Skip to main content

आजही दुविधेतच----भाग:-आठ

*आजही दुविधेतच.....!!!*
*भाग आठ*
       किरणनं सपशेल नाकारनं सूर्याला काही पचलं नाही.त्याच्यासाठी हा जबरदस्त धक्का होता.त्या धक्क्यानं तो अधिकच भरकटला.दिवसेंदिवस तो कसा दिवस काढतो हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं.योग्य-अयोग्य समजण्यास त्याची नक्कीच गफलत झाली हे त्याला कळून चुकलं होतं.सोबत असताना ती त्याच्या आयुष्यात चंद्रप्रकाशाप्रमाणे अंधारावर मात करावी तसेच तिनं त्याच्या मनाच्या वेदनेवर हळुवार फुंकर घालून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत साथ देण्याचं अभिवचन दिलं होतं.आयुष्यभर साथ निभावण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या.आता तिचेच शब्द तिला आठवत नाही.तिनं दिलेल्या वचनाची पूर्ण वाट लावली अनं त्याला वाऱ्यावर सोडून गेली.सूर्यानं कळत-नकळत तिच्या संगतीनं आयुष्य घालविण्याचं स्वप्न बघितलं होतं.क्षणिक स्वप्नाच्या नादात तो चांगल्या दिवसाला कायमचा मुकला होता.एका कवीच्या शब्दात सांगायचे झाल्यास....

     "गुन्हा माझा नाही
      मी प्रेम तुझ्यावर केले 
      माझ्या काळजातल्या दुःखे
      तुला कधी नाही समजले"

          तिच्या आठवणीत रमताना ती आता कधी साथ देईल अशी अपेक्षा करणं शक्य नव्हतं.सर्व काही अवघड होऊन बसलं होतं.किरणच्या आठवणी आणि विरहातून तो काही केल्या बाहेर पडत नव्हता.त्याचा जीव तिच्यातच गुंतला होता.पूर्वीचा आनंदी-उत्साही सूर्या हा कधीचाच हरविला होता.तब्बल पाच वर्षाचा कालखंड उलटूनही सूर्यात फारसा काही फरक पडला नाही.तो कसा राहतो,कसा वागतोय हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं.तिच्या प्रेमात तो पूर्ण वेडापिसा झाला होता.त्याचं भविष्यच अंधारात अडकलं होतं.तो यातून कधी बाहेर पडणार ही आशा मावळल्यागत झाली होती.आशेचा किरण मात्र दृष्टीत पडत नव्हता.त्याचं संपूर्ण आयुष्य अंधारकामय झालं होतं.किरणच्या भेटीसाठी दिवसरात्र तडफडत होता.अशातच २६ जून १९९९ ला किरणची वर्गमैत्रीण सुप्रियाचं लग्न ठरलं होतं.सुप्रियाच्या भावाकडून सूर्याला सुद्धा त्या लग्नाची पत्रिका मिळाली होती.हा लग्न सोहळा तालुक्याच्या ठिकाणावरील एका प्रसिध्द मंदिरात होणार होता.या निमित्ताने किरणला भेटण्याची संधी त्याच्याकडे चालून आली होती.ही संधी तो दवडण्याच्या मानसिकतेत नव्हता.हे लग्न दोघांच्याही नातेसंबंधातील नव्हतं.दोघांनाही कुणी ओळखत असेल किंवा त्यांचे प्रेम प्रकरण माहीत असलेल्या व्यक्तीची संख्या नसल्यात जमा होती.सूर्याला अशीच संधी हवी होती.म्हणून सूर्या लग्नाचे दिवशी सकाळीच वधू लग्नमंडपी उपस्थित झाला.लग्नाला येणाऱ्या पाहुणे मंडळीकडे लक्ष ठेवू लागला.त्यात तो किरणला शोधू लागल.पण ती काही त्याच्या नजरेत पडत नव्हती.काही वेळातच लग्नमंडप (मंदिर) गचागच भरला पण तेव्हाही किरण काही त्याच्या नजरेत पडली नाही.मात्र तिचे वडिल आणि तिचा नवरा हे दोघेही त्याच्या नजरेतून सुटले नाही.नव्हे ते दोघेही लग्न मंडपी (मंदिरात) अगोदरच पोहोचले होते.सूर्या त्यांच्या नजरेत पडणार नाही अशा ठिकाणी उभा राहिला.सूर्या त्यांची नजर चुकवू लागला.काही वेळात लग्न सोहळा पार पडला. जेवण वगैरे आटोपून तिचे वडील आणि तिचा नवरा हे दोघेही लग्न स्थळावरून बाहेर निघून गेलेत.पण किरण ना विवाहाच्या वेळी,ना जेवणाच्या वेळी त्याच्या दृष्टीत काही पडली नाही.एवढं मात्र खरं की सुप्रिया-किरण यांच्यातील मैत्री बघता किरण ही लग्नाला येणारच याबाबत त्याला पूर्ण खात्री होती.पण ती दिसत नसल्याने तो काहीसा हिरमुसला.त्याचा जीव खाल-वर व्हायला लागला.कारण अशी संधी कित्येक वर्षांनी मिळाली होती.ही संधी त्याला दवडायची नव्हती.नव्हे त्यानं तिचे वडील व तिच्या नवऱ्याची नजर चुकवून किरणला भेटण्याचं ठरविलं होतं.सूर्याच्या समोर तिचे वडील आणि नवरा लग्न स्थळावरून बाहेर गेल्याने त्याची भीती कमी झाली होती.म्हणून तो किरणला शोधू लागला.पण ती काही केल्या त्याच्या नजरेत पडत नव्हती.नवरीच्या बिदाईची वेळ झाली.चार वाजून पस्तीस मिनिटांनी नवरी मुलगी जाण्याच्या वेळी नवरी मुलीच्या पाठोपाठ किरण सुद्धा मुख्य हॉलमध्ये प्रवेशली.किरणला बघून सूर्याचा जीवात जीव आला.त्याचवेळी सूर्या-किरणची एकमेकांशी नजर भेट झाली.तिला बघताच सूर्या तसा अवाक झाला.कारण सूर्या सकाळपासून लग्नमंडपी (मंदिर) हजर होता.दिवसभरापासून तिचा शोधाशोध करूनही ती त्याला काही दिसत नव्हती.कदाचित ती लग्नात आली नसेल असंही त्याला वाटू लागलं होतं.पण ती अचानक दिसतात त्याचा चेहरा आनंदाने फुलला.तब्बल पाच वर्षानंतर ही भेट होणार होती.विशेष म्हणजे त्यांच्या भेटीत कुणी बाधक ठरेल असं त्या लग्नात कुणीच उपस्थित नव्हतं.सूर्या अनं किरण हे दोघेही एकमेकांवर नजर फिरवीत होते.तिचे हावभाव/ व्यवहारावरून तिलाही सूर्याला भेटण्याची उत्सुकता दिसत होती.सूर्या तर मुद्दाम तिलाच भेटण्यासाठी आला होता.लग्न हे त्याच्यासाठी माध्यम होतं.तिच्याकडून आज पर्यंत सूर्या सोबत झालेला व्यवहार लक्षात घेता सूर्याच्या मनात राग तर भरलेला होता पण ती तब्बल पाच वर्षानंतर भेटणार असल्याने आनंदही तितकाच होता.सूर्याला तिच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरे घ्यायची होती.पण त्यांनं राग आणि भावनेला आवर घातला. तिच्यासमोर उत्साहीपणा दाखविला.सूर्याला किरण कडून अपेक्षित प्रश्नाची उत्तरे मागवून प्रतीक्षेनंतरची सुखद भेट ही दुखद करायची नव्हती.तिला दुखवायचं पण नव्हतं.म्हणून त्यांनं सर्व राग तसेच त्याला होणाऱ्या वेदना/यातना बाजूला सारून आनंदाने भेटण्याचं ठरविलं.म्हणून तो ती असेल त्या ठिकाणी वारंवार घिरट्या मारू लागला.त्यांच्या प्रेमप्रकरणाची पूर्वकल्पना असणारे व ज्यांच्या समोर भेटल्यामुळे तिच्या वैवाहिक जीवनात अडथळा येणार नाही याबाबतची काळजी घेत तिला भेटण्याचा प्रयत्न करू लागला.ओळखीतील वा तिच्या आजूबाजूला कुणी नाही अशा संधीची तो वाट पाहू लागला.अशातच चार वाजून पस्तीस मिनिटांनी नवरी मुलगी सासरी जाण्याची (बिदाई) वेळ.नवरी मुलगी आप्तस्वकीयांना नमस्कार करीत आशीर्वाद घेऊ लागली.तसं संपूर्ण वातावरण हे भावनिक झालं होतं.मुख्य हॉलमध्ये नवरी पाठोपाठ किरणने सुद्धा नवरी सोबत प्रवेश केला.त्याचवेळी दोघांचीही थेट नजर भेट झाली.यावेळी तिचा पती आणि तिचे वडील सुद्धा लग्न मंडपी हजर नव्हते.सूर्याच्या मनात रागाचा भडका होता पण त्यांनं रागावर नियंत्रण ठेवलं.किरणही तिच्या छोट्या मुलीला घेऊन नवरी मुलीच्या आजूबाजूला होती.सूर्याला बघताच ती सुद्धा विचलित झाली.सूर्याला भेटण्याची तिच्याही मनात तीव्र इच्छा अनं उत्सुकता प्रकर्षाने दिसली.पाच वर्षाच्या काळात बरच काही बदलं होतं.विरहात रमलेल्या सूर्याप्रती तिलाही कदाचित सहानुभूती वा भेटण्याची आतुरता वाटत असावी. म्हणूनच ती नवरी मुलीची साथ सोडून मुख्य द्वाराजवळ आली आणि काही वेळ उभी राहिली.कदाचित कुणी ओळखीचे नसल्याची खात्री करून नेमके कुठे उभे राहायचे जेणेकरून सूर्याची भेट घडून येईल किंवा सूर्याला तिच्याजवळ येता येईल अशीच काहीशी ती विचार करत असावी.तिच्या मनात होणारी घालमेल सूर्याच्या लक्षात यायला लागली.तिनं मुख्य द्वारावरून संपूर्ण हॉलवर नजर फिरवली आणि अलगदपणे एका कोपऱ्यात जाऊन बसली.तिची अप्रत्यक्ष नजर ही सूर्यावर होती.कदाचित सूर्याला भेटण्यासाठी संधी मिळावी म्हणून ती एका कोपऱ्यात जाऊन बसली पण तिनं तशी सूर्याला जाणीव होऊ दिली नाही.सूर्यानं त्याच्या रागावर नियंत्रण ठेवून अखेर किरणला गाठलं. तिच्याजवळ जाताच तिचे कुशीत असलेल्या तिच्या मुलीला सूर्यानं कडेवर घेतलं.त्या लहानग्या मुलीसाठी सूर्या नक्कीच अनोळखी होता.म्हणून इतर लहान मुला-मुली प्रमाणे ती सुद्धा आरडाओरडा करायला लागली.तिच्या लेकीला सूर्यानं गोंजाारलं,लाड केला अनं काही वेळाचे फरकाने तिला तिच्या आईकडे सुपूर्द केलं.तत्पूर्वी किरणला उद्देशून तो लहानग्या मुलीला म्हणाला की, " हे बाळा ! तुझ्या आईप्रमाणे तुला पण माझा सहवास नकोसा वाटतो का? तुझ्या आईला मी तर बरेच बरे,पण माझी सावली सुद्धा आवडत नाही" असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मुलीला उद्देशून केलेत.हे शब्द त्या चिमुकलीसाठी नव्हे तर तिच्या आईसाठी होते.सूर्याचा तिचे मुलीशी संवाद चालू असताना आणि लाड करीत असताना किरण धीर गंभीर झाली आणि सूर्याकडे एकटक बघू लागली ! ती त्याला मनोमन न्याहाळत होती.आता तिच्या व्यवहारात/वागण्यात बराच काही सकारात्मक बदल झाला होता.सूर्याप्रती आत्मीयता/सहानुभूती अनुभवाला येत होती.तिच्या मुलीला कुरवाळत व लाड करीत असताना सूर्या सुद्धा किरणला न्याहाळत होता.त्याच्यासाठी हा सुखद क्षण होता.चर्चे दरम्यान दोघेही धीर गंभीर व्हायला लागलीत.एकमेकांकडे पाहण्या व्यतिरिक्त त्या दोघांच्याही तोंडातून शब्दही बाहेर पडत नव्हता.कुठुन बोलण्याची सुरुवात करायची असाच प्रश्न कदाचित दोघांनाही पडला असावा.काही वेळाने त्यांच्यातील शांतता भंग झाली.दोघेही आपापल्या जीवनातील/ आयुष्यातील प्रसंग एकमेकांना सांगू लागलेत.प्रेम प्रकरणावरही संवाद,प्रश्नोत्तरे व्हायला लागलीत.सूर्याने त्याला होणाऱ्या वेदनाना मनातल्या-मनात लपवून सुखी समाधानी असल्याचं किरणला सांगू लागला.तसंच किरणही तिचं मत सूर्यासमोर मांडू लागली.पण ती स्वतःच असं मत व्यक्त करतानाच एकाएकी शांत झाली अनं अंतरंगात शिरली.सूर्याच्या अचानक प्रश्नाने ती भानावर आली.तिच्या मनात असलेली घालमेल ती लपवू शकली नाही.सूर्याच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ती सावधपणे देऊ लागली.तिच्या मनातील राग आणि तळमळही लपून राहिली नाही.अशातच सूर्याने अचानक किरणला प्रश्न केला की, "तुझ्या पतीचा तुझ्याशी व्यवहार कसा काय आहे? " ती पतीच्या व्यवहाराप्रती एकदम सुखी,समाधानी,आनंदी असल्याचं सांगितलं.सूर्याने तिला पुन्हा प्रश्न केला की, "तुझ्या मनात/हृदयात माझ्यासाठी थोडीशी तरी जागा शिल्लक आहे का? किरण हसत हसतच म्हणाली,"अजिबात नाही" आता कशासाठी सहानुभूती,आत्मीयता व आपुलकी ठेवायची? अशा प्रकारची उत्तरे देत सुर्याची समजूत काढायला लागली.किरणच्या उत्तराने तो नाराज झाला पण निराश झाला नाही.त्यालाही असंच उत्तर अपेक्षित होतं.लग्नानंतर कोणत्याही पत्नीनं आपल्या पतीप्रति कायम प्रामाणिक राहावं.यात किरणचं काही एक चुकलं नव्हतं.तिनं असाच समजूतदारपणा सूर्याला नाकारताना दाखविला असता तर तो असा भरकटला नसता.त्याचं भविष्य/आयुष्य विस्कळीत झालं नसतं.सूर्यानं प्रसंगावधान साधून मूळ प्रश्नाला हात घातला आणि म्हणाला की, "तू मला,एकाएकी का नाकारलं? मला माझी बाजू मांडण्याची संधी का दिली नाही? या प्रश्नांनं किरण जरा संभ्रमित झाली.गोंधळात पडली.तिने तात्काळ प्रश्नाचं उत्तर देण्याचं टाळलं.कदाचित तिच्याकडे अपेक्षित असं उत्तर नसावं किंवा अल्प वेळेत उत्तर देणं शक्य नसावं.अखेर तिने स्वतःला सावरलं.अनं सूर्यावर एकदम भडकली अनं कणखरपणे उत्तरे देऊ लागली.तु मला काय दिलं? "बदनामी !" केवळ बदनामीच ना ! संपूर्ण बदनामीसाठी तूच जबाबदार आहे.कानाकोपऱ्यात बदनामी घडवून आणली.जो तो तुझे आणि माझे नाव एकमेकांशी जोडून अपमानित करायचे.चिडवायचे.हे सर्व एवढ्यावरच थांबलं नाही तर ही बाब माझ्या वडिलांपर्यंत जाऊन पोहोचली.सगळी कडे झालेल्या बदनामीने मला कुठेच तोंड दाखवायला जागा शिल्लक ठेवली नाही.इतकेच नव्हे तर घराबाहेर पडणंही अवघड झालं होतं.हेच का तुझं प्रेम? हीच अपेक्षा होती का तुझ्याकडून? शाळेला जा की, घराबाहेर पडा,वेळोवेळी अपमान अनं चिडवनचं! केवळ तुझ्यामुळे हा सर्व अपमान सहन करावा लागला.अशा एक ना अनेक प्रश्नांचा भडिमार तिनं सूर्यावर केला.नव्हे तिनं सूर्याची चांगली खरडपट्टी काढताना म्हटले की,कशी संधी देणार तुला? संधी देण्यासाठी काही शिल्लक ठेवलं होतं का? अजून जास्तीच्या बदनामीसाठी संधी द्यायची होती का? सूर्यानं तिचं सर्व म्हणणं मूकपणे ऐकून घेतलं.तिनं सूर्याची बोलतीच बंद केली.सूर्याकडे तिनं केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर अशी उत्तरे होती.पण त्यांनं वेळेचं गांभीर्य ओळखून ऐकून घेणेच पसंत केले.एवढे मात्र खरे की, किरणने सूर्याला बदनामी साठी पूर्णपणे कारणीभूत ठरविलं होतं.तिला समर्पक उत्तरे देण्यासाठी त्याच्याकडे तितका वेळ नव्हता.त्यातही त्याला पाच वर्षाच्या प्रतिक्षेनंतरची सुखद भेट ही दुखद करायची नव्हती.त्याचे म्हणणे ऐकण्यासाठी वा कैफियत मांडण्यासाठी त्याला स्वतंत्र वेळेची अपेक्षा आहे.त्यानं स्वतःला सावरून तिचं म्हणणं ऐकून घेतलं.तिला प्रतिउत्तर देणं आणि दुखविण्याचं टाळलं.नियोजित भेटीत त्याला सर्व काही व्यक्त करायचं असं ठरविलं. वादळी संवादाने संपूर्ण वातावरण तापलं होतं.काही वेळानं तिनही स्वतःला सावरून घेतलं.विषय बदलवून ती सूर्याला म्हणाली की, "बरं जाऊ दे, तू कधी लग्न करणार आहेस?" तिच्याकडून अनपेक्षित लग्नाच्या प्रश्नाने सूर्या विचलित झाला.अनं शांतपणे उदगारला, काय सांगाव,कधी होणार तर......! पुन्हा किरण म्हणाली, "अरे वा ! तुझं स्वतःचं लग्न केव्हा होणार आहे,हे तुला ठाऊक नाही ! कमालच आहे बा तुझी.......!" सूर्या म्हणाला, "तूच तर माझेवर विश्वास ठेवला नाही.इतर दुसरी मुलगी माझेवर विश्वास ठेवणार का?" किरण शांत झाली आणि म्हणाली, "नाही बाबा,तुला तर खूप चांगली आणि सुंदर मुलगी मिळेल !" सूर्या म्हणाला,"मला सुंदर मुलगी नको,सुंदर विचाराची मुलगी हवी? सुंदरतेवर विश्वास ठेवायचा कसा.....! मी तर तुझ्या सुंदरतेपेक्षा तुझ्या निर्मळ मनावर/ स्वभावावर ......!" मध्येच तिनं सूर्याचं म्हणणं खंडीत करीत म्हणाली,"सुंदरतेवर प्रेम नव्हते तर ......! असा प्रतिप्रश्न केला".सूर्या तिला सुंदरतेची भाषा समजावू लागला.त्याच्या मनातील भावना सांगू लागला.त्याचं सर्व म्हणणं ऐकून ती निरुत्तर व्हायला लागली आणि एकटक त्याच्याकडेच पाहू लागली.त्याचं म्हणणं ऐकता ऐकता ती सूर्याला म्हणाली,"जाऊ दे,तू माझ्या........ लग्न करून घेणे".तिचा हा प्रश्न सूर्याच्या काळजात घुसला.त्याला अपेक्षित असाच प्रश्न तिचेकडून आला.यासोबतच पुढील काही बाबी तिने सूर्या समोर मांडल्यात.तिच्या मुलीचं नाव "प्रेरणा" असल्याच सांगितलं.तिने अजय सोबत लग्न करण्याच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केलं.सूर्यानं तिच्याकडे पुन्हा भेटीचा आग्रह धरला पण तिनं अडगळीत उत्तर दिलं.तिचे त्याच्याकडे असलेले प्रेमपत्र व फोटो परत करण्याचा आग्रह केला.मात्र किरणनं हे सर्व नाकारलं."तुझ्यासोबत मी कसल्याच प्रकारचा पत्रव्यवहार केला नाही, तुझ्यात नं माझ्यात कसल्याही प्रकारचे संबंध सुद्धा नव्हते" असं मत व्यक्त करून पुन्हा नियोजित भेट घेण्यास स्पष्ट नकार दर्शविला.पुन्हा आता आपली भेट होणे शक्य नाही.यापुढे आपला संबंध काय? असा प्रतिप्रश्न केला.पाच वर्षानंतरच्या प्रतीक्षेतील भेटीतही समर्पक उत्तराभावी तो दुविधेतच राहिला. 
        प्रतीक्षेनंतरची ही भेट सूर्यासाठी तशी आनंददायी ठरली.अनपेक्षितपणे भेट घडून येईल असं वाटलं नव्हतं पण भेट घडून आली.या भेटीत पूर्वीपेक्षा एक विशिष्टपणा होता.प्रथमच एकमेका प्रति उत्सुकता अनं आदर होता.बोलण्यात मनमोकळेपणा होता.सूर्याप्रति जिव्हाळा अनं स्नेह होता.विशेष म्हणजे या भेटीच्या वेळी तिच्या मनात भीतीचा लवलेशही नव्हता.नाराजी नव्हती.कदाचित असली तरी व्यक्त केली नाही.यापूर्वी ती भेट टाळायची.दूर दूर पळायची.यावेळी मात्र उलट परिस्थिती होती.सूर्यासोबत भेट व्हावी म्हणून ती नवरीला सोडून हॉलच्या एका कोपऱ्यात जाऊन बसली जेणेकरून सूर्याला तिच्याकडे येता येईल वा बोलता येईल.तिच्या बाजूला दोन मुली बसल्या होत्या.त्या सर्व काही ऐकत होत्या.पण त्याच्याकडंही तिनं दुर्लक्ष केलं.त्या दोघात त्यांच्या प्रेमाची चर्चा रंगली.ती सर्व भान हरवून मनमोकळेपणाने बोलू लागली.तिचा पती आणि तिचे वडील लग्नस्थळी नसल्याची तिनंच जाणीव करून देत बाहेर गेल्याचे सांगितलं.भेटी दरम्यान तिच्या बोलण्यात-वागण्यात प्रत्यक्षपणे जिव्हाळा,प्रेम अनं आपुलकी व्यक्त केली नसली तरी आजही तिच्या अंतर्मनात सूर्या असल्याची जाणीव करून गेली.या भेटीत तिच्यात आत्मविश्वास होता.याउलट सूर्याच्या मनात नेहमीप्रमाणे भीती होती.कदाचित तिचे वडील आणि नवऱ्याच्या नजरेत पडले तर....! अशी भीती होतीच.तिच्या वैवाहिक जीवनात वादळ निर्माण होऊ नये,तिला त्रास होऊ नये हाच त्यामागे हेतू होता. तिच्यासोबत बोलत असताना त्याची एक नजर ही रस्त्याच्याच दिशेने राहायची.या भेटीदरम्यान सूर्यानं तिला ठामपणे सांगितलं की, "तुझ्यावर माझे निस्सीम प्रेम आहे आणि ते आजन्म राहील." वेळेचे भान राखून भेट संपविली आणि जड अंतकरणाने तिचा निरोप घेतला--!
         किरणची वर्ग मैत्रीण सुप्रियाच्या लग्नप्रसंगीची भेट ही सूर्यासाठी खऱ्या अर्थाने निर्णायक ठरली.तिच्या सहानुभूतीनं त्याला एकप्रकारे ऊर्जा मिळाली.तो भरकटत चालल्याची तिने जाणीव करून दिली.भविष्यात इतरांसाठी एक आदर्श बनण्याची सूचना केली.सन्मानानं कुणीही नाव घ्यावं असं करून दाखविण्याचा अप्रत्यक्ष शब्द घेतला.बोलण्याच्या ओघात "स्वतःला ओळखण्याचं" "काहीतरी बनण्याचं स्वप्न दिलं" अशा अनेक बाबी तीने संक्षिप्त भेटीत सुचित केल्या.सूर्या तर किरणसाठी काहीही करायला तयार आहे.ती त्याच्या आयुष्यात नाही पण तिचे शब्द त्याच्यासाठी जीवन जगण्याची शिदोरी बनली आहे.त्या दिशेने त्याचे पाऊलही पडायला लागलेत.त्या भेटीपासून सूर्यात आमूलाग्र असा बदल व्हायला लागला.नैराश्याला त्यांनं गाडून टाकलं.सूर्यामधील अचानक बदल बघून अनेकांना आश्चर्य वाटू लागलं.आता नव्या सूर्यानं जन्म घेतला होता.मागे वळून बघायचं नाही,पुढे जाण्यासाठी कधी थांबायचं नाही असंच त्यांनं ठरवून घेतलं.विशेष म्हणजे या भेटीतून त्याला जगण्याची दिशा गवसली.निराजनक आयुष्याला "आशेचा किरण" मिळाला.शिक्षणात घटांगड्या खात असलेला सूर्या तदनंतरच्या काळात यशाच्या दिशेने निघाला.परिणामतः त्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरायला लागलं.
        कालांतराने किरणच्या वडिलांच्या मनातील रागही दिवसेंदिवस कमी व्हायला लागला.दरम्यानच्या कालावधीत किरणचे वडील आजारी असल्याचं समजलं.(कदाचित एक्सीडेंट) त्यांना तालुक्याच्या ठिकाणी शासकीय दवाखान्यात भरती केलं होतं.त्याच्या भेटीसाठी गावातील अधिकांश मंडळी भेटीला यायला लागलीत.सूर्याच्या मनात भीती असूनही त्याच्या भेटीला जाण्याची इच्छा व्हायला लागली.पण भेटी प्रसंगी तिचे वडील आपला पानउतारा तर करणार नाही ना ! शेवटी परिणाम काहीही होवो भेटीला जायचं असं ठरवलं. त्यासाठी सूर्या दोन-चार वेळा दवाखान्यापर्यंत पोहोचला पण भेटीसाठी दवाखान्याच्या आत जाण्याचं धाडस काही झालं नाही.अखेर तो दवाखान्यात पोहोचला.किरणचे वडील हे पलंगावर रेटले होते.आजूबाजूला गावातील काही मंडळी बसली होती.सूर्या हळूच पलंगाच्या बाजूला एका कोपऱ्यात हात गुंडाळून उभा राहिला.तशी मनात भीती होतीच.अचानक तिच्या वडिलांनी सूर्याकडे नजर फिरवली.सूर्या घाबरला.तिच्या वडिलांनी सूर्याकडे नजर फिरवीत " ये रे बाबू , बैस" असा प्रेमाने आवाज दिला.अनं सूर्यानं सुटकेचा श्वास घेतला.तेव्हापासून किरणचे वडील सूर्याला कधी वाईट बोलले नाही.आजही बोलत नाही.उलट त्यांची इज्जत करतात.मानसान्मान करतात.चार चौघात कौतुक करतात.सूर्या इतका गावात/परिसरात चांगला अनं मेहनती मुलगा नाही असे सर्वांना अभिमानाने सांगतात.अखेर कणखर आणि तापट स्वभावाच्या किरणच्या वडिलांचं मन जिंकण्यास सूर्या यशस्वी झाला.आपल्या स्वभाव गुणांनं त्यांचं मत परिवर्तन घडविलं अनं आपलंसं करून घेतलं.
        किरणला विसरण्याचा प्रयत्न करूनही तो काही तिला विसरू शकला नाही.आजही तो तिच्या आठवणीत रमतो.सूर्याला किरणची आठवण येणं ही काही त्याच्यासाठी नवीन बाब नाही.किरणनं सूर्याची कधीचीच साथसंगत सोडली.ती त्याला आता कधीच मिळणार नाही वा भेटणार नाही हे त्याला चांगलं ठाऊक आहे.तरीही तो आजही तिच्या प्रेमात वेडापिसा आहे.म्हणूनच "मनी असे ते स्वप्नि दिसे" हे काही खोटं नाही.किरण ही प्रत्यक्षात त्याच्यासोबत नाही पण कधी कधी ती त्याच्या स्वप्नात सोबत राहते.म्हणूनच तर ती त्याच्या बरेचदा स्वप्नात अवतरत असते.अशीच ती १ सप्टेंबर २००० रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्याच्या स्वप्नात आली.त्याचबरोबर शुक्रवार दिवस असल्याने दूरदर्शनवर "हकीकत" हा सिनेमा सुरु होता.तो सिनेमा बघून सूर्याला किरणची आठवण झाली.म्हणून त्याला झोप काही येत नव्हती.असे अनेकदा त्याच्या बाबतीत घडतेय.त्या दिवशी किरण त्याच्या स्वप्नात आली.सूर्या सूटबूट घालून एका शासकीय कार्यक्रमासाठी रवाना झाला होता.त्या शासकीय कार्यालयाच्या परिसरात किरणचं घर होतं.आजूबाजूला कुणी ओळखीचं नसल्याची खात्री करून तो किरणच्या घरात शिरला.सूर्याला बघून किरण थबकली आणि कावरी बावरी होऊ लागली.त्यावेळी तिच्या घरी ती आणि तिची मुलगी (दहा-बारा वर्षाची) या दोघीच घरी होत्या.सूर्याला बघून तिला आश्चर्य वाटलं आणि त्याच्याकडे तिरस्कारानं बघितलं.सूर्यानं तिची वाट न बघता पाणी पिण्यासाठी पाण्याच्या माठाजवळ पोहोचला.तो पाणी घेत असताना तिनं त्याला रोखलं.तिचं असं वागणं सूर्याला खटकलं.ती पूर्णतः घाबरली होती.सूर्याला तिच्या वागण्याचं आश्चर्य वाटू लागलं.ती सूर्याला समजावण्याच्या प्रयत्नात असताना तिची नजर मात्र दरवाज्याकडेच खिळवून होती.ति दूर दूर अंतरापर्यंत नजर फिरवित होती.तिच्या अशा वागण्याचं रहस्य मात्र त्याला काही कळत नव्हतं.तिने सूर्याला माठातील पाणी घेऊ दिलं नाही म्हणून सूर्या तिला उपाहासनं म्हणाला की,"आजही तुमच्या घरी बाट आहेच वाटते".सूर्याच्या अशा बोलण्याचा तिला प्रचंड राग आला.पण तिने व्यक्त केला नाही.त्याला तिच्या वागण्याचं नवल वाटायला लागलं.बराच वेळ पर्यंत दोघात वादळी संवाद झाला. तदनंतर लगेच तो घरातून बाहेर पडला.नंतर त्याला समजलं की,किरणचा पती हा तिच्या घराच्या काही अंतरावरच नोकरीवर असल्याचं समजलं.सूर्याच्या कारणावरून तो तिला त्रास देतोय.विवाहपूर्वी सूर्या आणि किरण यांच्यातील संबंधामुळे दोघात नेहमीच खटके उडतात.सतत वादविवाद होतात.अजय तिला टोचून टोचून बोलतोय आणि प्रसंगी मारझोड पण करतोय.किरण सूर्या सोबत अशी का वागतोय याचं रहस्य आता त्याला उलगडलं होतं.त्या भेटीदरम्यान तिच्या चेहऱ्यावर अजिबात हास्य नव्हतं.चेहरा पूर्णपणे कोमेजलेला अनं निस्तेज होता.गोरा वर्ण काळ्या-सावळ्या वर्णात परावर्तित झाला होता.हे सर्व बघून आणि ऐकून सूर्याला कसंतरी वाटायला लागलं होतं.हा सर्व प्रकार स्वप्नात होता प्रत्यक्षात नाही.( निष्कर्ष :- सूर्याच्या नावाने अजय हा किरणवर संशय घेत असावा आणि तिचा मानसिक छळ करीत असावा.)
     असंच स्वप्न ४ फेब्रुवारी २००१ च्या मध्यरात्री पडलं. किरण ही सूर्याच्या स्वप्नात आली.भूतकाळात घडलेले संपूर्ण प्रेमप्रकरण अनं काही निवडक प्रसंग एकमेकासमोर व्यक्त करू लागलेत.सूर्या सोबत असलेले नाते आणि तिच्या विवाह संदर्भात जो काही प्रसंग घडला त्या बाबतीत तिचं मत सूर्यासमोर मांडलं.हे सर्व प्रत्यक्षात नाही तर स्वप्नात होतं.(निष्कर्ष- तिचे लग्न प्रसंगासाठी अनेक बाबी कारणीभूत असाव्यात)
       अभ्यासापासून दुरावलेला सूर्या हा किरणची भेट झाली तेव्हापासून अभ्यासात चांगलाच रमायला लागला.आश्चर्याची बाब म्हणजे त्याच वर्षी त्यानं पदव्युत्तर परीक्षाही उच्च श्रेणीत उत्तीर्ण केली.त्याच पात्रतेच्या भरवशावर त्याला एका ठिकाणी तात्पुरत्या नोकरीची संधी चालून आली.आगामी शैक्षणिक वर्षात तो त्या ठिकाणी रुजू पण होणार होता.पण दुर्दैवाची बाब म्हणजे तो नोकरीत रुजू होण्यापूर्वीच त्याचा २५ मे २००१ रोजी भयानक असा एक्सीडेंट झाला.एक्सीडेंट मधून त्याचा जीव वाचणार की नाही अशी संभ्रमावस्था होती.अपघातातून तो काही वाचणार नाही अशी चर्चाही सर्वदूर पसरली होती.सुदैवाने तो त्या अपघातातून वाचला पण एका पायाने कायमचा पंगू झाला.पायाचे ऑपरेशन झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला काही महिने बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिला.म्हणून तो नोकरीत रुजू होऊ शकला नाही आणि हाती आलेल्या नोकरीला मुकला.
        सूर्याचा अपघात झाला त्यावेळी संपूर्ण गाव हळहळलं होतं.त्याचा जीव वाचावा म्हणून गावातील लहान मुलांनी हनुमानजीच्या मूर्तीला पाणी घातलं होतं.अर्थात त्याचा जीव वाचावा म्हणून लहान मुलांनी एकप्रकारे हनुमानजीकडे साकडे घातले होते.विशेष म्हणजे सूर्याचा अपघात आणि त्याची परिस्थिती बघून संपूर्ण गाव त्याच्या मदतीला धावलं.त्यात किरणचा पती अजय सुद्धा होता.गंभीर अवस्थेत दवाखान्यात नेतेवेळी गावातील इतर मंडळी सोबत अजय सुद्धा त्यात सहभागी होता.सूर्यावर प्राथमिक उपचार होईस्तोवर तसेच सूर्या धोक्याच्या बाहेर आहे हे डॉक्टरकडून समजेपर्यंत गावकऱ्यासह अजय सुद्धा दवाखान्यातच थांबला.तेव्हापासून सूर्या आणि अजय यांच्यातील संबंध अधिक दृढ आणि पूर्ववत झाले.सूर्याच्या चांगुलपणानं अजयचही मन जिंकलं होतं.आता त्यांच्यात निखळ मैत्रीचे संबंध आहेत.कदाचित अजयचा सूर्यावर विश्वास आहे म्हणून हे सर्व घडलं असावं.अखेर येनकेनप्रकारे सूर्याला अजयचं मन जिंकण्यास यश मिळालं !.
      अपघातामुळे सूर्या हा आरामासाठी घरीच राहू लागला.प्रारंभी हातात वाकर आणि नंतर हातात काठी घेऊन वावरू लागला.होणारा त्रास लक्षात घेता फिरण्यापेक्षा अधिकांश वेळ तो घरीच राहू लागला.दिवसभर एकांतवास आणि झोप घेणे यापेक्षा वेगळं काही काम नव्हतं.म्हणून त्याला किरणचं अधिक स्मरण होत होतं.कदाचित ती भेटीला येईल असं अपेक्षित होतं.पण सामाजिक बंधनामुळे असं काही घडलं नाही.तिच्या आठवणीतच ०२ सप्टेंबर २००१ रोजी त्याला रात्रीच्या वेळी झोप काही येत नव्हती.तो किरणच्या आठवणीत रमला.वेळोवेळी तिचा चेहरा आणि तिच्यासोबत घालविलेले काही निवडक क्षण आठवू लागला.तिच्या आठवणीत डोळ्याला डोळा काही लागत नव्हता.अशातच किरणकडून प्राप्त झालेले पहिले प्रेमपत्र आणि फोटो त्यांनं जीवापाड जपून ठेवलं होतं.०२ सप्टेंबर २००१ चे रात्री ते प्रेमपत्र आणि फोटो बाहेर काढलं.सलग आठ वर्षापासून ते प्रेमपत्र आणि फोटो जपून ठेवला होता.अपघातामुळे त्याकडे तसं दुर्लक्ष झालं होतं.जेव्हा फोटो आणि प्रेमपत्र बाहेर काढलं तेव्हा ते खराब झाल्याचं आढळून आलं.पावसाळ्याच्या दिवसात त्यावर पाणी गळल्यासारखं झालं होतं.तिच्याबरोबर तिचं आठवणीतील प्रेमपत्र ही हिरावल्या जाणार की काय असं वाटू लागलं.सूर्याने ते पत्र व्यवस्थित केलं आणि पुन्हा पुन्हा ते प्रेमपत्र वाचून काढून स्वतःचं समाधान करून घेतलं आणि पुन्हा फोटो व पहिलं प्रेमपत्र सुरक्षित ठिकाणी ठेवलं.
         मंगळवार दिनांक ०४ सप्टेंबर २००१ च्या मध्यरात्री किरण पुन्हा स्वप्नात आली.स्वप्नामध्ये किरण ही सूर्याच्या घरी आली होती.तिचं एकाएकी घरी येणं सर्वांनाच आश्चर्यचकित करणार होतं.त्यावेळी सूर्या घरी नसला तरी घरातील सर्व मंडळी घरीच होती.किरण सर्वांशी बोलली.चर्चा केली.घरी परतण्यापूर्वी तिनं सूर्याच्या आईला स्वेटरची मागणी केली.कदाचित तिने स्वेटर विणण्याचं अगोदरच सांगून ठेवलं असावं.पण तिला त्यावेळी स्वेटर काही मिळू शकले नाही.तिने स्वेटरसाठी आग्रह धरला.म्हणून सूर्याच्या आईने किरणची समजूत काढून नंतर देणार असल्याचे सांगितले.पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.ती स्वेटरसाठी हट्टी पेटली अनं रागातच घरी परतली.काही वेळाने सूर्या घरी आला अनं किरण घरी आली असल्याचं समजलं.त्यालाही आश्चर्याचा धक्का बसला.त्याला तिच्या रागाचं कारण समजलं.त्यावर पर्यायी व्यवस्था करण्याचं सूर्यानं सुचविलं.हे सर्व स्वप्नात घडलं प्रत्यक्षात नाही.(निष्कर्ष :- कदाचित तिला सुरक्षा कवचाची गरज असावी.) तिचच स्वप्न दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार दिनांक ०५ सप्टेंबर २००१ रोजी पडलं.काहीतरी उत्सवानिमित्त गावातून मिरवणूक निघाली होती.त्यात सूर्याही सहभागी झाला होता.वाजत गाजत मिरवणूक ही किरणच्या घरापर्यंत पोहोचली.किरण तिच्या घराच्या दरवाजातच बसली होती.नेहमीप्रमाणे सूर्याची इच्छा असूनही त्यांनं तिच्याकडे काही बघितलं नाही.किरण सुद्धा त्याची नजर चूकवित न पाहल्यासारखी भासवित होती.कदाचित दोघांनाही एकमेकाकडे पहायचं होतं.पण तसं त्यांनी एकमेकांना  दाखविलं नाही.नजर चुकवून दोघांनीही एकमेकाकडे पाहिलं होतं पण तसं एकमेकांना कळू दिलं नाही.मिरवणुक तिच्या घराजवळून काही अंतरावर गेली.सूर्याला काही राहावयला गेलं नाही.म्हणून त्यांने दूरवरून मागे वळून बघितलं.किरण सुद्धा सूर्याकडे एकटक बघत होती.दूर अंतरावरून सूर्या व किरण हे दोघेही एकमेकांकडे बघत होते.तितक्यातच त्याच स्वप्न भंग झालं.अनं झोपेतून जागी झाला.हे प्रत्यक्षात नाही तर स्वप्नात घडलं होतं.( निष्कर्ष :- दोघांच्याही मनात आजही एकमेकाप्रती आपुलकी, सहानुभूती आणि आकर्षण असावं)
     अशाच प्रकारचे स्वप्न गुरुवार दिनांक ०८ नोव्हेंबर २००१ च्या मध्यरात्री पडलं.हे स्वप्न सूर्यासाठी आनंददायी ठरलं.स्वप्नात सूर्या किरणच्या घरी आला होता.किरणचा पती अजय आणि सूर्या या दोघात कालांतराने सलोख्याचे आणि पूर्वीप्रमाणे मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते.सूर्यानं त्याच्या प्रेमळ अनं मनमिळाऊ स्वभावानं अजयचं मन जिंकलं होतं.अजयला सूर्या-किरणच्या विवाहपूर्व संबंधाबाबतीत सर्व काही माहीत होतं.सूर्याचे किरण सोबत प्रेम संबंध असले तरी भविष्यात किरणला बाधक ठरेल असं सूर्या कधीच वागणार नाही अशी त्याला खात्री पटली होती.म्हणून अजयनं सूर्यावर कधीही अविश्वास दाखविला नाही.त्यामुळे सूर्याचं अजय किरण कडे येणं-जाणं सुरू झालं होतं.अशातच एके दिवशी सूर्या किरणच्या घरी पोहोचला.सूर्यानं तिचा पती अजय बाबत सर्व काही किरण जवळ सांगून टाकलं.तिनं सुद्धा तिच्या पतीचा विश्वास कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला होता.सूर्या तर तिच्या शब्दापलीकडं जाणारा नव्हता.अजयच्या विश्वासाला तडा बसणार नाही असाच सूर्याचा प्रयत्न राहिला आहे.स्वप्नात सूर्या हा किरणच्या घरी गेला होता. त्यावेळी दोघेही पूर्वीपेक्षा मनमोकळ्याने चर्चेत रमले. तरीही तिच्या वडिलांविषयी त्याच्या मनात भीती कायम होती.मात्र किरणच्या मनात अजिबात भीती नव्हती.उलट पूर्वीपेक्षा तिचा आत्मविश्वास अधिक बळावला होता.सूर्या तिला तिच्या वडिलाबाबत सांगत असला तरी ती हसण्यावर घेत होती.ती सूर्याला हसत हसतच म्हणाली की, "माझ्या पतीनं जसं तुला समजून घेतलं तसंच माझे वडील सुद्धा तुला समजून घेईल." अशी दिलखुलास चर्चा सुरू असताना सूर्याला किरणचे वडील घरी येत असल्याची चाहूल लागली.सूर्या नेहमीप्रमाणे घाबरला.किरण मात्र अजिबात घाबरली नाही.उलट तिच त्याला धीर देत होती.तिच्या वडिलांच्या भीतीने सूर्यानं घरातच लपण्याचा प्रयत्न केला.पण तिच्या वडिलांच्या नजरेतून तो काही सुटला नाही.सूर्या तिच्या वडिलांच्या नजरेत पडताच त्याच्या वडिलांच्या रागाचा पारा अधिक चढला.त्यांनी सूर्याची चांगलीच खरडपट्टी काढली.सूर्या हा कसलीही प्रतिक्रिया न देता केवळ ऐकत होता.वाद विकोपाला जाऊ नये म्हणून किरणने स्वतः पुढाकार घेत मध्यस्थी केली.तिने तिच्या वडिलांची समजूत काढली.सूर्या कसा व किती चांगला आहे हे तिने तिच्या वडिलांना पटवून दिलं.अखेर तिच्या वडिलांचा गैरसमज दूर झाला.त्यांनाही त्याच्या वागण्याचा पछाताप वाटू लागला.हे सर्व स्वप्नात होतं,प्रत्यक्षात नाही.(निष्कर्ष :- सूर्याला:- किरणचा पती अजय आणि वडिलांनी समजून घेतलं होतं.त्याचे संबंध पूर्ववत झाले होते.)
     उपरोक्तप्रमाणे हे स्वप्न जरी असलं तरी वास्तवात यापेक्षा वेगळी काही स्थिती नाही.फरक इतकाच की स्वप्नात किरणनं तिच्या वडिलांची समजूत काढली तर वास्तवात सूर्याने त्याच्या स्वभावगुणांनं आणि व्यवहारांनं किरणचा पती आणि तिच्या वडिलांचं मतपरिवर्तन घडवून आणलं होतं.त्याचं मन जिंकलं आणि विश्वासही संपादन करण्यास यश मिळवलं होतं.किरणच लग्न झालं तेव्हा पासून ति सूर्यापासून कायमची दुरावली असली तरी त्यांनं कधी तिचा सूड उगविण्याचा प्रयत्न केला नाही.उलट किरणला पूरक ठरेल अशीच भूमिका घेतली.भूमिका घेत राहिला.स्वतःचं दुःख,यातना,वेदना अंतर्मनात साठवून आनंदी राहू लागला.किरण पासून आणि तिच्या घरापासून कायम दूर राहू लागला.सूर्याचं कधीकाळी किरणावर प्रेम होतं असं त्याच्या वागण्यावरून कधीच कुणाला वाटलं नाही.वाटणार नाही अशीच त्यांची वागणूक आणि व्यवहार राहिला आहे.तसेच तिचा पती आणि तिच्या वडिलांनी सूर्याचा कितीही राग केला,अपमान केला, तरी त्यांना कधीही प्रत्युत्तर दिलं नाही.उलट त्यांचा मान-सन्मान करीत राहिला.इतकेच नव्हे तर किरणच्या पतीला वेळोवेळी अप्रत्यक्षपणे मदत करत राहिला.त्याची बाजू घेत राहिला.सूर्याचा जेव्हा एक्सीडेंट झाला तेव्हा ज्या गाडीने सूर्याचा अपघात झाला ती गाडी किरणच्या पतीच्या नावाने होती.त्यावेळी सर्व बाजूने गाडी मालकाची पोलीस तक्रार करण्यासाठी सूर्यावर दबाव आला होता पण सूर्या दबावाला बळी पडला नाही अनं पोलीस तक्रार सुद्धा केली नाही.तसेच एका स्थानिक निवडणुकीत पिढ्यान-पिढ्या मधूर संबंध असलेल्या लोकांचा/ गटांचा विरोध पत्करून सूर्यानं अजयच्या पाठीशी उभा राहणं पसंत केलं.असे एक ना अनेक प्रसंग त्याच्या आयुष्यात घडले.हे सर्व त्यांनं किरणच्या प्रेमापोटी केलं होतं.म्हणूनच सूर्याला किरणचा पती अजय आणि वडिलांचं मतपरिवर्तन आणि राग शांत करण्यास यशस्वी ठरू शकला.आजच्या घडीला अजय, तिचे वडील आणि सूर्या यांच्यात अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत.सूर्यावर त्यांचा कमालीचा विश्वास आहे.गावात सूर्यासारखा चांगला आणि मेहनती दुसरा कुणी मुलगा नाही असच त्या दोघांचंही मत आहे आणि हे मत ते चारचौघात मांडण्यासही कधी कचरत नाही.हे सर्व त्यानं प्रेमाने जिंकलं.जे कधी होणार नव्हतं ते सूर्यानं करून दाखविलं.पण आजपर्यंत प्रयत्न करूनही किरणच मन मात्र जिंकता आलं नाही याचं शल्य त्याला आजही आहे.
      सूर्यानं किरणला प्रत्येक वेळी मनोमन जपलं आणि आजन्म जपत राहील यात शंका नाही.किरणला होणारी प्रत्येक वेदना वा दुःखाची झळ तिच्यापेक्षा सूर्यालाच अधिक पोहोचते.अशातच शुक्रवार दिनांक ०२ ऑगस्ट २००२ रोजी किरण आजारी पडली असल्याचं सूर्याला कळलं.तिचं आजारपण ऐकून सूर्या कावरा बावरा झाला.त्याच्या नजरेसमोर किरणची प्रतिमा गरगर फिरू लागली.पण इच्छा असूनही तिला काही भेटता आलं नाही.अर्थात तिच्याकडे जाता येत नव्हतं.त्या दिवशी तो कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी आला होता.वाटेतच अर्थात तालुक्याच्या ठिकाणावरील दवाखान्यासमोर सूर्याच्या गावातील काही मंडळी उभी होती.त्यांच्या बोलण्यावरून किरण दवाखान्यात भरती असल्याचं समजलं.हे ऐकून सूर्या विचलित झाला.नंतर किरणला जिल्ह्याच्या ठिकाणी भरती करण्यासाठी नेलं. तालुक्याच्या ठिकाणावरून जिल्ह्याच्या ठिकाणावर भरती कराव लागल्यानं तब्येत जरा जास्तच आहे यात काही शंका नव्हती.तालुक्याच्या ठिकाणी असताना सूर्या हा दवाखान्याच्या आसपास एक दीड तास थांबला पण भेटीसाठी दवाखान्यात जाता आलं नाही.त्यासाठी सूर्याचं हतबल /निष्पळ प्रेम कारणीभूत ठरलं.
      सूर्या अनं किरण या दोघांची भेट सुप्रियाच्या लग्नात झाली.त्यावेळी ती सूर्यासोबत बिनधास्त बोलली.काही सूचनाही केल्यात.स्वतःला ओळखण्याचा दमही दिला.भविष्यात वेगळं काहीतरी करून दाखविण्याचं स्वप्न दिलं.तुझ्या प्रति सर्वाची अभिमानानं मान ताठ राहील असं काहीतरी करण्याचा रस्ता दाखविला.या भेटी पासून सूर्याला काहीसा दिलासा मिळाला.स्वतःला ओळखण्याची संधी मिळाली.काहीतरी वेगळं करून दाखविण्याचं ध्येय मिळालं.तात्पर्य या भेटीनं सूर्यामध्ये आमुलाग्र असा बदल घडवून आणला.कदाचित ही भेट झाली नसती तर सूर्या सतत भरकटतच राहिला असता.त्या भेटीपासून सूर्यानं स्वतःला सावरलं आणि मेहनतीला बळ दिलं.पुढे त्याच्या प्रयत्नाला यशही मिळत गेलं.कालांतराने त्यांनं त्यांच्या गावी एक छोटासा व्यवसाय सुरू केला.काही वर्षे व्यवसाय सांभाळला. त्याच दरम्यान सन २००४ मध्ये त्याला त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर नोकरीची संधी मिळाली.व्यवसायाबरोबरच नोकरीही सांभाळू लागला.आता त्याचा बऱ्यापैकी जम बसला होता.उच्च शिक्षित म्हणून त्याला गाव परिसरात ख्यातीही मिळू लागली.लग्नासाठी स्थळही येऊ लागलेत.पण तो लग्नासाठी तितका उतावीळ नव्हता.कदाचित तो लग्न करण्यासाठी तयार नसावा.पण सामाजिक रितीरिवाज आणि नातेवाईकांच्या दबावापुढे त्याचं लग्नाविषयीचं मत बदललं.पण त्यात त्यानं अट घातली."मी लग्नासाठी कोणत्याच मुलींना नकार देणार नाही वा नापसंत करणार नाही" या अटीवर तो लग्नासाठी तयार झाला.
       व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आणि नोकरी लागण्यापूर्वी त्याच्याकडे लग्नासाठी एक स्थळ आलं होतं.रितीरिवाजाप्रमाणे पाहणी झाली.तत्पूर्वी सूर्यानं त्या मुलीशी प्रत्यक्ष बोलणं केलं.त्याचं लग्नाबाबतचं मत त्या मुलीसमोर मांडलं.मुलगी अधीक्षक म्हणून नोकरीला होती.सूर्याच्या पसंतीचा विषय नव्हता.त्यांने पहिलेचं सांगून ठेवलं होत की,तो कोणत्याच मुलीला नापसंत करणार नाही म्हणून ! त्या मुलीनं भेटी दरम्यान लग्नासाठी होकार दिला.देण्या-घेण्याचा प्रश्न नव्हता.पण सूर्या नोकरीत नाही म्हणून नोकरी मिळेपर्यंत लग्न स्थगितीचा निर्णय सूर्याच्या कुटुंबीयाकडून मुलीकडच्या कुटुंबीयांना कळविलं होतं.मुलीकडील मंडळी विशेषता  मुलगी नाराज झाली.कुटुंबीयांच्या पश्चात त्या मुलीने व्यक्तिगत होकार कळविण्यासाठी वारंवार सूर्याला निरोप पाठविला.पण हे लग्न होऊ शकलं नाही.विशेष म्हणजे त्या मुलीच्या गावची मुलगी सूर्याच्या गावात दिली होती.(बऱ्याच वर्षांपूर्वी आता त्यांना पाचव्या-सहाव्या वर्गात मुले आहेत) सूर्या त्यांना गाव नात्याने वहिनी म्हणायचा. कांचन वहिनीमार्फत त्या मुलीने सूर्या बाबतीत सर्व काही माहिती करवून घेतली आणि तिचं व्यक्तिगत मत सुद्धा सांगितलं.जणू काही ती सूर्याच्या प्रेमातच पडली !! कांचन वहिनी त्या प्रसंगाच्या खऱ्या साक्षीदार आहेत.
     नोकरी पश्चात सूर्यासाठी लग्नासाठी पुन्हा दोन स्थळ आलेत.एक स्थळ तो नोकरी करतो त्या गावाच्या तालुक्याच्या ठिकाणचे तर दुसरे जिल्ह्याच्या ठिकाणचे.रीतिरिवाजाने दोन्ही मुलीची पाहणी केली.सूर्याच्या पसंतीचा विषय नव्हता.त्यांनं अगोदर सांगितलं होतं की,तो कोणत्याच मुलीला नकार देणार नाही म्हणून ! दोन्ही ठिकाणीसाठी कुटुंबानी फायनलची तारीख निश्चित केली.२१ जानेवारी २००५ (जिल्हा)  व २२ जानेवारी २००५ (तालुका) अशी तारीख निश्चित झाली.शुक्रवार दिनांक २१ जानेवारीला जिल्ह्याच्या ठिकाण वरच्या मुलीशी सूर्याच्या गावी फायनल ठरलं होतं.देण्या-घेण्याचा विषय नव्हता.जिल्ह्याच्या ठिकाणावरची मुलगी ही सूर्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला पसंत नव्हती.मात्र सूर्यानं त्या मुलीला नकार न देता पसंती दर्शविली.इतर मुलाप्रमाणे लग्नाबद्दल त्याची काही फारशी अपेक्षा नव्हती.पसंती-नापसंतीचा विषय नव्हता.कुटुंबातील सदस्य,नातेवाईक जी मुलगी पसंत करतील/पाहतील तीच पसंत करायची असं त्यांचं ठरलेलं होतं.त्याप्रमाणे त्यांनं पसंती दर्शवली.आणि जिल्ह्याच्या ठिकाणी रितीरिवाजानुसार सूर्याचं लग्न पक्क झालं.
      ज्यावेळी सूर्याचं लग्न पक्क झालं त्यावेळी त्याचे लग्नाचे बाबतीत नातेवाईकात/गावात फारशी काही चर्चा नव्हती.तत्पूर्वी सूर्याला किरणची भेट घ्यायची होती.नेहमीप्रमाणे प्रयत्न करूनही त्याला तिला काही भेटता आलं नाही.त्याला त्याचं लग्नाबद्दल असलेलं मत तिच्यासमोर मांडायचं होतं.पण तेही त्याला शक्य झालं नाही.आतापर्यंत सूर्याने किरण प्रति जे जे ठरविलं ते ते कधीच घडलं नाही वा पूर्णत्वास गेलं नाही.प्रत्येक बाबतीत सूर्या यशस्वी ठरला पण किरणच्या बाबतीत मात्र नेहमीच अयशस्वी ठरला.
         शुक्रवार दिनांक २१ जानेवारी २००५ रोजी सूर्याचं लग्न पक्क झालं आणि त्याच दिवशी त्याचा साक्षगंध पण झाला.तत्पूर्वी किरणची भेट झाली नाही.म्हणून तिची भेट घेण्याचं ठरविलं.तसे प्रयत्नही त्यांने चालविलेत.तत्पूर्वी तो किरणच्या घराकडे कधीच जात-येत नव्हता.पण यावेळेस त्यांनं तिच्या घरी जाण्याचं पक्क ठरवून घेतलं होतं.एक-दोन वेळा तसा प्रयत्नही केला.पण त्यात त्याला काही यश आलं नाही.अशातच गुरुवार दिनांक २४ मार्च २००५ रोजी भेटीचा योग घडून आला.तिचे वडील आणि पती गावी नसल्याची पहिलेच खात्री करून घेतली होती.उन्हाची वेळ असल्याने तिच्या घराच्या परिसरातील आसपास तसं कुणीही दिसत नव्हतं.ही संधी साधून त्यांनं तिच्या घरात प्रवेश केला.त्यावेळी घराच्या ओसरीत कुणीच नव्हतं.म्हणून तो आतील खोलीच्या दिशेने जात असतानाच किरण त्याच दिशेने यायला लागली होती.सूर्याला बघून तिला तसं आश्चर्य वाटलं.कारण सूर्या हा पहिल्यांदाच तिच्या घरी आला होता.तिनं स्मित हास्य करीत सूर्याचं स्वागत केलं.तिला आनंदी बघून सूर्याला त्याच्या प्रेमातील पूर्वीच्या आनंददायी क्षणाची आठवण झाली.दोघेही चर्चेत रमलेत.पण सूर्याच्या मनात नेहमी प्रमाणे भीती कायम होती.तो दरवाज्याकडे नजर खिळवून तिच्याशी चर्चा करू लागला.किरणच्या मनात मात्र कसलीही भीती नव्हती.उलट तिच्यात प्रचंड आत्मविश्वास ओतप्रोत भरलेला होता.दोघेही चर्चेत गुंग असताना तिनच सूर्याच्या लग्नाचा विषय हाताळला.तुझं लग्न जुळलं म्हणून समजलं.होय ! तेच सांगायला आलोय.किरण म्हणाली, छान झालं.आता तुझही घर बसणार ! काय!, छान असेल मुलगी? सूर्या म्हणाला, होय ! पण तुझ्यासारखी नाही ! तुझी जागा कुणीच घेऊ शकणार नाही ! ति एकदम भावूक झाली आणि लगेच स्वतःला सावरत सूर्याला म्हणाली, छान आहे म्हणते मुलगी, तू तर डीएसपीची मुलगी केली आहे,तुझं काय,मोठं काम आहे,असे एक ना अनेक प्रश्न एकमेकांना करित ही भेट तशी आनंददायी ठरली.दोघेही भूतकाळात शिरले.किरण भूतकाळाविषयी काही बोलली नाही.पण सूर्यानं किरणला भूतकाळाची आठवण करून दिली.तिने दिलेलं पहिलं प्रेमपत्र आणि फोटो तिच्याकडे सुपूर्द केलं.सोबतच त्यांनं लिहिलेलं छोटेखानी छापील मनोगत (लेख) तिला वाचण्यासाठी दिलं.हे सर्व बघून ती पुन्हा भावुक झाली आणि म्हणाली की,"बाप रे ! इतके दिवस जपून ठेवलं काय हे पत्र,कमाल आहे बा तुझी" त्यावर सूर्या किरणला म्हणाला की,केवळ तुझं पत्रच नाही तर तुला आणि तुझ्या आठवणीला पण कायम जपून ठेवलं आहे.तुझी आठवण झाली नाही असा एकही दिवस नाही.असं सांगतानाच सूर्यानं त्याच्या डाव्या हातावर कोरलेलं तिचं नाव तिला दाखविलं. सूर्याच्या प्रत्येक गोष्टीत तिला आश्चर्य वाटायला लागलं.तिनं सूर्याबाबत कल्पनाही केली नसेल असे वेगवेगळे पैलू तिच्यासमोर आलेत.चर्चेच्या ओघात सूर्या किरणला म्हणाला की,आता पर्यंत मी तुला जिवापाड जपलं.आता माझं लग्न होणार आहे.यापुढे माझं प्रेम हे माझ्या पत्नीसाठी राहील पण तुला मात्र कधीच विसरणार नाही हे ही तितकंच खरं आहे.पण याची झळ माझ्या पत्नीला पोहचणार नाही याबाबत तितकीच काळजी घेणार असल्याचं सांगितलं.अखेर तिला लग्नाला येण्याचं निमंत्रण दिलं अनं जड अंतकरणाने तिचा निरोप घेतला.सूर्या परतीसाठी निघाला पण तिच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही.उलट ती त्याच्याकडे एकटक पाहतच राहिली.सूर्या घराबाहेर आला आणि अखेरची नजर म्हणून मागे वळून बघायला लागला,तर ती आहे तशीच उभी राहून सूर्याकडे एकटक पाहू लागली होती.अखेर सूर्या जड पावलाने घरी परतीच्या दिशेने निघाला..................
(टीप-किरण सूर्याच्या सहवासात असताना "तुम्ही" तर आता "तू" असा उल्लेख करतेय)

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...