*आजही दुविधेतच-----*
*भाग:-सात*
किरण कडून असं विचित्र अनं अविश्वसनीय प्रेमप्रकरण घडेल असं कुणालाच वाटलं नाही.तिच्या गावी प्रेमप्रकरणे झाले नाही असेही नाही.पण किरणचं प्रेमप्रकरण जरा इतरांपेक्षा वेगळं होतं.ते तसे हटके अनं कुणाचाही विश्वास बसणारं नव्हतं.त्यास ऐतिहासिक म्हटल्यास वावगे ठरणार नाही.जे भल्याभल्यांना जमलं नाही ते साध्या भोळ्या पणाचा आव आणणाऱ्या किरणनं करवून दाखविलं.तिचा स्वभावगुण,लाजाळूपणा,सुसंस्कारीपणा,स्वच्छ चारित्र्य,कुणाशी फारशी न बोलणारी,सतत घरात व कामात व्यस्त राहणारी,फारशी घराबाहेर न पडणारी,घराबाहेर पडली तरी खालची मान वर न करणारी कुणालाही आकर्षित करेल असं सौंदर्यवान रूप,अर्थात सर्व गुणसंपन्न मुलगी म्हणून तिची सर्व गावभर ओळख होती.सर्व गावाचा याबाबतीत तरी तिच्यावर मोठा विश्वास होता.साधे भोळे पणाचं उदाहरण म्हणून लोक किरणचा दाखला देत असे.किरण कडून गावाचा असा इतिहास रचना जाईल असं स्वप्नातही कुणाला वाटलं नव्हतं.सूर्याचा तर तिचे लग्न होईस्तोवर विश्वास बसला नाही.पण त्याच्याही विश्वासाला तडा गेला.म्हणूनच इतरापेक्षा त्याच्या प्रेम प्रकरणाला जरा वेगळी कलाटणी मिळाली.म्हणून त्याचं दुःख आणि वेदना इतरांपेक्षा वेगळ्या आहेत.त्याचं दुःख त्यालाच माहित आहे.तो इतर कुणाजवळ सांगूही शकत नाही.सांगतानाही त्याची त्यालाच लाज वाटते.आपलं म्हणून असं हक्काचं कुणी त्याच्या कडे नव्हतं.ज्यांचेवर भिस्त होती त्या समीर आणि सानिया यांनी सूर्याकडे कधीचीच पाठ फिरवली होती.ते दोघेही केवळ किरणच्या संपर्कातील राहिलेत,आहेत.त्यांच्यापासून ते केव्हाचेच दुरावले होते.समीर फक्त मित्र म्हणून सोबत आहे.मित्र म्हणून बोलतो पण किरणचा विषय हाताळत नाही.सानिया तर साधं बोलणं बरेच बरे साधं भेटणंही टाळत होती.शिवाय यदाकदाचित ती नजरेत पडली,अनवधानाने भेट झाली तर दूर वरूनच पळ काढायची.विशेष म्हणजे समीरनं किरणकडे नोकरीच स्वीकारली.त्यामुळे समीरची किरणशी दररोज नित्यक्रमाने भेट व्हायची.तरीसुद्धा तो किरणच्या विषयावर कधीच बोलत नाही.तात्पर्य समीर आणि सानिया हे दोघेही किरणच्या कायम संपर्कात आहे.तिच्याशी जवळीक ठेऊन आहे पण सूर्यापासून ते दोघेही मनानं कोसो दूर आहेत.समीर काही त्या विषयावर बोलत नाही.सानिया संपर्कात येऊ देत नाही.ज्या दोघांवर सूर्याची खरी भिस्त होती त्या दोघांनीही किरण प्रमाणे पळ काढला.सर्व बाजूंनी सूर्याची कोंडी झाली.म्हणून तो मनातल्या मनात कुडत बसण्यातच रमला.तिच्या विचारांने रात्र-रात्र झोपत नव्हता.झोपत नाही तर कधी कधी एकांतवासात एकटाच ओक्षाबोक्शी रडत बसायचा.कित्येकदा तिच्या आठवणीने सूर्यानं एकांतवासात त्यांच्या अश्रूला वाट मोकळी करून दिली.असे अनेकदा घडले आणि आजही बरेचदा तेच घडत आहे.त्याचे अश्रू पुसायला कुणी नव्हतं.तेव्हा त्याला त्याची बालमैत्रीण पणतीची आवर्जून आठवण व्हायची.पण ती सुद्धा तिचे सासरी होती.कदाचित ती असती तर त्याला आधार मिळाला असता.तिच्याजवळ त्याला दुःख व्यक्त करता आलं असतं.मनमोकळेपणानं रडता आलं असतं.ती त्याचं दुःख समजून घेऊ शकली असती.कधी कधी तर त्याला तिचे गावी जाऊन सर्व काही सांगून मनमोकळं करावं असं वाटायचं.पण तिला अशी विचित्र प्रेमकहाणी सांगण्याची सूर्याची हिम्मत झाली नाही.कदाचित तिनं ऐकून घेतलं असतं आणि सूर्याला अपेक्षित असलेल्या प्रश्नाची उत्तरे ती किरण कडून मिळवू शकली असती आणि सूर्याच्या मनाला न झेपणारा भार निदान काही प्रमाणात तरी हलका झाला असता.एवढी खात्री सूर्याला होती.दुर्दैवाने कित्येक वर्षापासून पणती आणि सूर्याची कधी भेट झाली नाही.कालांतराने भेट झाली तरी त्याला त्याचं विचित्र प्रेम प्रकरण तिच्यासमोर मांडता आलं नाही.
सूर्यानं किरणवर निस्वार्थ प्रेम केलं.कदाचित तिला प्रेमाची परिभाषा काही समजली नाही.इतर मुलं-मुली जसे शारीरिक आकर्षणातून धरसोडीच प्रेम करतात तसाच सूर्याबद्दलही तिचा समज झाला असावा.त्याने तिचेवर कधीच शारीरिक आकर्षणातून नव्हेतर अंतर्मनातून प्रेम केलं.कदाचित हीच त्याची चूक असावी.तिचा नवा घरठाव बघून कधी कधी सूर्याला असं वाटायचं की किरणचं त्याच्यावर प्रेम वगैरे काहीच नव्हतं.त्याचा केवळ वापर करायचा अनं आपला हेतू साध्य करायचा असच काहीसं तिनं ठरविलं असावं.सूर्या तिच्या अशा तकलाटू प्रेमाला/व्यवहाराला प्रेम समजून बसला.खरं तर तिला सूर्यासोबत प्रेमाचं नाटक करायचं होतं असंच वाटतय.प्रेम कसंही करा ते काही केल्या लपून लपत नाही.यातून बदनामी होणं स्वाभाविक प्रवृत्ती आहे.सूर्या किरण अशा बदनामीस कसे अपवाद ठरतील.सूर्याच्या बाबतीत असंच घडलं.सूर्याच्या नावाने बदनामी झाली किंवा घडवून आणली.परिणामतः तिच्या आई-वडिलांचं संपूर्ण लक्ष हे सूर्यावर केंद्रित झालं.म्हणून अजय बाबतीत कुणालाही विशेषतः तिचे आई वडीलांना शंका येण्याचं काही एक कारण नव्हतं.घडलंही तसंच.एकीकडे सूर्याकिरणच्या प्रेम प्रकरणाची सर्वत्र चर्चा झाली तर दुसरीकडे अजय किरणच्या प्रेमाची (लफडयाची) फुलबाग बहरली.सूर्याचं नाव पहिलेच डंक्यावर असल्याने तिच्या आई-वडिलांचं संपूर्ण लक्ष हे सूर्यावर केंद्रीत झालं.अजय बाबतीत शंका येण्याचं तसं काही एक कारण नव्हतं.अजय-किरण यांचेतील नातेसंबंध बघता असे काही घडणारच नाही अशी खात्री होती.किरण-सूर्याच्या बदनामी नंतर पुढील घटनाक्रम असाच घडला.अजय-किरण विवाहबद्ध होऊन इतिहास घडविला.किरणला अपेक्षित असं सर्व काही व्यवस्थितरित्या मिळालं.पण सूर्याचं संपूर्ण आयुष्य बिघडलं.कदाचित तिने अजय सोबत असलेल्या प्रेम संबंधाची पूर्वकल्पना दिली असती तर तो तिच्या पासून सन्मानाने बाजूला झाला असता.पण दुर्दैवाने किरणनं असं काही धाडस दाखविलं नाही.उलट तिनं सूर्याच्या आयुष्याशी खेळण्यास धन्यता मानली.
सूर्यानं किरणला नेहमीच जिवापाड जपलं.प्रेमही निभविलं.तिला अपेक्षित दिशेनेच वाटचाल राहिली.तिचे मतानुसारच पुढील निर्णय घेणार होता.तिची विवाह करण्याची इच्छा असती तर त्याची विवाहासाठी काही एक अडचण नव्हती.तिने त्याच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला असता तर त्याने एकाएकी विवाहाचा निर्णय घेतला नसता.सूर्याने सर्वप्रथम तिची समजूत काढली असती.विवाहाचा निर्णय घेण्यासाठी वेळ दिला असता.इतरांच्या प्रेमविवाहाची उदाहरणे तिचेसमोर ठेवली असती.आंतरजातीय विवाहाचे चांगले वाईट परिणाम तिच्यासमोर मांडले असते.सर्व बाबीचा तपशीलवार विचार करून तिच्या संमतीने निर्णय घेतला असता.जबरदस्तीने नाही.सूर्यालाही तिच्या निर्णयाची प्रतीक्षा राहिली असती.त्यालाही स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेळ मिळाला असता.तिचे प्रेम मिळविण्यासाठी त्यानेही प्रचंड मेहनत घेतली असती.पण तसं काही घडलं नाही.उलट त्याच्या आयुष्यात न थांबणारं वादळ आलं.त्याच्या आयुष्याचं वाळवंट झालं.परिणामतः अजयचं प्रेमप्रकरण (लफडं) आणि पुढील घटनाक्रम समजल्यानंतर त्यावर्षी तो पदवीच्या दुसऱ्या वर्षाला चक्क नापास झाला.पुढील शैक्षणिक काळातही सूर्याला असेच काहीसे धक्के बसले.पदवीनंतर पुढील शिक्षणासाठी तो जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला गेला.घरची परिस्थिती जेमतेम असल्याने त्यानं कॉलेज सोबतच खाजगी नोकरी स्वीकारली.त्यातून पुढील शिक्षण पूर्ण केलं.पण तिच्या आठवणीतून तो अद्यापही बाहेर पडला नव्हता.पदव्युत्तर परीक्षेसाठी केवळ दोन वर्षे लागतेय त्यासाठी त्याला तब्बल चार वर्षे लागलीत.कारण तो किरणच्या विरहातून सावरता सावरेना!! तिच्या विरहात तो चांगलाच रमला.तो कसा राहतो, कसा वागतो त्याचं त्यालाच भान नव्हतं.ऐन उमेदीच्या वयात तो पूर्णपणे भरकटला.दिशाहीन झाला.कावरा-बावरा राहायला लागला.आपण सर्व काही गमावून बसलो आहे.आपल्या जगण्याला काही अर्थ उरला नाही असं त्यांनं मनाशी ठरवून घेतलं.तो त्याच्या दुनियेतून बाहेर पडण्याची काही चिन्हे दिसत नव्हती.सतत यशाच्या शिखरावर असलेला सूर्या आता अपयशाच्या दिशेने सुसाट निघाला होता.त्याच्यासोबतचे सवंगडी जे त्यांचेशी शैक्षणिक स्पर्धा करायचे ते सर्व सवंगडी यशाच्या दिशेने कितीतरी दूर गेले.सूर्या मात्रा अपयशाच्या रस्त्यातच अडकला.काळ कुणासाठी थांबत नाही.सूर्याच्या बाबतीत असंच झालं.काळाच्या ओघात सूर्या कितीतरी मागे पडला.सूर्या असा का वागतो,राहतो याचं रहस्य कुणालाच उलगडत नव्हतं.ज्याला माहीत आहे ते त्यांच्या फारसे संपर्कात नव्हते.सूर्या भरकटत चालला आहे हे त्याच्या सवंगड्यांना कळून चुकलं होतं.म्हणून त्याचे सर्व सवंगडी त्याची समजूत काढू लागलीत.पण सूर्या समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.तो पूर्णतः किरणच्या विरहात विसावला होता.तिच्या शिवाय त्याला दुसरं काहीच दिसत नव्हतं.चूक किरण कडून घडली शिक्षा मात्र सूर्या भोगू लागला.कदाचित किरण कडून अशी चूक झाली नसती आणि सूर्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असती तर सूर्यांनं हवं ते यशाचं शिखर गाठलं असतं.पण तसं काही घडलं नाही.सर्व या उलट घडलं.तिचा निर्णय हा सूर्यावर उलटला.खऱ्या अर्थाने अजय किरणच्या प्रेमात सूर्याचा बळी गेला.
किरणने सर्व बदनामीचा ठपका हा सूर्यावर ठेवला. वास्तविकता बदनामी होणार नाही यासाठी सूर्यानं.पुरेपूर काळजी घेतली.पण हेमंत व त्याच्या साथीदारांकडून सूर्या किरणचं प्रेम बदनाम करण्यासाठी कसलीच कसर सोडली नाही.हे तिच्या लक्षात आणून देण्यास तो अपयशी ठरला.पण या एकमेव कारणासाठी किरण ही सूर्यापासून कायमसाठी दूर झाली.तरीही सूर्या हा किरणचं हितच जोपासत आहे.तसं वागायचं असतं तर कधीचाच तिला जाब विचारला असता.बदनामी व्यतिरिक्त नाकारण्याचे कारण काय या प्रश्नाचे उत्तर घेतले असते.त्यांच्याकडे असलेली सत्याची बाजू आणि सर्व पुराव्याच्या आधारे तिला भेटण्याचा प्रयत्न केला असता.तिच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला असता.खऱ्या प्रेमापोटी तो इतराप्रमाणे असं काही करू शकला नाही.तिला प्रेम नाकारण्याचं कारण कधीच विचारलं नाही.सूर्या व्यतिरिक्त कुणीही असत तर त्यांनं त्याच्या प्रश्नाचे उत्तर घेतलं असतं.तो तिच्या सुखाला स्वतःच सुख मानत असे.म्हणून तो तिच्या पसंतीच्या विरोधात कधी गेला नाही.सर्व अन्याय,दुःख,यातना स्वतः सहन करीत आहे पण याची झळ मात्र तिला पोहोचण्यासाठी कधीच पुढाकार घेतला नाही.उलट तो तिचा पती आणि किरणच्या नजरेपासून सदैव दूर राहिला.असे वागण्याची कल्पना लोकांना काय तर स्वतः किरणला सुद्धा येऊ दिली नाही की किरण आणि सूर्यात कधीकाळी प्रेम होतं म्हणून.तब्बल सहा वर्षाचा कालावधी लोटला.तरीही तो तिच्या नजरेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो.सूर्याचं तिला स्मरण होऊ नये आणि तिच्या पतीला सूर्या-किरणच्या भूतकाळाची आठवण होऊ नये असंच अशा वागण्या मागे सूर्याचा मूळ हेतू आहे.असं वागण्यात सूर्याचा कोणता स्वार्थ दडला आहे? सहा वर्षाच्या पश्चातही किरण ही सूर्याला समजू शकले नाही.सूर्याच्या प्रेमाची महती कळू शकली नाही.याचं शल्य सूर्याला आहे.कारण सूर्या आजही किरणवर पूर्वीप्रमाणे जिवापाड प्रेम करतोय.किरणचं लग्न झालं म्हणून तिने तिच्या पतीशी प्रामाणिक राहावं असं सूर्यालाही वाटतं.पण तिनं सूर्याचं प्रेम समजून घ्यावं एवढचं सूर्याला अपेक्षित आहे.कारण तिचं लग्न होऊन सुद्धा तो किरणच्या प्रेमाप्रति आजही तितकाच प्रमाणिक आहे.तिच्या लग्नानंतरही सूर्याचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू आहे.तसा तो हुशार अनं दिसायलाही बऱ्यापैकी आहे.त्याच्या महाविद्यालयीन जीवनात कुठलीच मुलगी आली नाही असे नाही.कधी येण्याचा प्रयत्न केला नाही असं कधी झालं नाही.तदनंतरही अनेक मुलींनी त्यांच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न केला.पण त्यानं कधीही किरणची जागा कुणाला दिली नाही.उलट त्यांन त्याचं स्वतःचं भूतकाळात असलेलं प्रेम सांगून तो प्रेम प्रकरणाच्या भानगडीत पडला नाही.कारण सूर्याच्या जीवनात किरणच्या व्यतिरिक्त कुणासाठीच प्रेम शिल्लक नाही.केवळ त्याचं किरणवर प्रेम आहे आणि कायम राहील.सामाजिक प्रथेनुसार विवाह झाल्यानंतर केवळ पत्नीसाठी प्रेम राहील एवढे मात्र खरे.ज्याप्रमाणे तो किरणशी प्रामाणिक राहिला तसाच तो पत्नीशी सुद्धा तितकाच प्रामाणिक राहील असं त्याच्या व्यवहारावरून सहज लक्षात येतय.
किरणनं नाकारल्यानंतर आणि ती विवाहबद्ध झाल्यानंतर कुठल्याच मुलींनं त्याच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न झाला नाही असं कधी घडलं नाही त्यालाही असा अनुभव येत गेला पण त्यांनं कुणालाच प्रेमाची हिरवी झेंडी दाखवली नाही.ज्या मुलीकडून असा प्रयत्न झाला आहे अशा मुलीच्या प्रेमात पडण्याऐवजी त्याने त्यांची समजूत काढण्यास प्राधान्य दिले.म्हणून अशा मुलींना सूर्या हा कायमचा लक्षात राहिला.शिक्षित,सात्विक, समजूतदार आणि त्याचा प्रामाणिकपणा त्यासाठी कारणीभूत ठरला.असाच प्रसंग नोव्हेंबर १९९८ या महिन्यात घडला.त्याच्याच गावातील एका मुलीचं सूर्यावर प्रेम जडलं.ती सूर्यावर किती दिवसापासून आणि किती प्रेम करते हे सांगण्यासाठी तिने गावातीलच एका मुलाकडे निरोप पाठविला.सूर्याला आश्चर्य वाटलं.कारण त्या मुलीला सुद्धा सूर्या-किरणचं प्रेम प्रकरण चांगलं ठाऊक असूनही तिनं सूर्यावर प्रेम करण्याचं धाडस दाखविलं.एका सुंदर मुलीला नकार देणं सूर्यासाठी सोपं नव्हतं.त्याचे कडे केवळ किरणसाठी प्रेम आहे इतर मुलीसाठी नाही.मग अशा स्थितीत तो त्या मुलीला कसा होकार देणार? म्हणून सूर्यानं त्या मुलीला समजावून सांगण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी त्याने गावातील बीकेजी नावाच्या व्यक्तीची मदत घेतली आणि त्यांचेकडून तिची समजूत काढली.कदाचित किरणलाही त्या मुली बाबतीत कल्पना आली असेल.कालांतराने सूर्याला समजलं की,ती मुलगी नेहमी किरणच्या संपर्कात असते.सूर्यानं त्या मुलीला नकार कळविला.कदाचित त्या मुलीचा गैरसमज झाला असावा किंवा वाईट वाटलं असावं पण सूर्याकडे दुसरा पर्याय नव्हता.आता जेव्हा केव्हा ती मुलगी सूर्याच्या नजरेत पडते तेव्हा तेव्हा ती मुलगी त्याचे समोर नजर झुकविते.त्या मुलीची सूर्याकडे बघण्याची आजही हिम्मत होत नाही.इतके मात्र खरे की,ती मुलगी आणि सूर्या या दोघांमध्ये कधीच संवाद झाला नाही.
सूर्याच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगी सूर्याला "एस" नावाच्या मुलीची आवर्जून आठवण होते.एस ही जेव्हा पासून सूर्याच्या संपर्कात आली तेव्हापासूनच ती त्याच्यावर प्रेम करतेय.तिनं कधी तिचं प्रेम सूर्यासमोर व्यक्त केलं नाही.अप्रत्यक्षरित्या तिनं सूर्यावर अपार प्रेम केलं.ते सूर्याच्याही लक्षात आलं होतं.कारण त्या दोघांनीही इयत्ता पाचवी ते कॉलेज पर्यंतच शिक्षण सोबत केलं वा शिकले.त्याचं प्रेम तर केवळ किरणवर जडलं होतं.म्हणून त्यांनं एसची समजूत काढली आणि खरं काय ते सांगितलं.त्याप्रसंगी एसनं सूर्यासमोर मूकपणे सर्व ऐकून घेतलं त्यावर तिनं अध्यापही भाष्य केलं नाही.विशेष म्हणजे ती सूर्या प्रती कायम प्रामाणिक राहिली.तिच्या पतीव्यतिरिक्त तिच्या आयुष्यात असं कुणी आलं असं कधीच ऐकण्यात आलं नाही.दृष्टीत पडलं नाही.योग्य निर्णयाअभावी "अति शहाणा, त्याचा बैल रिकामा" अशी सूर्याची गत झाली.
"जो इतिहास विसरतो,तो इतिहास घडवू शकत नाही" असं म्हटलं जातं.मात्र किरणच्या बाबतीत हे लागू पडत नाही.किरण इतिहास विसरली मात्र इतिहास घडविला.ज्यांनं सर्वंकष दृष्टिकोनातून प्रेम केलं त्याला तिनं नाकारलं आणि ज्यांनं अपेक्षा ठेवून शारीरिक आकर्षणातून प्रेम केलं त्याला स्वीकारलं.खरं प्रेम करणाऱ्याला इतिहासात जमा केलं.पश्चाताप, दुःख, यातना,अपमानित जीवन त्याच्या वाट्याला भरभरून दिलं.म्हणून तो बऱ्याच काळ पर्यंत पश्चातापाच्या आगीतून बाहेर पडला नाही.जेव्हापासून सूर्याला तिनं नाकारलं तेव्हापासून प्रत्येक दिवस त्यांनं तिच्या आठवणीला अर्पण केला.असा एकही दिवस नसेल की त्या दिवशी सूर्याला किरणचं स्मरण झालं नाही.कित्येक रात्रा त्यांनं तिच्या आठवणीत जागून काढल्यात. अनेकदा डोळ्यातून अश्रू गाळलेत.ओक्साबोक्षी रडला.आजही त्याची स्थिती यापेक्षा काही वेगळी आहे असे ठामपणे म्हणता येत नाही.असं असह्य जगणं आयुष्यभरासाठी त्याच्या वाट्याला आलं.कदाचित हे अतिशयोक्तीपूर्ण वाटेल पण त्यात शतप्रतिशत सत्यता आहे.तिच्या आठवणींनं दररोज त्याच्या पदरी निराशा येतेय.त्यातच किरणच्या वडिलांचा सूर्यावरचा जो राग आहे तो अजूनही कायम आहे.त्यांच्या मुलीच्या हातून जो इतिहास घडला त्यात सूर्याचा काय दोष? तरिही सूर्याला किरणच्या वडिलांकडून आजही अपमानित व्हावे लागत आहेच शिवाय गावातील लोकही त्याला डीवचून अपमानित करतात.तिच्या लग्नापूर्वी आणि तिच्या लग्नापर्यंत "एक फुल दो माली" यात सूर्याचा अधिक अपमान होत राहिला.किरणनं स्वतःच घर बसविलं आणि संसारात रममान झाली.पण सूर्याला कायमच्या वेदना देऊन गेली.विशेष म्हणजे ती संसारात रममान झाल्यानंतर तिला कधी सूर्याचं स्मरण व आठवण झाली असेल असं काही वाटत नाही.पण मध्यंतरीच्या काळात तिच्या आईला मात्र आवर्जून आठवण झाल्याशिवाय राहिली नाही.कदाचित तिच्या आईला सूर्याच्या प्रामाणिकपणा बाबतीत कसलीही शंका नसावी.सूर्या भरकटत चालला आहे हे त्यांच्या लक्षात आलं असावं म्हणून सूर्याच्या भवितव्याविषयी चिंता करीत असावी.तिच्या आईनी अनेकदा सूर्या बाबतीत विचारणा करायची असे अनेकजण वेळोवेळी सूर्याला सांगत असे.तसाही सूर्याला तिच्या आईबद्दल नेहमीच आदर राहिला आहे.कारण जेव्हा किरणच्या वडिलांना प्रेमप्रकरणाविषयी माहीती झाली तेव्हापासून तिच्या आईला अधिक त्रास व्हायला लागला.असं अनेकांकडून सूर्याला कळलं.किरणच्या वडिलांनी किरण बरोबर तिच्या आईला पण अधिक त्रास दिल्याचे सर्वश्रुत आहे.यात तिच्या आईचा काय दोष? इतकेच काय तर किरण अजयच्या लग्नप्रसंगालाही तिच्या आईलाच अधिक जबाबदार धरण्यात आलं.तिच्या लग्नाची आवई जेव्हा उठली तेव्हा तिच्या आईला बाजूला ठेवून स्वतः पुन्हा नव्याने लग्न करण्याचा घाट तिच्या वडिलांनी घातला असल्याचेही सर्वश्रुत आहे.लोकांनी त्यांची समजूत काढली म्हणून सर्व अनर्थ टळला.इतका शारीरिक व मानसिक त्रास किरणच्या आईला सहन करावा लागला.
खरं प्रेम काय असतं हे किरणला कळलंच नाही.सूर्या तर किरणवर आजन्म खरं प्रेम करतोय आणि निभावतो सुद्धा.पण ज्या हेतूने त्यांनं प्रेम केलं तो हेतू काही साध्य झाला नाही.याचं शल्य त्याला आजही आहे.म्हणून सूर्याला तिच्या बाबतीत अनेक प्रश्न पडतात.कारण ते दोघेही एकमेकांच्या सहवासात असताना सूर्या कधी किरणच्या इच्छेविरुद्ध वागला नाही. तिच्या म्हणण्याप्रमाणे त्याची वागणूक राहिली.जेव्हा जेव्हा ती सूर्याला भेटायची तेव्हा तेव्हा ती सूर्याला काही ना काही सूचना करायची आणि सूर्या त्या सूचनेचं तंतोतंत पालन करायचा.तिने दिलेला प्रत्येक शब्द त्याने कधीच मोडला नाही.ज्या आनाभाका घेतल्या त्याही निभावल्यात.पण तिला यातील काहीच आठवत नाही.पण सूर्याचा कल आजही तिच्याकडेच आहे.म्हणूनच एका नवोदित कवीची काव्यरचना त्याच्या दृष्टीपटलावर नेहमीच तरळते ती अशी,
"पानझडीच्या वाळवंटात
शोधत असतो तुझेच नेत्र
अजून वाट सापडत नाही
केव्हा संपेल ग हे पहिले सत्र
नयनाची एवढी ओढ की,
तेव्हा तुझ्याकडेच वळतात
तू समोर असूनही दिसत नाही
म्हणून तुझ्या आठवणीत गळतात
मायेची पाखरं संगतीला
तेही प्रोत्साहन देतात
तुझ्यासाठीच मला ते
सर्वस्व अर्पण करतात
तुझ्या मधुर आठवणीत
मी बेचैन होऊन जातो
संध्याकाळी तरी दिसशील
म्हणून मी (दारात) उभा असतो".
जे घडलंय ते अगदी सूर्याच्या दृष्टीनं वाईटच.असं घडायला नको होतं.परंतु टाळी एका हाताने वाजत नाही असं म्हणतात ते खरंच असेल.आपणच एकमेकांना समजून घ्यायला हवं होतं.त्यासाठी एकमेकांनी आपलं मत एक दुसऱ्या जवळ मोकळ करायला हवं होतं.यानिमित्ताने एका शायराचे गीत सहज आठवले म्हणून लिहितो
तो शायर म्हणतो,
कैसे पिएंगे जाम ही क्या
कम है गम पीने के लिए
तेरी तो जरूरत नही बस एक एक
याद काफी है जिने के लिये----!
जरी तू मला आता साथ देणं नाकारलं.तरी मी तुला दोष देणार नाही.अजूनही माझ्यात एवढं बळ आहे की,मी तुझ्या आठवणीत जीवन जगू शकतो.हे बळ कदाचित तुझ्या प्रेमानेच माझ्यात भरलं असेल.बहुतेक वेळा मी स्वतःला आवर घालण्याचा प्रयत्न करतो.याच आशादायी जीवनातलं एक नातं संपलं असलं तरी आयुष्य संपत नाही.आपण त्याकडे दुर्लक्ष करून आपले कर्तव्य जबाबदारी याकडे लक्ष द्यायला हवं.पण तुझ्या आठवणीच्या सागरातून कसा निघणार बाहेर? तुझ्या नकारावर मी उगीचच तुला दोष देऊन तुझ्यावर भार ठेवणार नाही.उगीच स्वतःची चूक तुझ्यावर थोपविनार एवढा मी--- नाही.बस आता मी ही ठरवलं तुला सारखं आठवण करायचं नाही.विनाकारण झालेल्या जखमेवरची खिपले कुरतडावी व त्यातून भळाभळा रक्त बाहेर पडावं अगदी अशाच वेदना तुझ्या आठवणीत जर देत राहतात तर तुझ्या आठवणी मला नकोत! पण शब्दाचे गुंफण करूनही मी या हृदयात दडलेल्या असंख्य आठवणींना बाहेर काढून लावण्यात समर्थ आहे काय? अशावेळी एका कवीचे शब्द आठवते,ते असे,
नाही ! मुळीच नाही !
आता आठवण करणार नाही
परंतु हे विसरलो मी
प्रत्येक क्षण तुझ्या आठवणी शिवाय
कधीच मात्र सरणार नाही
आयुष्य हे संपेल
तुझ्या आठवणीत------------!!!
सूर्याचं व्याकूळ मन तिच्याविना होणाऱ्या वेदना व्यक्त करताना लिहितो की,(साभार-२८/०१/२००२)
असं बरेचदा मला वाटतं की, तुझ्याविषयी प्रेमाचे दोन शब्द बोलावे--- पण वेळ नाही.प्रयत्न नाही.अशातच मी अपराधी ठरल्यासारखे वाटते.अगदी जगावेगळं दूर जावं, एखाद्या उद्यानाच्या ठिकाणी बसावं.तुझ्याशी बोलावं आणि मग बरेच दिवसापासून भेट नसलेल्या व्याकुळ मनाला तुझ्या अधीन करावं--- अशातच झुळझुळ वाहणाऱ्या वाऱ्यानं मला जागं करावं---समोर अधी मधी उडणाऱ्या तुषाराचे अलगद थेंब चेहऱ्यावर यावेत आणि शांततेत कुजबूज करून प्रेमधुंद तुझं मन पडताळून पहावं.अशा या स्वप्न तरंगानं मला वेडं केलं आहे. उघड्या डोळ्यांनी पाहीन आणि मिटलेल्या डोळ्यांनी नुसता भास करणं यात बराच फरक असतो.वर्षानुवर्षे जाणाऱ्या या आयुष्यात मी तुझी आठवण काढण्यात एक एक दिवस घालवितो.रात्री तुझी गोड स्वप्ने असतात तर दिवसा तुझी चर्चा.पण करणार तरी काय?तुझ्या आठवणी व्यतिरिक्त मन रमविण्यासाठी दुसरा पर्यायच कुठं उरतो....माझी शोकांतिका तुझ्याविषयीच असते.तू डोळ्यासमोर असली की,धावत तुझ्याजवळ यावसं वाटतं पण परिस्थितीचं भान होतं.तुझ्या बोलण्याच्या तऱ्हेने पूर्वी तुझ्या नि माझ्या प्रेम बंधनाचा चर्चात्मक विषय बनला होता.तुझ्या आठवणीत मी विचार प्रवाहाने दूर कुणीकडे वाहत होतो.तू प्रत्येक क्षणा-क्षणाक्षणाला प्रेमाने बहरलेल्या मनाला गती दिली.तुझा अबोला पण... पण माझ्या बद्दलचा आत्मिक जिव्हाळा यापुढे मी तुझ्या प्रितीच उत्तरोत्तर प्रसन्न चित्ताने आदर करीन.तुला माझ्या भावना कदाचित जाणवत असतीलच पण आपण यावर कधी बोललोच नाही की,बोलण्याची संधीही दिली नाही. आपण या भावना समजून घेण्याची चर्चा करायला हवी होती.त्यातूनच काही निष्पन्न होणार होतं.पण तू फितूर निघाली आणि माझ्यासाठी फक्त आठवण उरली.तू माझी अवहेलना केली.माणसानं तुलना करावी अवहेलना करू नये.मैत्री आणि प्रेम यात वेगळं नातं असतं. म्हणूनच तर दोन मनाचे मिलन वेड्या जगाला कधीच कळत नाही.प्रेम विरहात सुख आणि दुख दोघांनी समसमान वाटून घ्यावं लागतं.पण त्यात काय तारतम्य मी अबोलच राहिलो आणि तुझी आठवण येतच राहिली आणि मनाच्या कुठल्याही अवस्थेत तुझा विसर पडू दिला नाही.आता तुझे नसणे एक क्षणही सहन होत नाही.तुझा तो अपशब्दाचा बोल सहन झाला असता पण विरह सहन होत नाही.माझे प्रेम म्हणजे एका फुलाप्रमाणे कोमल,चंदनासारखे शितल आणि तुझ्या मनासारखे हळवे होते.ते तू सांभाळले नाही.आताही तू मला भेटली तर तो क्षण माझ्यासाठी अनमोल राहील.
प्रेम द्यावं,प्रेम घ्यावं,प्रेमळ राहावं पण ते प्रेम निस्वार्थी असावं हे तूच शिकवलं होतं ना? तू माझी मी तुझा एवढेच आपण मर्यादित राहायला हव होतं.प्रेम हे अंतर्मनावर अवलंबून असतं.त्याचा कुठल्याही बाह्य गोष्टीशी संबंध नसतो.म्हणूनच तर ते टिकून राहतं.मी दुसऱ्या कुणालाही अनुभवण्याचा प्रयत्न केला नाही.मला फक्त तूच हवी होती.मला तू माझ्या जीवनातून निघून जाण्याचं दुःख होत नाही, दुःख वाटतं ते पुन्हा एकदाही मागं वळून न बघण्याचं..... तुझ्या अबोल प्रीतीचं तुझी आठवण नित्य नवा अनुभव आहे.मनानं तू साधी आहेस खरी.पण हा साधेपणाच मला वेड लावतो.हे प्रेम पाण्यासारखं निर्मळ,फुलपाखरा सारखं चंचल तर पौर्णिमेच्या चंद्रासारखं मोहक असते.माझे मनातले हे प्रेम तुझ्या जिज्ञासू मनाने जाणले नाही आणि त्या मोबदल्यात "आसवाचे देणे" देणे तुला शोभले काय? खूपदा वाटलं,जिच्या मनात आपल्याविषयी प्रेमभाव आहे तिला विचारावं पण साहस झाले नाही वा शब्दही गवसला नाही.प्रेम हे शाश्वत सत्य असतं आणि तेच शाश्वत प्रेम सुखदुःखात साथ देत असतं पण तू मात्र साथ तर दिलीच नाही आणि उगीचच थांब म्हणून निघून गेली.आता तुझ्या डोळ्यांमध्ये एकदा बघायच आहे.तुझा माझ्यावरचा ठामपणा निश्चित करून निश्चित व्हायचं आहे.तुझें प्रेम भेटणं म्हणजे भाग्यच आहे.तुझ्या प्रीतीची रित जाणली नाही पण आता जाऊ दे,आज आता सध्यास्थितीला तुला आठवलं की डोळ्यात न कळत पाणी तरळतं.कशाचा रड येतो म्हणून? याचही भान राहत नाही.तुझ्यातले आणि माझ्यातले नाते म्हणजे फक्त शब्दाची उतरंड.त्यात थोडासा विश्वास,थोडा प्रेमाचा ओलावा व थोडासा आठवणीतला ठेवा.बस! या पलीकडे काही नको.
Comments
Post a Comment