*भाग :- नऊ*
लग्नापूर्वी किरणला भेटून सूर्याचं समाधान झालं.यानंतर तिची कधी भेट होईल याची अजिबात शाश्वती नाही.हे त्याला चांगलं ठाऊक आहे.एक-दोन महिन्याच्या फरकानं सूर्याचं लग्न थाटामाटात पार पडलं.त्याच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात झाली.शिक्षण,नोकरी,व्यवसाय, आणि कुटुंबाला त्यांनं समर्पित केलं.लग्नानंतर प्रारंभीचे दोन वर्षे तो गावी अर्थात कुटुंबातच राहिला.त्यांच दरम्यान त्यांच्या संसारवेलीवर एक फुलही (मुलगी) उमललं.तदनंतर तो नोकरीच्या ठिकाणी राहायला गेला.त्यामुळे पूर्वीप्रमाणे त्याचा गावाशी संपर्क कमी झाला.तो संसारात रमला.गाव सोडलं पण त्याला किरणचा काही विसर पडला नाही.तिच्या आठवणी शिवाय त्यांच्याकडं दुसरं काही नव्हतं.अनेक वेळा ती त्याला आठवणीत घेऊन गेली आणि आजही आठवणीत घेऊन जात आहे.त्याचा आठवणीचा प्रवास काही थांबला नाही.असं घडत असताना तो याबाबतीत कुणाजवळ काहीही व्यक्त न होता तो कुढत बसलाय.अधून मधून तो गावी यायचा पण किरण त्याच्या नजरेत पडेल असं काही नव्हतं. अनाहुतपणे कधीतरी ती त्याच्या नजरेत पडत असे.पण असा प्रसंग विरळाच म्हणावे लागेल.म्हणून आता त्याला तिचा नेमका चेहरा कसा दिसतय हे ही त्याला कळेनासं झालं.ती सहवासात असतानाचा चेहराच त्याच्या आठवणीत आहे.अधून-मधून दूरवरून नजर भेट व्हायची पण ती भेट नसल्यास जमा म्हणावी लागेल.दरम्यानचे काळात सूर्या संसारात रमला पण तिच्या आठवणी काही विसरला नाही.लग्न निमंत्रण देतेवेळी सूर्याने किरणला म्हटलं होतं की, "आतापर्यंत तुला जपलं पण यानंतर---------!!. पण असं काही घडलं नाही.सूर्या त्याच्या पत्नीशी कायम प्रामाणिक राहूनही किरणच्या प्रेमातून काही बाहेर पडला नाही.असं का घडतंय याबाबतीत सूर्या आजही दुविधेतच आहे...
या सर्व घडामोडीत तब्बल २९ वर्षानंतर त्याचे बालमित्र-मैत्रीणी भेटलीत.विशेष म्हणजे सानिया सुद्धा संपर्कात आली.हे सर्व बालमैत्रीण पणतीनं घडवून आणलं.पणती आणि सूर्या कायम संपर्कात असले तरी तिचं गाव जवळ असूनही तिच्याकडे तितकं जाणं-येणं नव्हतं.म्हणून त्यांच्या प्रत्यक्ष भेटी तशा दुर्मिळच.त्यांनं केवळ निखळ मैत्री आणि बहिण भावाचं नातं जपलं.पण त्यांनं त्याचं दुःख आणि होणाऱ्या वेदना कधी सांगण्याचा प्रयत्न केला नाही.पणतीनं सर्वांना एकत्रित केलं. निवडक बालमित्र-मैत्रिणीना एकमेकांच्या संपर्कात आणलं म्हणून सर्वजण जुन्या आठवणीत रमले.योगायोगानं त्याच दरम्यान पणतीच्या लग्नाचा वाढ दिवस आणि जन्मदिवस आला.त्यानिमित्त पणतीकडं सूर्या- साकेतचा अपवाद वगळता अपेक्षित सर्व बालमित्र मैत्रिणी एकत्रित आलेत.त्यामुळे मैत्रीचं रोपट उगवलं.साकेत व सूर्या सहभागी न झाल्याने पणती सह त्याच्या बाल मैत्रीणीनं नाराजीचा सूर आवळला असला तरी मैत्री मात्र अधिक घट्ट झाली.
पणतीने सर्व बाल मित्र-मैत्रिणींना प्रेमाच्या धाग्यात घट्ट जखडून ठेवलं.काही महिन्याच्या फरकाने पणतीने पुन्हा सर्वांना तिच्या घरी एकत्रित केलं.साकेत वगळता सर्वच जण एकत्रित आलेत.सर्वांनी जुन्या आठवणीला उजाळा दिला.उर्वशीनं तर सर्वच जुन्या आठवणी बाहेर काढल्यात.सूर्या उर्वशीचं नातं कसं होतं,त्यांच्यात भांडणे कशी होत होती.सूर्या-उर्वशी तसेच इतरांचे कसे कसे प्रेमप्रकरणे होती हेही चर्चेला यायला लागले.सूर्या हा उर्वशीच्या पाठीमागे कसा होता आणि उर्वशी सूर्यासोबत कशी फटकून वागत होती हेही कुणी सांगायला विसरले नाहीत.असं असलं तरी त्याचं प्रेम प्रकरण काही पुढे सरकलं नव्हतं.त्याच दरम्यान सूर्या किरणकडे एकतर्फी प्रेमात गुरफटला असल्याचं कुणालाच कळलं नाही.दहावीचे परीक्षेनंतर सूर्या-उर्वशी फारसे संपर्कात आले नाहीत.शिवाय एक दोन वर्षाच्या फरकांनं तिचं लग्नही झालं.आता इतक्या वर्षाच्या भेटीनंतर उर्वशीचं प्रेम उतू आलं होतं.उर्वशीचं सूर्यावर कसं प्रेम आहे हेही ती सांगू लागली.इतर मित्र मैत्रिणीनं तिचीच री ओढली.त्यांचं बालपण जागं व्हायला लागलं.इतकं मात्र खरं की,उर्वशीपेक्षा पणतीचं प्रेम प्रकरण कसं प्रसिद्धी झोतात होतं हेही चर्चेच्या ओघात लपून राहिलं नाही.यानिमित्ताने पणतीलाही साकेतला भेटायचं होतं.त्यांचेशी मनमोकळं बोलायचं होतं.साकेतप्रति पणतीची तळमळ कुणाच पासून लपून नव्हती.सूर्या-उर्वशी भेटलेत तसेच साकेत पणतीची भेट व्हावी असं सर्वांनाच अपेक्षित होतं.पण पणतीने तिच्या गावी एकत्रित केलेल्या निवडक मित्र-मैत्रिणीचे भेटी प्रसंगी साकेत मात्र आला नाही.त्यामुळे सर्वांचा विशेषतः पणतीचा अधिक हिरेमोड झाला.तदनंतर तिच्या मैत्रिणीकडे आणि एक वेळ सूर्यानं त्यांची भेट घडवून आणली ही बाब वेगळी.
सर्वजण फोनवर एकमेकांशी बोलायला लागलेत.साकेत-पणती तसेच सूर्या-उर्वशी नित्यक्रमानं बोलायला लागलीत.सूर्यासाठी पणती तर पणतीसाठी सूर्या पुढाकार घ्यायला लागलेत.पणतीची साकेत प्रति जशी तळमळ आहे तशी सूर्याची उर्वर्षीसाठी तळमळ दिसत नसल्याची उर्वशीच्या बोलण्यावरून पणतीच्या लक्षात यायला लागलं.तसं मत पणतीनं सूर्याजवळ मांडलं.पण सूर्यानं त्यावर भाष्य करण्याच टाळलं. उर्वशीला वारंवार फोन करून उर्वशीला जपत असल्याचं त्यानं सांगितलं.सानिया पण उर्वशीला जपण्याचं सूर्याला वारंवार सांगू लागली.सूर्याला सानियाचं आश्चर्य वाटायला लागलं.नाईलाजाने सूर्या सानियाच्या सुरात सूर मिसळायला लागला.पण किरण विषयी काही बोलत नव्हता.कारण सानियाला किरणचा विषय नकोच होता.म्हणूनच तिनं तब्बल २९ वर्षेपर्यंत भेटणं टाळलं. पणतीमुळे सानियाची भेट घडून आली.सानियाला नाराज करून पुन्हा तिला दूर सारायचं नव्हतं.म्हणून त्यांनं सानियाशी संवाद साधताना किरण विषयी फारसा विषय हाताळत नव्हता.
सूर्या-उर्वशी बिनधास्त बोलायला लागलीत.असे असले तरी कालांतराने सूर्याच्या बोलण्यात कुठेतरी अढी असल्याचं पणतीच्या लक्षात यायला लागलं.तसं पणतीने सूर्याजवळ वारंवार मतही व्यक्त केलं.पण त्यांनं तिला किरण विषयी शब्दही सांगितला नाही.पण हे पणतीपासून जास्त दिवस लपून राहिलं नाही.पणतीनं सूर्याच्या मनातील गुपित अखेर उकललं.सूर्यानंही उर्वशी व्यतिरिक्त त्याच्या आयुष्यात घडलेलं सर्व प्रेमप्रकरण पणती समोर उघड केलं.पण यावर सानिया व्यतिरिक्त कुठेच आणि कुणाही सोबत भाष्य न करण्याचा शब्द घेतला.हे सर्व ऐकून तिला आश्चर्य वाटायला लागलं.बहिण भावाचं नातं असूनही इतक्या दिवस त्याचं दुःख, वेदना लपून ठेवल्याचा रागही तिला आला.किरणप्रति रागही अनावर व्हायला लागला.पण सूर्यानं तिला संयम ठेवण्यास सांगितलं.सोबतच उर्वशीला कळू न देण्याचा शब्द घेतला.पणतीला उर्वशी बाबतीत सर्व काही माहित आहे.सर्वांच्या नजरेत सूर्या-उर्वशीचचं प्रेम होतं.पणतीसाठी उर्वशी ही अधिक जिव्हाळ्याची मैत्रीण.पणती उर्वशीला अजिबात दुखवू इच्छित नव्हती.उर्वशीसाठी सुद्धा हे सहन न करण्या पलीकडचं होतं.पणती सूर्याला म्हणाली की, " तू उर्वशीला अजिबात दुखवू नको रे बाबू".सूर्या सुद्धा उर्वशीला दुखू इच्छित नव्हता.पण परिस्थितीपुढे तो हतबल झाला.तरी सुद्धा ती दुखावणार नाही असाच व्यवहार तिचे सोबत करायला लागला."तो किरणला विसरू शकत नव्हता, आणि उर्वशीला दुखवू इच्छित नव्हता".अशा कात्रीत सूर्या अडकला.तीन दशकानंतर उर्वशींनं तिचं खुलं मत सूर्या जवळ मांडलं.बालवयात सूर्याला दुखावलं आता त्याला दुखावणार नाही अशीच तिनं मनाशी खुणगाठ बांधली.सूर्याचंही यापेक्षा काही वेगळं मत नव्हतं.पण तो किरणला विसरू शकत नाही हेही तितकच खरं आहे.उर्वशीच्या भावना दुखावणार नाही असं सूर्यानं ठरवून घेतलं.
सूर्यांनं किरण विषयी असलेलं प्रेम पणती पासून तब्बल २९ वर्षे लपून ठेवलं.त्याचा बालमित्र साकेत तसेच इतर बाल मित्र-मैत्रिणींना या बाबतीत काहीच माहिती नाही.सर्वजण उर्वशीला गृहीत धरून आहे. किरणला माहीत नसताना वा ति त्याला कधीच भेटणार नाही असं माहीत असूनही तो किरणवर प्रचंड प्रेम करतोय याचं पणतीला नवल वाटायला लागलं.पण किरणनं सूर्याला समजून घेतलं नाही याबाबतीत वाईटही वाटायला लागलं.सानिया ही त्याच्या प्रेम प्रकरणाची खरी साक्षीदार आहे आणि तिने अडचणीच्या वेळी सूर्याला सहकार्य न करणं पणतीला अजिबात आवडलं नाही.म्हणून तिनं सानिया कडूनच हे प्रकरण समजून घेण्याचं ठरविलं.उर्वशीच्या चर्चेच्या ओघात सूर्याचं इतर कुणाशी प्रेम प्रकरण होतं काय? असं पणती ही सानियाला वारंवार विचारणा करायला लागली.पण सूर्याचं इतर कोणत्याच मुली सोबत प्रेम प्रकरण नव्हतं असं ति ठामपणे सांगत सुटली.पण तिनं पणतीला किरण बाबत काहीही सांगितलं नाही.उलट सूर्या किरणचे काहीच संबंध नव्हते असं सांगायलाही ती विसरली नाही.तसेच सूर्यासोबत इतक्यावर्षानंतरही सानिया ही किरण विषयी काहीच बोलली नाही.सानिया सोबत बोलताना सूर्यानं जेव्हा जेव्हा किरण बाबतीत विषय हाताळला तेव्हा तेव्हा तिनं किरणचा विषय टाळला.इतकेच नव्हे तर सूर्या किरणचं प्रेम होतं हे मानायलाही तयार नव्हती.सानियाला किरणच्या विषयावर बोलायचं नाही असं सूर्याला कळून चुकलं होतं.ज्या जीवाभावाच्या मैत्रिणीने किरणची गाठ पाडून दिली त्या सानियाला इतक्या वर्षानी भेटल्यानंतर दुखवायचं नव्हतं.म्हणून तो सानियाशी चर्चा करताना किरण विषयी बोलण्याचं टाळायला लागला.कदाचित सानियाला पण हेच अपेक्षित होतं.परंतु, "तू पूर्णपणे बदलली आहे,पूर्वीची सानिया राहिली नाही" असं बोलायचं मात्र विसरत नव्हता.पण सूर्या असा का बोलतोय याचं रहस्य मात्र सानियाला काही उलगडत नव्हतं.म्हणूनच सानिया ही पणतीला सांगू लागली की, "सूर्या माझ्याबाबत असं का बोलतोय" या बाबतीत पणतीला वारंवार विचारणा करायला लागली.पण तिनं एकाएकी काही तिला सांगितलं नाही.त्यातच "पणतीचा जसा स्वभाव होता तसाच स्वभाव आजही कायम आहे,पण सानिया पूर्णपणे बदलली आहे" असं सूर्याचं म्हणणं सानिला चांगलंच खटकू लागलं.सूर्याला विचारणा करूनही त्यांनं तिला खरं काय ते सांगितलं नाही.काही महिन्याच्या फरकाने पणतीनं किरणचा विषय घेऊन सर्व काही सांगितलं.पण "सूर्या किरणचं प्रेम प्रकरण होतं असं मानायला ती अजिबात तयार नव्हती" किरणचं दुसरी कडील प्रेम प्रकरण लक्षात घेता पणतीला पण सूर्यापेक्षा सानियाच म्हणणं अधिक पटायला लागलं.सूर्याने हळूहळू किरणबाबतीत सर्वच प्रसंग पणती समोर ठेवलेत आणि ठामपणे सांगितलं की, "सानियानंच आमची पहिली भेट घडवून आणली आहे".एवढं असूनही किरणचं तुझ्यावर प्रेम होतं असं पणती मानायला तयार नव्हती. "जे पात्र विचारत नाही, तिच्यावर जीव ओवाळतो आणि जे पात्र तुझ्यावर जीव ओवाळते तिला दूर सारतं" असं म्हणून उर्वशीचीच बाजू घेत सूर्याची समजूत काढत असे.पण सूर्याच्या डोक्यातून किरण काही निघत नव्हती.जसं तुझं साकेतवर अजूनही जीवापाड प्रेम आहे,तू त्याला अजूनही विसरली नाहीत तसंच माझंही आहे.फरक इतकाच की,तू साकेत सोबत बोलू शकते पण माझे किरण कडे जाणारे सर्व मार्ग कायमसाठी बंद आहेत असं सांगून सूर्याने त्याचं खरं प्रेम पणतीला पटवून दिलं.
सानिया आणि पणतीची मैत्री पूर्वीपेक्षा अधिक घट्ट झाली.पणती ही सानियाला सूर्याकिरण बाबतीत विचारणा करायला लागली.प्रारंभी सानियाने काही सांगितलं नसलं तरी कालांतराने सर्व काही तिनं पणती जवळ खरं सांगितलं.सूर्या-किरणचे प्रेम कसे घडून आले आणि किरण त्याच्यापासून कशी दुरावली हे सांगून टाकलं.सानिया आणि किरण यांची पूर्वीप्रमाणेच घट्ट मैत्री आहे पण सूर्याबाबत ती किरण सोबत कधीच बोलली नाही हेही तिने प्रामाणिकपणे कबूल केलं.पण तू किती चुकली,आणि भावासारखं प्रेम करणाऱ्या सूर्याला तू किती व कसं दुखावलं याबाबतीतची जाणीव तिने सानियाला करून दिली.सानियालाही तिचं असं वागणं चुकीचं वाटायला लागलं.म्हणून तिनेही सूर्यासमोर तिची चूक कबूल केली.आता पुढं काय करायचं ते मिच ठरविणार आहे अस सानियांने ठामपणे सांगितलं.पुढे सानिया आणि पणती काय भूमिका घेतय याकडे सूर्याचं लक्ष लागलं आहे.
सूर्याचं असलं प्रेमप्रकरण आणि झालेली परवड लक्षात घेता थेट किरणलाच भेटून विचारणा करायची आणि अपेक्षित प्रश्नांची उत्तरे तिचे कडून घ्यायची असं पणतीला वाटायला लागलं.पण अशी घाई करून काही उपयोग होणार नाही अशी सूर्यानं पणतीची समजूत काढली. म्हणून ती किरणकडे जाण्यापासून थांबली.पण सानियाला मात्र जाणीव करून दिली.तीन दशकानंतर या दोघी एकमेकींना भेटल्यात म्हणून सूर्याला किरणबाबतीत असलेलं मत मांडण्यासाठी कुणीतरी हक्काचं मिळालं.इतक्या वर्षापासून त्याने किरणविषयी साठवून ठेवलेले विचार त्यांच्याकडे सांगून त्यांनं डोक्यावरचा भार हलका केला.त्या दोघींनीही एकदा तरी सूर्याची किरण सोबत भेट घडवून आणायचं ठरविलं.आता ही भेट कधी होणार हे सांगता येणार नाही पण त्याला या दोघीच्या रूपात "आशेचा किरण" मात्र नक्कीच मिळाला.
दरम्यान किरणच्या मुलीच्या लग्नाची चर्चा सानिया कडून सूर्याला कळली.गावानजीकच्या गावी तिच्या मुलीचं लग्न ठरलं होतं.जो मुलगा पसंत केला तो मुलगा बालपणी सूर्याजवळच खेळला-बागडला.स्वभाव गुणानं मुलगा तसा खूप छान असल्याचं आणि तिच्या मुलीच्या लग्नाला जाणार असल्याचं त्यांनं सांगितलं.त्याच कालावधीत सूर्याचा धाकटा भाऊ हा दुर्धर आजाराने ग्रस्त झाला.त्याच्या आजारामुळे सूर्याला नेहमी शहराच्या ठिकाणी जावे लागत असे.त्याच्या भावाची तब्येत कधी बिघडेल आणि कधी त्याला दवाखान्यात भरती करावे लागेल याची अजिबात शाश्वती नव्हती.त्यामुळे सूर्या आणि दवाखाना असं त्याचं समीकरण झालं होतं.ज्या दिवशी किरणच्या मुलीचं लग्न होतं नेमकं त्याच दिवशीच्या अगोदरच्या रात्री त्याच्या भावाची तब्येत अचानक सिरीयस झाली.म्हणून त्याला तातडीने जिल्ह्याच्या ठिकाणी भरती करावं लागलं.त्याला रात्रभर आयसीयुत ठेवलं.लग्नाच्या दिवशी सुद्धा त्याची तब्बेत समाधानकारक नव्हती.विशेष म्हणजे सूर्याची धाकटी बहीण आरतीचं पण किरणच्या मुलीच्या लग्नाला येण्याचं ठरलं होतं.पण त्यांच्या धाकट्या भावाच्या अचानक तब्येतीमुळे सूर्या आणि त्याची धाकटी बहीण आरती तेथेच असतानाही लग्नाला जाता आलं नाही.तसेच त्याला आठवड्यातून दोनदा दवाखान्यात भरती करणे बंधनकारक असले तरी त्याची तब्येत कधी बिघडेल आणि कधी दवाखान्यात भरती करावे लागेल याची अजिबात शाश्वती नव्हती.म्हणून सूर्याला वारंवार त्याच्या मूळ गावी जावं लागत असे. दरम्यानच्या कालावधीत सूर्याची अचानक त्याच्या मुळ तालुक्याच्या ठिकाणी परीक्षेसाठी ऑफिसर म्हणून ड्युटी लागली.नव्हे त्याचा धाकटा भाऊ सतत आजारी राहत असल्याने त्याचे कडे लक्ष राहावे तसेच वेळोवेळी त्याच्या मदतीसाठी जाता यावे म्हणून सूर्याने इतर ठिकाणची ड्युटी नाकारून त्याच्या तालुक्याचे ठिकाणी विनंती करून ड्युटी लावून घेतली.त्यामुळे कित्येक वर्षांनंतर त्याला प्रथमच गावी ये-जा करण्याची संधी मिळाली.कधी कधी नियमितपणे तर कधी कधी एक दोन दिवसाचे आड तो मूळ गावी जात असे.कधी कधी मुक्कामी राहत असे.नोकरी लागल्या नंतर त्याला इतके दिवस गावी जायची/मुक्कामी राहायची प्रथमच संधी मिळाली.गावी येता-जाता त्याला तीन दशकापूर्वीच्या आठवणी जशाच्या तशा दृष्टीपटलावर येऊ लागल्यात.त्याने या सर्व गोष्टी विसरण्याचा प्रयत्न केला.पण त्याला ते कदापिही शक्य झालं नाही.उलट पुर्वीपेक्षा अधिक भावूक व्हायला लागला.याच दरम्यान गावी जात असल्याने सूर्याला पूर्वीचे दिवस आठवायला लागलेत.अशातच २८ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या मध्यरात्री किरण सूर्याच्या स्वप्नात आली.सूर्या दहावी-बारावीत असताना ज्याठिकाणी नियमितपणे अभ्यास करायचा त्याठिकाणी किरण आली.त्यावेळी तिने शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान केले होते.ती सूर्यासमोरून गेली पण त्याच्याकडे ढुंकूनही बघितलं नाही.म्हणून सूर्याचा चेहरा पडला.पण काही क्षणातच ती सूर्याकडे परतली आणि त्याचे पाय धरून धायमोकलून रडायला लागली------!!!
तेवढ्यातच सुर्याला झोपेतून जाग आली !!! (निष्कर्ष :-कदाचित तिला तिच्या चुकीची जाणीव झाली असावी ! )
दिवसेंदिवस सूर्याच्या धाकट्या भावाची तब्येत अधिकच खालावली.अशातच अचानक गुरुवार दिनांक ०२ नोव्हेंबर २०२३ रोजी (राष्ट्संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी तिथीनुसार मौन श्रद्धांजली) त्यांनं मृत्यूला कवटाळलं.सूर्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.म्हणून त्याच्या कुटुंबीयांच्या सात्वनासाठी आप्तस्वकीय त्याचे घरी भेटीसाठी यायला लागलीत.काही दिवसाच्या अंतरांने सूर्याच्या बाल मैत्रिणी पणती (जावई),सानिया (जावई),उर्वशी (मुलगा) आणि नंदा (मुलगा) या चौघीजणी कुटुंबियासह सूर्याकडे त्याचे कुटुंबाच्या सांत्वनासाठी आलेत.कुटुंबीयांना भेटल्यात.कुटुंबाचं सांत्वन केलं.रितीरीवाजाप्रमाणे औपचारिकता केली.त्या गावी परतण्यापूर्वी त्यांना सानियाच्या आईला (आजारी असल्याने) भेटीसाठी जाण्याचं ठरलं.सूर्या व त्याच्या आईसह त्याच्या बाल मैत्रिणी सानियाच्या आईच्या भेटीसाठी तिचे घरी पोहोचले.तत्पुर्वी वाटेतच सूर्याची किरणसोबत प्रथम भेट झाली व तिने ज्या घरातून स्वतः होकार दिला ते घर (रामेश्वरराव) त्यांनं पणतीला दाखवीलं.पणतीला किरणचा चेहरा आठवत नसला तरी किरण मात्र पणतीला चांगल्या प्रकारे ओळखतेय.म्हणून पणती जेव्हा गावी येईल तेव्हा घरी आणण्याचं किरण कडून तिच्या दोन मैत्रिणीकडे कधीचचं सांगून ठेवलं होतं.सूर्यानं सुद्धा पणतीला सांगून ठेवलं होतं की, "जर तू बाल मैत्रिणीसह विशेषतः उर्वशी सोबत गावी आली तर किरणकडे जायचं नाही म्हणून". पणतीनही तिच्या घरी जाण्याचं हेतुपुरस्सर टाळलं.वास्तविकता किरणच्या भेटीसाठी पणती अधिक उत्सुक होती.पण यावेळी तिनं सूर्याच्या म्हणण्याप्रमाणे टाळलं.सूर्याच्या बालमैत्रिणी त्याच्या घरी येणार असल्याचं सानिया मार्फत किरणला अगोदर कळलं असावं.म्हणून किरण व त्याच्या बाल मैत्रिणी यांच्यात भेट होऊ नये असं सूर्याला मनोमन वाटत होतं.कारण उर्वशी तशी बिनधास्त बोलणारी आणि ती कुठे काय बोलणार आणि सूर्याच्या संबंधाबाबत बोलण्यापासून उर्वशीला रोखणं तस अवघड काम होतं.सोबतच पणतीला पण एक वेळ किरणला भेटायचं होतं.किरण विषयी पणतीच्या मनात असलेल्या रोषाला अटकाव घालणं वा तिच्या रागावर नियंत्रण ठेवणं वाटतं तितकं सोपं नव्हतं.पण यावेळी पणतीनं स्वतःला आवरलं.त्यातच सानियानं पणती आणि किरण यांच्यात भेट घडून आणायची वा किरणच्या घरी जाण्याचं ठरवून घेतलं होतं.पणतीला किरणच्या घरी आणणार असल्याचं सानिया कडून किरणला अनेकदा सांगितलं गेलं होतं.सूर्याच्या पश्चात किरणला भेटण्यासाठी वा तिचे घरी जाण्यासाठी त्याची काही एक हरकत नव्हती.पण सूर्या सोबत असताना "त्यांची" भेट होऊ नये वा तिचे घरी जाऊ नये असं सूर्याला अपेक्षित होतं.पणतीनं सूर्याचा शब्द पाळला.तिच्या चातुर्याने सूर्याला अपेक्षित असंच सर्व काही घडलं.त्यादिवशी किरणकडे जाण्याचे टाळण्यासाठी पणतीनं वेळोवेळी पुढाकार घेतला तसेच सानिया कडून सुद्धा किरणच्या घरी जाण्यासाठी वा तिला भेटण्यासाठी ठरविल्याप्रमाणे वेळेचा भान राखून तिनेही तिच्याकडे जाण्यासाठी तेवढा आग्रह धरला नाही.म्हणून सूर्याला अपेक्षित असं सर्व काही घडलं.
१० डिसेंबर २०२३ रोजीचे मध्यरात्री किरण ही सूर्याच्या स्वप्नात आली.सूर्या-किरणचा आमना-सामना झाला मात्र किरणने सूर्याकडे ढुंकूनही बघितले नाही.इतकेच नव्हे तर सूर्या प्रति प्रचंड राग तिच्या मनात ठासून-ठासून भरलेला होता.सूर्या प्रति प्रचंड चिड तिच्या मनात घर करून असल्याचे दिसून आले.(निष्कर्ष :-अजूनही किरणच्या मनात सूर्याविषयी राग कायम असावा)
सूर्या परीक्षेसाठी दररोज तालुक्याच्या ठिकाणी जायला लागला.त्याच सुमारास ०५ जानेवारी २०२४ रोजी किरणच्या मामेभावाचा लग्न सोहळा ठरला होता.मुलगी त्याच्याच गावातील असल्याने सूर्या सुद्धा लग्नाला आला होता.या निमित्ताने किती तरी वर्षांनी किरणचं दर्शन होणार होतं.या हेतूनेच त्यांनं लग्नाला उपस्थिती दर्शविली.तत्पूर्वी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास लग्न असलेल्या गावी किरणचा मामा आणि सूर्याची गाडी एकमेकांना क्रॉस झाली.दोघांनीही स्मित हास्य करीत एकमेकांना नमस्कार घेतला.गाडीत मामासोबत बाजूचे सीटवर किरणची आई पण बसली होती.त्यांनी सूर्यावर नजर फिरविली अनं लगेच मानखाली वळविली.सूर्या तालुक्याच्या ठिकाणी निघून गेला आणि ड्युटी करून पुन्हा दुपारी बारा वाजताचे दरम्यान लग्नस्थळी पोहचला.तेथे गावातील अनेकजण त्याच्या नजरेत पडायला लागली.मात्र किरण काही त्याला दिसत नव्हती.लग्न हॉल गचागच भरला होता.म्हणून तो इतर पाहुणे मंडळी सोबत हॉल बाहेरच थांबला.सुई लग्न लावण्यासाठी लग्न हॉलमध्ये प्रवेश केला.तेव्हाही किरण काही त्याच्या नजरेत पडली नाही.लगेच सूर्याला ड्युटीवर पण परतायचं होतं.तरीसुद्धा तो तब्बल तीन तास लग्न समारंभात थांबला.पण किरण काही त्याला दिसली नाही.ती दिसल्याशिवाय वा तिला बघितल्याशिवाय त्याचं काही समाधान होणार नव्हतं.म्हणून तो आत बाहेर करू लागला.त्याच दरम्यान तिचा पती अजय आणि वडिलांची गाठ पडली.दोघांशीही त्यांनं मनमोकळ्या गप्पा केल्यात. इतरांच्याही भेटी झाल्यात.तालुक्याच्या ठिकाणी परतण्यापूर्वी सूर्याने पुन्हा लग्न हॉलमध्ये प्रवेश केला.किरण त्याला कुठेच दिसत नव्हती.तेवढ्यात तिच्या वडिलांची सूर्यावर नजर पडली.त्यांनी सूर्याला आवाज दिला आणि जवळ बसून घेतलं.जवळपास पंधरा-वीस मिनिट त्यांच्याशी चर्चेत घालविले पण किरण काही त्याच्या नजरेत पडली नाही.त्यामुळे त्याचा हिरेमोड व्हायला लागला.तो निराशेतच हॉलच्या बाहेर पडला.इतक्या वर्षाने संधी मिळाली तेव्हा भेटणं नाही,निदान नजरभेट तरी सूर्याला अपेक्षित होती.तो परतीसाठी निघाला पण तिला बघितल्याविना त्याच्याकडून काही राहावल्या गेलं नाही.म्हणून तो काही वेळ पुन्हा रोडवर थांबला.तेवढ्यात कुणाला तरी आवाज देण्याच्या निमित्ताने किरण हॉलच्या गेटवर आली. आणि कुणाला तरी आवाज देऊन लगेच हॉलमध्ये शिरली.त्यावेळी सुद्धा तिची साधी नजरभेटही होऊ शकली नाही.म्हणून सूर्या तिच्या पाठमोऱ्या प्रतिकृतीकडे बघून ड्युटीच्या ठिकाणी परतला.भेट न झाल्यानं सूर्या हिरमुसला. सायंकाळी ड्युटी करून गावी परतत असताना शहराच्या ठिकाणा वरील स्टॅन्डवर सूर्याच्या गावातील वहिनीने (शरद दादाची पत्नी) त्याला आवाज दिला.त्याना पण गावी जायचं होतं.म्हणून सूर्यांने वहिनींना गाडीवर बसवून घेतलं.परतीच्या वेळी वहिनीमुळे पुन्हा लग्न ठिकाणी जाण्याचा योग आला.नवरा-नवरीकडील कुटुंब वहिनीच्या नातेसंबंधातील असल्याने त्यांनीच लग्न स्थळी थांबण्याचा आग्रह केला.यानिमित्त सूर्याला सुद्धा तेथे पुन्हा थांबण्याची संधी मिळाली.नवरी बिदाईची वेळ.सूर्या नेमका त्याचवेळी तेथे पोहचला.सर्वजण बाहेरच उभे होते.नवरा-नवरी गाडीत बसण्याच्या तयारीत होती.किरण दर्शनी भागात म्हणजे नवरदेवाच्या सोबतच होती.किरण आणि सूर्याची एक नजर झाली.सूर्याला बघताच तिने एकदम मान खाली घातली.सूर्याला बघून किरणचा एकदम चेहरा पडला.सूर्या तेथे बराच वेळ पर्यंत थांबला.दरम्यान तो तिच्या वडीलासोबत बोलायला लागला.हे सर्व बघून कदाचित तिलाही आश्चर्य वाटायला लागलं असावं.दोघेही दूरवरून एकमेकाकडे नजर फिरवीत होते.पण तिला आनंद झाला आहे असं तिच्या चेहऱ्यावरून अजिबात जाणवत नव्हतं.नैराश्य तिच्या चेहऱ्यावर प्रकर्षांने दिसत होतं.प्रकृतीही तितकी समाधानकारक वाटत नव्हती.चेहऱ्यावर जी चमक असायला हवी ती सुद्धा दिसत नव्हती.त्यामुळे सूर्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालीत.पण त्या प्रश्नाचे उत्तरे सूर्याकडे नक्कीच नव्हते.म्हणून सूर्या तेथून निराशेतच बाहेर पडला आणि गावी परतला.
२९ जानेवारी २०२४ च्या मध्यरात्रीच्या स्वप्नात किरण ही सूर्याच्या दृष्टीत पडली.त्या दिवशी सानिया ही गावी मुक्कामी होती.ती किरण सोबत संवाद साधणार का? असा विचारांचा घोळ सूर्याच्या मनात सुरू होता.त्याच रात्री किरण ही सूर्याच्या स्वप्नात आली.सूर्या प्रति तिच्या मनात प्रचंड चीड आणि राग असल्याचे स्पष्टपणे तिच्या हावभावावरून जाणवत होतं.तिच्या मनातील प्रचंड राग बघून सूर्या जेव्हा जागी झाला तेव्हा त्याला त्या दिवशी कित्येक तास झोप लागली नाही.
Comments
Post a Comment