु सविस्तर लिहिलेलं ते प्रेमपत्र सानियाच्या स्वाधीन करण्यास यश मिळालं.ते प्रेमपत्र सानियानं किरण पर्यंत पोहोचविलं किंवा नाही याबाबतीत सूर्या आजही दुविधेतच आहे.
    महिन्या मागून महिने जात होते.मध्यंतरीच्या कालावधीत सूर्याची किरण सोबत कधीच भेट घडून आली नाही.किरणच्या भेटीसाठी सूर्या कडून प्रयत्न चालविला पण त्याला काही यश आलं नाही.यश मिळतही नव्हतं.काही महिन्यानंतर सूर्या किरणच्या भेटीसाठी अविरत धावपळ करीत असला तरी किरण कडून त्यासाठी तसा काही प्रयत्न दिसत नव्हता.उलट ती सूर्याला बघून टाळत असे.तिच्या वडिलांना हे सर्व प्रकरण माहित पडल्याने कदाचित ती दडपणाखाली असेल,घाबरली असेल म्हणून ती टाळत असावी असा सूर्याचा समज झाला.जेव्हा जेव्हा त्या दोघांचाही आमना- सामना होत असे तेव्हा तेव्हा किरण सूर्याकडे पाहून न पाहिल्या सारखी करीत होती.सूर्याची नजर चुकवत होती.तत्पूर्वी किरण ज्या ठिकाणी असायची त्या ठिकाणी सूर्या हा क्षणभर पण थांबत नव्हता.त्याचं असं वागणं तिला टाळण्यासाठी नव्हे तर कुणाला संशय येऊ नये वा हेमंत व त्याचे सहकाऱ्यांनी पुन्हा गाजावाजा करू नये हाच त्यामागील हेतू होता.कदाचित किरणलाही सूर्याच्या अशा वागण्याबद्दल वाईट वाटत असावे किंवा गैरसमज झाला असावा.पण असं वागण्याचं सर्व रहस्य त्या सविस्तर पत्रात (जे सानिया मार्फत पाठवलं होतं) उलगडलं होतं.कदाचित सूर्या हा सर्व प्रकार विसरला असेल असाही तिचा समज झाला असावा परंतु सूर्या हा आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत किरणला विसरू शकत नाही इतकं घट्ट प्रेम त्याचं किरणवर आहे हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.परिस्थितीनूरूप सूर्या नाईलाजाने असा वागत होता.कदाचित हाच तिचा गैरसमज असावा.सूर्याचा प्रामाणिकपणा अनं त्याचं काळजातून असलेलं खरं प्रेम करणं हेच त्याच्या प्रेमाच्या अपयशासाठी खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरलं असं त्याला कालांतराने लक्षात आलं.
       उत्तरोत्तर किरण सुद्धा टाळत असल्याचं सूर्याच्या लक्षात येऊ लागलं.किरण त्याला सतत टाळू लागली.दूर दूर राहू लागली.तिच्या अशा वागण्याचं रहस्य सूर्याला काही उलगडत नव्हतं.दिवसेंदिवस ती सूर्यासोबत अधिक तिरस्कारानं अन फटकून वागू लागली.तिच्या अशा वागण्याचं सूर्यालाही आश्चर्य वाटू लागलं.त्याचेही मनात आता शंकेची पाल चूकचुकू लागली.काही महिन्यापूर्वी समीरनं अजय-किरण यांच्या संबंधाबाबत पुसटशी कल्पना दिली होती.त्यावेळेस सूर्यानं "त्या" संबंधाबाबत दुर्लक्ष केलं.अजय आणि किरण यांच्यात असे संबंध असूच शकत नाही असा सूर्याचा ठाम विश्वास होता.समीरचं म्हणणं त्यांनं पूर्णपणे धुडकावून लावलं होतं.काही दिवसानी हीच गोष्ट किरण राखी बांधत असलेल्या तिच्या मानलेल्या भावाने (श्यामने) सुद्धा सूर्याच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला.नव्हे ! शामने खात्रीपूर्वक सांगितलं की,किरण आणि अजय यांच्यात संबंध आहे म्हणून.अजय आणि किरण यांच्या संबंधाबाबत गावातही दबक्या आवाजात चर्चा पसरायला लागली होती.श्यामच्या म्हणण्यावरही सूर्याचा विश्वास बसत नव्हता.श्यामने एकदा नव्हे तर वारंवार त्यांच्या संबंधाबाबत सूर्याला अवगत केलं.पण सूर्यानं श्यामच्या म्हणण्यावर कधीही विश्वास ठेवला नाही.त्याच दरम्यान सूर्याचा जिवलग मित्र गजाहू यानेही अजय आणि किरणच्या प्रेम संबंधाबाबत अवगत करण्याचा प्रयत्न केला.गजाऊ हा केवळ जाणीव करून देऊन थांबला नाही तर गजाहूने सूर्याची समजूत काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला.पण सूर्या हा किरणच्या प्रेमात पूर्णतः वेडापिसा झाला होता.किरणशिवाय त्याच्या दृष्टीत काहीच पडत नव्हतं.त्यातच अजय आणि किरण यांच्यातील नातं.सोबतच त्यांच्या वयातील अंतर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे किरणचा मुळ स्वभावगुण अनं तिचा लाजाळूपणा हे त्याला सत्य मान्यापासून परावृत्त करीत असे.किरण अनं तेही अजय सारख्या माणसासोबत ती प्रेम करूच शकत नाही अशी त्याला पूर्ण खात्री होती.सामाजिक रितीरिवाज,रूढी,प्रथा,परंपरा त्यांच्यातील नातेसंबंध लक्षात घेता समाजही हे नवं नातं कधीही स्वीकारणार नाही.मग अशा स्थितीत किरण ही अजय सोबत असे संबंध प्रस्थापित करण्याचे धाडस करेल का? असा प्रश्नही त्याच्या समोर उभा राहत असे. म्हणून सूर्या हा अजय आणि किरण यांच्यामध्ये संबंध आहे असे मानायला तयार नव्हता.आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिचा मूळ सालस स्वभाव असं सत्य मानू देत नव्हतं.
       गुरुवार दिनांक १० नोव्हेंबर १९९४ चा दिवस.सकाळी १०.४३ वाजताची वेळ.सूर्याची किरणशी चंद्रभागा नदीवर गाठ पडली.किरण ही नदीवर कपडे अर्थात धुणं धुवायला आली होती.तर सूर्या हा नित्यक्रमानं शहराकडे निघाला होता.सूर्याला किरण ही दूरवरूनच दृष्टीत पडली.किरणनं त्यावेळी लाल रंगाचं गाऊन तर सूर्यानं शेवाळी रंगाचा पॅन्ट आणि हिरव्या रंगाचं शर्ट घातलं होतं.विशेष म्हणजे ती नदीवर  एकटीच कपडे धुण्यात मग्न होती.आता भेट घडणार ! तिच्याशी संवाद साधता येणार, शंकेच निरसन होणार या आशेने सूर्या अतिशय आनंदी झाला.मनाशी एक स्वप्न घेऊन एक एक पाऊल तो पुढे टाकत असताना त्याच्या मनात कालवा कालवही व्हायला लागली होती.कित्येक महिन्यानंतर ही भेट होणार होती.घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती तिला देऊ असं मनाशी ठरवलं होतं.एक एक पाऊल पुढे टाकत तिच्यापर्यंत पोहोचूनही तिने खालची मान वर केली नाही.कदाचित सूर्या तिच्या दिशेने येत आहे हे तिला अगोदरच ठाऊक असावं किंवा दूरवरूनच सूर्या तिच्या नजरेत पडला असावा म्हणून ती पाहून न पाहल्यासारखी दाखवत होती.कित्येक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर होणारा भेटीचा सुखद आनंद क्षणातच मावळला.तिच्या नजीक जाताच सूर्या निराश झाला.किरणनं सूर्या सोबत बोलण्यास स्पष्ट नकार दिला. सूर्याने तिला प्रश्न केला की, "का ग, तू तर, काहीच बोलत नाही, अनं पाहत सुद्धा नाही".अस म्हणताच तिने वर न बघता खाली मानेनेच उलट सूर्यावर भडकली.अनं प्रश्न केला की, "काय ठेवलं बोलायचं," या शब्दानेच सूर्याचं काळीज फाटलं.दरोडेखोराने दरोडा टाकावा अनं क्षणातच सर्व काही लुटून परागंदा व्हावं अशीच काहीशी सूर्याची गत झाली होती.सूर्याने सत्यता सांगण्याचा प्रयत्न केला पण किरण काही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.क्षणभर बोलण्याचीही तिची तयारी नव्हती.तिने बोलण्यास स्पष्ट नकार देऊन यापुढे कसल्याही प्रकारचा व्यवहार वा संबंध न ठेवण्याचं ठणकावून सांगितलं.इतकेच नव्हे तर घडलेल्या सर्व प्रकारास सूर्याच जबाबदार असल्याचं आवर्जून सांगितलं.बदनामीचं सर्व खापर तिनं सूर्याच्या डोक्यावर फोडलं.जे काही घडलं त्यासाठी केवळ सूर्याच जबाबदार आहे असं म्हणून ती मोकळी झाली.या सर्व संवादा दरम्यान तिनं एकदाही खालची मान वर केली नाही.सूर्यावर साधी एक नजरही टाकली नाही.त्यावेळी सूर्याची काय अवस्था झाली असेल याची कल्पना न केलेली बरी.सूर्या शेवटपर्यंत प्रामाणिक राहूनही त्याला कायम दूर राहण्याच्या किरणच्या निर्णयाने सूर्या पूर्णपणे कोसळला.सूर्याचं काही एक न ऐकता कायमस्वरूपी तिच्या आयुष्यातून निघून जाण्याचा  निर्णय तिनं का घेतला असेल याबाबतीत सूर्या आजही दुविधेतच आहे.
"गुरुवार दिनांक १० नोव्हेंबर १९९४ या दिवशीची भेट सूर्यासाठी अखेरची ठरली !!!"

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...